सुलोचना चव्हाण : मुंबईच्या चाळीनं घडवलेली पद्मश्री गायिका

१० डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.

फड सांभाळ तुऱ्याला गं आला तुझ्या उसाला लागल कोल्हा… नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हनत्यात लंवगी मिरची… तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं… अशा एकाहून एक अजरामर लावण्यांना ज्या सूरांनी नटवलं तो सूर आज अनंतात विलीन झाला आहे. ज्येष्ठ लावणीगायिका पद्मश्री सुलाचना चव्हाण यांचं गिरगावामधील त्यांच्या घरी निधन झालंय.

मुंबईतल्या या चाळींनी या शहराला जसं अहोरात्र काम करणारे कामगार दिले, तसंच संस्कृतीचा वारसा टिकवणारे अफलातून कलाकारही दिले. या अशाच चाळीत राहणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा जीवनप्रवास हा फक्त संगीतक्षेत्रासाठीच नाही, तर या शहरासाठीही महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या ८९ वर्षात पाहिलेलं आयुष्य हे मनोरंजनाच्या जगाचा आणि या शहाराचाही इतिहास आहे.

कोल्हापूरचा ठसका मुंबईत

आज लावणी म्हटली की, अनेकांना सुलोचना चव्हाण यांचं नाव आठवतं. सुलोचना चव्हाण आणि लावणी हे समीकरणच होऊन बसलं. पण त्यामुळे त्यांचं आधीचं गाणं झाकोळलं गेलं. खरं, तर गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या बालमेळ्यात गाणाऱ्या सुलोचनाबाईंनी लावणीआधी नाटकात काम केलंय, सिनेमासाठी गाणी म्हटली आहेत. पण त्यांची शेवटपर्यंत खरी ओळख ठरली ती लावणीच आणि त्यांचा कोल्हापुरी ठसका हीच.

हा कोल्हापुरी ठसका बाईंकडे जन्मजात होता. कारण बाईंचं कुटुंब मुळचं कोल्हापूरचं. त्यांचे आजोबा कोल्हापुरातून मुंबईत आलेले पैलवान होते. बाईचं आईकडलं आडनाव कदम. महादेव‌ विठ्ठल कदम आणि राधाबाई महादेव कदम या जोडप्याला १३ मार्च १९३३ला पाचवं अपत्य झालं. तिचं नाव ठेवलं सुलोचना. पण सर्वजण तिला बबन या नावानेच ओळखत. त्यांच्या वडलांची टर्नर-फिटरची नोकरी आणि आईचा फुलविक्रीचा धंदा होता. त्यामुळे घराचं उत्पन्न जेमतेमच. रेडिओवर जे काही कानी पडत होतं तेच संगीताचं शिक्षण.

शाळेतलं शिक्षण त्यांना फार कधी रुचलं नाही. नाही म्हणायला पोतदार हायस्कूलमधे त्या चार इयत्ता शिकल्या. शाळेतल्या कविता आणि गाणी याव्यतिरिक्त अभ्यास हा त्यांना कधीच आवडला नाही. शाळेची ही बिल्डिंग पडायला हवी, असं त्यांना सतत वाटायचं. त्यामुळे शेवटी त्यांनी शिक्षण सोडलं आणि थोरल्या भावाच्या मेळ्यामधे काम करायचं, गाणं म्हणायचं असं ठरवलं. सुलोचलनाबाईंचा मोठा भाऊ दीनाअण्णा यांचा एक बालमेळा होता. तिथून त्यांनी या मनोरंजनविश्वात प्रवेश झाला.

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

गणेशात्सवानं दिला आत्मविश्वास

दहीहंडी आणि गणपती हे गिरगावातले खास सण. गणपतीमधे मेळे भरायचे. तसंच वेगवेगळ्या मंडळांमधे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. दिनाअण्णाच्या मेळ्यामधे पिंजराफेम अभिनेत्री संध्या आणि अभिनेत्री रंजनाच्या आई वत्सलाबाई देशमुख यांच्यासोबत सुलोचनाबाईही काम करत. बालगीतं, कृष्णगोपिकांचा गरबा, देशभक्तीपर गीतं असं त्या मेळ्याचं स्वरूप होतं. या मेळ्याचे मेकअपमन दांडेकर म्हणून होते. त्यांनी बाईंना गुजराती नाटकात डान्स करायला नेलं. 

दरम्यान लैला मजनू , चांदबीबी अशा हिंदी, उर्दू नाटकातही त्यांनी काम केलं. त्याचे १५ रुपये मिळायचे. घरच्यासाठी पैसे कमावणं तेव्हा खूप गरजेच होतं. नंतर दांडेकरांनी त्यांना श्यामबाबू पाठक आणि भट्टाचार्य या संगीतकाराकडे नेलं. त्यावेळी ते‌ 'कृष्ण सुदामा' सिनेमाचं संगीत करत होते. त्यात सुलोचनाबाईंना गाणं म्हणण्याची संधी मिळाली आणि सिनेसृष्टीतला त्यांचा गायक म्हणून प्रवास सुरू झाला.

एकीकडे सिनेसृष्टीत गायक म्हणून नावारुपाला येत असतानाच बाईंनी आपलं गणेशोत्सवातलं गाणंही सुरूच ठेवलं. मुंबईतल्या कार्यक्रमांनी आपल्याला आत्मविश्वास दिलाय, अशी त्यांची भावना होती. ती त्याच्या भाषणातून, लेखनातून कायमच दिसून येते. त्यांनी लिहिलेल्या 'माझं गाणं, माझं जगणं' या पुस्तकात मुंबई शहराच्या आणि इथल्या संस्कृतीच्या अनेक आठवणी आपल्याला उमटलेल्या दिसतात. 

गाडगेबाबांनी पोटाशी घेतलंय

हातात फुटलेल्या मडक्याचं खापरं, ठिगळं लावलेले पण स्वच्छ कपडे आणि तोंडात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गाणारे गाडगेबाबा महाराष्ट्रभर फिरत असत. मुंबईत आले की ते अनेकांना भेटत असत. त्यांच्यासोबत राहत असत. आपल्या समाजकार्यासाठी निधी, शिधा जमवत असत. एवढंच काय तर तिथल्या गल्ल्या, रस्ते साफ करून लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असत. याच गाडगेबाबा आणि सुलोचनाबाईंचं खास नातं होतं. 

त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी एक महान आठवण सांगितली आहे. त्या म्हणतात की, 'गाडगेबाबा हे आमच्या आजोबांचे मित्र होते. गाडगेबाबा मुंबईत आले की, आमच्या घरी उतरत असत. त्यांना जेवायला शिळी भाकरीच लागत असे. इतका मोठा माणूस पण, साधा नमस्कार घातलेलाही त्यांना खपत नसे. खाली वाकली की, बाबा पाठीवर प्रेमाने काठी हाणायचे. काही जण ती काठी खाण्यासाठी खाली वाकायचे.'

त्या पुढे लिहितात की, 'माझी आई नाशिकला त्यांच्या मठात कधीमधी जात असे. मला आठवतंय, मी सात वर्षाची होते तेव्हा आईने मला त्यांच्या मठात नेलं होतं. माझी ओळख करून दिली होत, ही माझी धाकटी लेक. त्यानंतर ती दोघं इतर काही तरी बोलू लागली. मला तर काहीच कळत नव्हतं. पण हे सारं बोलणं सुरू असताना बाबांनी मला पोटाशी घट्ट धरून ठेवलं होतं, एवढं मात्र आठवतंय. त्यांच्या अपरंपार स्पर्शातली अपार माया माझ्या बालमनाला तेव्हाही जाणवली होती.'

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

आचार्य अत्रे लावणीसम्राज्ञी म्हणाले

सुलोचनाबाई सिनेसृष्टीत जम बसवत होत्या. सुमारे ७० हिंदी सिनेमांतून त्यांनी पार्श्वगायन केलं. हिंदी सिनेसृष्टीत त्या सुलोचना कदम किंवा के. सुलोचना नावाने ओळखल्या जायच्या. मास्टर भगवान यांच्या सिनेमात त्यांनी पार्श्वगायन केलं तेव्हा त्यांच्या सोबत सहगायक सी. रामचंद्र होते. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, शामसुंदर अशा कलावंतांबरोबर सहगायनाची संधी त्यांना लाभली. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी भोजपुरी रामायण गायलं. भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामिळ, पंजाबी या भाषांतली गीतं त्यांनी गायली.

मराठी सिनेविश्वात गाण्याची पहिली संधी संगीतकार वसंत देसाई यांनी दिली. आचार्य अत्रे यांच्या 'हीच माझी लक्ष्मी' या सिनेमासाठी त्यांनी अत्रे यांनी लिहिलेली लावणी गायली. 'मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीएबीटी' असे त्या लावणीचे बोल होते. पडद्यावर हंसा वाडकर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. गाणं ऐकल्यावर अत्रे प्रचंड खूष झाले. त्यांनी सुलोचनाबाईंचं तुफान कौतुक केलं आणि त्यांना पदवी दिली, लावणीसम्राज्ञी.

पुढे शामराव चव्हाण यांनी ‘कलगीतुरा’ या तमाशापटाची निर्मिती केली. त्याची कथा-पटकथा, संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते. शामरावांनी सुलोचनाईंच्या गळ्यातली ताकद ओळखून, त्यांना लावणी गायला सांगितली. याच शामरावांशी पुढे १९५३मधे सुलोचनाबाई विवाहबद्ध झाल्या आणि सुलोचना कदम याऐवजी सुलोचना चव्हाण असं नाव लावू लागल्या.

लावणीतलं शालीन लावण्य

१९५०-६० नंतर मराठी सिनेमात तमाशापटाची लाट आली. या तमाशापटांमधे सुलोचनाबाईंनी अनेक सुपरड्युपर हिट लावण्या म्हटल्या. पण, लावण्यांच्या या अव्याहत प्रवासात सुलोचनाबाईंचे अभंग, भजनं, भावगीतं, गझला हे सारं मागे पडत गेलं. त्यांनी याबद्दलची खंत बोलूनही दाखवली आहे. जयपूरच्या एका महोत्सवात सुलोचनाबाईंनी गझल गायली. त्यावेळी तिथं बेगम अख्तर उपस्थित होत्या. त्यावेळी बाई गाणं शिकलेल्या नाहीत, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

लावणी जरी गात असल्या तरी बाई कायम पांढऱ्या साडीचा अंगभर घेतलेला पदर, शक्यतो नजर खाली ठेवून गात. त्यांच्या आई राधाबाई यांना वावगं वागणं मुळीच खपायचं नाही. पदर घट्ट आवळून अंगभर असा घ्यायचा की, चोळी दिसता कामा नये, ही आईची शिस्त त्यांनी कायम पाळली. त्यामुळे शृंगारिक लावण्या गात असूनही त्यांची सोज्वळ प्रतिमा कायम टिकून ठेवली.

संगीतकार वसंत देसाई एकदा म्हणाले होते की, 'ही मुलगी गातांना थोडीशी जरी अदा करुन गायली तर काय बहार येईल, कुठल्या कुठे पोहोचेल.’ त्यावर बाईंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, तसलं पोहोचणं नकोच मला, माझं गाणं हेच खणखणीत नाणं आहे, कदर करणारे श्रोते आहेत, आणखी काय हवं? बाईंना आपल्या या खणखणीत गाण्याबद्दल संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार मिळाले. यावर्षीच त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. आज ही अनेकांचे फेटे उडविणाऱ्या लावण्या गाणारी शालीन गायिका काळाच्या पडद्याआड गेली आहे. तिने मागे ठेवलेले सूर रसिकांच्या सेवेसाठी अजरामर असतील.

हेही वाचा: 

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे