राहुल गांधींनी महाराष्ट्रात मांडलेले १० महत्वाचे मुद्दे

२२ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


दोन आठवड्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेला यात्रेचा हा दोन आठवड्यांचा झंझावाती प्रवास २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात संपला. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रातलं आणि देशातलंही राजकीय तापमान चांगलंच वाढवलं.

७ सप्टेंबर २०२२ला कन्याकुमारीपासून सुरु झालेली ‘भारत जोडो’ यात्रा ६१व्या दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमधे मशालींच्या लखलखाटात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचं जंगी स्वागत केलं गेलं. त्यानंतर महापुरुषांना अभिवादन करून या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात झाली. 

दोन आठवडे लांबलेल्या या दौऱ्यात राहुल यांनी तब्बल ३८१ किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला. १५ विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या या यात्रेत राहुल गांधींनी केलेल्या भाषणांची राज्यासोबतच देशाच्याही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगतेय. त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या भाषणांमधले महत्त्वाचे मुद्दे इथं देत आहोत.

हेही वाचा: भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

१. नोटबंदी, जीएसटीचा उल्लेख

राहुल गांधींची महाराष्ट्रातली पहिली कोपरा सभा भोपाळा पाटी गावात ८ नोव्हेंबरला झाली. सहा वर्षांपूर्वी, या सभेच्या दिवशीच नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. राहुल यांनी आपल्या पहिल्याच सभेत या निर्णयावर कडाडून टीका केली. हा नोटबंदीचा निर्णय म्हणजे काळ्या पैशांवर नाही, तर देशातल्या शेतकऱ्यांवर आणि छोट्या दुकानदारांवर आक्रमण होतं, असं ते म्हणाले.

तरुणाईला भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नावरही राहुल यांनी आपल्या भाषणात बोट ठेवलंय. देशातले तरुण शिक्षण तर इंजिनियरींगचं घेतायत, मात्र प्रत्यक्षात त्यांना मोलमजूरी करावी लागतेय. मोदी सरकारने एकापाठोपाठ एक कंपन्यांना खाजगीकरणाच्या दावणीला बांधल्याने नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण झालाय. नोटबंदी, जीएसटीने एक रस्ता बंद केलाय, खाजगीकरण दुसरा बंद करतंय. या योजनांचं उद्दिष्ट फक्त एकच, गरिबांना घाबरवणे!

२. खोट्या तपस्वींवर टीका

आपल्या एका भाषणात केदारनाथ दर्शनाचा किस्सा सांगताना आरएसएसचे नेते कसा स्वतःचा स्वार्थ पाहतात हे राहुल गांधी यांनी सांगितलं. ते नेते स्वार्थ म्हणून मंदिरात जातात तर आपण देवाला धन्यवाद म्हणायला मंदिरात जातो, असं सांगत त्यांनी दोन्ही बाजूंमधला फरक अधिकच ठळकपणे सुचवलाय.

राहुल यांनी तमाम महापुरुषांना आपल्या अहंकारावर मात करणाऱ्या आणि जनकल्याणासाठी झटणाऱ्या तपस्वींचा दर्जा दिला. दिवसभर कष्ट करून देशाचं पोट भरणारा इथला प्रत्येक शेतकरी, प्रगतीची वीट रचणारा मजूर आणि प्रामाणिकपणे व्यवहार करणारा व्यापारी हा तपस्वीच असल्याचं त्यांनी सांगितलं.

पण त्यांना त्यांच्या तपस्येचं फळ मिळत नाही. त्यांच्या तपस्येची फळं दुसरेच तपस्वी खात असल्याचा आरोप राहुल यांनी आपल्या भाषणात केलाय. हे तपस्वी अचानक एखादी योजना घेऊन येतात, भावनिक होण्याचं नाटक करतात आणि खऱ्याखुऱ्या तपस्वींवर ती योजना लादून त्यांचं फळ घेऊन जातात, असं म्हणत राहुल यांनी अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणाऱ्या नोटबंदीकडे बोट दाखवलंय.

हेही वाचा: शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं

३. डरो मतचं आवाहन

सरकारी योजनांच्या घोषणाबाजीतून ‘तुमची कर्जमाफी होणार नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत’ अशा आरोळ्याही दबक्या आवाजात घुमत आहेत. या सगळ्यावर गरीब शेतकरी आणि बेरोजगार तरुण पेटून उठत नाही, तर अधिकच घाबरतोय. या योजना त्यांच्या मनात भीती निर्माण करतायत आणि याच भीतीचं नरेंद्र मोदी आणि भाजप द्वेषात रुपांतर करतेय, असं राहुल यांनी आपल्या पुढच्या जाहीर सभेत सांगितलं.

नांदेडमधल्या एका सभेत राहुल गांधी बोलत असतानाच एका तरुणाने 'तरुणाईसाठी काय संदेश द्याल' असं त्यांना विचारलं. तुमची भीतीच तुमच्यातला द्वेष वाढवण्यासाठी वापरली जातेय हे सांगताना राहुल म्हणाले, ‘डरो मत, अगर डरोगे नहीं तो किसीसे नफरत करोगे नहीं.’ त्यांचा हा वीडियो सोशल मीडियावरही प्रचंड वायरल झालाय.

४. तुटलेल्या मनांची जोडणी

भाजप भीतीच्या जोरावर द्वेष पसरवतोय. घराघरात भांडणं लावतोय. या विखारी राजकारणामुळे भाऊ-भाऊच एकमेकांसमोर भांडणांसाठी उभं राहिल्याची हन्त राहुल यांनी आपल्या एका भाषणात व्यक्त केलीय. या अशा भांडणाने नेमका कुणाचा फायदा होतोय, असा सूचक प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय.

द्वेषापायी एकाच घरातले लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. त्यातून फायदा कुणालाच होत नाहीय. घरातल्याच भांडणांमुळे समाज दिवसेंदिवस मागे पडत चाललाय. प्रेमाची, बंधुत्वाची भावना नाहीशी होत चाललीय. हीच भावना पुन्हा निर्माण करण्यासाठी, द्वेषापायी तुटलेल्या मनांची जोडणी करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा काढल्याचं राहुल यांनी सांगितलंय.

हेही वाचा: पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

५. वनवासी नाही आदिवासीच

१५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त राहुल यांनी वाशिममधेही एक सभा घेतली. ही सभा दोन कारणांमुळे गाजली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे आदिवासींचं सांस्कृतिक अपहरण. भाजप आणि आरएसएस मुद्दाम आदिवासींचा उल्लेख ‘वनवासी’ करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. या नव्या नावाआडून भाजप आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचं काम करतोय, असं त्यांचं म्हणणं होतं.

आदिवासी हे वनवासी असल्याचं वारंवार त्यांच्या मनावर ठसवलं जातंय. बिरसा मुंडा यांनी केलेला संघर्ष भाजप खोडू पाहतेय. वनवासी हे नवं नाव देऊन आदिवासींना जंगलात पाठवलं जातंय. त्यांच्यापासून नव्या जगातल्या, आधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय. हे एक प्रकारचं सांस्कृतिक अतिक्रमणच असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितलंय.

६. सावरकरांच्या माफीनाम्याचा उल्लेख

बिरसा मुंडा जयंतीला झालेलं हे भाषण ज्या दुसऱ्या कारणामुळे गाजलं, ते म्हणजे सावरकर आणि त्यांचे माफीनामे. सावरकर हे भाजप आणि आरएसएसचे आदर्श मानले जातात. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या योगदानासाठी त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ अशा उपाधीनेही गौरवण्यात आलंय. सभेत बोलताना जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा विषय आला त्यावेळी राहुल यांनी सावरकरांनी इंग्रजांकडून घेतलेल्या पेन्शनचा आणि त्यांच्या माफीनाम्याचा उल्लेख केला.

त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अकोल्याच्या दौऱ्यातही जेव्हा राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा सावरकरांच्या माफीनाम्याची प्रत त्यांनी सोबतच आणली होती. माझी सावरकरांविषयीची भूमिका ठाम आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला ही यात्रा थांबवायची असेल तर त्यांनी तसं करून दाखवावं, असं जाहीर आवाहनही राहुल यांनी केलं होतं.

भाजप आणि संघाचे आदर्श असलेले सावरकर आपली शिक्षा माफ करवून घेऊन इंग्रजांकडून मदत मिळवत राहिले आणि कॉंग्रेसविरोधात जाऊन इंग्रजांची मदत करत राहिले. त्यामुळे वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्रजांच्या प्रलोभनाला बळी न पडता भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी मृत्यूला कवटाळणारे बिरसा मुंडा हे आपले आदर्श असायला हवेत, असं राहुल यांनी स्पष्टपणे सांगितलं.

हेही वाचा: जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

७. मुलभूत मुद्द्यांवर भाष्य

राहुल गांधी म्हणतात, विरोधी पक्ष जेव्हाजेव्हा शेतकरी कायदे, नोटबंदी किंवा जीएसटीबद्दल बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हातेव्हा त्याचा आवाज दाबला जातो. विधानसभा, लोकसभा इथले माईक अचानक बंद पडतात. माध्यमांसमोर बोलूनही त्याचा काही उपयोग होत नाही. आमचे प्रश्न, आमची तळमळ ही सामान्य जनतेपर्यंत पोचावी यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे.

सत्ताधारी आणि इतरही बरेचजण भारत जोडो यात्रेची गरजच काय असं सतत  विचारत असतात. पण त्यांना या यात्रेला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद दिसत नाही. दरवेळी हॅलीकॉप्टर आणि विमानाने फिरणाऱ्यांना इथल्या जनतेच्या मनात कोणते प्रश्न आहेत, हे कधीच कळणार नाही, असाही टोला राहुल यांनी आपल्या कळमनुरीच्या सभेत हाणलाय.

८. जनतेची ‘मन की बात’

जनतेच्या मनातलं जाणून घेण्यासाठी, ती मनं जोडण्यासाठी ही यात्रा सुरु केल्याचं राहुल गांधी सांगतात. वाशिमच्या मेडशीमधे कोपरा सभा घेऊन वाशिम दौऱ्याची सांगता झाली. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आपल्या या यात्रेचं उद्दिष्ट पक्ष आणि लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे, ते स्पष्ट केलं.

ते म्हणतात, काही नेते जनतेशी संवाद साधायचं निमित्त करून पुढे येतात पण प्रत्यक्षात स्वतःच्याच ‘मन की बात’ जमलेल्या जनतेला ऐकवून निघून जातात. आम्ही मात्र या यात्रेच्या निमित्ताने खुद्द जनतेच्या ‘मन की बात’ काय आहे ते जाणून घ्यायला आलो आहोत. 

हेही वाचा: नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

९. भीती, द्वेष, हिंसेला नकार

विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगावमधे राहुल गांधी यांनी वारकऱ्यांचा रिंगण सोहळा अनुभवला. नंतर आपल्या भाषणातही त्यांनी संतपरंपरेचा उल्लेख करत आपण त्यांच्या मार्गावर चालत असल्याचं सांगितलं. संतांनी समाजाला जे प्रेमाचे धडे दिले, तेच धडे गिरवण्यासाठी ही भारत जोडो यात्रा निघाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी कायमच या समाजाला बंधुत्वाची, समतेची आणि प्रेमाची शिकवण दिली आहे. ती शिकवण आपल्याला विसरायची नाही. भीती, द्वेष आणि हिंसेला आपल्या वरचढ होऊ द्यायचं नाही, असं राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून अधोरेखित केलं.

१०. प्रेमाने विजय मिळवण्याचा निर्धार

बुलढाणा जिल्ह्यातल्या निमखेडी गावात राहुल गांधींची महाराष्ट्रातली शेवटची कोपरा सभा झाली. या सभेत राहुल यांनी गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार मानले. जगाला समतेची शिकवण देणाऱ्या संतांचं, महापुरुषांचं राज्याच्या जडणघडणीत मोठं योगदान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आपण महाराष्ट्रातल्या जनतेकडून गेल्या दोन आठवड्यात मिळालेलं प्रेम आणि विश्वास घेऊन पुढे जात आहोत, असं म्हणत त्यांनी द्वेषभावना पसरवणाऱ्यांवरही प्रेमाने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: 

विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही