'भारत जोडो'चं विजन, राहुल गांधींचं नवं वर्जन! - २

०१ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षासोबतच सर्वसामान्यांनाही जोडून घेतलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राहुल यांची उभी केलेली पप्पू ही प्रतिमा या यात्रेमुळे फोल ठरतेय. राहुल गांधींमधे झालेल्या प्रगल्भ बदलाचे साक्षीदार असलेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राहुल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.

या यात्रेत मी ही चालत गेलो. वर्षात १०-१२ वेळा वगळता मी कधीही सकाळी उठून चालत नाही. मॉर्निंग वॉक केलाच तरी दोन तीन किलोमीटर म्हणजे डोक्यावरून पाणी. राहुल गांधींच्या या यात्रेचा अनुभव घ्यायचा म्हणून मीही चालू लागलो.

माझ्यासोबत चंद्रपूरहून आलेले काही मित्र होते. त्यातले काही थकले. पण मी सलग २० किलोमीटर चालत गेलो. इतकं चालल्यानंतर माझे पाय दुखतील, त्रास होईल, असं वाटत होतं. मात्र तेही झालं नाही. माझं मलाच आश्चर्य वाटलं की हा चमत्कार कसा घडला. अर्थात हा चमत्कार भारत जोडो यात्रेनं घडवला.

हेही वाचा: सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

जुन्या यात्रांची आठवण

राहुल गांधी यांना चालताना बघूनच आपल्यात ऊर्जा संचारते हा अनुभव माझ्यासह हजारो लोकांनी या यात्रेत घेतला. राहुल यांच्या वेगानं चालायचं असेल तर सामान्य व्यक्तीला पळावंच लागते, अशी त्यांची चालण्याची गती.

इंदिरा गांधी किंवा महात्मा गांधीही असंच वेगानं चालायचे. राहुल यांना चालताना पाहून या दोघांची आठवण येते. त्यांची संवादाची शैली, सामान्यांचं दुःख समजून घेण्याची पद्धत पाहून तर महात्मा गांधींची आठवण येते.

‘आम्ही महात्मा गांधींच्या दांडी यात्रेत सहभागी होऊ शकलो नाही. आम्ही विनोबा भावेंच्या भूदान यात्रेत होऊ शकलो नाही. म्हणून आम्हाला राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचं होतं. किमान आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना अभिमानानं सांगू की आम्ही भारत जोडो यात्रेत सामील झालो होतो,’ ही या यात्रेत सहभागी झालेल्या बहुसंख्य लोकांची भावना होती.

लोकांचं मतपरिवर्तन होतंय

ही यात्रा सुरू झाली तेव्हापासून राहुल गांधींची भाषणं ऐकणाऱ्या लोकांचं राहुलबद्दलचं मत बदललंय. कोट्यवधी खर्चून, मीम रचून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपकडून राहुल यांची पप्पू अशी जी प्रतिमा रंगविण्यात आली ती किती खोटी आहे हे आता जनतेला कळलंय.

राहुल गांधी हे अभ्यासू, संवदेनशील, तत्वचिंतक, विनम्र आणि जनतेवर प्रेम करणारे राजकारणी आहेत, हे आता त्यांचे एकेकाळचे टीकाकारही मान्य करू लागलेत.
राहुल यांच्याबद्दल आता जे मत लोकांचं होतंय ते मात्र माझं पहिल्या दिवसांपासून आहे.

हेही वाचा: मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

शांत, संयमी नेता

२००४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा मी ईटीवीच्या नवी दिल्ली ब्युरोत पत्रकार म्हणून कार्यरत होतो. काँग्रेसच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं होतं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक भरली.

श्रीमती सोनिया गांधी यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आता त्याच पंतप्रधान होणार असं चित्र निर्माण झालं. या निवडीनंतर सोनियाजींचं अभिनंदन करायला काँग्रेस खासदारांची झुंबड उडाली. हे खासदार रांगेनं येऊन पुष्पगुच्छ देऊ लागले. तेव्हा सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की राहुल गांधी कुठे आहेत? 

स्टेजवर राहुल नव्हते म्हणून पहिल्या रांगेत नजरा गेल्या. तिथंही ते नव्हते. एकेक रांग बघत नजर पुढे गेली तेव्हा कळलं राहुल तर शेवटच्या रांगेत शांतपणे बसलेत. नियमानुसार रांगेत येऊन ते आपल्या आईला आणि काँग्रेस अध्यक्षांना शुभेच्छा देऊन निघून गेले तेव्हा उपस्थितांना त्यांची विनम्रता प्रभावित करून गेली.

खरंतर ते सोनिया गांधी यांच्या बाजूला बसू शकले असते, त्यांच्यासोबत फोटोत येतील असे राहू शकले असते. मात्र ते एखाद्या संन्यस्त व्यक्तीप्रमाणे दूर बसून शांतपणे या साऱ्या राजकीय घडामोडी बघत होते. यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथी, सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारणं, मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी नियुक्ती या काळात कुठंही वरिष्ठांना डावलून ते पुढे पुढे करतायत, असं दिसलं नाही.

संसदपटू म्हणून पहिलं अधिवेशन

त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा संसदेचं अधिवेशन सुरू झालं तेव्हा संसदपटू म्हणून राहुल गांधी कसं काम करतात याकडे आम्हा पत्रकारांचं लक्ष होतं. अधिवेशनाचं कामकाज संपवून खासदार संसद इमारतीच्या बाहेर पडू लागले की त्यांना गाठणं आणि त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करून काही बातमी मिळते का याचा शोध घेणं हा पत्रकार म्हणून माझ्यासारख्या अनेकांचा दैनंदिन कार्यक्रम.

अशातच मी तेव्हा टीवी पत्रकार असल्यानं राहुलसह महत्वाच्या खासदारांच्या विविध विषयांवर बाईट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हा माझ्या नोकरीचा भाग होता. राहुल बाहेर आल्यानंतर अनेकदा मी आणि त्यावेळच्या टीवी पत्रकारांनी त्यांच्या बाईट घेतल्या आहेत. अनेकदा बाईट द्यायला त्यांनी नकारही दिलाय.

या काळात अनेकदा त्यांच्यासोबत संसद परिसरात उभ्या-उभ्या कितीतरी वेळा गप्पाष्टके रंगवण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सोशल मिडिया नसल्यानं आणि राहुलविरूद्ध विखारी अपप्रचार झाला नसल्यानं पत्रकारही त्यांच्याबद्दल ममत्व बाळगून बोलत होते. एक तरूण आणि उद्याचा मोठा नेता म्हणून राहुल यांना जाणून घेण्याचा माझ्यासह अनेक पत्रकार तेव्हा प्रयत्न करत होतो.

हेही वाचा: राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

प्रगल्भ आणि भविष्यवेधी दृष्टी

राहुलचं वागणं अतिशय डाऊन टू अर्थ. कुठंही अहंकार, माज, बनचुकेगिरीचा लवलेश जाणवत नव्हता. उलट तो लाजराबुजरा आहे, टीवीच्या माईकसमोर मोजकं बोलणारा आहे. अर्थव्यवस्था, सामाजिक प्रश्न, धर्मनिरपेक्षता, विविध राज्यांमधला तणाव, काँग्रेस पक्षापुढची आव्हानं, मनमोहन सिंग सरकारचे विविध निर्णय अशा कितीतरी विषयांवर राहुल यांच्याशी तेव्हा कधी निवांत तर कधी चालत-पळत गप्पा केल्या आहेत.

त्याच वेळेस राहुल हा एक परिपक्व, नम्र आणि संवेदनशील नेता आहे, याची प्रचिती आली होती. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंसारख्याच प्रगल्भतेची आणि भविष्यवेधी दृष्टीची क्षमता असलेल्या नेत्याकडे जात असल्याचं समाधानही तेव्हा माझ्यासह अनेक पत्रकारांना वाटत होतं.

लाजरेबुजरे राहुल गांधी

बहुतेक २००५ची गोष्ट. एकदा दक्षिण भारतातून काही महाविद्यालयीन विद्यार्थी संसद भवन पहायला आले होते. हे विद्यार्थी बाहेर पडताना त्यांना राहुल गांधी आम्हा पत्रकारांसोबत गप्पा मारताना दिसले. त्यांनी राहुलला वेढा घालून आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचाय म्हणून एकच कल्ला केला.

राहुल हसत हसत तयार झाले. पण ज्या जागेवर आम्ही उभे होतो ती फोटो काढण्याच्या दृष्टीनं गैरसोयीची होती. त्यामुळे राहुल यांनी स्वतः योग्य ती जागा शोधून विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं. त्यानंतर ते स्वतः त्यांच्यामधे उभे राहिले. या फोटोनंतर एक दोन महाविद्यालयीन तरूणींना त्यांच्या जवळ उभं राहून फोटो काढायचा होता.

या तरूणी जेव्हा त्यांना खेटून उभ्या राहिल्या तेव्हा लाजून गोरा मोरा झालेला राहुल आजही माझ्या डोळ्यासमोर तरळतोय. या फोटोसेशननंतर आम्ही पुरूष पत्रकारांनी तेव्हा राहुलची खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानेही आमच्या या प्रयत्नांना खळाळून हसत दाद दिली होती.

हेही वाचा: स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

काँग्रेस अधिवेशनातली आठवण

त्यानंतरची आणखी एक आठवण. जानेवारी २००६ची. हैद्राबादच्या सीमेवर असलेल्या गच्चीबोली स्टेडियम म्हणजेच आताच्या जीएमसी बालयोगी स्टेडियमवर अखिल भारतीय काँग्रेसचं ८२वं अधिवेशन भरलं होतं. मी काँग्रेस बिट कवर करत असल्यानं दिल्लीहून या अधिवेशनाचं वार्तांकन करायला गेलो होतो. अशात मी ईटीवीचा प्रतिनिधी असल्यानं आणि कार्यक्रम आंध्रात असल्यानं आयोजकांकडून मला ब्रेकिंग इनपूट मिळत होते.

सोनिया गांधी,मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे सर्वच ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते तेव्हा मंचावर बसले होते. राहुल गांधी यांना खासदार होऊन तेव्हा दीड वर्ष होऊन गेलं होतं. त्यांनाही मंचावर आमंत्रित केलं जाईल किंवा ते मंचावर बसतीलच असं सर्वांना वाटत होतं. पण ते मंचावर कुठंही नव्हते. खाली नेत्यांच्या पहिल्या काही रांगांमधेही ते दिसत नव्हते.

अचानक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. राहुल गांधी यांना मंचावर बोलवण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. राहुल मागे कुठंतरी बसलं होते. त्यांनी उभं राहून या तरूणाईला शांत करण्याचा प्रयत्न केला. मंचावर बसलेले ज्येष्ठ नेतेही तेव्हा कावरेबावरे झाले आणि आता काय करावं या नजरेनं एकमेकाला बघायला लागले.

शेवटी याच अधिवेशनात राहुल यांना पहिल्यांदा काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात मंचावर बसायला जागा मिळाली. इंदिरा गांधींचा नातू, राजीव गांधींचा पुत्र आणि तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पुत्र असूनही काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात मंचावर जागा मिळायला राहुलला आधी खासदार होऊन दाखवावं लागलं आणि त्यानंतरही जवळपास दोन वर्षं वाट पहावी लागली.

लोकशाही समृद्ध करणारी यात्रा

अर्थात राहुलला मंचावर बसण्यात तेव्हाही फारसा रस नव्हताच. काँग्रेसच्या तरूणाईनं तेव्हा गोंधळ घातला नसता तर कदाचित आणखी काही वर्षं त्याला सामान्य नेत्यांसारखं मागच्या रांगांमधे शांत बसून स्टेजवर बसून चिंतन-मनन करता आलं असतं. वाशिमला जेव्हा राहुलला इतक्या वर्षानंतर पाहिलं तेव्हा खूप आनंद झाला. तेव्हाचा कोवळा सुकुमार राहुल आता तपश्चर्येनं रापलेल्या संतासारखा दिसत होता.

माझी यात्रा हीच माझं मेडिटेशन आहे, असं राहुल सांगत आहेत ते शंभर टक्के खरं आहे. लोकशाहीला समृद्ध आणि बलशाली करणारी ही यात्रा आहे. राहुल हे परिपक्व आणि लोकशाहीची यंत्रणेची जबाबदारी समर्थपणे खांद्यावर पेलू शकेल असा नेता असल्याचं आज लोकांना पटलंय.

पण एका गोष्टीचा आनंद आहे की राहुलचं हे दर्शन मला फार पूर्वीच घडलं. जे राहुल गांधी मी संसद परिसरात अनुभवले तेच राहुल आज जगाला भारत जोडो यात्रेमुळे अनुभवायला मिळतायत, याचा आनंद आहेच.

हेही वाचा: 

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?