फुले आणि आंबेडकर : मुक्तिदायी राजकारण उभारणारी आधुनिक गुरुशिष्याची जोडी

१४ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध.

भारतात गुरू-शिष्यांच्या अनेक परंपरा आहेत. या परंपरांपेक्षा वेगळी परंपरा महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातल्या गुरू-शिष्याची होती, आहे. ही परंपरा ऑरगॅनिक विचारवंत या प्रकाराची आहे. यामुळे या दोन विचारवंतांमधे समाजपरिवर्तनाच्या संदर्भात साम्य दिसतं.

त्यांनी समताधिष्ठित समाजाची संकल्पना मांडली. तसंच सामाजिक आणि राजकीय अंदाधुंदीवर दोन्ही विचारवंतांनी उपाय शोधून काढले. त्यांनी चांगल्या समाजाची आणि राज्याची व्यवस्था लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. यथास्थितीशील समाजाच्या जागी कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र त्यांनी रंगवलं.

अशा कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग अवलंबला. त्यांनी चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता.

मुक्तिदायी राजकारणाचा अजेंडा

या दोन्ही विचारवंतांची राजकारण विषय समज व्यापक होती. अस्पृश्यता निर्मूलन, जातिसंस्थेचा अंत आणि पुरुषसत्ताक समाजरचनेचा अंत म्हणजे राजकारण अशी राजकारणाची व्यापक समज त्यांची होती. त्यांनी संकुचित राजकारणावर सातत्याने मात केली. यामुळे हे दोन्ही विचारवंत मुक्तिदायी राजकारणाचे शिल्पकार आहेत.

या दोन्ही विचारवंतांनी मुक्तिदायी राजकारणाचा अजेंडा भारतात दिला. अशी अनेक साम्यस्थळं या दोन्ही विचारवंतांमधे आहेत. त्यापैकी ऑरगॅनिक विचारवंत, गुड सेन्स आणि मुक्तिदायी राजकारण हे तीन मुद्दे आजच्या काळातल्या समस्या सोडवण्यासाठी औचित्यपूर्ण आहेत.

या दोन्ही विचारवंतांमधल्या तीन मुद्द्यांची ही एक चित्तवेधक समान कथा आहे. ही कथा सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्रांतीशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे ती बिग कथा ठरते.

हेही वाचा : खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

ऑरगॅनिक विचारवंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानलं होतं. त्यामुळे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एक गुरू-शिष्याची परंपरा आहे. मात्र, ही परंपरा पारंपरिक पद्धतीची नाही. दोघेही समाज प्रतिबद्ध म्हणजे ऑरगॅनिक इंटलेक्च्युअल विचारवंत होते. त्यामुळे ते परंपरागत विचारवंतांपासून वेगळे होते. हा दुवा दोघांना एकत्र जोडणारा होता, आहे. हे दोन्हीही विचारवंत समाज प्रतिबद्ध विचारवंत होते. कारण दोघेही परिवर्तनासाठी आग्रही होते.

त्या दोघांचा विचार क्रांतिकारी होता. त्यांनी क्रांतिकारी जाणिवांचा विकास सतत केला. त्यांनी परिस्थितीपासून स्वतःला वेगळं केलं नाही. त्यांनी समाजाशी जवळचे संबंध निर्माण केले. समाजापासून स्वतंत्र आणि वेगळं असं स्वतःचं क्षेत्र निर्माण केलं नाही. समाजाशी बांधिलकी ठेवून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. 

यांची उदाहरणं म्हणजे महात्मा फुले आणि आंबेडकरांचा जातीवादावरचा युक्तिवाद. फुले म्हणायचे ,जातसंस्था विषमतेवर आधारलेली आहे. म्हणून तिच्या शेवटाचा विचार त्यांनी मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही समतेसाठी जातिसंस्थेच्या अंताचा विचार मांडतात. दोघांचं अंतिम ध्येय स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करण्याचं होतं. या कारणासाठी त्यांनी विषमतेवर आधारलेली जातिसंस्थेची व्यवस्था नाकारली. त्यांनी जातीविरहित समाजाचा पुरस्कार केला.

लोकशाही मूल्य गुड सेन्समधे

धर्मश्रद्धांबद्दल कॉमन सेन्सची संकल्पना परंपरागत विचारवंत मांडतात. पण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात गुड सेन्सचा विचार मांडला. त्यांनी लोकांच्या कॉमन सेन्सला गुड सेन्समधे रूपांतरित केलं. यासाठी त्यांनी लोकांमधल्या धर्म श्रद्धांचा आदर केला. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म ही संकल्पना मांडली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा विचार मांडला.

लोकांमधली सहिष्णुता, सामाजिक सलोखा, बंधुभाव या मूल्यांना त्यांनी गुड सेन्समधे रूपांतरित केलं. याची उदाहरणं म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म आणि ‘बुद्ध अँड हिज’ धम्म ही आहेत. त्यांनी सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव हा विचार मांडला. त्याबरोबरच त्यांनी धर्म संकल्पनेची चिकित्सा केली. व्यक्ती-व्यक्तीचे संबंध, व्यक्ती आणि समाजाचे संबंध, व्यक्ती आणि राज्य यांचे संबंध या गोष्टींची आधुनिक संदर्भात पुनर्रचना केली.

म्हणजे त्यांनी वरवरचं समाजपरिवर्तन केलं नाही. त्यांनी अत्यंत सखोल समाजपरिवर्तन केलं. त्यांनी परिवर्तनाची सामूहिक जाणीव निर्माण केली. यातून त्यांनी परिवर्तनवादी शक्तींचा समाजात एक ब्लॉक तयार केला.

हेही वाचा : युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

सांस्कृतिक प्रभुत्वाला नकार

सत्ताधारी वर्ग केवळ शस्त्रबळाच्या आधारे आपलं वर्चस्व निर्माण करत नाहीत. सत्ताधारी वर्ग आर्थिक आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वैचारिक प्रभुत्वाचं क्षेत्र निर्माण करतात. वैचारिक प्रभुत्वाचं क्षेत्र म्हणजे सांस्कृतिक संकल्पना. यामुळे या दोन्ही विचारवंतांनी सांस्कृतिक संकल्पनेची सविस्तर चर्चा केली. त्यांनी नवीन सांस्कृतिक संकल्पनेची मांडणी केली.

उदाहरणार्थ, महात्मा फुले यांनी बळीचं राज्य ही संकल्पना मांडली. तसंच त्यांनी कुळवाडी कुलभूषण हा शिवाजी महाराजांवरचा पोवाडा लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध हे सांस्कृतिक प्रतीक स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या संदर्भात विकसित केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिलं होतं. तसंच ते रायगड इथंही गेले होते. ही त्यांची कामगिरी जुने सांस्कृतिक प्रभुत्व नाकारणारी होती. त्यांची ही कृती नवीन समाजाची निर्मिती करण्यासाठी पर्यायी संस्कृतीची उभारणी करणारी होती. हे दोन्ही विचारवंतांमधे समान दिसतं.

ऑरगॅनिक विचारवंतांचा बंधुभाव

पुरुष वर्चस्व, जात वर्चस्व, धर्म वर्चस्व, वंश वर्चस्व, आर्थिक वर्चस्व या गोष्टी समतेच्या विरोधातल्या आहेत. याबद्दल या दोन्ही विचारवंतांचं एक मत होतं. त्यामुळे त्यांनी वर्चस्वाची संकल्पना नाकारली. त्यांनी स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात मांडला. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची परंपरा सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बीलचा आग्रह धरला.

हिंदू कोड बील मंजूर केलं नाही म्हणून आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजेच, थोडक्यात त्यांनी सर्व प्रकारच्या वर्चस्वाला दूर करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा दोन्ही ऑरगॅनिक विचारवंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक समान पैलू होता. हे दोन्ही विचारवंत आधुनिक नागरी समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी मानवी मूल्यांवर आधारलेली परंपरा सुरू केली.

यामुळे त्यांची आंदोलने वेगवेगळ्या काळात झाली असली, तरी त्या आंदोलनांचा आशय मात्र परिवर्तनवादी होता. या दोन्ही विचारवंतांनी जमातवाद आणि धर्मांधता या दोन्ही गोष्टींना विरोध केला. त्यांनी सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव यासारख्या मूल्यांना नवीन समाजाचा आधार मानलं. आजच्या काळातही त्यांचा हा विचार औचित्यपूर्ण ठरतो.

विशेषतः आजचा समाज हा पाळतसमाज आहे. या पाळतसमाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी या दोन्ही ऑरगॅनिक विचारवंतांनी मांडलेल्या बंधुभाव संकल्पनेची ऑक्सिजन आणि पाण्यासारखी गरज आहे. हे त्यांच्या विचारांचं आजच्या काळातलं औचित्य दिसतं.

हेही वाचा : 

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

(साभार दैनिक पुढारी)