राम कदमांची हंडी का फुटली?

२९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?

First Published : 07 September 2018

१४ एप्रिल २०११. पाच वर्षं उलटून गेलीत त्याला. राम कदम तेव्हा मनसेचे आमदार होते. अबू असीम आझमींना थोबडावलं म्हणून गाजलेले होते. बायकांना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ओटी भरता यावी, म्हणून या दिवशी त्यांनी आंदोलन केलं. महिला कार्यकर्त्यांसोबत ते गाभाऱ्यात घुसले. आई अंबाबाईची ओटी भरली. पण ते करताना त्यांनी सोवळं नेसून आत शिरण्याची देवळाच्या पुरोहितांची अट मान्य केली. शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाच्या अतिशय योग्य वेळेवर. पण ते धाडस तेव्हाही सोवळ्यातलंच ठरलं. यंदाच्या गोपाळकाल्याला त्यांच्या त्या सोवळ्याच्याही चिंध्या झाल्या.

`साहेब, मी तिला प्रपोज केलंय. ती मला नाही म्हणते. चुकीचं आहे. शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आईवडिलांना घेऊन यायचं. तुमचे आईवडील जर म्हणाले, मला ही पोरगी पसंत आहे. तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार.`  असं भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम शेकडो गोविंदांच्या गर्दीसमोर सांगताहेत आणि मागोमाग आपला फोन नंबरही त्यांना देत आहेत, हा वीडियो आपण सगळ्यांनीच बघितलाय. हे महिलांचा ढळढळीत अपमान करणारं वक्तव्य आहे. बायका या पुरुषांची मालमत्ताच आहे, असा पारंपरिक दूषित दृष्टिकोन आजच्या डिजिटल युगात बकबक करणाऱ्या तरुण नेत्यांच्या डोक्यात ठाण मांडून बसलाय, हेदेखील यातून दिसलं. महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सनातनी सोवळ्यातलाच निघाला, हे क्लेशकारकही आहे.

बहुतेक २००९च्या दहीहंडीला राम कदमांनी घाटकोपरमधे भारतातली सर्वात मोठी दहीहंडी उभारली होती. तेव्हा डोळे दिपवणारं २५ लाखांचं इनाम ठेवलं होतं. त्या दहीहंडीने कदमांना नाव मिळवून दिलं. तेव्हा त्यांनी फॉर्मात असणाऱ्या राज ठाकरेंचं लक्ष वेधून घेतलं. नंतर आमदारकीचं तिकीट. आज खासदार असणाऱ्या पूनम महाजनांना हरवून थेट विधानसभेत एण्ट्री. दहीहंडीने मिळवून दिलं ते कदमांनी हंडीत गमावलं. पैशांच्या जोरावर जे कमावलं होतं, ते त्यांनी पैशांच्या गुर्मीत गमावलं. अशा निष्कर्षाप्रत येण्यास नक्की जागा आहे.

दिवसभर हजारो तरुण मुलं सतत समोर आहेत. टीवीचे सगळे कॅमेरे आपल्यावर रोखले गेलेत. सतत लाइव सुरू आहे. बडेबडे स्टार, सेलिब्रेटी आपल्या इशाऱ्यांवर नाचत आहेत. गेल्या दहा पंधरा वर्षातच दहीहंडीच्या या वातावरणात ग्लॅमरवाले नेते घडताना आणि बिघडताना या मुंबई, ठाण्याने पाहिले आहेत. या स्टेजचे आपण मालक आहोत, हा अहंकार वर्षागणिक वाढत जातो. दहीहंडीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत चक्रवाढ व्याजाने तो अहंकार डोक्यात भिनत जातो. तो अहंकार कधीना कधी घात करतोच. त्यातून एका उत्तम वक्त्याचा वाचाळवीर होताना आपण सगळ्यांनीच पाहिलं.

बोलता बोलता जीभ घसरली, असं कुणी राम कदमांचं समर्थन करत असेल, तर ते चुकीचंच आहे. उलट त्यांनी कदमांचं `स्लीप ऑफ टंग` का झालं, याचा विचार करायला हवा. त्यामागची कारणं फक्त त्यांच्यासाठीच नाहीत तर सगळ्यांसाठीच महत्त्वाची ठरू शकतात. त्यासाठी त्यांचा सेल्फमेड प्रवास तपासावा लागेल.

विकीपीडिया सांगतं, राम शिवाजी कदम यांचा जन्म २४ जानेवारी १९७२. त्यांचं फेसबूक पेज सांगतं की त्यांचा जन्म लातूरचा. तो लातूर शहरातला की मूळ गावातला, हे कळायला जागा नाही. मूळ गाव मरशिवणी. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर नगरपरिषदेच्या हद्दीतच हे गाव आहे. आईवडिलांनी फार पूर्वीच गाव सोडलंय. एक दोनदा राम कदमांनी तिथे कीर्तनं केली होती. तेवढाच त्यांचा गावाशी संपर्क. पण बारकाईने ऐकणाऱ्याने आजही त्यांच्या बोलण्यात लातूरचा लहेजा सापडतो. त्यांनी वक्तृत्व स्पर्धा केल्यात की नाही हे माहीत नाही, पण त्यांची कीर्तनाचा प्रभाव असणारी स्टाईल खास मराठवाड्यातल्या तरुण व्याख्यात्यांची आठवण करून देणारी आहे. त्याच्याच जोरावर ते सहज सभा जिंकतात. टीवी चॅनलवर चर्चेत पक्षाची बाजू उत्तम लावून धरतात.

पण राम कदम घडले ते मुंबईच्या बैठ्या चाळींमधे. विक्रोळी पार्कसाईटच्या डोंगरापाशी आणि सोमैय्या कॉलेज समोरच्या झोपडपट्ट्यात ७२च्या दुष्काळात मुंबईत आलेली कुटुंब गठ्ठ्यागठठ्याने सापडतात. वडील शिवाजीराव तिथेच वसले. प्रामाणिकपणे खूप कष्ट उपसले. त्यांच्या रिटायरमेंटनंतर आलेल्या दोन लाख रुपयांतून राम कदमांनी सावकारीचा धंदा सुरू केला. या धंद्यानेच त्यांना दुनियादारी शिकवली असावी. ९०च्या दशकात प्रायवेट लॉटरीचा नवा धंदा आला होता. कदमांनी ती संधी साधली. आजही घाटकोपर स्टेशनजवळ असलेल्या लॉटरीवाल्यांचं आमदारांशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं.

राम कदमांच्या एका नातेवाईकाचा खार इथे बंगल्याचा प्लॉट होता. तो त्यांनी डेवलप करायला घेतला. त्यांना नवी लाईन मिळाली. १९९९-२००० ला त्याचं भूमिपूजन की उद्घाटन गगनगिरी महाराजांच्या हस्ते झालं होतं. या प्रोजेक्टने त्यांना बिल्डर म्हणून ओळख मिळवून दिली. प्रचंड कष्ट आणि राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध हे त्यांचं भांडवल होतं. प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल महाजन हा त्यांचा कधीतरी वर्गमित्र होता. तो धागा पकडून ते राहुल तसंच प्रमोद महाजनांचा पीए विवेक मोएत्रा यांच्या खास बैठकीत शिकले. त्यात त्यांचा मित्र नेक्सा ऑटोमोबाईलचा मालक समीर जानी याची त्यांना मदत झाली. पुढे तीन चार वर्षांतच प्रमोद महाजनांच्या मुलीचा पराभव करून राम कदम विधानसभेत गेले, इतका काळ बदलला होता.

`प्रमोद महाजनांनी राम कदमांकडे पैसे ठेवायला दिले होते. महाजनांच्या अचानक मृत्यूमुळे कदमांची चांदी झाली`, असं सांगणारे पन्नासेक तरी पत्रकार मंत्रालय परिसरात सापडतात. पण कदमांना स्ट्रगल करताना पहिलेल्यांचा या थियरीवर विश्वास नाही. ते त्याला कदमांच्या कष्टाचा अपमान मानतात. शून्यातून जग उभं करणाऱ्या प्रत्येकाकडे अशा संशयाने पाहिलं जातं. त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक संशय उभा केला जातो. त्याचाच हा भाग असावा.

राम कदमांच्या प्रोजेक्टमधे मोठमोठ्या राजकारण्यांनी पैसा गुंतवले असावेत. ते नेते सर्वच पक्षाचे होते. सर्वच पक्षांशी त्यांचे जवळचे संबंध होते. नेत्यांचा त्यांच्यावर भरोसा होता. कदमांकडे भरभरून येत होतं आणि ते भरभरून देतही राहिले. ते घाटकोपरचे रॉबिनहूड आहेत. तीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. कॉलेजच्या दिवसापासून त्यांच्यासोबत असणारी शंभरेक पोरं आजही त्यांच्यासोबत असतात. पोसण्यापेक्षा त्यांनी त्यांना पोटापाण्याला लावलंय.

प्रचंड दानत हाच राम कदमांचा यूएसपी. त्याच जोरावर त्यांनी घाटकोपर पूर्वेचा मतदारसंघ मजबूत बांधलाय. स्वतःची वैयक्तिक ताकद उभी केलीय. त्यांनी स्वतःची प्रतिमाही `दयावान डॅशिंग आमदार`, `गरिबों के मसिहा` अशीच केलीय. ही विशेषणं त्यांच्या फ्लेक्सवर बाकायदा लिहिलेली असतात. `आई वडील हे साक्षात ईश्वर आहेत`, हे त्यांचं आणखी एक ब्रीदवाक्य. त्या एकाच वाक्यावर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांना जिंकलंय. कधी ते २५ हजार भाविकांना शिर्डीला घेऊन जातात. कधी काशीला, तर कधी हरिद्वारला. भागात कोणतंही मोठं ऑपरेशन असो, त्यासाठी कदमांना भेटावंही लागत नाही. त्यांच्या ऑफिसातले लोकच पुरेसे असतात. कुणी मेलं तर त्यांच्या घरी कदमांचा डब्बा पोचतो. ते तेराव्याचं जेवणही करून देतात. कधी ३० हजार लोकांना जेवायला देतात. दर महिन्याला ४ हजार अनाथ म्हाताऱ्यांच्या घरी रेशन पोचवतात. कधी दिवाळीचं सामान तर कधी ईदचं सामान वाटतात. शिलाई मशीन, आटा चक्कीचं वाटप. ड्रायविंग कार प्रशिक्षण हे सारं तर नेहमीचंच. कदमांकडून हे सगळं अगदी मोफत असतं.

या सगळ्यावर कडी करणारा राम कदमांचा विक्रम म्हणजे ते ६० हजार बहिणींचा भाऊ आहे. तसं त्यांचं फेसबूक स्टेटसच आहे. ६० हजार या आकड्यावर विश्वास बसणं कठीण आहे. कदमांच्या ऑफिसात त्याचा रेकॉर्ड असेलही. कारण या बहिणींना ओवाळणी मिळवण्यासाठी रेशन कार्डावर शिक्का मारून घ्यावा लागतो म्हणे. ते सोडलं तरी किमान १५ -२० हजार बायका त्यांना दरवर्षी रक्षाबंधनाला राखी बांधतात. लोकसंपर्काचा हा अद्भूत नमुना आहे.

म्हणूनच या ६० हजार बहिणींच्या भावाने केलेलं वक्तव्य म्हणूनच धक्कादायक आहे. वरून कितीही देखावा केला तरी सत्तेच्या मस्तीत असताना डोक्यातली कीड अशी जिभेवर येतेच. राम कदम घाटकोपरमधून एकदा मनसेच्या आणि नंतर भाजपच्या तिकीटावर आमदार झालेत. तेही दणदणीत मताधिक्याने. त्यांना हरवू शकेल असा प्रतिस्पर्धी कोणत्याही पक्षात नाही.

त्यामुळे त्या सत्तेचा तो माज असू शकेल. कदाचित आजवर लोकांवर केलेल्या उपकारांचा तो माज असू शकेल. कसलाही असला तरी तो माजच आहे. राजकीय कारकीर्दीला दहा वर्षही झालेली नसताना राम कदमांना या माजाचे दुष्परिणाम लक्षात आलेत, हे चांगलं झालंय. त्यातून त्यांनी धडा घेतला, तर ते राजकारणात दीर्घकाळ राहू शकतील. आपल्या ६० हजार बहिणींचं खरोखरचं भलं करू शकतील, अशी धोरणं राबवण्याची सत्ता त्यांच्या हातात येऊ शकते.