वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

२६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


मी मॉडेलिंगच्या तेही न्यूड मॉडेलिंगच्या नादाला लागलो ते एका चित्रकार मित्रामुळे. त्याच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात गेलो. मॉडेलिंग विपश्यनेसारखं असतं, हे मला तिथं जाऊन उमगलं. मॉडेलिंगमधेही निश्चल बसावं लागतं आणि विपश्यनेतही. विपश्यनेप्रमाणेच मॉडेलिंग करताना शरीराची हालचाल होत नाही. तेव्हा मन अधिक कार्यरत होतं, असं मनोगत मांडणारा आकाश छाया लक्ष्मण यांचा लेख.

शाळेत इयत्ता आठवीपर्यंत चित्रकला हा विषय आपण सगळेच शिकतो. कुठलीही पूर्वतयारी न करता पेपर देऊ शकू असा हा एकमेव विषय असतो. एवढाच त्याच्याशी आपला संबंध. पण खरंतर, चित्र हा चिंतनाचा विषय आहे. त्यातही आशय दडलेला असतो. त्यामुळेच चित्रातून कुठल्या मानवी भावभावना, नवरस योग्यरित्या व्यक्त होतील, याचा एकदा शोध घ्यायला हवा. आणि चित्रातून व्यक्त होईल तेच शब्दातून व्यक्त करता येईल असं काही नाही.

त्यामुळेच व्यक्त होण्याच्या प्रभावी माध्यमांपैकी चित्र हे महत्त्वाचं माध्यम ठरतं. चित्र म्हणजे फक्त कागद, पेन, रंग एवढंच नसतं. त्यापलिकडे चित्रासाठीचं मॉडेल बनूनही आपण चित्राशी जोडले जातो तेव्हा चित्रकला नव्या पद्धतीनं समोर येते. आपल्याकडे या मॉडेलिंगला फारशी किंमत दिली जात नाही. त्यातही न्यूड मॉडेल असतील तर त्यांच्याकडे अश्लीलतेच्या नजरेतूनच पाहिलं जातं. पण नग्नता नेहमीच अश्लीलता असत नाही.

हेही वाचा : वाचकाचा लेखः किशोरीताई आमोणकर भिन्न षड्ज

मॉडेलिंग म्हणजे विपश्यनाच

चित्र आणि मॉडेलिंग ही एकमेकांना जोडलेली आणि तरीही एकमेकांपासून लांब असलेली क्षेत्रं. मी मॉडेलिंगच्या तेही न्यूड मॉडेलिंगच्या नादाला लागलो ते एका चित्रकार मित्रामुळे. त्याच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात गेलो. मॉडेलिंग विपश्यनेसारखं असतं, हे मला तिथं जाऊन उमगलं. मॉडेलिंगमधेही निश्चल बसावं लागतं आणि विपश्यनेतही. विपश्यनेप्रमाणेच मॉडेलिंग करताना शरीराची हालचाल होत नाही. तेव्हा मन अधिक कार्यरत होतं.

विपश्यना म्हणजे ध्यानधारणेची एक नवी पद्धत सध्या फार रूढ होतेय. त्यासाठी एका विशिष्ट मुद्रेत, डोळे बंद करून पायापासून गुडघ्यापर्यंत आणि तिथून पुन्हा हळूहळू पोटांमधे जाणवणाऱ्या संवेदनेपर्यंत लक्ष केंद्रीत करावं लागतं. सोबतच श्वास सोडल्यानं ओठांच्या वरच्या भागावर हवेमुळे जाणवणाऱ्या संवेदना, डोळे बंद आणि एकाच ठिकाणी स्तब्ध असल्यामुळे डोळ्यांच्या खाली जाणवणाऱ्या संवेदना, मेंदूतल्या संवेदना, हातापासून डोक्यापर्यंत जाणवणाऱ्या या साऱ्या संवेदनांवर लक्ष केंद्रीत करावं लागतं.

तशा अवस्थेत बसून शरीरात वेदना झाल्या म्हणून चेहऱ्यावर त्रासिक भाव येऊ द्यायचे नाहीत किंवा सुखद अनुभव आला म्हणून हुरळूनही जायचं नाही अशी अट असते. दोन्ही परिस्थितीत तटस्थ राहता आलं पाहिजे, तेव्हा विपश्यना पूर्ण होते.

डोक्यात हजारो विचार चालतात

अगदी तसाच प्रत्यय मॉडेलिंगच्यावेळीही येतो. फरक इतकाच की मॉडेलिंगसाठी डोळे उघडे ठेवून, नजर एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित करून, दिलेल्या ठराविक पोझमधे निश्चल बसावं लागतं. सलग सहा तास बसून रहायचं म्हटलं तर सुरवातीला माणसाची चिडचिड होते. हे निश्चल बसण्याचं कसलं काम, असं वाटू लागतं. ना बुद्धीला चालना, ना सक्रियता! नुसतीच स्थिरता! आपल्यासारखीच माणसं आपल्या आसपास आपलं चित्र काढताना पाहून आपलेही हात सळसळू लागतात. पण जागेवरून हलायचं नसतं.

बसून बसून कधी हाता पायाला मुंग्या येतात, तर कधी पोटात हालचाल जाणवते. कधी पाठ आणि पार्श्वभाग भयानक दुखू लागतो. अवघड पोझ असली की कसोटी लागते. वेदना इतक्या तीव्र होतात की दहा मिनिटांचा ब्रेक घेऊन शरीर मोकळं करावं असं वाटू लागतं. वेदना आणि संवेदनांवर तटस्थपणे लक्ष्य केंद्रित करून ठराविक अवयवांमधे होणारी वेदना केव्हातरी निघून जाते आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुसरी वेदना सुरू होते.

अशावेळी, मनात होणारा भावनांचा कल्लोळ चेहऱ्यावर दिसू द्यायचा नसतो. अचानक कुठलातरी जोक आठवून हसू आलं तरी ते आतल्या आत दाबावं लागतं. कधीकधी तर शरीरातला रक्त प्रवाहही आपल्याला जाणवतोय असा भास होत असतो. तर दुसरीकडे डोक्यात असंख्य विचार चालू असतात. अगदी पॉर्नपासून जग बुडीपर्यंत काहीही.

हेही वाचा : ‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

प्रत्येक कॅनवॉसवर आपण वेगळे असतो

सुरवातीला कुणीतरी आपल्या शरीराचा अभ्यास करतंय ही जाणीव खूप सुखद वाटू लागते. वर्गातल्या असंख्य नजरा आपल्यावर रोखलेल्या असतात. प्रत्येकजण आपलं शरीर न्याहाळत असतं. पोझमुळे निर्माण झालेले अवयवांचे आकार, श्वासोच्छ्वासामुळे किंचित हलणारं पोट, पोटातल्या हवेमुळे निर्माण झालेली गोलाई यावरून फिरणाऱ्या नजरा पोटापासून हातापर्यंत येतात आणि हळू हळू चेहऱ्यावर स्थिरावतात. चेहऱ्यावरील असंख्य छटा, ओठांमागे दिसणारे दात, डोळ्यांमधे रोखलेले भाव जसेच्या तसे कॅनवॉसवर चितारणारे असंख्य चित्रकार आपल्यासमोर बसलेले असतात.

त्यातलंच कुणीतरी आपल्या त्वचेचा रंग कुंचल्याने एकत्र करून जुळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रकाश योजना अशी की अर्धा चेहरा अंधारात तर अर्ध्या चेहऱ्यावर सूर्याची कोवळी किरणं स्मित हास्य निर्माण करतायत असा भास होतो. अंधारामुळे गूढ, तर उजेडामुळे आशादायी अशी रचना त्या हॉलमधे भरलेली असते.

प्रत्येकाची कलर पॅलेट वेगवेगळी असतात तसंच त्यातल्या प्रत्येकाच्या कॅनवॉसवर आपण वेगवेगळं दिसत असतो. स्वतःची अशी असंख्य रूपं पाहताना मजा वाटते. कुणी चित्रातून व्यक्तिमत्त्व शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर कुणाचा हा प्रयत्न अर्धवट पूर्ण झालेला असतो. कुणी हुबेहुब आपलं चित्र रेखाटलेलं असतं. तर कुणाला फक्त हातच उत्तम जमलेला असतो. तर कुणाचं चित्र पाहताना हसू येई इतकं ते विनोदी वाटत असतं.

एखादं चित्रं मॉडेलचंही असतं

मॉडेलचा खरा आनंद, चित्रकाराने शोध घेतलेल्या व्यक्तिमत्वात असतो. हुबेहुब चित्र रेखाटन एकवेळ सोपं असतं. पण व्यक्तिमत्वाचा शोध घेणारी चित्र खूप दुर्मिळ असतात. चित्रकाराला मॉडेलचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असेल, तर मॉडेलला बोलतं करावं लागेल. तरंच माणूस म्हणून समजून घेतलेला मॉडेल चित्रात सहज उमटेल. नाहीतर चित्र निर्जीव वाटेल.

नेमका हाच संवाद मॉडेल आणि चित्रकारांमधे घडत नाही. त्यासाठी मोकळीक निर्माण करायला हवी. चित्रामधे मॉडेल आणि चित्रकाराची प्रचंड ऊर्जा एकवटलेली असते. दोघांच्या मनात असणाऱ्या कितीतरी भावभावनांचा, विचारांचा संस्कार चित्रावर झालेला असतो. एखादं चित्र फक्त चित्रकाराचंच असतं असं नाही. तर त्या चित्राच्या निर्मिती प्रक्रियेत चित्रकाराइतकाच मॉडेलही गुंतलेला असतो. चित्रकाराएवढंच ते चित्र त्याचंही असतं. पण याचं क्रेडिट मॉडेलला मिळत नाही, आणि मॉडेल फक्त चित्रातल्या पात्रा एवढाच उरतो.

समजा, एखाद्या चित्रकाराचा आणि मॉडेलचा संभोग झाला आणि त्यानंतर लगेचच चित्र काढणं सुरू झालं तर त्यात त्या मॉडेलच्या व्यक्तिमत्वाचे कित्येक ठसे दिसतील. बऱ्याचदा चित्रकाराच्या दृष्टीतून दिसणाऱ्या त्या मॉडेलवर चित्रकाराने स्वतःचे संस्कार केलेले असतात. चित्र काढताना डोक्यात कोण्या एका व्यक्तीचा किंवा घटनेचा विचार असेल तर ते चित्रात उतरण्याची शक्यता दाट असते.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

मॉडेलिंगविषयी संकुचित दृष्टीकोन

मी अभिनवमधे सुरवातीला साधं मॉडेलिंग केलं. त्यानंतर न्यूड मॉडेलिंगकडे वळालो. तेव्हा लक्षात आलं की इथे नग्नतेला फारच महत्त्व आहे. चित्राचं मॉडेलिंग हे आपल्याकडे करियर म्हणुन प्रस्थापित झालेलं नाही किंवा मॉडेल म्हणून बसण्यासाठी काही कोर्स, डिग्री वगैरेही नाही. आणि समाजात त्याला मान्यताही मिळालेली नाही.

आर्ट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा अभ्यासासाठी मॉडेल्स मिळत नाही. मग कुठल्यातरी ओळखीच्या मित्रांना आणलं जातं. कुणीच मिळालं नाही तर विद्यार्थी स्वतः आळीपाळीने मॉडेल म्हणून बसतात. बाहेरुन प्रोफेशनल मॉडेल आणणं हे प्रत्येक आर्ट कॉलेजना परवडत नाही. कॉलेजने ठरवून दिलेल्या त्याच मॉडेलचं चित्र विद्यार्थी काढतात. पण नव्या शरीराचा अभ्यास करायची संधी त्यांना मिळत नाही. काही हौशी मॉडेल येतात पण त्यांनाही इथली उदासीनता लवकरच लक्षात येते.

न्यूड स्टडीसाठी तर मॉडेल मिळणं आणखीनच कठीण असतं. आपण आपल्या जोडीदारासमोर नागड होणं आणि तेच चाळीस पन्नास विद्यार्थ्यांसमोर नागडं होणं यात कितीसं अंतर आहे? पण न्यूड शब्द उच्चाराला तरी काहींच्या भुवया उंचावतात. नग्नता ही काही अश्लील नाही.

पुरूष सुंदर नसतो?

काही चित्रकार पुरुषांपेक्षा स्त्री मॉडेलकडे जास्त आकर्षित होतात. चित्रांचं प्रदर्शन बघताना हे प्रकर्षाने जाणवतं. बहुतेक सगळ्याच प्रदर्शनात स्त्रियांची न्यूड पेंटिंग असतात. काही अपवादात्मक ठिकाणी पुरुषांचीही न्यूड पेंटिंग सापडतात. पण बहुधा सगळ्यांनाच स्त्री देहाविषयी प्रचंड, कधीही न संपणारं, कमालीच कुतूहल असतं.

आपल्याकडे पुरूष म्हणजे रांगडा, रुबाबदार, मर्द आणि स्री म्हणजे सुंदर, नाजूक, कोमल अशी समजूत आहे. पुरूष सुंदर नसतो का? पण मुळातच चित्र विकत घेणारे रसिक कमी असल्यानं आणि आहेत त्यांचा भर सजावटीसाठी चित्र विकत घेण्याकडे असतो. त्यामुळे पारंपरिक समजूतीनंच सगळा कारभार चालतो. त्यामुळे चित्रकाराचा मूळ हेतू रसिकापर्यंत पोचतोच असं नाही.

हेही वाचा : लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

नग्नतेकडे तटस्थपणे पहावं लागेल

त्यातही न्यूड या शब्दाभोवती एक गूढतेचं वलय आपण आखून ठेवलंय. पारंपरिक समजूतींमुळे मॉडेलिंगसाठी सौष्ठव असलेलं शरीर असावं तरच मॉडेल म्हणून चित्रकाराला अत्याधिक आनंद देता येईल, असं प्रत्येकालाच वाटतं. पण प्रत्यक्ष मॉडेलिंगमधे उतरल्यावर बेढब शरीराकडेही पोरं आकार म्हणुन पाहतात, हे लक्षात येतं. मॉडेलिंग, नग्नता,लाज याविषयीचे सगळे पूर्वग्रह तिथं गळून पडतात. 

स्वतःतली लाज घालवायची असेल तर न्यूड मॉडेलिंग करायला हवं. पण त्याआधी नग्नतेकडे आपल्याला तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. आपली सगळी इज्जत नग्नतेत एकवटलेली असते. नग्न होणं म्हणजे आपलं काहीतरी गुपित उघडं पडलंय असा आविर्भाव आपल्यात असतो. त्यामुळेच ‘नग्नता म्हणजे अश्लीलता नाही’ हे कितीही ओरडून सांगितलं तरी कळत नाही आणि वळतही नाही.

हेही वाचा : 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं