बगळा : बोकील, संतांना न सापडलेली शाळा भेटवणारी कादंबरी

१४ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रसाद कुमठेकर यांच्या बगळा या कादंबरीची नवी आवृत्ती आलीय. २०१६ला त्याच्या पहिल्या आवृत्तीचं वसईत प्रकाशन झालं तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस त्यावर मस्त बोलले होते. त्या भाषणाचं महेश लीला पंडित यांनी केलेलं शब्दांकन साहित्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन देत आपल्याला समृद्ध करतं.

मित्रहो प्रसादला आपण काय करून बसलो आहोत याची कल्पना नाही. तो लिहून मोकळा झालाय. डिपार्टमेंटमधून बाहेर पडताना रणधीरनी बगळा नावाची कादंबरी माझ्या हातात दिली. त्याच्या नावावर कुरिअर आलेलं होतं. आणि मी रात्री आठला सुरु केलेली कादंबरी रात्रीच वाचून काढली.

मला सतत प्रश्न पडलेला की, हा कुठून का होईना आपल्या परिवारातला माणूस असेल. कारण त्याने जे काही लिहलंय, जो काही विचार मांडला त्यामुळे तो आमच्या परिवारातला माणूस असण्याची शक्यता मला दाट वाटायला लागलेली. तशी या लेखकाची आणि माझी आधीची ओळख नाही.

आता परिवार हा शब्द वापरला त्याच्या मागची एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. चित्रा नाईक, जेपी नाईक, लीला पाटील आणि महाराष्ट्रभर पसरलेले आमचे सगळे समविचारी. मला हे वाचताना सतत प्रश्न पडायचा की हा कोठून का होईना आमच्यातलाच माणूस असला पाहिजे.

कादंबरी संपल्यानंतर मी चौकशी केली. जयदेव डोळेना फोन केला. स्नेहलता दसनूरकर आणि डोळे सरांच्या मिसेस या नातेवाईक होत्या. त्यामुळे ना. य. डोळे सर नेहमी गारगोटीला यायचे. मग जयदेव डोळे सरांनी मला त्यांची ओळख करून दिली.

हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

रणधीर शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी कथनाच्या अंगाने श्रेष्ठ आहेच. भाषिक अंगानं विश्लेषण केलं तर ती आपल्याला अवाक करून सोडते. गणेश वसईकरने सांगितल्याप्रमाणे, कादंबरीतल्या जागा अत्यंत महत्वाच्या आहेत. तर मराठी समीक्षा ज्या पद्धतीने विचार करेल त्या त्या पद्धतीने या कादंबरीची वेगवेगळी वैशिष्ट्यं आपल्यासमोर येत जातात.

या कार्यक्रमात जेव्हा मी वीणाताईना बघितलं तेव्हा मी म्हटलं की, शंभर टक्के हा या सगळ्या गोष्टींशी निगडीत असणारा माणूस आहे. कुठल्या गोष्टीशी? तर या कादंबरीचं कथानक साधं सोपं नाहीच ही पहिली गोष्ट. म्हणजे मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि खेळताना चिंतुच्या हाताला लागून चेंडू हरवतो तो झुडपात गायब झालेला आहे.

हे मुख्य कथानक वर वर दिसणारं कथानक जरी असलं तरी कादंबरी इतकी सोपी नाही. आपण संपूर्ण हरवलेलं भावविश्व म्हणजे आपण शिक्षणातून एका भावविश्वाला हरवलेलं आहे. आपल्याकडं बुद्ध्यांकांची, आयक्यू ची चर्चा होते पण ईक्यू ची, मुलाची इमोशनल, भावनिक जडणघडण आहे त्याची होत नाही. हा जो बॉल हरवलेला आहे, म्हणजे मुलांच्या खेळातून बॉल जो हरवलाय ते म्हणजे आपल्या शिक्षणपद्धतीतून ईक्यू हरवल्यासारखं आहे.

माझ्या मते, बगळा ही त्याने मांडलेली अशी जबरदस्त शोकांतिका आहे. आणि ते हरवलेलं भावविश्व,  जे ते शिक्षणातून हरवलंय, जे घरातून हरवलंय, जे हरवलेलं सगळं आहे. ज्याच्याकडे संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचं दुर्लक्ष आहे. म्हणजे बघा ना आपण आयक्यू मोजतो पण ईक्यू नाही म्हणजे आयक्यू बरोबर इमोशनल कोशंट आपण काढला पाहिजे तो नाही काढत. आणि समाजाच्या संपूर्ण शोकांतिकेचं कारण आपण भावनिकतेला आपल्या सगळ्या जगण्यातून वजा केलंय.

आता ही भावनिकता म्हणजे या कादंबरीत असणारं तळं, त्यात असणारे बगळे आणि चिंतूचं तिथे जाणं. या सगळ्यांशी निगडीत काय होतं की, तो बगळ्याशी निगडीत होणं. त्याला हे कळलंय की बगळा विकला तर त्याला अकरा रुपये मिळणार आहेत. मुद्दा केवळ अकरा रुपयाचा नाहीये. म्हणजे शेवटी तो बगळे धरणारा सराईत माणूस आहे. तो चिंतूची अवस्था बघून म्हणतो की, अरे मी तुला एक बगळा देतो. पण तू नेऊन तो विक. पण हा चिंतू ते नाकारतो.

तो म्हणतो की, मला तुम्ही धरून दिलेला बगळा नको. मला तुम्ही बगळा धरायचं शिकवा मग मी तो धरतो आणि मग मी विकतो. तो कोणत्या बाजूने आहे बघा? त्याचं भावनिक विश्व हे निरागस जग आणि त्यात प्रत्येक निरागसतेला तो असं जपू पाहतो. आतून असं भरगच्च होऊ पाहतो. म्हणून तो ‘बर’ असं म्हणतो.

हेही वाचा : गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

या कादंबरीत बर हा शब्द कसा येतो म्हणजे खूप काही बोललं की याचं ‘बर’ म्हणजे तुमचं चालू द्यात. या सगळ्या कादंबरीत हा जो आपल्या जगण्यातला इमोशनल कोशंट हरवलेला आहे, आपल्या जगण्यातली जी भावनिकता हरवली आहे त्या भावनिकतेचा शोध हे हरवलेला बॉलसाठी पैशाच्या जमवाजमवीची ती गोष्ट आहे. भावनिकतेचा शोध हेच सूत्र आहे. आता या सगळ्या बगळा कादंबरीच्या केंद्रस्थानी काय आहे तर चिंतुला पडणारे 'प्रश्न' आहेत. 

प्रश्न ही आपल्या व्यवस्थेतून हद्दपार झालेली गोष्ट आहे. असं शिक्षण, प्रश्नच कुणाला पडणं उपयोगाचं नाही. असं घर आणि प्रश्नच कुणाला पडू नये असा भोवताल. मूळ शिक्षणाचा हेतू हा असतो की, जिथं मुलांना प्रश्न पडले पाहिजेत. पण आज एकूण शिक्षणातून प्रश्न हद्दपार झालाय आणि कोरड्या भावविश्वात मुलं अडकलीत.

मुलांचे प्रश्न संपवणं हेच ध्येय असतं. प्रश्न विचारताक्षणी त्याला बस खाली म्हटलं जातं. त्याला  गप्प केलं जातं. गुरुजीला शाळेत मुलाने प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मग पुढे पुढे ते मूल निरुत्तर होत जातं. जशी इयत्ता वाढेल तसा त्याचा प्रश्न संपवण्याचा कार्यक्रम म्हणजे आपली शिक्षणव्यवस्था, आणि नंतर ते इतकं कोरडं होतं की, गाईड वाचणं हाच मुलासमोर पडलेला मोठा प्रश्न असतो.

याच अख्ख्या व्यवस्थेच्या फोलपणावर लेखकानं बोट ठेवलंय. आणि हे इतकं अफाट यात काहीतरी झालेलं आहे. नकळत होऊन गेलेलं आहे. लेखनात हे होत असतं. चांगल्या लेखनाची हीच तर खरी गंमत असते. त्यात लिहिणाऱ्यालाही कळत नसतं. आपल्या हातातून काय होऊन गेलेलं आहे. म्हणून मी म्हणतो प्रसादलाही माहित नाही. तो काय करून गेलाय.

या प्रश्नांच्या जगातल्या मुलाचं भावविश्व काय आहे. काय काय प्रश्न आहेत त्याचे यातले सगळे प्रश्न सोलून सोलून काढले की, त्यातून आपल्याला वेगळं काहीतरी सापडतं. रणधीरने उल्लेख केल्याप्रमाणे, शाळा ही बोकिलांची कादंबरी, मलोसेंची कादंबरी किंवा या अमक्या तमक्याचं लंपन बिंपन या कादंबरीत याचा अत्यंत वेगळ्या पद्धतीने क्रॉस निर्माण केलाय.

यातली पिंकी आणि चिंत्या, पिंकी ही बरोबर मिलिंद बोकील, डॉ. राजेंद्र मलोसे किंवा प्रकाश नारायण संत यांची आवृत्ती आहे. आणि चिंत्याला मात्र ते नको आहे. म्हणजे ती चिंत्याला त्या भागवत वाचण्यातून ओढून का आणते. तर त्याने तिचं भाषण ऐकलं पाहिजे, तिला श्रोता पाहिजे म्हणून ती त्याला ओढून आणते. तसं करत असताना ती दाखवते असं की याने वावगं वागू नये पण आतला हेतू काय तर तिचं भाषण ऐकायला श्रोता नाही.

चमको मुलांचं जे विश्व आहे, म्हणजे या सगळ्या व्यवस्थेमधल्या गुणवंत मुलांचा त्याने पार आडवा उभा छेद देवून हे किती फोल आहे हे दाखवून दिलंय. एका बाजूला पिंकी आहे. एका बाजूला चिंत्या आहे. पिंकी ही शाळेतल्या मेरिट लिस्टीतल्या पोरांची प्रतिनिधी आहे. चिंतू यालाच आव्हान देतो की, हे खोटं आहे. मला काहीतरी दुसरं शोधायचं आहे. बाई म्हणजे जे शाळा बोकीलाना सापडलं नाही, जे संताना सापडलं नाही, जे मलोसेंना सापडलं नाही असं काहीतरी या मुलाला सापडलेलं आहे.

हेही वाचा : कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

त्याची आणि माझी भाषा जवळचीच आहे. कारण तो उद्गीरच्या सीमापट्ट्यात वाढला. मी गडहिंग्लजच्या सीमापट्ट्यात वाढलो. पण या सगळ्या भाषेतून सुद्धा तो काय सूचित करतो तर भाषा शुद्ध अशुद्ध नसतेच भाषा ही भाषाच असते. त्याचा त्याच्याकडे आग्रह आहे. या सगळ्या कादंबरीचा जो आटीवपणा आहे तो म्हणजे लेखकाचा नायक तो सुरवातीपासून शेवटाकडे येताना असल्या व्यवस्थेला कुठेही बटबटीत पद्धतीने प्रश्नांकित करत नाही.

त्याची ती संहिताच सगळ्या व्यवस्थेला प्रश्नांकीत करून तुम्हाला विचार करायला भाग पाडते की, या मुलाचं चुकलं काय? आणि या मुलाला शोधायचंय काय? उत्तर असं येतं की, चुकली व्यवस्था, चुकलं घर, चुकले पालक, चुकला समाज, चुकले शिक्षक, चुकलं शैक्षणिक धोरण आणि या चुकलेपणातून मिळणार काय? असं भय वाटता वाटता ही कादंबरी वाट काढते. म्हणजे इतक्या गोष्टी या कादंबरीत याने नकळत करून ठेवलेल्या आहेत.

मी निश्चित सांगतो की, ही कादंबरी या पद्धतीने मराठीतला कुठलाही समीक्षकवर्ग वाचणार नाही, त्यांना ही कादंबरी त्यात याने काय केलंय हे कळणार नाही. आज कळणार नाही पण पुढे वीस वर्षानंतर कुणीतरी नक्कीच म्हणेल की ही मराठीतली अत्यंत महत्वाची कादंबरी आहे.

हेही वाचा : 

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

एमपीएसीचे विद्यार्थी आक्रमक झाले त्याला कारणंही तशीच आहेत

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?