बप्पी लाहिरी: चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार

१७ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.

एखाद्या माणसाला एकाच फ्रेममधे अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत. ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचं उत्तम उदाहरण ठरावेत. बप्पीदांविषयी लिहण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचंय.

विनोद खन्नाचा कमबॅक

साल होतं १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत ‘इन्कार’च्या यशातून शिरपेच खोवला. यातलं हेलनचं ‘मुंगळा मुंगळा’ गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसला. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद आधी एकांतवासात आणि नंतर रजनीश आश्रमात गेला.

राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदसाठी आपल्या मनाची कवाडं एखाद्या बेअरर चेकसारखी खुली ठेवली. विनोदचं करियर मातीत गेल्यात जमा होतं. चार वर्षं ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. १९८७ मधे राज सिप्पींच्या ‘सत्यमेव जयते’मधून त्याचं कमबॅक होतं. त्याच्या मोठ्या अडचणी होत्या. त्याचं वय होतं एक्केचाळीस वर्षं!

हेही वाचा: गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

‘सत्यमेव जयते’ची पार्श्वभूमी

‘सत्यमेव जयते’साठी विनोदच्या नायिकेचा शोध चालू होता. त्याला फिट बसेल अशी नायिका नव्हती आणि त्याच्यासोबत काम करायला कुणी उत्सुकही नव्हतं. पंचविशी पार केलेली अनिता राज हसत हसत तयार झाली. मुंबईत ड्रेस डिझायनरअसलेल्या अभिनेत्रीला कधीच या शर्यतीत जाता आलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरून तिला खूप ऐकवलं जायचं. जगदीश राजची मुलगी ही ओळख तिला अजून पुसता आली नव्हती.

तिच्याच वयाची दुसरी नायिका होती मीनाक्षी शेषाद्री. ‘सत्यमेव जयते’कडून कुणाच्याच फारशा अपेक्षा नव्हत्या. याच सिनेमात आणखी एक अभिनेत्री होती, माधवी. ‘एक दुजे के लिये’, ‘अंधा कानून’ वगळता हिचा एकही सिनेमा चालला नव्हता. तिला ऑफर्स यायच्या बंद झाल्या होत्या. ‘सत्यमेव जयते’ची अख्खी कास्टिंग पडीक आणि बी ग्रेड म्हणून हिणवली गेलेली होती. कथेतही काही दम नव्हता. 

सगळे असे दुकानदारी बंद झालेले चेहरे घेऊन राज सिप्पींनी डाव लावला आणि तो यशस्वी झाला. सगळ्यांनाच जणू संजीवनी मिळाली तीही नियतीला हरवून! आपल्या कामासाठी एक छदामही न घेऊन या यशाचा लाभ एका माणसाला बिलकुल झाला नाही तो म्हणजे बप्पीदा! खरं तर, त्यांच्या एका गाण्याने सिनेमा तारला होता तरीही त्यांचं नाव झालं नाही.

नियतीला हरवणारी कामचलाऊ माणसं

या संपूर्ण काळात जगात आसपास जी माणसं होती ती नियतीला हरवून पुढे आली होती. १९८४ला इंदिराजींची हत्या होऊन राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. त्यांच्या कालखंडात १९८७च्या दरम्यानच श्रीलंकेत तमिळ इलमच्या उग्रवाद्यांचा विद्रोह शिगेला गेला होता. रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी जगाला ग्लासनोस्त आणि पेरीस्रोईकाची नवी परिभाषा दिली होती. ग्यानी झैलसिंग यांच्या जागी वेंकटरमण राष्ट्रपती झाले होते.

सगळीकडे एका नव्या आणि स्थिर बदलाच्या समीकरणाचे दिवस होते. अगदी 'सत्यमेव जयते'सारखे आणि अस्तित्वाच्या शोधात असणाऱ्या बप्पीदासारखेच! या चित्रपटातल्या गायकांच्या नावावर एक नजर टाकली तर हे म्हणणं आणखी पटेल. कविता कृष्णमूर्ती, एस. जानकी, शैलेंद्र, मिताली मुखर्जी आणि स्वतः बप्पीदा! एका अर्थाने म्हटलं तर तो काळच कामचलाऊ माणसांचा होता.

हेही वाचा: मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

ठहराव असलेल्या पिढीचे प्रतिनिधी

देश स्वतंत्र झाला पन्नासच्या दशकात. त्यामुळे त्या पिढीचा ताजाताजा गवगवा आणि थोरवी नव्वदपर्यंत कायम होती. पण स्वातंत्र्योत्तर कालंखंडात सत्तरच्या दशकात जन्मलेली पिढी आज कोणत्याच हिशोबात नाही. नव्या मिलेनियममधे जन्मलेल्या लोकांनी नवी डिजिटल दुनिया बनवलीय तर एकोणीसशे तीस चाळीसच्या क्रांतीपर्वात जन्मलेले लोक आता फक्त आठवणीत उरलेत.

मग मधल्या लोकांचं काय झालं? काळाच्या पडद्यावरचं त्यांचं अस्तित्व काय? फारशा अपेक्षा न करता सुखात समाधानात जगलेल्या या पिढीला नियतीशी लढता आले नाही किंबहुना नियतीशी तिचा सामना झालाच नाही. या पिढीच्या आयुष्यात एक ठहराव होता. एक शांत शीतल गती होती. एक समर्पण होतं. मात्र त्यांना कधीच कुणी कसलं श्रेय दिलं नाही. बप्पीदा याचेच एक प्रतिनिधी ठरावेत.

त्यांनी काही विशेष, अतिप्रचंड, भन्नाट, लोकप्रिय झालेलं, कालातीत असं संगीत मोठ्या प्रमाणावर दिलं नाही. पण त्यांनी भरपूर हिट गाणी दिलीत. बप्पीदांच्या नावावर जी हिट गाणी आहेत ती बहुतांश एका पठडीतील आहेत. त्यामुळे त्या पलीकडचे बप्पीदा कुणाला दिसले नाहीत आणि त्यांचा कुणी शोधही घेतला नाही.

कुणाच्या गिणतीत नसलेला संगीतकार

मॅटीनीचा सुवर्णकाळ सरत आला होता. अमिताभ जुना झाला होता. नव्या चेहऱ्यांचं आगमन सुखावह ठरत होतं. हे समीकरण जवळपास प्रत्येक क्षेत्रात समोर येत होतं. अशाही अवस्थेत जुनी सागवानी मंडळी तग धरून होती. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा यांच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. सगळे एकमेकांना धरून पुढे जात होते.

पण विशेष असं काही घडत नव्हतं. कारण ज्याला त्याला शिक्के मारलेले होते आणि जो तो त्या शिक्क्यांना जागून आपली भूमिका सराईतपणे वठवत होता. बप्पीदा याला अपवाद नव्हते. त्यांच्या वाट्याला मख्ख चेहऱ्याचा मिथुनच जास्त असायचा. क्वचित अमिताभ वाट्याला आला, पण जेव्हा हा योगायोग यशस्वी झाला तेव्हा त्यांनी ‘नमकहलाल’, ‘शराबी’सारखे उत्तुंग म्युझिकल हिट्स दिलेत.

पार्श्वगायकांमधे अतिशय हार्ड टोन असलेला विजय बेनेडिक्ट त्यांच्या हिश्श्यात आला. त्याच्यासाठी पॉप डिस्कोवरून काही ट्युन्स घेतल्या होत्या. उषा उत्थुपच्या करियरचा तो पीक टाईम होता. कल्पना अय्यर आणि पद्मा नारायण यांच्या डान्सिकल वँपनी जादू केली होती. ही सगळी गाणी त्या त्या काळापुरती हिट होती. त्यांचे रिमिक्सही येऊन गेले. पण ही गाणी बप्पीदासारखीच स्वतःच्या ओळखीच्या शोधात भटकत राहिली.

सत्तर ते नव्वदच्या दशकातली पिढी आजही जशी स्वतःच्या ओळखीच्या शोधात भटकतेय तसं बप्पीदांचं झालं. खूप काही होतं त्यांच्या संगीतात. पण तो लौकिक त्यांना कधी मिळालाच नाही जो आधीच्या शंकर जयकिशन किंवा नंतरच्या ए. आर. रेहमानला मिळाला. त्यांची खास अशी गणना झालीच नाही. त्यांची चर्चा अधिक झाली ती त्यांच्या सोनेरी व्यक्तीमत्वापायी!

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

कौतुक कमी, टीकाच जास्त

त्यांच्या डिस्को गाण्यांविषयी अधिक बोललं, लिहिलं गेलं. त्यांच्या सायलेंट क्लासिक्सविषयी क्वचित चर्चा झाली. ‘शराबी’, ‘ऐतबार’, ‘मनोकामना’, ‘नमकहलाल’, ‘चलते चलते’, ‘जख्मी’, ‘पतिता’मधली त्यांची गाणी ऑफबीट होती तरीही त्यांची चर्चा झाली नाही. त्यांच्या उचललेल्या थीम्सवरून त्यांची टवाळकी अधिक झाली पण त्यांच्या ओरीजनल गाण्यांविषयी कमी कौतुक झालं.

त्यांनी इंग्लिश, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती गाण्यांना चाल लावली. त्याला कधी दिलखुलास दाद मिळाली नाही. पार्श्वगायक म्हणून त्यांनी एकट्याने कितीतरी हिट गाणी दिली. अगदी रशिया आणि बाल्टिक देशांसह आखाती देशांमधे त्यांची गाणी गाजली. पण इथं त्यांना ते स्थान मिळालं नाही जे इतरांना मिळालं होतं. बप्पीदा निरंतर प्रयोग करत राहिले. स्वतःला आजमावत राहिले. पण त्यांची एकच फ्रेम झाली आणि नकळत त्यांच्यावर अन्याय झाला.

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

साचेबंद तरीही टिच्चून उभे

आधीची सगळी समीकरणं मोडून नवी मांडणी केली जात होती. अगदी संगणकीकरणापासून ते डिस्कोपर्यंतचे आगळेवेगळे बदल हरेक क्षेत्रात घडत होते. आता मागं वळून पाहताना या बदलांचं विशेष वाटत नाही कारण हे सगळं जुनं झालंय. मग या काळात ज्यांनी योगदान दिलं त्यांचं काय?

ती नावं त्या एका काळापुरतीच जगली असं नव्हतंच. किंबहुना त्यांनीच तर डळमळत्या पायावर इमारतीचं बांधकाम केलं आणि आज जे भव्य स्वरूप दिसतंय त्यात हे सगळं झाकून गेलंय. बप्पीदांचंही असंच झालंय. १९७३ ते २०२० अशी सत्तेचाळीस वर्षं त्यांनी संगीत देऊनही त्यांना एका चौकटीत बंदिस्त केलं गेलं हे मूल्यांकन योग्य नव्हतं.

त्यांच्या वाट्याला आलेले सिनेमे, नायक, नायिका आणि गाण्यांच्या रचना, सगळं काही साचेबंद होत गेलं. याला कारण त्या पिढीच्या साचलेपणातही होतं. एकाच व्यक्तीमधे असणारे बहुविध गुण तेव्हा शोधलेच जात नव्हते. तरीही ते तग धरून होते नव्हे तर टिच्चून उभे होते. टीकाकारांना फाट्यावर मारून काम करत होते. लेखाच्या सुरवातीला ‘सत्यमेव जयते’चा उल्लेख त्यासाठीच केलाय.

दिल में हो तुम

जो तल्लख बुद्धीचा आहे त्याला मेरिटमधे आणणाऱ्या शिक्षकांचा गौरव दुनिया भलेही करत असेल. पण जो थोडासा मागे पडतोय किंवा ज्याच्याकडे फारसं कौशल्य नाही, बळ नाही त्याला पुढं आणणाऱ्या शिक्षकाचं कौतुकही व्हायलाच हवं. पण समाज इथं कंजूसपणा करतो. तो अशा शिक्षकांसह त्यांच्या विद्यार्थ्यांनाही मानाचं पान देत नाही.

बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यामुळे त्यांची खरी आणि नेमकी ओळख झालीच नाही. कदाचित हीच त्यांची ओळख असावी. ‘सत्यमेव जयते’मधलं ‘दिल में हो तुम’ हे गाणं बप्पीदाचं ‘द बेस्ट साँग’ आहे.

तुम्ही आमच्या स्मृतीत असाल बप्पीदा! 
दिल में हो तुम...

हेही वाचा: 

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट