संकटं, संघर्ष आणि फाळणीत संधी शोधत मुंजाल कुटुंबाने बनवली ‘हिरो’

०५ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.

‘हिरो मोटोकॉर्प लिमिटेड’ म्हणजेच आधीची आपली लाडकी ‘हिरो होंडा’ कंपनी. सायकल, बाईक आणि मोपेड गाड्या बनवणारी ही भारतातलीच नाही तर जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. आज ही ‘हिरो’ आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलीय. आपल्यापैकी अनेकांचं रोजचं ये-जा करण्याचं साधन आहे. भारताच्या प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यावरून ‘हिरो’च्या अनेक गाड्या धावतात.

या ‘हिरो’च्या उभारणीची गोष्ट सांगणारं पुस्तक ‘हिरो’ कंपनीचे मालक बृजमोहनलाल मुंजाल यांचा मुलगा सुनीलकांत मुंजाल यांनी लिहिलं होतं. या मूळ इंग्लिश पुस्तकाचं हिंदी वर्जन ‘हिरो की कहानी’ २४ मार्च २०२१ ला मंजुल प्रकाशनानं प्रकाशित केलं. या पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबुकवर एक लेख लिहिला होता. त्या हिंदी लेखाचा रेणुका कल्पना यांनी केलेला अनुवाद इथं देत आहोत.

आपल्या सगळ्यांनाच ‘हिरो’ माहीत आहे. पण ‘हिरो’ बनवणाऱ्या चार हिऱ्यांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. आजपर्यंत मोजता येणार नाही इतक्या लोकांच्या आयुष्यात ‘हिरो’ची सायकल आली असेल. ‘हिरो होंडा १०० सीसी’ बाईक आली असेल.

‘हिरो होंडा १०० सीसी’ या नावानं १०० सीसीच्या इंजिनची क्षमता ओळखण्याचा मापदंडही घालून दिला. हवेसारखी आवाज न करता चालणारी ही मोटर सायकल जुन्या फटफटीपेक्षा वेगळी होती. तेव्हाची त्याची जाहिरात ‘फिल इट, शट इट, फर्गेट इट’ तर आठवत असेलच. 

लोकसंस्कृतीचा भाग

८०-९० चं दशक ‘हिरो होंडा’चं होतं. खरंतर गाडीची लोकप्रियता आजही आहेच. पण ऐंशीच्या दशकाला या बाईकनं वेगळीच ओळख दिली. वापरणाऱ्यांना स्वप्न दिली. गौरव दिला. लोभही दिला. हा तो काळ होता जेव्हा दारात कार नसल्याचं दुःख सामान्य माणसांना होत नसे. त्यांच्या आयुष्यात कार नव्हती म्हणून नाही तर मोटरसायकलची प्रतिस्पर्धी म्हणून ‘होंडा’ आली. इंधनाचा कमी वापर, धूर आणि आवाज न करणारी ‘हिरो होंडा’ लोकसंस्कृतीचाच एक भाग झाली.

अनेक भोजपुरी गाण्यात ‘हिरो होंडा’चा उल्लेख सापडेल. त्या गाण्यांचं वेगळं विश्लेषण करायला हवं. या बाईकनं लग्न घराचा रुबाब वाढवला. मुलगा आणि मुलीच्या वडलांमधली बोलणी अनेकदा ‘आधी हिरो होंडाची डिलीवरी होईल मगच वरात निघेल’ या मुद्द्यावर अडकून पडली. त्यावरून भांडणं आणि वाटाघाटीही झाल्या. ‘हिरो होंडा’ न मिळाल्यामुळे बायकोला सोडूनही दिलं जातं होतं किंवा जाळलंही जात होतं.

या बाईकनं तरुणांमधे उत्साह संचारला आणि रोमान्स करण्यासाठी नव्या नव्या जागांवर जायची हिंमतही दिली. बाईक मिळवण्यासाठी अनेक मुलं गुन्हेगार झाली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधे गुन्हेगारांची क्षमताही ‘हिरो होंडा’मुळे वाढली. कमालीचा पीक अप आणि जोरदार स्पीडने गुन्ह्याच्या ठिकाणापासून पळून जाणं सोपं झालं. ८०-९० च्या दशकात खुपसे गुन्हेगार ‘हिरो होंडा’वरून आले आणि गायब झाले.

हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

११९ रुपयांचं खास पुस्तक

माझ्या आयुष्यातही एक ‘हिरो होंडा’ आहे. आजही आहे. वडलांच्या आठवणींची खूण आहे. तीच लाल रंगाची, १०० सीसीची ‘हिरो होंडा.’ त्यांना लाल रंग खूप आवडायचा. आता बाईक चालत नाही. पण तरीही तिला स्वतःपासून दूर नाही करू शकलो. मला माहितीय या ओळी वाचताना तुमच्याही आठवणीतले ‘हिरो’चे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले असतील. तुम्ही ते थांबवूच शकणार नाही. पैज लावा हवंतर! 

हे सगळं आठवलं यासाठी कारण मी एक पुस्तक वाचत होतो. ज्यात ‘हिरो’ला हिरो बनवणाऱ्या चार भावांची गोष्ट सांगितलीय. सुनीलकांत मुंजाल यांनी ही गोष्टी लिहिलीय. ते चार भावांमधल्या एकाचे, बृजमोहन मुंजाल यांचे चिरंजीव आहेत. २०२० मधे इंग्लिशमधे आलेलं हे पुस्तक याच वर्षी मंजुल प्रकाशनाकडून हिंदीत प्रकाशित झालंय. १९९ रुपयांचं हे पुस्तक खासच आहे.

हे पुस्तक वाचताना आपल्याला फक्त एका कुटुंबाची माहिती मिळते, असं नाही. तर फाळणीच्या आधी आणि नंतरच्या काळातल्या व्यावसायिक जीवनातही डोकावण्याची संधी मिळते.

ऊसाच्या शेतात काम केलं

आजच्या पाकिस्तानात लायलपूर जिल्ह्यात कमालिया नावाचं एक शहर होतं. बहादूरचंद मुंजाल हे तिथंच राहत होते. त्यांना पाच मुलं झाली. एक मुलगी आणि चार मुलं. बृजमोहनलाल मुंजाल, दयानंद मुंजाल, ओमप्रकाश मुंजाल आणि सत्यानंद मुंजाल. 

आर्य संस्कृतीतलं हे कुटुंब आनंदी होतं. पण हातात पैसे फारसे नव्हते. या भावांनी आपल्या आयुष्यात काय काय पाहिलं! पण हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातल्या बदलांसोबतच फाळणीच्या आधी आणि नंतरच्या आर्थिक बदलांचीही नोंद ठेवतं. 

१९२९ ची महामंदी त्यांच्या आसपासच्या परिस्थितीवर आणि तेव्हाच्या ब्रिटिश सरकारवर परिणाम करते. त्याचा प्रभाव मुंजाल कुटुंबावरही पडतो. नोकरीचा शोध घेणाऱ्या वडील मुलाच्या बृजमोहनलाल मुंजालच्या हातात अपयश येतं. शेवटी १९३८ मधे शिक्षण बाजुला ठेवून ऊसाच्या शेतात मोळ्या मोजायचं काम मिळतं. हे कामही ते प्रामाणिकपणे करतात. हेच बृजमोहनलाल पुढे जाऊन ‘हिरो’ सायकल आणि मोटर सायकल बनवतात. पण एकटे नाही, तर आपल्या चार भावांना सोबत घेऊन.

हेही वाचा : तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

मृत्यूलाही दिली हुलकावणी

बृजमोहनलाल आपल्या तीन भावांच्या मागे मागे क्वेटा शहरात जातात. भाऊ तिथं शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात काम करत असतात. सुनीलकांत मुंजाल लिहितात की या शहरात भरपूर वर्दळ होती. संपूर्ण भारतातून लोक रोजगाराच्या शोधात इथं येत होते. अनेक मजली इमारती होत्या. त्याला मिनी लंडनच म्हटलं जात होतं. 

१९३५ चा भूकंप येतो आणि त्यातला एक भाऊ दयानंद इमारतीच्या खाली गाडला जातो. ३६ तासानंतर ते जिवंत बाहेर येतात आणि आयुष्यभर वेदनेत राहतात. पुन्हा १९५८ मधे हिरोचा कारखाना बनला तेव्हा स्टीलचं सीट त्यांच्यावर पडलं आणि मांड्यातलं हाड अनेक ठिकाणी तुटलं. दंगल चालू असताना एक बंदुकीची गोळी बृजमोहनलाल यांच्या कपाळाला चाटून गेली. जखमी झाले. 

सत्यानंद यांना बाकीचे भाऊ सैन्यात भरती व्हायला सांगत असतात. पण त्यांच्या पाय सपाट असल्यानं त्यांची निवड होत नाही. योगायोगच म्हणायला हवा. कारण, त्या वर्षी क्वेटामधून ज्या चार लोकांची निवड झाली ते चारही जण दुसऱ्या महायुद्धात मारले गेले.

भारताची स्वप्न आपलीशी केली

क्वेटामधे अपयशी होऊन सत्यानंद लाहोरला जातात. आपला भाऊ दयानंदच्या मित्राच्या सायकल दुकानात काम करण्यासाठी. तिथं पंक्चर काढणं शिकतात. या चौघांच्याही आयुष्यात सायकल येत-जात राहते. हे पुस्तक वाचताना असं वाटेल की कधी नियती या चार भावांची गोष्ट लिहितेय. तर कधी हे चार भाऊ आपल्या नियतीची गोष्ट स्वतःच लिहितायत.

शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात काम करताना तीन भाऊ मेकॅनिकचं काम शिकतात. तर बृजमोहनलाल मॅट्रिक पास झाल्यामुळे क्लार्क बनतात. इथंच चौघं भाऊ सायकलची देखरेख आणि दुरूस्ती शिकतात. बृजमोहनलाल आपल्या कामातून सगळ्यांची मनं जिंकतात. पण मित्राच्या वडीलांची सेवा करण्यासाठी स्वतःची नोकरी पणाला लावतात. शेवटी नोकरी सोडून देतात.

कोणत्याही किमतीवर व्यक्तिगत संबंध निभावणाऱ्या बृजमोहन यांचं संपूर्ण आयुष्य या पुस्तकात रेखाटलं नाहीय. त्यांच्या आयुष्यावरही पुस्तक लिहायचे अनेक प्रस्ताव आले. पण त्यांनी नाही लिहिलं. कदाचित त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची कथा इतकी लांब आणि गुंतागुंतीची असेल की त्यात परत जाऊन, ती लिहून पुन्हा नव्यानं आयुष्य जगणं त्यांना जमलंच नसतं.

त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुनील यांनी लिखण्याचा विडा उचलला पण खूप कमी प्रसंग हाती लागले. काही इथून मिळेल तर काही तिथून. पण या प्रसंगातही फाळणीचा सामान्य माणसांच्या जीवनावर होणारा परिणाम दिसतो. त्यात उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब फाळणीनंतर जगण्यासाठी संघर्ष करत स्वतंत्र भारतातची स्वप्नही आपलीशी करतं. म्हणून तर बृजमोहन आपलं घर सोडून १६ ऑगस्टला नेहरूंचं भाषण ऐकायला जातात. उत्सव साजरा करतात.

हेही वाचा : आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद

१९५६ मधे घातला ‘हिरो’चा पाया

१९४४ चं साल होतं. दयानंद अमृतसरमधे सायकल पार्ट्सचं दुकान उघडतात. १९४५ मधे अमृतसरमधे पूर येतो. त्यांच्या आसपासच्या दुकानात चोरी होते. चारही भाऊ चोराला आग्र्याहून शोधून आणतात. चोराच्या मागे मागे आग्र्याला जातात तर तिथेच सायकलचं दुकान काढण्याचा निर्णय घेतात. पण काही काळानंतर बालमुकुंद लुधियानात सायकल पार्टचं दुकान काढतात. त्यात पार्टनर म्हणून पहिले दयानंद पोचतात आणि मग त्यांच्या मागे त्यांचे भाऊ.

भावांचं अशाप्रकारे एकमेकांच्या मागे येणं आणि त्यांच्या जगण्यात या ना त्या कारणानं सायकल येणं सांगत राहतं की अजून यांच्या जगण्यातली ‘हिरो’ची गोष्ट बाकी आहे.

भाऊ तिथंच आपलं स्वतःचं घर बनवण्याच्या पाठी लागतात. पण तेव्हा वातावरण गरम व्हायला लागलं होतं आणि दंगलीच्या, फाळणीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी कुटुंबाची बैठक बोलावली जाते. सगळे अमृतसरला जायचं ठरवतात. दयानंद आणि सत्यानंद तिथं जाऊन व्यवसाय सुरू करतात.

डिझेल इंजिन, पंप, शिलाई मशीन, कल पुर्जे आणि सायकलच्या उत्पादनात आणि मागणीत वाढ झाली तोच हा काळ. मुंजाल भाऊ या संधीच्या आधीच तिथं आले होते. गोष्ट अनेक वळणं घेत लुधियानाला पोचते. १९५६ मधे हिरो सायकलचा पाया घातला जातो.

‘हिरो’ची प्रसिद्ध डायरी

सुनीलकांत यांनी हे पुस्तक फक्त आपल्या वडलांसाठी लिहिलेलं नाही. त्यांच्या तीन काकांशिवाय ‘हिरो’चा प्रवास पूर्ण झाला नसता. त्यातच ओमप्रकाश मुंजाल आहेत. त्यांची ओळख शायर मुंजाल अशी झाली होती. ते ‘हिरो’ची डायरी बनवतात. या डायरीला भरपूर मागणी होती. या डायरीच्या प्रत्येक पानावर कुणाचा शेर तर कुणाची कविता असायची. त्याची निवड ओमप्रकाश मुंजाल करायचे. नव्या कवींनाही संधी मिळायची. 

पुस्तकातली गोष्ट एका वळणावर बंगालमधल्या अकालमधे जाऊन पोचते तर तिथे महात्मा गांधी ‘करो या मरो’च्या आंदोलनात असतात. अशी एक से एक वळणं आहेत या पुस्तकात! आता हे पुस्तक आहे चार भावांवर. आणि मी अजून ते वाचतोय. पण स्वतंत्र भारतात कोणताही उद्योगाचा विस्तार झालाच नसता त्या प्रसंगांचा उल्लेख आत्तापर्यंत त्यात केलेलाच नाहीय. नेत्यांशी झालेल्या ओळखीचा उल्लेख या पुस्तकात आहे पण त्यांच्यासोबत झालेल्या देवाणघेवाणीचा नाही. कदाचित पुढच्या पानांत असेल किंवा तो उल्लेख करणं शक्यही झालं नसेल.

हेही वाचा : इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

मुंजाल झाले नाहीत धर्मांध

मी सगळ्या गोष्टी नाही लिहित. खरंतर या पुस्तकात इतके छोटे छोटे प्रसंग आहेत आणि प्रत्येक प्रसंगामागचे संदर्भ इतके व्यापक आहेत की त्यांचा उल्लेख न करण्यापासून स्वतःला थांबवणं अवघड आहे. त्यामुळे इथंच पूर्णविराम द्यायला हवा. पण या पुस्तकाच्या माध्यमातून बृजमोहनलाल मुंजाल आणि त्यांच्या भावांना भेटून खूपच छान वाटलं. खास जगणं जगलेत ते. खूप सोसलंय आणि तितकंच जगलंय. 

धर्मांधतेच्या भयंकर तुफानात अडकलेल्या या कुटुंबाचं किती काय काय उद्ध्वस्त झालं! पण त्याची कटुता मनात ठेवत मुंजाल कुटुंब स्वतः कधीही धर्मांध झालं, असं अजिबात वाटत नाही. निदान या पुस्तकात तरी तसं काहीही सांगितलेलं नाही. सुनीलकांत मुंजाल यांचा ‘हिरो’ ग्रुप अशा धार्मिक कट्टरता वाढवणाऱ्या चॅनेलना जाहिरात देत नसेल अशी आशा आहे.

फाळणीनंतर भारतात राहिलं पाहिजे, असं मुंजाल कुटुंबाला वाटलं. तसंच लुधियानाच्या करीम दीन यांना फाळणीच्या खूप नंतर वाटू लागलं की पाकिस्तानात गेलं पाहिजे. करीम दीन पाकिस्तानात जाऊ लागले तर ओमप्रकाश मुंजाल यांनी ‘तुमच्या ब्रँडचा वापर करू का?’ असं त्यांना विचारलं. करीन दिन यांनी होकार दिला. त्याच ब्रँडचं नाव ‘हिरो’ होतं. तोच आजचा ‘हिरो’ आहे.

हेही वाचा : 

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?