डॉन रवी पुजारी अंडरवर्ल्डचं विजिटिंग कार्ड?

१४ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कर्नाटक आणि महाराष्ट्रात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या रवी पुजारीच्या थेट आफ्रिकेत जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या. ही अटक पोलिस आणि शासन, प्रशासनाने मिळवलेलं एक यश म्हणून बघितलं जातंय. यानिमित्ताने डॉन पुजारीच्या अंडरवर्ल्डमधल्या दहशतीची हा ओळख.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह सर्वत्र दहशत माजवलेल्या अंडरवर्ल्डच्या काळ्या साम्राज्याची आजच्या पिढीला फारशी माहिती नसेल. पण या अंडरवर्ल्डशी संबंधित दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन, अरुण गवळी यासारख्या डॉननी सर्वसामान्यांसह व्यावसायिक, उद्योगपती आणि बॉलीवूड कलाकारांच्या मनात दहशत निर्माण केली होती. याच डॉन पंक्तीतील एक कुख्यात नाव म्हणजे रवी पुजारी.

बॉलीवूडमधल्या दिगज्जांची झोप उडवायचा

१९९०-२००० च्या दशकात बॉलीवूडवर दबदबा निर्माण करणार्‍या गुन्हेगारांमधे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्याबरोबरच रवी पुजारीचं नावही घेतलं जातं. बॉलीवूडचे कलाकार आणि बिल्डर नेहमीच या गुंडांच्या रडारवर राहिलेत. दुबईत बसून बॉलीवूडच्या कलाकारांना धमकावण्यात रवी पुजारी सराईत होता. त्याने आतापर्यंत पंधराहून अधिक कलाकारांना फोन करून धमकावलय. राकेश रोशन, महेश भट्ट यासारख्या बॉलीवूडमधील दिग्गजांनाही धमक्या दिल्यात.

रवी पुजारीविरुद्ध मुंबईत ५५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्रातले गुन्हे पाहिल्यास दाखल गुन्ह्यांची संख्या शंभराहून अधिक असेल. साहजिकच, पोलिसांसाठी तो ‘मोस्ट वॉँटेड’ होता. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वीही झाला. परंतु अलीकडेच सेनेगलची राजधानी डकार इथे त्याला अटक करण्यात आली. या कारवाईला मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिलाय.

गुजरातचे एटीएस आणि गुन्हे शाखा आणि बंगळूर पोलिस हे अनेक काळापासून रवी पुजारीच्या मागावर होती. त्याला सेनेगलमधे एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. ही अटक पोलिस आणि शासन-प्रशासनाने मिळवलेलं यश मानलं जातय. रवी पुजारीच्या अटकेने अंडरवर्ल्डची अनेक गुपितं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अटकेच्या निमित्ताने कर्नाटक ते सेनेगल व्हाया मुंबई, दुबई, ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणार्‍या रवी पुजारीचा प्रवास समजून घेतला पाहिजे.

मुंबई ते दुबई एका गुन्हेगारीचा प्रवास

पुजारीच्या गुन्हेगारीचा इतिहास मोठा आहे. रवी पुजारी दहशत पसरवण्यासाठी ‘पँथर’चा वापर करायचा. शिवीगाळ आणि गोळीबाराच्या मदतीने लोकांना धमकावण्यात तो माहीर होता. तो मूळचा कर्नाटकचा. त्याचा जन्म कर्नाटकातल्या उडपी जिल्ह्यातला. लहानपणीच तो मुंबईला आला. त्याला इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषाही चांगल्या अवगत आहेत. लहानपणीच त्याला कुरापतीमुळे शाळेतून काढलं होतं. त्याच्यामुळेच संपूर्ण कुटुंबाला मलप्पे गाव सोडण्याची वेळ आली होती.

१९८० च्या दशकात तो अंधेरीत चहाच्या दुकानात काम करायचा. तेथून तो विनोद मटकर आणि रोहित वर्मासारख्या गुंडांना चहा द्यायचा. वर्माच्या गुंडाने बाला जालटेची हत्या केल्यानंतर रोहित वर्माबरोबर त्याची उठबस वाढली. वर्माने पुजारीला बँकॉकला नेलं. तिथेच त्याने छोटा राजनशी भेट घडवून आणली. १९९० मधे तो दुबईला गेला. तिथे बसून भारतातल्या बिल्डर आणि हॉटेल मालकांना धमकी देत खंडणी वसूल करण्याचा व्यवसाय सुरू केला.

याच काळात त्याच्या तीन गुंडांनी कुकरेजा बिल्डरच्या ऑफिसमधे जाऊन ओमप्रकाश कुकरेजाची हत्या केली होती. त्यानंतर आठ वर्षांनंतर नवी मुंबईचा बिल्डर सुरेश वाधवा याच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. ऑफिसमधून वेळीच निघाल्याने त्यांचा जीव वाचला.

टोळीकडून पाठवायचा आपलं कार्ड

कर्नाटकमधे ‘पँथर’ आणि रवी पुजारी यांच्यातले संबंध लक्षात घेण्यासारखे आहे. रवी पुजारी हा आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक व्यापार्‍यांना विजिटिंग कार्ड पाठवायचा. या कार्डवर सर्वात वर पँथरचा फोटो असायचा आणि कार्डखाली रवी पुजारीचं नाव असायचं. कार्ड पाठवल्यानंतर तो व्यापार्‍याला फोन करायचा आणि पैशाची मागणी करायचा. फोन केल्यानंतर सर्वात अगोदर ‘कार्ड पाहिले का?’ अशी विचारणा करायचा.

त्याला दोन भाऊ, दोन बहीण आणि आई वडील होते. पुजारीचे वडील आणि एका भावाचा मृत्यू झालाय. आता आई दोन मुलींसमवेत राहते. रवी पुजारीने लव मॅरेज केलं. त्याची बायको पद्माला बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. तीन महिन्यानंतर ती जामिनावर तुरुंगाबाहेर आली तेव्हा तिनेही देशातून पळ काढला. रवी पुजारीला दोन मुली आणि एक मुलगा आहे.

बॉलीवूडवरचं संकट

बॉलीवूडच्या मंडळींवर रवी पुजारीची नेहमीच दहशत राहिलीय. सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर आणि राकेश रोशन यासारख्या कलाकारांना धमक्या दिल्या. काही दिवस शाहरुख खानलाही तो धमकीचे फोन करत होता. २०१४ मधे ‘हॅप्पी न्यू इअर’च्या चित्रपटाचे परदेशातील हक्क देण्याबाबतची धमकी दिली होती. अर्जित सिंगला पाच लाख रुपये किंवा दोन शो मोफत करण्याची धमकी दिली होती.

रवी पुजारीने शाहरुख खानला करीम मोरानीशी कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला होता. करीम हा शाहरुखचा चांगला मित्र आणि व्यावसायिक भागीदारही आहे. करीम मोरानी आणि अली मोरानी यांच्या घराबाहेर त्याने गोळीबारही घडवून आणला होता.

खंडणीसाठी थेट धमक्या

त्याआधी त्याने करिश्मा कपूरचा नवरा संजीव कपूरलाही धमकावून ५० कोटींची मागणी केली होती. यासंदर्भात त्याने एक मेलही पाठवला होता. मात्र पुजारीचा पंटर दुसरा ईमेल पाठवण्यासाठी सायबर कॅफेत आला तेव्हा पोलिसांनी त्या पंटरला मुंबईत अटक केली. यानंतर पुजारीने मुंबईचे प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांनादेखील मारण्याचा प्रयत्न केला. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून हा प्रयत्न झाला.
 
जे भारतविरोधी आहेत, पाकिस्तानशी गुप्तचर संघटना आयएसआय आणि दाऊद आणि शकीलशी निगडित आहेत, त्यांना जिवंत ठेवणार नसल्याचं पुजारी म्हणायचा. या गोष्टीचा खुलासा त्याने स्वत: टीवीवर येऊन केला होता. २०१५ मधे त्याने प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांचं विशेष पथक करतंय. आणंदच्या गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकालाही पुजारीने खंडणीसाठी धमकी दिली.

रवी पुजारीवर गुन्ह्यांची मालिका

१९९३ मधे मुंबईत साखळी स्फोट झाले आणि रवी पुजारी हा दाऊदवर भयंकर चिडला. तो छोटा राजनचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींची हत्या करण्याची जबाबदारी रवी पुजारीला देण्यात आली होती. ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन हा दाऊदपासून वेगळा झाला. इस्ट वेस्ट एअरलाईन्सचा मालक वाहिदची हत्या रवी पुजारीनेच केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर त्याने कर्नाटकमधे मोहन कोटियनचा खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तपासाला वेग आला तेव्हा त्याने देशातून पोबारा केला.

सप्टेंबर २००० मधे बँकॉकमधे गोळीबारानंतर छोटा राजनपासून अनेकांनी फारकत घेतली. त्यात पुजारीचादेखील समावेश होता. राजनच्या अटकेनंतर पुजारी ‘हिंदू डॉन’ होण्याच्या प्रयत्नात होता. या जोरावरच त्याने जेएनयूचा उमर खालिद, शेहला रशिद, जिग्नेश मेवाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुजारीला अटक झाल्याने अंडरवर्ल्डमधली अनेक गुपितं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कारवाई करताना खबरदारी

पुजारीला अटक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी खूप काळजी घेतली. सेनेगलच्या तीन बसमधून पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले आणि चोहोबाजूंनी त्याला वेढा घालत त्याला पकडलं. पुजारीने दक्षिण आफ्रिकेत व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. हॉटेलची चेनच तयार केली होती. त्यात गयाना, बुर्किंना फासो, आयवरी कोस्ट या देशांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षात त्याने व्यावसायिक, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार यांच्यासह ७५ हून अधिक जणांना खंडणीसाठी फोन केलेत. गुजरातमधे रवी आपल्या टार्गेटपेक्षा ५० कोटी अधिक वसुली करत होता. त्याला पकडण्यासाठी डकारमधे असलेल्या गुजराती नागरिकांची मदत घेतली. यापूर्वी तो अनेक वर्षे इंग्लंडमधे राहिलाय. त्याच्यासोबत चोवीस तास हत्यारबंद सुरक्षा रक्षक तैनात असायचे.

भारतात आणण्याची तयारी ठरेल डोकेदुखी

आताच्या अटकेच्या कामी गुजरात एटीएस, महाराष्ट्र, बंगळूर पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी सेनेगल पोलिसांना कागदपत्रे पाठवली. आता पुजारीला भारतात आणण्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे तो श्रीलंकेच्या पासपोर्टवर प्रवास करत होता. ही बाब तपास यंत्रणेला डोकेदुखी ठरू शकते. अशीच काहीशी परिस्थिती थायलंडमधे निर्माण झालीय.

शार्पशूटर मुन्ना झिंगाडा याला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा थायलंड सरकारशी चर्चा करत आहे. त्याला २००० मधे बँकॉकच्या एका रुग्णालयात छोटा राजनवर गोळीबार करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी पासपोर्टसह अटक करण्यात आली होती. रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सरकारला राजकीय मुत्सद्देगिरीही पणाला लावावी लागणार आहे. त्याच्या प्रत्यार्पणाबाबत नेमके काय घडते हे येणार्‍या काही दिवसांत पहावे लागेल. त्याच्या अटकेमुळे अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नाला एक मोठे यश मिळाले आहे हे मात्र नक्की!
 

(साभार दैनिक पुढारी)