रधोंचा विचार समाजाच्या राजकीय आणि सामजिक स्वास्थ्याबद्दलचा

१४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा.

लोकसंख्या वाढ, लैंगिक समस्या ही भविष्य काळातील संकटं ओळखून त्यावर मात करण्यासाठी भरीव कार्य करणारे आणि तरीही कायम टीकेचे धनी झालेले महाराष्ट्राच्या सुधारकी परंपरेतही एकटा पडलेले सुधारक म्हणजे, ‘रघुनाथ धोंडो कर्वे.’ 

रघुनाथ कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा. १४ जानेवारी १८८२ ला मुरूड गावात त्यांचा जन्म झाला. मुरूडलाच प्राथमिक शिक्षण घेऊन ते पुण्याला आले. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून ते प्रथम क्रमांकाने मॅट्रीक झाले होते. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून गणित विषयात एम. ए केलं आणि शाळा आणि कॉलेजमधे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

र.धों. कर्वे गणिताचे प्राध्यापक असले तरी लोकसंख्येच्या वाढणाऱ्या आकड्यापुढे इतर कोणतेही आकडे त्यांना कधी दिसले नाहीत. १९२२ मधे मुंबईतल्या विल्सन कॉलेजात ते होते. त्यावेळी वेगवेगळ्या मासिकांमधून वाढणारी लोकसंख्या, संततीनियमन याविषयी ते लिहित असत. त्यावेळेच्या सनातन्यांना न पटणारी ही गोष्ट होती. विल्सन कॉलेजच्या ख्रिश्चन मिशनरी व्यवस्थापनानेही त्यांना हे काम बंद करायला सांगितलं. पण तत्त्वाशी तडजोड करण्याऐवजी नोकरीवर पाणी सोडणं रधोंना जास्त योग्य वाटलं. त्यांनी विल्सन कॉलेजातली नोकरी सोडली आणि संततिनियमनाच्या कामसाठी स्वतःला पूर्णवेळ वाहून घेतलं.

म्हणून रधोंचं काम अर्धवट राहिलं

१९२१ साली त्यांनी मुंबईच्या परळ भागात भारतातलं पहिलं संततिनियमन केंद्र चालू केलं. त्याच दरम्यान अमेरिकेत सेंगर आणि ब्रिटनमधे मेरी स्टोप्स या दोघीही संततिनियमनाचं काम करत होत्या. मेरी स्टोप्स यांनीही याच काळात त्यांच्या नवऱ्याच्या मदतीने लंडनमधे संततिनियमन केंद्र चालू केलं होतं. संततिनियमन झालं तरच बायकांना चूल आणि मुलाच्या रहाटगाड्यातून स्वातंत्र्य मिळेल असा विचार या मागे होता. 

पण रधों च्या विचार यापेक्षा फार व्यापक होता. संततिनियमन आणि लैंगिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गुप्तरोग आणि नको असलेल्या गर्भधारणेमुळे लैंगिक स्वातंत्र धोक्यात येतं. विशेषतः स्त्रियांना याचा जाच सहन करावा लागतो. ती टाळण्यासाठी काही उपाय असेल तर त्यातून स्त्रिया मोकळ्या होतील आणि स्वतःचं लैंगिक स्वातंत्र्य अनुभवू शकतली अशी भूमिका रधोंनी मांडली.

जेष्ठ्य समीक्षक म. वा. धोंड सांगतात की रधोंची हीच भूमिका त्यांच्या संततीनियमनाच्या कार्याला मारक ठरली. त्यांनी संततिनियमनाचा प्रचार कामस्वातंत्र्याच्या भूमिकेतून केला. म्हणून रधोंचं काम त्याकाळात रूजलं नाही असं विश्लेषण धोंड यांनी त्यांच्या ‘जाळ्यातील चंद्र’ या समीक्षालेखनात केलं आहे.

हेही वाचा : सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

आगरकरांचे खरे वारसदार

या कामासाठी रधोंनी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचं मासिक काढलं. या मासिकात ते कुटुंब नियोजन, संततिनियमन, समागम स्वातंत्र्य अशा विषयांसोबतच धर्माची गरज, निरीश्वरवाद अशा विषयांवरही लिहित असतं. त्यांच्या अशा लिखाणामुळे अर्थातच त्यावेळच्या सनातन्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या मासिकातलं लिखाण अश्लील आहे असा आरोप ठेवून त्यांच्यावर तीनवेळा खटलाही भरण्यात आला होता.
 
रधों स्वतःला आगरकरांचे एकमेव वारसदार म्हणवून घेत. त्याचं कारणंही तसंच होतं. आगरकर त्यांच्या लिखाणातून अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर टीका करत. चपला हा साधा विषय त्यांच्या लिखाणात असे. भारतीय स्त्री-पुरूषांचे कपडे याच्यावर ते टीकात्मक लिहित. संततिनियमनाचा विचार पहिल्यांदा आगरकरांनी मांडला होता. रधोंनी हा विचार पुढे नेला. रधोंही आपल्या लिखाणातून अशाच छोट्या पण महत्वाच्या मुद्दांना हात घालत.

रधोंच्या लेखनाचे आठ खंड संपादन करणारे अनंत देशमुख लिहितात, ‘रघुनाथरावांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी होता. विज्ञानाची कास धरणारा होता. त्यांना अंधश्रद्धा, देवधर्माविषयक खुळचट कल्पना, भुताटकी – मोहनिद्रा इत्यादींविषयीच्या भाकडकथांसंबंधी विलक्षण तिटकारा होता. त्यामुळे जुन्या ग्रंथामधील, भारतीय तत्त्वज्ञानातील. रामायण महाभारतादी महाकाव्यांतील ओंगळ समजुतींवर ते तुटून पडत.’ 

समाजस्वास्थ्याचा भक्कम पाया म्हणजे रधों

समाजस्वास्थ्य मासिकाच्या इमारतीचा भक्कम पाया म्हणजे रधों होते. मासिकामधे छापण्यासाठी मजकूराचं लेखन करणं, अंकाची प्रुफं तपासणं, तिकीटं चिकटवणं, अंकांचे शहरानुसार वेगवेगळे गठ्ठे करण्यापासून ते पोस्टात ते गठ्ठे पोचवण्यापर्यंत सगळी कामं रधों एकट्याने करत. समाजस्वास्थ्य त्यांनी नेहमी तोट्यात चालवलं.

लेखकांना मानधन देऊन त्यांच्याकडून मजकूर लिहून द्यायला त्यांच्याकडे पैसे नसत. मानधनाशिवाय लेखकांकडून लिहून घेणं त्यांना चुकीचं वाटे म्हणूनच स्वतंत्रपणे लेखन करत, फ्रेंच आणि इंग्रजीतल्या मजकूरांचा, कथांचा अनुवाद करून रधों मासिकाची पानं भरत असत. असं असलं तरीही, रधोंशिवाय मासिक चालूच शकत नाही असा समज कुणाचाही झालेला नाही. किंवा मासिकात रधोंशिवाय कुणाचे लेख छापूनच येत नाहीत असंही झालेलं नाही

अनंत देशमुख लिहितात, ‘व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल असं साहित्य ‘समाजस्वास्थ्य’मधून द्यायचं हे रघुनाथरावांचं ध्येय होतं. त्यानुसार वैचारिक शारीर विज्ञान लेखनाबरोबरच, कथा, कविता, नाटिका, एखाद्या कादंबरीचा अनुवादीत भाग असे ललित लेखन आणि पुस्तक परिक्षण, गृहकर्मेंसारखी सदरं त्यांनी त्यातून आवर्जून दिली. नाट्या आणि सिनेमाची परीक्षणे देण्यावरही त्यांचा भर राहिला. अशा वेळी ललित प्रकारांपैकी कथाप्रकारात समावेश होईल असं लेखन त्यांनी विपुल प्रमाणात दिलं.’

रधोंनी लिहिलेल्या या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा फॅन्टसी प्रकारात मोडणाऱ्या नव्हत्या. किंवा समाजसुधारणा करतील अशाही कथा नव्हत्या. त्यांच्या कथेत जातीविषयक संबंध आढळतात. समलिंगी संबंधांचं चित्रण त्यांच्या कथेत आढळतं. वेश्येविषयीच्या कथा होत्या. या कथा दर्जेदार होत्या.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

रधोंच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी अंक निघाला

दर महिन्याच्या १५ तारखेला समाजस्वास्थ्यचा अंक प्रकाशित होत असे. १५ जुलै १९२७ ला मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यानंतर रधोंच्या मृत्यूनंतर १५ नोव्हेंबर १९५३ मधे दुसऱ्याच दिवशी मासिकाचा शेवटचा अंक निघाला.

१० ऑक्टोबर १९५३ ला मुंबईत एका प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात असताना अचानक रधोंची तब्येत बिघडली आणि लगेचच ४ दिवसांत १४ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. तरीही १५ ऑक्टोबरचा अंक लोकांच्या हाती पडला. पुढचा अंक एक महिना आधीच तयार करून ठेवायची रधोंची शिस्त होती. त्यानुसार त्यांनी १५ नोव्हेंबरचा अंकही टंकलिखित स्वरूपात तयार करून ठेवला होता. त्यामुळे समाजस्वास्थ्यचा शेवटचा अंक प्रसिद्ध होऊ शकला.

या अंकाला संपादकीय लेख भास्करराव कर्वे यांनी लिहिला होता. या लेखात त्यांनी रधोंविषयी लिहिलंय. ते म्हणतात, ‘बुद्धिवादाचा प्रचार करण्यात कर्वे यांनी आपली हयात घालवली व त्याचे फळ आजच्या समाजात जे विचार स्वातंत्र्य आढळते त्यात दिसून येत आहे. आजच्या बुद्धिवादाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून जशी आगरकरांची समाजाला आठवण होते. तशीच कदाचित पन्नास वर्षांनंतर लैंगिक बुद्धिवादाच्या त्यावेळेच्या कल्पनांचे प्रणेते म्हणून श्री, र. धों. कर्वे यांची आठवण समाज काढील.’

‘समाजस्वास्थ’ असं रधोंच्या मासिकाचं नाव होतं. समाजाचं स्वास्थ म्हणजेच समाजाचं आरोग्य. सुट्या व्यक्तींच्या एकत्रीकरणातून समाज बनतो. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा परिणाम समाजावर होत असतो. पण समाजाचं स्वतःचं म्हणून एक आरोग्य असतं. त्यात फक्त डॉक्टर्स, दवाखाने, औषधं किंवा लैंगिक आरोग्य यांचा समावेश होत नाही. तर समाज कोणत्या सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक विचारात आहे, याचा विचार केला जातो. थोडक्यात माणूस राहतो ते आसपासचं वातावरणं कसंय या सगळ्याचा एकत्र कोलाज करून समाजाचं आरोग्य बनतं. समाजाच्या आरोग्याचा हा व्यापक विचार र. धों. कर्वे त्यांच्या मासिकातून करत होते.

हेही वाचा : 

महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

र धों. कर्वेंचा बुद्धिवाद अस्सल आणि आरपार होता

सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

अश्लीलता ही काय भानगड आहे: र. धों. कर्वेंचं न झालेलं भाषण

१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!