समग्र सयाजीराव महाराज: सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या लोकराजाची ओळख

१२ मार्च २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो.

सयाजीराव महाराजांचं जन्मगाव महाराष्ट्रातल्या मालेगाव जवळचं कौळाणे. त्यांची दत्तकविधानाने बडोदा राज्याच्या प्रमुखपदी २७ मे १८७५ला निवड झाली. प्रादेशिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भिन्नता असूनही त्यांनी बडोदा राज्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या.

प्रजेची उन्नती हेच त्यांनी जीवनाचं अंतिम ध्येय मानलं. आपल्या कार्यकर्तृत्वाने हिंदुस्थानात पुढारलेलं बडोदा राज्य निर्माण केलं. महाराष्ट्रातल्या अनेक समाजधुरिणांना मदत केली. त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची जडणघडण घडवण्यात मोठा हातभार लावला. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाराजा सयाजीराव यांच्या चरित्रविषयक अक्षरधनाचे प्रकाशन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १७ ऑक्टोबर २०१६ला ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्थापन केली.

महाराजांची दुर्लक्षित आणि दुर्मीळ चरित्रसाधनं त्याचबरोबर नव्याने लिहिलेले ग्रंथ प्रकाशित करणं ही समिती समोरची प्रमुख उद्दिष्ट्यं होती. समिती स्थापन झाल्याबरोबर समिती सचिव बाबा भांड आणि इतर सदस्य झपाटून कामाला लागले. त्यांच्या परिश्रमातून अवघ्या दोन वर्षांतच बारा खंड तयार झाले. खंडाचं प्रकाशन बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २०१८ला झालं.

त्यानंतर समिती सदस्यांनी अनेक लेखक आणि अनुवादकांच्या मदतीने पुन्हा नव्याने परिश्रम घेत पुढच्या दोन वर्षांत तेरा खंडातल्या ५० ग्रंथांची निर्मिती केली. या ग्रंथांचं प्रकाशन त्यांच्या जन्मभूमीतल्या नाशिक साहित्य संमेलनात झालं. पूर्वीच्या बारा खंडांचंही प्रकाशन साहित्य संमेलनात झालं होतं.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

सयाजीरावांच्या भाषण, पत्रांचं प्रकाशन

महाराज १९३२च्या कोल्हापूर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी १९००, १९२१ आणि १९३४ अशा तीन मराठी साहित्य संमेलनांचं बडोद्यात यशस्वी आयोजनही केलं होतं. त्याला भरीव आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या चरित्रविषयक ग्रंथांचं प्रकाशन त्यांच्या कर्मभूमीत, जन्मभूमीत आणि मराठी साहित्य संमेलनात व्हावं हा एक दुर्मीळ योगायोगच म्हणावा लागेल.

२०१८मधे बडोद्यातल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने सयाजीराव महाराजांच्या भाषणांचे दोन मराठी खंड - संपादक: डॉ. रमेश वरखेडे, पत्रांचे तीन मराठी खंड - संपादक: डॉ. एकनाथ पगार, आणि ‘महाराजा सयाजीराव गायकवाड गौरवगाथा महापुरुषाची’ - संपादक: बाबा भांड असे सहा मराठी खंड आणि महाराजांच्या भाषणांचे दोन इंग्रजी खंड - संपादक: डॉ. अविनाश सप्रे, महाराजांच्या इंग्रजी पत्रांचे चार खंड - संपादक: एकनाथ पगार असे सहा इंग्रजी, अशा एकूण बारा खंडांचं प्रकाशन करण्यात आलं.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्रीनिवास पाटील, तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, समिती सदस्य आणि सचिव बाबा भांड उपस्थित होते.

या खंडातल्या महाराजांच्या भाषणांतून आणि पत्रांमधून त्यांच्या वैचारिक बुद्धिमत्तेची झलक दिसते. एक तत्त्वज्ञ, प्रज्ञावंत राजा म्हणून महाराजांची ओळख सलामीच्या बारा खंडांतून होते. ‘गौरवगाथा महापुरुषाची’ या खंडातल्या इतर समकालीन मान्यवरांच्या लेखातून महाराजांच्या बौद्धिक प्रतिमेवर शिक्कामोर्तब होतं. त्याचबरोबर त्यांच्या बहुविध क्षेत्रातल्या कार्याची झलक खंडांतून पाहायला मिळते.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

महाराजांनी लिहिलेले ग्रंथ

नाशिक इथल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ४ डिसेंबर २०२१ला ५० ग्रंथांचं प्रकाशन झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, समिती अध्यक्ष उदय सामंत, बडोद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षण संचालक धनराज माने आणि समिती सचिव बाबा भांड उपस्थित होते. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तित्वावर एकाच वेळी ५० ग्रंथ प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ होती.

या ५० ग्रंथांमधे, ‘महाराजा सयाजीरावांचे लेखन’ या तेराव्या खंडातल्या पहिल्या दोन भागांमधे सयाजीराव महाराजांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम कैसर टू सुलतान’ या इंग्लिश आणि ‘कैसरकडून सुलतानाकडे’ या दोन ग्रंथांचा समावेश आहे. याचा मराठी अनुवाद राजारामशास्त्री भागवत यांनी केलाय. पुढच्या तीन भागांमधे बडोद्यात १८९८-९९ला दुष्काळ पडल्यावर महाराजांनी प्रजेला केलेल्या मदतीबद्दल आणि आपत्ती नियंत्रणाबद्दलच्या ‘नोटस ऑन फॅमिन टूर’ ग्रंथाचा अनुवाद अनुक्रमे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे.

महाराज हे लिपीचा, भाषेचा, कलेचा, साहित्याचा, साहित्यिकांचा, प्रकाशकांचा विचार करणारे प्रज्ञावंत, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी राजे होते. त्यांनी देशातल्या नाही, तर परदेशातल्या साहित्यावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केलं. साहित्यनिर्मितीसाठी आर्थिक मदत केली. स्वतःही वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांनी आयुष्यभर विद्याव्यासंग सोडला नाही. त्यांच्या विचारात, लेखनात आणि चिंतनातही अनेक दिवसांची तपश्चर्या होती. त्यांचं साहित्य म्हणजे त्यांनी कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानाचा परिपाक होता. अभ्यासाचं फलित होतं. म्हणून समितीने प्राधान्याने त्यांच्या लेखनाचा समावेश तेराव्या खंडात केलाय.

बडोद्याला दिशा देणारी व्याख्यानं

सयाजीराव महाराजांचं दत्तकविधान झाल्यावर ब्रिटिशांनी एफएएच इलियट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्ष शिक्षण दिलं. शिक्षणक्रमाच्या शेवटी त्यांना प्रशासनातल्या वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देण्यात आली. त्या अनुभवी आणि जाणकार व्याख्यात्यांच्या व्याख्यानामुळेच त्यांना बडोदा राज्य प्रगतीपथावर घेऊन जाता आलं. महाराजांच्या सुप्रशासानाचं गमक त्यांच्या शिक्षणात आणि व्याख्यानात आहे.

ही व्याख्यानं त्याकाळातच ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आली; पण हे ग्रंथ आता दुर्मीळ झाले होते. व्याख्यानांचं महत्त्व आजही कालातीत आहे. त्यामुळेच ‘महाराजा सयाजीरावांचे सुप्रशासन’ या चौदाव्या खंडात ‘भाग १: सुप्रशासनाची सूत्रे’, ‘भाग २: गुड अॅडमिनिस्ट्रेशन’ आणि ‘भाग ३: बडोद्याचा राज्यकारभार’- संपादक डॉ. राजेंद्र मगर हे ग्रंथ समाविष्ट केलेत. महाराज सुप्रशासक असल्यानेच राजा भोज तसंच महेंद्रपाल, प्लेटोला अपेक्षित असणारं राज्य निर्माण करणारा राजा अशा उपमा चरित्रकारांनी दिल्या आहेत. चरित्रकारांच्या उपमांची खात्री या खंडामुळे समजते.

हेही वाचा: सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ

सयाजीरावांची जगभरची भ्रमंती

सयाजीराव महाराज जगप्रवासी होते. त्यांनी सव्वीस वेळा जगप्रवास केला. सर्व जगप्रवासाचे अहवाल त्यांनी अधिकाऱ्यांमार्फत तयार करून घेतले होते. समितीचे सचिव बाबा भांड यांनी सर्व अहवाल मराठीत अनुवादित करून घेतले. ‘महाराजा सयाजीराव यांचा जगप्रवास’ या पंधराव्या खंडात सर्व अहवाल ३ मराठी भागांत आणि ३ इंग्रजी भागांत प्रकाशित केले. मराठी खंडांचं संपादन बाबा भांड आणि इंग्रजी खंडांचं संपादन डॉ. विशाल तायडे यांनी केलंय.

महाराजांनी केलेला प्रत्येक प्रवास बडोदा राज्यासाठी लाभदायक ठरला. त्यांनी पुढारलेल्या देशात पाहिलेल्या आणि बडोद्याला उपयुक्त ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला भारतीय रूप देऊन बडोद्यात आणलं किंवा निर्माण केलं. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी बडोद्यात उभारलेलं आशिया खंडातलं सर्वांत मोठं ग्रंथालय. 

त्याचबरोबर औद्योगिक आणि ललितकलांच्या शिक्षणासाठी उभारलेलं कलाभवन. महाराजांच्या जगप्रवासाचे अहवाल बडोद्याच्या प्रगतीतला महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आजही प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीने स्वउन्नतीसाठी आणि देशहितार्थ कोणती दृष्टी ठेवावी हे अहवालातून समजतं.

स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे

महाराज इतर संस्थानिकांसारखे मांडलिक राजे नव्हते. ते इंग्रजांचे मित्र आणि स्वतंत्र राजे होते. त्यांनी उमेदीच्या काळात इंग्रजांशी संघर्ष केला. स्वातंत्र्यलढ्यातल्या धुरिणींना पाठबळ दिलं. इंग्रजांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. यामुळेच त्यांनी सीआयडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला. पोलीस आणि सीआयडी प्रमुखांनी अनेक अहवाल वरिष्ठांना पाठवले. सर्व अहवाल ‘बँडेड बॉक्स फाईल’ आणि ‘मोस्ट सिक्रेट्स फाईल’मध्ये बंदिस्त होते. आज साठ वर्षानंतर हे अहवाल सर्वांसाठी खुले केलेत.

समिती सचिव बाबा भांड यांनी मित्रांच्या साहाय्याने हे अहवाल लंडनवरून मिळवले. अहवालाच्या आधारे त्यांनी ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव’ हा नवा इतिहास लिहिला. या ग्रंथाचा ‘महाराजा सयाजीराव स्वातंत्र्य युद्ध के समर्थक’ या सोळाव्या खंडातल्या पहिल्या दोन भागांमधे अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद केलाय. 

महाराज आणि इंग्रज यांच्या संघर्षातला नाविन्यपूर्ण आणि सत्यनिष्ठ यात इतिहास वाचायला मिळतो. एक राजा असूनही ‘इंग्रजांशी दोन हात करणारे, क्रांतिकारकांना मदत करणारे महाराज सयाजीराव हे एक इतिहासातलं सोनेरी पान होतं’ हे या ग्रंथांमुळे समजतं.

हेही वाचा: परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

शिक्षणविषयक सुधारणांचा पाया

सयाजीराव महाराजांच्या सुधारणा शिक्षणाच्या भक्कम पायावर उभ्या होत्या. यात त्यांना मिळालेलं शिक्षणही लाभदायी ठरलं. त्यांच्या शिक्षणाचा सविस्तर अहवाल रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी त्यावेळीच लिहून ठेवला होता. खेडेगावातल्या शेतकऱ्याचा मुलगा ते पुढारलेल्या बडोदा राज्याचे नृपती असा महाराजांचा सामान्य ते असामान्य प्रवास अहवालातून स्पष्ट होतो.

या अहवालाचं मराठी आणि इंग्रजी भाषेत पुनर्प्रकाशन ‘शिक्षण आणि शिक्षण सुधारणा’ या सतराव्या खंडातल्या पहिल्या दोन भागांमधे केलंय. तर तिसऱ्या भागात बडोद्यातल्या स्त्री-शिक्षणविषयक सुधारणांवर मंदा हिंगुराव यांनी लिहिलेला ग्रंथ इंग्लिशमधून प्रकाशित केलाय.

महाराजांनी बडोद्यात सुरू केलेलं सक्तीचं, मोफत, प्राथमिक, स्त्रीशिक्षण, औद्योगिक शिक्षण, शेतीशिक्षण आणि बडोद्यातले विद्यार्थी शिष्यवृत्ती देऊन परदेशात पाठवणं या शिक्षणविषयक सुधारणांचा मूळ पाया त्यांच्या स्वतःच्या शिक्षणात आहे. त्यांची शैक्षणिक जडणघडण आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा समजण्यासाठी हे तीनही ग्रंथ मौल्यवान आहेत.

समकालीनांनी लिहिलेल्या आठवणी

‘सत्कार, आठवणी आणि लेख’ या अठराव्या खंडात तीन ग्रंथांचा समावेश आहे. महाराजांच्या सुधारकी बाण्यामुळे भारताबरोबर जगभरात त्यांचे सत्कार आयोजित केले जात. अशीच सत्कारांची मालिका त्यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात आयोजित केली गेली. त्यावेळी त्या मालिकेचा अहवाल महाराजांचे विश्वासू अधिकारी रामचंद्रराव माने पाटील यांनी ‘सयाजीराव महाराजांचा महाराष्ट्रातील सत्कार’ या नावाने ग्रंथरूपाने लिहून ठेवला. त्याचं पहिल्या भागात पुनर्प्रकाशन केलंय.

महाराजांच्या समकालीन मान्यवरांनी त्यांच्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्याचं संपादन बाबा भांड यांनी दुसऱ्या भागात केलंय. देशातल्या आणि जगभरातल्या मान्यवरांनी महाराजांविषयी अनेक लेख लिहिले. त्याचं संपादन ‘सयाजीरावांचे जागतिक वेगळेपण - भाग ३’ मधे डॉ. राजेंद्र मगर यांनी केलंय. हा खंड महाराजांची चरित्रविषयक साधने पुनर्जीवित करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर तत्कालीन काळात त्यांच्याविषयी जनमानसात असणारा आदरही समजतो.

हेही वाचा: मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

सयाजीराव महाराजांची चरित्रं

सर्वसामान्यांना असामान्य व्यक्तींच्या चरित्राविषयी उत्सुकता असते. त्यामुळे खंड एकोणीस, वीस आणि एकवीसमधे महाराजांची काही चरित्रं अनुक्रमे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधून पुनर्प्रकाशित केली आहेत तर काही नव्याने लिहून घेतली आहेत. यामधे एकोणिसाव्या खंडात चार मराठी चरित्रं आहेत. महाराजांचे समकालीन दा. ना. आपटे यांनी लिहिलेलं चरित्र पहिल्या दोन भागात आहे.

तिसऱ्या भागात महाराजांचे पणतू फत्तेसिंगराव गायकवाड यांनी लिहिलेल्या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवाद ‘महाराजा सयाजीराव - एक राजा एक माणूस’ असा केलाय. चौथ्या भागात महाराजांच्या प्रज्ञावंत व्यक्तीमत्त्वाच्या पैलूबद्दल नाविन्यपूर्ण चरित्र डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलंय. पाचव्या भागात महाराजांच्या अर्धांगिनी ‘महाराणी चिमणाबाई’ या मंदा हिंगुराव लिखित चरित्राचा समावेश आहे.

विसाव्या खंडाच्या पहिल्या भागात बाबा भांड लिखित ‘लोकपाळ महाराजा सयाजीराव’ आणि दुसऱ्या भागात ‘प्रज्ञावंत महाराजा सयाजीराव’ या चरित्राचा हिंदी अनुवाद आहे. एकविसाव्या खंडात समकालीन चरित्रकारांनी लिहिलेल्या चार इंग्रजी चरित्रांचं पुनर्प्रकाशन केलंय. तर एक नव्याने लिहिलेलं चरित्र आहे.

सर्व चरित्रकारांनी प्रथम साधनसामग्रीचा वापर करत चरित्रं सत्यनिष्ठ आणि तटस्थपणे लिहिली आहेत. त्याचबरोबर समरसता ठेवली आहे. दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि बंधुत्वाची शिकवण हा सगळ्या चरित्रांचा गाभा आहे. त्यामुळे देशाचं हित पाहणाऱ्या सर्वांना ही चरित्रं उपयुक्त आहेत.

अनुवादित ग्रंथांचे खंड

बाविसाव्या खंडात ‘महाराजा सयाजीराव गौरवग्रंथांचा’ बारावा खंडाचा हिंदीत अनुवाद केला असून त्याचं संपादन समितीचे सचिव बाबा भांड यांनी केलंय. तेविसाव्या खंडात महाराजांची भाषणं आणि चोविसाव्या खंडात पत्रं हिंदीत अनुवादित केली असून यासाठी अनेक अनुवादकांचं योगदान लाभलंय. यात भाषणं दोन भागात तर पत्रं तीन भागामधे आहेत.

मराठी भाषणांचे आणि पत्रांचे खंड पहिल्या टप्प्यात बडोद्यात प्रकाशित केले होते. त्याचा अनुवाद हिंदीत प्रकाशित केल्यामुळे गुजरातसह संपूर्ण भारतात याचा प्रसार होणार आहे. खंड बावीस ते चोवीसमधे महाराजांची चरित्रविषयक अस्सल साधनसामग्री आहे. हा मोठा दस्तऐवज पुनर्जीवित केल्यामुळे पुढच्या अनेक अभ्यासकांना याची मदत होणार आहे.

हेही वाचा: महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

महाराजांच्या वैश्विक सुधारणा

महाराजांनी बडोद्यात केलेल्या वैश्विक सुधारणांसाठी हे राज्य ओळखलं जातं. त्यांच्या वेगवेगळ्या सुधारणांवर पंचविसाव्या खंडात एकूण १० ग्रंथ नव्याने प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांमधे शिक्षण - डॉ. विशाल तायडे, शेती - पूनम मगर, आपत्ती निवारण - डॉ. राजेंद्र मगर, ग्रंथालय - जी. ए. बुवा, ललितकला - धारा भांड मालुंजकर, वास्तुकला - आर्किटेक्ट सारंग/वैशाली पाटील, धर्म आणि सामाजिक - दिनेश पाटील, स्त्रीसुधारणा - डॉ. सुनीता बोर्डे खडसे, सहकार - राहुल वनवे आणि उद्योग - सौरभ गायकवाड यांनी लेखन केलंय.

महाराजांनी सुधारणा करताना बडोद्याबरोबर देशहिताचाही विचार केलेला होता. त्यांच्या सुधारणांचा आपण मागोवा घेतला असता तर देशभरात वेगळं चित्र दिसलं असतं. महाराजांच्या वैश्विक सुधारणा समजून घेण्यासाठी हे दहाही भाग महत्त्वाचे आहेत. या भागातून सुधारणांची ओळख नेमकेपणाने होते.

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख

सयाजीराव महाराजांनी सुधारणा, प्रगती, धर्म आणि इतर सर्वच बाबतीत नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतली. आज सर्वत्र भेदाभेदाच्या अनेक भिंती उभ्या राहतायत. या पार्श्वभूमीवर महाराजांची सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आणि कार्यकर्तृत्वाची नव्याने ओळख होण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांची चरित्रविषयक साधने या समितीमार्फत प्रकाशित करतंय. दुर्मीळ होत चालेला आणि नव्याने लिहिलेला इतिहास पुन्हा समोर येतोय. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देण्यास उपयुक्त होईल.

या सर्व ग्रंथांतून आणि महाराजांच्या चरित्रातून, प्रामाणिकपणे कष्ट केले, देशबांधवांवर प्रेम केलं तर आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता येते याचीही शिकवण मिळते. त्याचबरोबर हे ग्रंथ स्वत:चे, देशाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थी, राजकारणी, विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणादायी आहेत. थोडक्यात, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि बंधुत्वाची शिकवण हा ग्रंथांचा मूळ गाभा आहे.

माणूस जन्माने नाही, तर कर्तृत्वाने संस्मरणीय ठरत असतो, हेही ग्रंथ अधोरेखित करतात. आजच्या स्थितीत निरामय समाज घडवू पाहणाऱ्यांसाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत. यासाठी ग्रंथांचं पुनर्वाचन आवश्यक आहे. समितीने चार वर्षांत सयाजीराव महाराजांच्या चरित्रविषयक ६२ ग्रंथ प्रकाशित केले. पुढेही अनेक दुर्मीळ साधने एकत्रित करून पुनर्प्रकाशित करण्याचा समितीचा मानस आहे.

महाराष्ट्र सरकारने या ग्रंथांची छपाई ‘बालभारती’मार्फत केल्यामुळे सुंदर आणि सुबक झालीय. पृष्ठसंख्येमुळे आकारात वैविध्यपूर्णता असली तरी छोट्या ग्रंथाची किंमत साठ रुपये आणि मोठ्या ग्रंथाची किंमत एकशे वीस रुपये ठेवल्यामुळे ग्रंथ अल्प किमतीत उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयांनी आणि शासकीय ग्रंथालयांनी सर्व ग्रंथ खरेदी करावेत असा शासनाने निर्णय घेल्यामुळे ग्रंथांचा प्रसार सर्वदूर होईल.

हेही वाचा:

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

(लेखक महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीमधे ‘संशोधन सहायक’ असून त्यांचा लेख लोकराज्य मासिकामधून घेतला आहे.)