लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत.
साहित्य, विज्ञान, सामाजिक संशोधन, संगीतकार इत्यादी मानवी संस्कृतीची जी विविध अंगे आहेत, त्यामधून मानवी कल्याण साधणे हेच एकमेव अंतिम उद्दिष्ट ठेवून लेखक, शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, कलाकार इत्यादींनी सतत कार्यमग्नस असणे अवघ्या समाजाच्या हिताचे असते. परंतु अलीकडे काही इतिहासकार आणि संशोधक वस्तुनिष्ठतेच्या नावाखाली समकालीन नेत्यांच्या किंवा महापुरुषांच्यातील मैत्रीपेक्षा संघर्षावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात मश्गुल झालेले दिसतात!
त्यामधूनच महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर किंवा महाराष्ट्रतील आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यातील वादाचा शोध घेतला जातो. तर काही विचारवंतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन विश्विवंदनीय महापुरुषांमधील मतभेदांचा मागोवा घेण्यात परम संतोष होतो. तोच प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबाबत आजही सुरू आहे.
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मैत्रीपेक्षा मतभेदांची सतत चर्चा करीत बसण्यात काही स्वसमूह श्रेष्ठतावादी तथाकथित अभ्यासक आणि काही विचारवंतांना आजही कमालीचा आनंद वाटत असतो. मात्र त्यामुळे लोकमान्य आणि राजर्षी शाहू छत्रपती या उभय महापुरुषांबाबत कमालीचा आदर आणि प्रेम असणाऱ्या असंख्य वाचकांचा खूप गैरसमज होतो. म्हणूनच प्रस्तुत लेखात प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या आधारे लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील स्नेह आणि सहयोगाचा विलोभनीय मागोवा थोडक्यात घेतला आहे.
हेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!
कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि लोकमान्य टिळक यांचा परस्पर संबंध अगदी प्रथम १८८३ मधे आला, असे दिसून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचे दत्तक वडील चौथे शिवाजी यांना तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांना ब्रिटिशांनी हाताशी धरून वेडे ठरविण्यात आले. चौथ्या शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या तुरुंगात डांबण्यात आले. तेथे ब्रिटिश अधिकारी ग्रीनने चौथ्या शिवाजी महाराजांच्या पोटात बुटाची लाथ घातली. परिणामी महाराजांचा पोटातील प्लीहा फुटून त्यांचा दुःखद मृत्यू झाला.
त्यावेळी नुकतेच उदयास आलेले ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या पत्रकांचे तरुण संपादक बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी चौथे शिवाजी महाराजांची बाजू घेऊन ब्रिटिश आणि दिवाण बर्वे यांच्यावर कडाडून टीका केली. त्यामुळे या तरुण पत्रकारांवर माधवराव बर्वे यांनी अब्रुनुकसानीचा दावा लावला. त्या दाव्यात टिळक आणि आगरकरांना १०१ दिवसांची डोंगरीच्या तुरुंगात सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली. पुढे १८८४ च्या सप्टेंबरमधे डेक्कोन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. त्यापूर्वीच कोल्हापूर संस्थानचे राजनैतिक प्रतिनिधी जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे यांनी टिळक - आगरकरांच्या न्यू इंग्लिश स्कूलला पाचशे रुपयांची देणगी दिली होती.
हळूहळू ‘केसरी’कार बाळ गंगाधर टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती घराणे यांच्यातील संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होत गेलेले आढळतात. २ एप्रिल १८९४ रोजी शाहू राजांचा राज्याभिषेक समारंभ अतिशय थाटात पार पडला आणि कागलच्या घाटगे घराण्यातून यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे कोल्हापूरचे शाहू छत्रपती झाले. त्या मंगल प्रसंगी लोकमान्य टिळकांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने एप्रिल १८९४ च्या ‘केसरी’मधे ‘करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग’ असा अग्रलेख लिहून शाहू छत्रपतींचे मनःपूर्वक स्वागत केले.
राजर्षी शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणणारे एक वादळी प्रकरण म्हणून वेदोक्त प्रकरणाकडे पाहावे लागते. ‘जरी ब्राह्मण झाला भ्रष्टा तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठा’ या सनातनी हिंदू धर्मातील वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत बहुजनांच्या सर्वांगीण कल्याणासाठी केलेल्या संघर्षांची ती केवळ सुरवात होती.
१८९९ च्या कार्तिक महिन्यात शाहू छत्रपतींचे क्षत्रियत्व अमान्य करून त्यांचेच सेवक असणाऱ्या एका पोटार्थी भिक्षुकाने त्यांचा वेदोक्ताशचा अधिकार नाकारला होता. तीच वेदोक्तस या धगधगत्या प्रकरणाची सुरवात होती. पंचगंगेच्या काठावर स्नानाच्या वेळी घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने महाराष्ट्राच्या सामाजिक - धार्मिक जीवनाचा चेहरामोहराच पूर्ण बदलून टाकला. या प्रकरणात शाहू छत्रपतींच्या विरोधात सनातनी उच्चवर्णीय वर्गाचे नेतृत्व इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ‘समर्थ’ पत्रकाचे संपादक विष्णू गोविंद विजापूरकर आणि वाईचे कर्मठ धर्मपंडित भाऊसाहेब लेले यांनी केले.
लोकमान्य टिळकांनी २२ आणि २९ ऑक्टोबर १९०१ च्या ‘केसरी’मधे ‘वेदोक्ताचे खूळ’ असे दोन अग्रलेख लिहून शाहू छत्रपतींवर जहरी टीका केली. शेवटी हे प्रकरण मुंबईच्या न्यायालयात गेले. १९०५ मधे या प्रकरणात न्यायालयाने शाहू छत्रपतींचा वेदोक्ताचा अधिकार मान्य केला. इतकेच नव्हे तर हिंदू धर्मपीठानेही राजर्षी शाहू छत्रपतींचा वेदोक्ताकचा अधिकार जाहीररीत्या सन्मानपूर्वक मान्य केला.
लोकमान्य टिळकांनी छत्रपतींना वेदोक्तारचा अधिकार असतो, असे सांगून या प्रकरणात थोडी पळवाट काढून वेदोक्तत प्रकरणातील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याही पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी एका प्रसंगी स्वतः शाहू छत्रपतींना फेटा बांधल्याची एका प्रसिद्ध व्यक्तीतची आठवण आहे. छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार आहे हे त्यांचे मत शाहू छत्रपतींनी १२ नोव्हेंबर १९०७ रोजी कर्नल फेरीस यांना लिहिलेल्या पत्रात वाचावयास मिळते.
वेदोक्त प्रकरणातील लोकमान्य टिळकांची सनातनी भूमिका श्री. म. माटे यांच्यासारख्या हिंदुत्ववादी लेखकालाही आवडलेली नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट या रसाळ आत्मचरित्रात लिहिले आहे. “या वादाच्या प्रसंगी बारीक-सारीक तपशिलात न शिरता टिळकांनी गर्जना करून जर सांगितले असते की, छत्रपती क्षत्रियच आहेत आणि छत्रपतींना वेदोक्तचा अधिकार आहे... तर महाराष्ट्रातील जातीय विचारांना निराळे वळण लागले असते.”
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
ब्रिटिश सरकार कोणते ना कोणते तरी कारण दाखवून कोल्हापूर संस्थान विलीन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने कोल्हापुरात स्थापन झालेल्या शिवाजी क्लबला सतत आर्थिक मदत करणाऱ्या शाहू छत्रपतींना योग्य ती खबरदारी घेऊनच भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी व्हावे लागत होते. शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक यांच्यामधे स्वातंत्र्ययुद्धात कसा सहयोग होता, यासंबंधीचे खूप पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी काही या ठिकाणी विचारात घेता येतील.
१) लोकमान्य टिळकांच्या केवळ प्रेरणेतून नव्हे तर प्रयत्नातून नेपाळ येथे उभ्या केल्या जात असणाऱ्या बंदुकीच्या कारखान्याला शाहू छत्रपतींनी ५००० रुपयांची मदत दिली होती, अशी प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांची साक्ष आहे.
२) सुमारे १९०३ पासून ते १९०८ पर्यंत भावी सशस्त्र स्वातंत्र्ययुद्धाकरिता टिळकांनी एक गुप्त संघटना चालवली होती. त्या संघटनेला प्रतिवर्षी शाहू छत्रपती ५०० रुपये पाठवीत असल्याची गणपत जांबोटकर यांची साक्ष आहे. १ ऑगस्ट १९७१ च्या ‘केसरी’मधे त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
३) ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्यासाठी अरविंद बाबू घोष धडपडत होते. सरकारने त्यांच्यावर क्रांतिकारक दहशतवादी म्हणून खटला घातला. त्यावेळी शाहू छत्रपतींनी अरविंद बाबूंना ५००० रुपयांची मदत दिली होती.
४) चिरोल खटल्यात लोकमान्य टिळकांनी चिरोलवर त्यांच्या ग्रंथात आपली बदनामी झाली म्हणून फिर्याद दाखल केली होती. त्या प्रकरणात चिरोलला मदत करा म्हणून ब्रिटिश सरकारने शाहू छत्रपतींना पत्रे पाठविली होती. ही पत्रे लोकमान्य टिळकांना मदत व्हावी म्हणून शाहू छत्रपतींनी लोकमान्यांचे वकील दादासाहेब करंदीकर यांच्याकडे गुप्तपणे सोपवली होती. यासंबंधीचा सविस्तर वृत्तांत प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रात मिळतो.
मिरजेत ‘गुप्तमंजुषा’ नाटक पाहण्यासाठी शाहू छत्रपती पहिल्या रांगेत बसले होते. लोकमान्य टिळकांना ते आपल्या शेजारी बसण्याचा आग्रह करीत होते. परंतु लोकमान्य टिळक तेथे न बसता छत्रपतींना मुजरा करून पाठीमागे जाऊन बसले होते. थोडक्यात लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती या दोन महापुरुषांमधे अतिशय जिव्हाळ्याचे मैत्र-जीवांचे असे संबंध होते.
लोकमान्य टिळकांच्या शेवटच्या आजारात त्यांना आराम पडावा म्हणून त्यांना आपल्या मिरजेच्या बंगल्यात ठेवा, तेथे योग्य उपचार करू, असे पत्र शाहू छत्रपतींनी श्रीधरपंतांना लिहिले होते. ते पत्र उपलब्ध आहे. लोकमान्यांना घेऊन येण्यासाठी वा. द. तोफखाने निघालेही होते. तोपर्यंत १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाल्याची बातमी शाहू छत्रपतींना समजली. तेव्हा ते रायबागमधील आपल्या कॅम्पमधे सकाळचे जेवण घेत होते. ही दुःखद बातमी ऐकताच त्यांनी आपल्या पुढील ताट बाजूस सरकावले आणि दिवाण सबनीसांना ते म्हणाले ‘मास्तर, मर्दानी माणूस गेला! आता कोणाशी आपण लढा देणार? त्याच्या मागे सारा पोरकटांचा बाजार...’ अशी प्रबोधनकार ठाकरे यांची नोंद आहे.
हेही वाचा :
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे
गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?
मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?
(दैनिक पुढारीतून साभार.)