थॉमस कँडी: मराठी भाषेला वळण लावणारा गोरा साहेब

२७ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरु केली. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की त्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना कँडी यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्यांनी मराठी भाषेसाठी योगदान दिलंय त्यांचं स्मरण करणं आवश्यक ठरतं.

भूतकाळात आणि वर्तमानात मराठीसाठी कार्य केलेल्या अनेकांचं आपण स्मरण करतो. त्यांच्यावर व्याख्याने होतात, लेख लिहले जातात. पण इंग्लंडमधे जन्माला येऊन ५० वर्षांपेक्षा जास्त काळ मराठीची कार्यसाधना करणार्‍या थॉमस कँडी यांचा उल्लेख फारसा केला जात नाही.

कोशवाङमयाच्या आणि मराठी शालेय पुस्तकांच्या इतिहासात कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की १८४७ ते १८७७ या ३० वर्षांच्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. निष्ठेने मराठीची साधना करणार्‍या या शिक्षण, लेखन आणि कोशलेखन तज्ञाविषयी हा लेखप्रपंच. 

ऑक्सफर्डचं शिक्षण, भारतातली नोकरी

थॉमस कँडी आणि जॉर्ज कँडी या जुळ्या भावांचा जन्म १३ डिसेंबर १९०४ रोजी इंग्लंडमधे झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मॅगडॅलेन कॉलेजमधे भारतीय भाषाविषयक अभ्यासाचं शिक्षण घेतलं. शिक्षण झाल्यानंतर दोघांनीही १६व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी खात्यात क्वार्टरमास्टर म्हणजेच संदेश वाहक अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली.

या नोकरीसाठी ते दोघेही मुंबईला आले. काही दिवसानंतर जॉर्जने नोकरी सोडली आणि तो ख्रिस्ती धर्मोपदेशक बनला. त्यानेच मुंबईतली इंडो-ब्रिटिश इन्स्टिटयूट ही शाळा स्थापन केली. मधल्या काळात थॉमस कँडी यानी मराठी भाषेची परीक्षा दिली.

त्यानंतर त्यांची नेमणूक १८३२ला मराठी-इंग्रजी कोशाच्या कामात मोल्सवर्थचा मदतनीस म्हणून झाली. कोशरचनेचं काम सुरु असताना दोघेही बंधू आजारी पडले. त्यामुळे त्यांना स्वदेशी जावे लागलं. जॉर्ज भारतात कधीच परत आले नाहीत. थॉमस मात्र लगेच परत आले आणि अखेरपर्यंत महाराष्ट्रातच राहिले.

हेही वाचा: आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

पुण्यात भाषांतरकाराची नोकरी

१८३७मधे कँडी यांची पुणे कॉलेजचे अधीक्षक आणि मराठी शाळांचे तपासनीस म्हणून नेमणूक करण्यात आली. १८४७मधे त्यांची मराठी भाषांतरकाराच्या जागेवर नेमणूक करण्यात आली. त्यांच्याच प्रेरणेने १८५१मधे पुण्याची पाठशाळा आणि इंग्रजी शाळा एकत्र केली गेली आणि ही जोडसंस्था न्यू पूना कॉलेज नावाने ओळखली जाऊ लागली.

त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कँडी यांनी १८५६ पर्यंत काम पाहिलं. एतद्देशीयांच्या धर्मभावना न दुखावण्याचं सहिष्णू धोरण त्यांनी सुरवातीपासूनच अंगिकारलं होतं. कँडी यांच्या प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे त्यांना मनस्ताप झाला आणि मोठा आर्थिक फटकाही बसला. त्यांना पुन्हा मराठी भाषांतरकाराच्या कमी पगाराच्या जागेवर जावे लागलं.

१८७६पर्यंत त्यांनी हे काम केलं. या मुदतीत इतरांनी लिहिलेली शालेय आणि दक्षिणा प्राईज साठी आलेली पुस्तकं तपासण्याचं काम त्यांनी केलं आणि स्वतः शालेय पुस्तकं लिहिली. त्यातूनच मराठी लेखनपद्धतीला एकसूत्रीपणा आणण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं. मराठीचं शुध्दलेखन एकदा पक्कं ठरवून तेच त्यांनी खंबीरपणे अमलात आणलं.

महत्त्वाच्या पुस्तकांचं लेखन

इंग्रजी-मराठी शब्द कोशाव्यतिरिक्त कँडी यांनी नीतिबोधकथा, नवीन लिपिधारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचनपाठमाला, भाषणसांप्रदायिक वाक्ये, हिंदुस्थानचे वर्णन अशी पुस्तकं लिहिली. ‘द इंडियन पिनल कोड’ आणि ‘न्यू पिनल कोड’ ची भाषांतरं सरकारने कँडीकडूनच करून घेतली.

ख्रिस्ती धर्मविषयक सात पुस्तकं त्यांनी लिहिली. ते स्वतः भाविक ख्रिस्ती होते. असं असलं तरी शाळेत जी पुस्तकं नेमली जात, त्यात ख्रिस्ती धर्मतत्वांचा उल्लेख चुकूनही असू नये याविषयी कँडी फार दक्ष होते. हा ब्रिटनमधला त्यांंच्यावर झालेला सेक्युलर संस्कारच म्हणावा लागेल. 

‘वाचनपाठमाला’ आणि ‘शाळातील मुलांकरिता पुस्तके - एक ते सहा’ ही क्रमिक पुस्तकं कँडी यांनी लिहली. या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या पुस्तकांच्या माध्यमातून कँडी यांनी त्यांना अभिप्रेत असलेली लेखनपद्धती प्रचारात आणली. बहुतेक सर्व शाळांमधून ती कित्येक वर्षं गिरवली गेल्याने तीच पुढे कायम झाली.

हेही वाचा: ‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

मराठी भाषेला वळण लावलं

त्यांच्या या पद्धतीला सुरवातीला फारच विरोध झाला. संस्कृत शब्द मुळाप्रमाणे लिहिणं, अनुस्वारांचा योग्य उपयोग, ठराविक शब्द ठराविक पद्धतीने लिहिणं, हे जे कँडी यांचं भाषाविषयक धोरण होतं, ते शास्त्रीय विषयांवरच्या शालेय पुस्तकातूनही अमलात आणण्याचा त्यांचा आग्रह असायचा. मुलांच्या हाती सामान्य वाचनासाठी म्हणून द्यायची पुस्तकं मेजर कँडी यांच्या काटेखोर नजरेखालून जायची.

त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या झाल्यावरच ती विद्याखात्याकडून मंजूर व्हायची. तपासणीसाठी आलेल्या पुस्तकांवर कँडी यांनी लिहिलेले अभिप्राय पहिले की, त्यांनी सुचवलेल्या भाषा आणि व्याकरणविषयक सुधारणा, दुरुस्त्यांमुळे मराठी भाषेच्या घटनेमधेच कसा बदल घडून आला, याची कल्पना येते. मराठीत चांगले ग्रंथकार झाले पाहिजेत, व्याकरणशुद्ध मराठी लिहिलं गेलं पाहिजे, यासाठी त्यांची सगळी धडपड असायची.

आजही आपण मेजर कँडी यांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे मराठी भाषा लिहितो. त्यांनी सुधारणा केल्या नसत्या तर आपण ‘फुटून’, ‘ऐकून’ अशी उकारयुक्त रूपे लिहिण्याऐवजी ‘फुटोन’ आणि ‘ऐकोन’ असं लिहिलं असतं. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी त्यांनी मराठी लेखनाला वळण लावण्यासाठी केल्या असं म्हणता येईल.

महात्मा फुलेंच्या शाळांना देणगी

थॉमस कँडी महाराष्ट्राच्या, मराठीच्या आणि शिक्षणाच्या इतिहासात मेजर कँडी या नावानेही डोकावत राहतात. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या शाळांच्या समारंभात ते उपस्थित असल्याचा उल्लेख सापडतो. तसेच फुल्यांनी मुलांसाठी सुरु केलेल्या शाळेला त्यांनी दहा रुपये देणगी दिल्याचाही उल्लेख दिसून येतो. मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम कँडी यांनीच सुरु केली.

मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी भाषेची सुमारे ५० वर्षं सेवा करणाऱ्या मेजर कँडी यांचं २६ फेब्रुवारी १८७७ला महाबळेश्वरचा माल्कमपेठमधे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झालं. मराठीसाठी योगदान देणार्‍या थॉमस कँडी यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे.

हेही वाचा: 

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच!

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे