सुभाषचंद्र बोस, भगतसिंग हे हिंदुत्ववादी होते का?

१० ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.

दिल्ली विद्यापीठात मी शिकलोय. तिथे गेल्या महिन्यात एक वाद उफाळून आला. वादाचं कारण होतं तिथल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविपने त्यांना आदर्श असलेल्या हिंदुत्वाचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर यांचा अर्धपुतळा, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांच्या अर्धपुतळ्यांच्या समवेत स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी ज्यांना इतिहासाचं आकलन होतं त्यांनी हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की, सावरकरांच्या समवेत ज्या दोन देशभक्तांचा पुतळा अभाविपने स्थापित करण्याचा प्रयत्न केला, ती दोन्ही व्यक्तिमत्त्वं वैचारिकदृष्ट्या सावरकरांच्या अगदी विरुद्ध होती. बोस हे डाव्या विचारसरणीचं काँग्रेसी व्यक्तिमत्त्व होतं. तर भगतसिंग क्रांतिकारी मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यामुळेच टीका करणाऱ्यांनी या वेळी असा प्रश्न केला की, मग कोणत्या आधारावर या दोघांना सांप्रदायिक विचारसरणी असलेल्या सावरकरांच्या समवेत स्थापित करण्यात येतंय?

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्यांना वैचारिक चर्चेपेक्षा घोषणाबाजी करण्यातच जास्त रस होता. परंतु उजव्या शक्तींकडून डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न फक्त दिल्ली विद्यापीठात झाला असं नाही. गेल्या काही वर्षांपासून असे प्रकार सर्वत्र घडताना आपण पाहतोय.

हेही वाचाः बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

अभाविपच्या कृतीतली ऐतिहासिक विसंगती

स्वतः पंतप्रधानही फक्त बंगालमधेच नाही, तर इतर ठिकाणीसुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा सतत उल्लेख करत असतात. त्यांनी आपल्या नेहमीच्या बडेजाव मिरवण्याच्या पद्धतीने मोठा गाजावाजा करत सुभाषचंद्र बोस यांच्यावरील भारतीय पुराभिलेखागारातल्या कागदपत्रांचा मोठा संग्रह खुला केला. अर्थात ही गोष्ट वेगळी की, खुल्या केलेल्या या संग्रहामधून कोणतीच नवीन बाब समोर आली नाही.

पंतप्रधानांप्रमाणेच इतर भाजप नेतेही ब्रिटिशांच्या विरोधातल्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिल्याबद्दल भगतसिंग यांची प्रशंसा करत असतात. कदाचित याची कारणमीमांसा अशी केली जाऊ शकते की, अभाविपने वि. दा. सावरकरांना आपलंसं करणं यातदेखील ऐतिहासिकदृष्ट्या विसंगती आहे.

कारण १९३० च्या दशकात सावरकर हिंदू महासभेशी संलग्न होते. त्यावेळी हिंदू महासभा स्वतःला संघापेक्षा वरचढ मानत असे. परंतु या दोन संघटनांच्या स्पर्धेपलीकडे पाहिल्यास, अभाविपच्या कृतीमधे वैचारिकदृष्ट्या बरीच समसमानता आहे. भारत हा मुख्यत्वे हिंदूंचं आणि फक्त हिंदूंनीच चालवावा असं राष्ट्र, या सिद्धांताचे सावरकर एक अतिशय प्रभावशाली पुरस्कर्ते होते. दुसरीकडे भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस दोघंही हिंदू बहुसंख्यांकवादाचे अतिशय कट्टर विरोधक होते.

बोस, भगतसिंग हिंदुत्ववादी होते?

भगतसिंग एक मार्क्सवादी विचारक होते. त्यांचा यावर विश्वास होता की मानवाची प्रमुख ओळख त्याच्या समाजातील वर्गीय संरचनेमधील स्थानावरून निश्चित होते. हिंदू-मुस्लिम अथवा सवर्ण-दलित या अस्मितांपेक्षा भगतसिंगांना कामगार आणि शेतकरी अधिक जवळचे होते. त्यांची संघटना हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी अर्थात एचएसआरएमधे हिंदू, मुस्लिम, पारसी, शीख अशा सर्वच धर्मांतले कार्यकर्ते होते.

सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली उभी हयात अतिशय एकनिष्ठतेने धार्मिक सलोख्याचा पुरस्कार करण्यात व्यतीत केली. काँग्रेसचे अध्यक्ष आणि आझाद हिंद सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यामधे कसलाही भेदभाव केला जाणार नव्हता अशा स्वतंत्र भारतासाठी लढा दिला. बोस, भगतसिंग यांच्यामधील आणि हिंदुत्ववाद्यांच्यामधील वैचारिक अंतराचा विचार करता, या दोन स्वातंत्र्यसेनानींना हिंदुत्ववादी लोक आपलंसं कसं करू शकतात?

हेही वाचाः डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

दोन्ही देशभक्तांची सहकाऱ्यांकडून उपेक्षा

एक कारण तर असं आहे की, दुर्दैवाने या दोन्ही देशभक्तांची त्यांच्या वैचारिक सहकाऱ्यांनी उपेक्षा केलीय. आपल्या राजनैतिक आयुष्याचा बहुतेक भाग बोस हे खंदे काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेनादेखील त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहाचाच एक ‘फॉरवर्ड ब्लॉक’ होता. परंतु इंदिरा गांधींच्या काँग्रेसनेच इतर अनेक महान काँग्रेसजनांची जशी उपेक्षा केली, तसंच त्यांनी बोस यांनाही दुर्लक्षित करून नाकारलं.

अगदी याचप्रकारे मार्क्सवादी असलेल्या भगतसिंग यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजेच माकपच्या पक्षीय प्रतीकांमधे स्थान नाही. कारण भगतसिंग यांची एचएसआरए ही संघटना मूळच्या अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न नव्हती. माकप एकीकडे लेनिन आणि स्टॅलिन यांना वरचे स्थान देईल. मात्र भारताच्या एका अस्सल मार्क्सवाद्याला दुर्लक्षित करेल.

या दोन देशभक्तांना नाकारण्याच्या डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या या अतिशय लाजिरवाण्या कृतीमुळे अभाविपला सोयीस्करपणे या सेक्युलर आणि समाजवादी विचारांच्या व्यक्तिमत्त्वांना आपलंसं करून त्यांच्याप्रती खोटा आदर व्यक्त करणं सोपं झालंय.

सावरकर, बोस, भगतसिंगांना एकत्रीकरणाचं कारण

या दोन व्यक्ती आज असत्या तर त्यांनी हिंदुत्वाचा आणि त्यांच्या कृतींचा धिक्कारच केला असता. आणखीन दोन कारणं आहेत, ज्यामुळे अभाविपने बोस आणि भगतसिंग यांच्यासमवेत सावरकरांना स्थापित करण्याचा निर्णय घेतला असणार!

पहिलं कारण म्हणजे, या तिघांचेही यावर एकमत होतं की, वसाहतिक पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अहिंसेपेक्षा हिंसेचा मार्ग स्वीकारणं अधिक श्रेयस्कर ठरेल. दुसरं कारण म्हणजे, आपल्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या तिघांचेही गांधीसोबत मतभेद झाले होते. हे सर्वश्रुत आहे की, सावरकर हे गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे वैचारिक गुरू होते. तसं पाहता सावरकरांच्या गांधीद्वेष करण्याला एक वैयक्तिक किनारदेखील होती.

कस्तुरबा गांधी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या फंडाला आर्थिक मदत न करण्याचा सल्ला सावरकरांनी आपल्या अनुयायांना दिला होता. याच्या उलट भगतसिंग यांचा गांधींना असलेला विरोध सांप्रदायिक कारणांमुळे नसून, मार्क्सवादी विचारधारेच्या म्हणजेच वैचारिक मतभेदांमधून आलेला होता.

हेही वाचाः खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

बोस, भगतसिंग गांधींविरोधांत होते?

बोस यांचे महात्मा गांधी यांच्यासमवेतचे संबंध हे तर अधिक गुंतागुंतीचे होते. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतरदेखील ते गांधींचा आदरच करत होते. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर सार्वजनिकपणे गांधींना पहिल्यांदा ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवणारेदेखील सुभाषचंद्र बोसच होते.

आजच्या काळातल्या उन्मादित हिंदू तरुणांना या व्यक्तिमत्त्वांच्या आपापसातल्या गुंतागुंतीच्या संबंधाविषयी माहिती नसतं. किंवा त्यांना याची कदरदेखील नसते. त्यांना या खुलाशाने काहीच फरक पडत नाही की, वैचारिकदृष्ट्या सावरकर हे बोस यांच्या खूप उजवीकडे होते आणि भगतसिंग यांच्या तुलनेत तर सावरकर अतिशय उजवे होते.

ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.

आत्यंतिक द्वेषातून आलेलं प्रेम

आजच्या क्रोधीत हिंदू नवयुवकांना वसाहतिक पारतंत्र्याविरोधात वापरण्यात आलेलं अहिंसेचं अस्त्र म्हणजे अतिशय सौम्य, कमजोर आणि स्त्री-सुलभ प्रतिक्रिया वाटते. ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला आपल्या प्रजासत्ताक राष्ट्रात हिंदूंप्रमाणेच समान हक्क असायला हवेत याची कल्पनादेखील त्यांना सहन होत नाही. धार्मिक सलोख्यासाठी गांधींसारखी एक व्यक्ती बलिदान देण्यास तयार होते, ही बाब त्यांच्यासाठी ‘वास्तवापासून गांधी किती दूर होते’ याचे परिमाण असते. त्यामुळेच त्यांचा वारसा पूर्णता नाकारण्याची मानसिकता या तरुणाईमधे तयार होते.

हिंदूमधील कट्टर उजव्या शक्तींना बोस आणि भगतसिंग यांच्याविषयी आता सुटलेले प्रेमाचे उमाळे हे काही त्यांच्या कार्याची महती उशिरा सुचल्यामुळे आलेलं शहाणपण मुळीच नाही. तर हे प्रेम महात्मा गांधींविषयी त्यांना असलेल्या आत्यंतिक द्वेषातून आलेलं आहे. राष्ट्रपित्याची नाचक्की करण्यासाठी शक्य झालं तर ते कुणाचाही, कशाचाही आणि अगदी स्थळ-काळ याचं भान न ठेवता वापर करू शकतात आणि करतातदेखील!

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!

(रामचंद्र गुहा हे ज्येष्ठ इतिहासकार असून त्यांचं हा लेख साप्ताहिक साधनाच्या ५ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झालाय. त्यांच्या या लेखाचा साजिद इनामदार यांनी अनुवाद केलाय.)