कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'

२६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : १० मिनिटं


असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते.

वुटसिलेक्टच्या 'असूर' या वेबसिरिजबद्दल ऐकल्यानंतर उत्सुकतेपोटी ती पाहायला घेतली. वेबसिरिजच्या पहिल्याच भागात एका बाईचा अतिशय क्रूरपणे खून होताना दाखवलाय. हल्लेखोर त्या बाईचं डोकं किचनच्या ओट्यावर आपटतो आणि नंतर ओवनमधे घालून ओवन चालू करतो. हा सीन बघितल्यावर आपण सिरिज पाहणं आपोआप दुसऱ्या दिवसावर ढकलतो.

परदेशी हॉरर आणि थ्रिलर सिरिज किंवा सिनेमे पाहिलेल्यांना यात काही खास वाटणार नाही. हे असे थंड रक्ताचे पाशवी खून अनेकांनी अनेक सिनेमांत किंबहुना याहूनही अधिक बीभत्स पद्धतीने होताना पाहिलेलं असण्याची शक्यता आहे, पण अशी कथा हिंदू पुराणकथेच्या पायावर रचणं आणि ती पडद्यावर तितक्याच समर्थपणे साकारणं निश्चितच सोपं काम नाही. त्यासाठी दिग्दर्शक ओनी सेन नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

पुराणकथांचं रंजक विश्व

'पुराणातली वांगी पुराणात' असं म्हटलं जात असलं तरी हिंदू पुराणातल्या देवादिकांच्या, असुरांच्या कथा केवळ वाचून कानाडोळा करण्यासारख्या नाहीत. जगणं शिकवून जाणाऱ्या या सगळ्या कथा रंजकतेच्या आवरणात लपेटलेल्या असल्याने त्यातून मिळणाऱ्या संकेतांकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. मनावर संयम ठेवण्याचं महत्त्व सांगणाऱ्या, चांगल्या-वाईटाची निवड करताना तारतम्य बाळगायला सांगणाऱ्या, 'गर्वाचं घर खाली' हे वारंवार पटवून देणाऱ्या, सत्याचीच कास धरायला सांगणाऱ्या अनेक कथा हिंदू पुराणांत आहेत.

आपल्याला त्या माहीतही असतात. पण आपण देवांच्या गोष्टींपलीकडे जाऊन त्यावर विचार करत नाही. या मालिकेत ओघाने येणारी त्रिपुरासुराच्या वधाची कथाही अशीच रंजक आहे. तिचा संदर्भ वाचल्यास लक्षात येतं की या कथेतल्या तीन असुरांना प्रथम पाप करायला प्रवृत्त केलं जातं आणि त्यानंतर भगवान शंकर तिन्ही पुरांचा नाश करतात. वेबसिरिजमधे शुभ निखिलला ही कथा सांगतो तेव्हा ही छळाची कथा आहे हे आपल्यालाही पटत जातं.

कलियुग, कली आणि कल्की यांचे सिरिजमधले संदर्भ रंजनमूल्य म्हणून महत्त्वाचे आहेतच. त्याचबरोबर हे संदर्भ आजच्या काळातली आजूबाजूची परिस्थिती, वाढती अराजकता, संपत चाललेली माणुसकी, झुंडशाही या सगळ्याशी साधर्म्य दाखवणारे आहेत.

धर्मग्रंथांकडे नव्यानं बघायला लागेल

पुराणकथांमधे असुरांनी तपश्चर्या करून वरदान म्हणून अमरत्व मागितल्याचे संदर्भ अनेक कथांमधे येतात. 'असूर'मधे चांगली माणसं किड्यामुंग्यांसारखी मरताना दाखवलीत. मात्र मारेकरी कोण आहे, हे शेवटपर्यंत गूढच राहिलंय. शुभ जोशीने तुरुंगात आपले अनुयायी तयार केलेत. जे त्याची विचारप्रणाली जगभर पसरवतायत आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे त्यालाच अमर करू पाहतायत. या सगळ्यांचा बोलविता धनी कोण, अनुयायी नेमके किती आणि कुठे पसरलेत, हे शोधताना सीबीआयच्या नाकीनऊ येतात.

असुरांनी युद्धात देवांना चकवा देण्याची ही कथा सर्वश्रुत आहेच. त्याच आख्यायिकांचा वापर करत इथं शुभ एका ठिकाणी असूनही सगळीकडे असल्याचा भास निर्माण करण्यात यशस्वी होताना दिसतो. सहाव्या भागाच्या सुरवातीला मारेकरी एका म्हाताऱ्या चित्रकाराचा खून करतो, ते दृश्य नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध करण्याच्या प्रसंगाची आठवण करून देणारं आहे. फक्त इथं मारेकरी स्वतः देव बनू पाहतोय.

या मालिकेच्या निमित्ताने का होईना, अनेकांना धर्मग्रंथांकडे, पुराणांकडे नव्याने पाहण्याची इच्छा होईल, त्यात स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतात का, हे पडताळून पाहावंसं वाटेल आणि झालंच तर त्यानिमित्ताने आपल्या मातीतल्या कथा सांगाव्याशा वाटतील, अशी आशा करायला हरकत नाही.

हेही वाचा : ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

प्रत्येकातला राक्षस बाहेर येतो

'कलियुग आलं' म्हणताना आजच्या जगातला माणूस आपणही त्या कलियुगाचाच एक भाग आहोत, हेच विसरतो. 'असूर' मधली अनेक पात्रंही ही गोष्ट सहजपणे विसरताना दिसतात. धनंजय राजपूत यांना वाटतंय की खोटे पुरावे दाखवून का होईना, पण गुन्हेगाराला शिक्षा करणं, हे आपलं काम आहे. त्यात अनीतीचा अवलंब करतानाही त्यांना आपण चूक करतोय, असं वाटत नाही. मात्र खोल कुठेतरी आयुष्यात पूर्वी केलेल्या अशा चुकीचा अपराधगंड त्यांच्या मनात आहे.

आपल्या बायकोला आणि मुलीला वाचवण्यासाठी निखिल मारेकऱ्याला खून करण्यासाठी मदत करायलाही तयार होतो. या मालिकेतली सगळीच मुख्य पात्रं अशा प्रकारे स्वतःच्या नजरेतून योग्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चुकीच्या, फसवणुकीच्या मार्गावर सहज चालताना दिसतात.

शेवटच्या भागात तीन व्यक्तींना मारेकऱ्याने ओलीस ठेवलेलं आहे, त्या तिघांचे बरेच अनुयायी समाजात असतात हे समोर येतं. अर्थात, समाजात प्रबोधन घडवून आणण्याची ताकद या तिघांच्याही शब्दांत आहे. म्हणजेच त्यांना सारासार विचार करता येतोच. ते समाजहिताचा, पर्यायाने दुसऱ्याचा विचार आधी करतात, हेही स्पष्टच आहे.

मात्र बंदिस्त जागेत श्वास कोंडायला लागल्यावर आपल्याला ऑक्सिजन मिळावा म्हणून दुसऱ्याचा खून कसा करता येईल, याची ते योजना आखू लागतात. तिघेही जिवंत सुटल्यानंतरही तिघांपैकी एकाचा खून होतोच. प्रत्येकात दडलेला राक्षस अधोरेखित करणारं हे दृश्य अतिशय महत्त्वाचं आहे.

समाजसुधारक म्हणून आपण ज्यांची व्यक्तिपूजा करायला जातो, तीही शेवटी माणसंच असतात ही जाणीव त्यांच्यातला राक्षस दिसल्यावर होते. जिथं माणसाला निवड करावी लागते, तिथं न निवडलेल्या पर्यायाचा अपराधगंड मनात राहतोच. आयुष्यभर आपल्याला निवड करावीच लागणार आहे. त्यामुळे या गिल्टमधून सुटका नाहीच. कितीही ठरवलं तरी आपल्यातल्या असुराचं पूर्णपणे दमन करता येणं आजच्या काळात जगताना अशक्य होऊन बसतंय, हीच गोष्ट ही सिरिज सांगू पाहतेय.

ज्ञानशाखांचा सुरेख संगम

अनेकांना थ्रिलर सिरिज बघायला आवडत नाही. 'असूर'च्या लेखकांचं आणि दिग्दर्शकाचं खरं कौशल्य इथं दिसून येतं. जो आपला प्रांत नाही, तिथे दिग्दर्शक आपल्याला सहजपणे घेऊन जातो. 'असूर' रंजक ठरते, ती यामुळेच. इथं खुनांची सिरिज आणि गुन्हेगाराचा शोध कथेच्या केंद्रस्थानी असला, तरी त्या वाटेवरून प्रेक्षकाला नेताना अनेक ज्ञानशाखा आणि त्यांतले संदर्भ प्रेक्षकांच्या दृष्टीस पडतात. त्यामुळे वेबसिरिज कुठेही रटाळ होत नाही.

इथं तथ्यांचा वापर इतका अभ्यासपूर्ण केलाय की, त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्या गोष्टींशी सहज रिलेट करता येईल. तरीही काही उणिवा राहून गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे सिरिज कुठेही कमी पडत नाही.

शुभचं पात्र रंगवताना यात चाईल्ड सायकॉलॉजीचा, ऑटिझमचा उल्लेख येतो. केसेस उलगडण्याच्या प्रक्रियेत बऱ्याच मेडिकल कंडिशनचा संदर्भ येतो. निखिलचा मागोवा काढताना एका इंटरेस्टिंग वळणावर पिरियॉडिक टेबल किंवा आवर्तसारणीचा उल्लेख येतो. पुराण आणि ज्योतिषाचे संदर्भ येतात. आयटीमधल्या बऱ्याच संकल्पनांचा संदर्भ येतो. मोटिवेशनल स्पीकर कसं काम करतात, तेही दिसतं.

मोठ्या उद्योजकांभोवती असणारी कडक सिक्युरिटी दिसते, त्याचप्रमाणे त्यांची बेफिकीर वृत्तीही दिसते. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची जीवनशैली कशी वेगवेगळी असते, हे दाखवणारा हा मोठा पट आहे. एक मोठा उद्योगपती आपल्या साखरपुड्याची जंगी पार्टी देतो, मात्र नुसरत प्रमोशन मिळाल्यावर फक्त थँक्स म्हणत आपल्या कामात गढून जाताना दिसते. अशा अनेक गोष्टींना ही सिरिज कवेत घेते आणि त्यामुळेच फक्त एक क्राईम थ्रिलर न राहता बरंच काही नवीन शिकवून जाते.

हे कोरोना स्पेशलही  वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

'सेक्रेड गेम्स'शी साधर्म्य

'असूर' मालिकेतल्या बऱ्याच घटनांचं 'सेक्रेड गेम्स' या गाजलेल्या मालिकेतल्या घटनांशी साधर्म्य असल्याचं जाणवतं. 'सेक्रेड गेम्स'ला राजकारणाची, मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी होती. 'असूर'मधे फक्त खुनांची मालिका गुंफण्यात आलीय. पण 'सेक्रेड गेम्स'मधे जसं गुरुजींचा आश्रम, त्या आश्रमात येणारे अनुयायी, जग संपवण्याची त्यांची मनीषा, हे सगळं होतं, तसंच काहीसं प्रकरण 'असूर'मधेही आहे.

जेलमधे शुभ जोशी आपले अनुयायी तयार करून आपलं तत्त्वज्ञान त्यांच्या माथी मारताना दिसतो. गुरुजींचं एक वाक्य 'सेक्रेड गेम्स'मधे खूप गाजलं होतं - 'बलिदान देना होगा.' इथंही एका प्रसंगात जेलमधला एक तरुण शुभच्या पायांवर आपलं रक्त माखताना दिसतो. सरताज सिंगला 'सेक्रेड गेम्स'मधे मुंबईला वाचवण्याचं आव्हान दिलं जातं आणि त्याच्यासमोर सगळी कथा उलगडत जाते. 'असूर'मधे निखिल नायरसमोर खुनांचं सत्र थांबवण्याचं आव्हान आहे.

असं असलं तरीही दोन्ही सिरिज पूर्णपणे वेगळ्या आहेत. 'सेक्रेड गेम्स' भव्य आहे. गणेश गायतोंडे आणि सरताज सिंग या दोन मुख्य पात्रांसोबत जी इतर पात्रं कथेच्या ओघात येतात, ती सगळीच महत्त्वाची आहेत. बरीचशी पात्रं मुंबईच्या, देशाच्या राजकारणाशी, समाजकारणाशी, चित्रपटविश्वाशी साम्य दाखवणारी आहेत. 'असूर'चा आवाका अर्थातच तितका नाही. शिवाय ही कल्पित कथा आहे. काही मोजक्या समान गोष्टी सोडल्या तरी दोन्ही सिरिज आपापल्या जागी ग्रेटच आहेत. दोन्ही मालिकांनी सद्य परिस्थितीवर केलेलं भाष्य तितकंच महत्त्वाचं आहे.

'जर-तर'च्या हिंदोळ्यावर

'असूर' मधे आपल्याला केवळ धनंजय राजपूतने शुभच्या बाबतीत घेतलेला एक चुकीचा निर्णय दिसतो, ज्याचा भयानक परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागतो. पण बारकाईने पाहिलं तर ही साखळी निखिल तोडू शकला असता, हेही जाणवतं. पुढे घडणाऱ्या वाईट गोष्टी वेळीच थांबू शकल्या असत्या हे सिरिज जसजशी पुढे सरकते, तसं उमगत जातं.

'जर-तर'च्या हिंदोळ्यावर माणूस अगतिक होतो आणि बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतो. त्यानंतर मात्र पश्चात्ताप करण्याशिवाय हाती काही उरत नाही. आयुष्याकडे नीट पाहिलं की आपल्या बऱ्याचशा समस्या या आपण नको त्या ठिकाणी ढवळाढवळ केल्याने, कधी चुकीचा निर्णय घेतल्याने निर्माण झालेल्या आहेत, हे कळतं.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

चिन्हं, प्रतीकं आणि रुपकं

'असूर'ला हिंदू पुराणांचा संदर्भ असल्याने या मालिकेत अनेक चिन्हं, प्रतीकं आणि रुपकं ओघानेच येतात. ठळकपणे आणि वारंवार दिसतं ते 'इन्फिनिटी'चं चिन्ह. या चिन्हाला आध्यात्मिक परिप्रेक्ष्यात पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून महत्त्व आहे. म्हणूनच आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मारेकऱ्याने हे चिन्ह निवडणं साहजिक आहे. आपण आणि पर्यायाने कलियुग अनंत असल्याचा संदेश सगळ्या जगात पसरवण्यासाठी याहून समर्पक चिन्ह आणखी कोणतं असू शकेल?

पहिल्या खुनात मारेकऱ्याच्या मानेवर एक टॅटू दिसतो. हा टॅटू नागालँडमधल्या एका जमातीचं प्रतीक आहे. या जमातीचा इतिहास पाहिला तर आता अस्तित्त्वात नसलेली पण पूर्वीच्या काळची त्यांची नरबळीची प्रथा आणि त्याद्वारे मारेकऱ्याने दिलेला धमकीचा संदेश स्पष्ट होतो. एका विशिष्ट प्रकारचा मुखवटा घालून केलेले खून कलीकडे निर्देश करतात.

युट्यूबवर 'हॉन्टिंग ट्यूब' या चॅनेलवर 'असूर' बद्दल एक वीडियो आहे. ही सिरिज पाहून झाल्यावर तो वीडियो नक्कीच बघण्यासारखा आहे. सिरिज पाहताना नजरेआड झालेल्या अनेक बारीकसारीक गोष्टींचं उत्तम विवेचन यात केलेलंय. त्यात या चिन्हांचा, विशिष्ट पद्धतीने केलेल्या खुनांचा संदर्भ आणि त्यांचं पटेल असं स्पष्टीकरणही आहे. या वीडियोचा कमेंट सेक्शनही वाचण्यासारखा आहे.

अंधभक्तीचे धोके

कुठलाही संप्रदाय कसा तयार होतो, हे 'असूर' मालिकेत फार विस्ताराने दाखवलंय. केसर भारद्वाजचे पॉडकास्ट्स ऐकणारे असंख्य लोक आपल्याला एका दृश्यात दिसतात. या लोकांचा एकमेकांशी काही संबंध नाही. ते एका ठिकाणी नाहीत, एका व्यवसायात नाहीत, एका वयोगटातील नाहीत, एकच समान सामाजिक पार्श्वभूमी असलेले नाहीत. मात्र तरीही एकाच विचाराने प्रेरित आहेत.

'मास हिप्नॉटिझम'चा हा प्रकार किती भयावह आहे, हे आपल्याला सिरिज पुढे सरकते, तसं कळत जातं. आपल्या आजूबाजूच्या घटनांवर एक नजर टाकली की अंधपणे एखादी विशिष्ट विचारसरणी अनुसरणारे आणि तीच बरोबर या मतावर ठाम असणारे हेकेखोर लोक वाढतायत हेच दिसून येतं.

संतांनी, महापुरुषांनी समाजसेवा करताना कधी भेद केला नाही, तेच संत आणि महापुरुषही आपण सोयीस्करपणे वर्गवारी करून वाटून घेतलेत. समाज कप्प्याकप्प्यांत कसा विभागला जाईल, हे पाहत हळूहळू विनाशाकडे वाटचाल करत आहोत. हे आपल्या लक्षात येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल, हेच सांगण्याचा प्रयत्न 'असूर' मालिकेतून केलेला आहे.

हेही वाचा : आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

असूरच्या यशाचे शिलेदार

'असूर' या मालिकेच्या यशात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. दिग्दर्शक ओनी सेन यांचे परिश्रम तर आहेतच, मात्र दमदार लेखकांची फळी दिमतीला असल्याशिवाय इतकी गुंतागुंतीची सिरिज यशस्वी करून दाखवणं निव्वळ अशक्य. निरेन भट, विभूकश्यप, अभिजीत खुमान, गौरव शुक्ला, विनय छावल, ईशा चोप्रा या सर्वांनी सिरिजच्या विविध भागांचं लेखन केलंय.

धनंजय राजपूतच्या भूमिकेत अर्शद वारसीने पुन्हा आपल्या अप्रतिम अभिनयाची प्रेक्षकांना दाखल घ्यायला लावलीय. बरुण सोबतीने साकारलेला निखिल नायरही उत्तम. लोलार्क दुबेची भूमिका शरीब हाश्मी यांनी संयतपणे साकारलीय. रिद्धी डोग्रा, अनुप्रिया गोएंका, पवन चोप्रा, अमेय वाघ, दीपक काझीर, गौरव अरोरा, जयंत रैना, निशांक वर्मा या सगळ्या सहकलाकारांनीही दाद देण्याजोगं कामं केलंय.

पण या सर्वांपेक्षा शुभ जोशीची भूमिका साकारणारा विशेष बन्सल हा बालकलाकार उजवा ठरतो. त्याचे डोळे आपला पाठलाग करत राहतात. धरम भट यांचं पार्श्वसंगीत सिरिजच्या जॉनरला साजेसं आणि भयावह आहे. या मालिकेच्या सिनेमॅटोग्राफर्सचं विशेष कौतुक करावं लागेल. बीभत्स खुनांचं चित्रण करतानाही कॅमेऱ्याचा तोल ढळलेला नाही.

खून होताना त्या ठिकाणांचे हवेतून शॉट्स घेण्यात आलेत. तेव्हा देवांची तीर्थक्षेत्रं असतात तशी या मारेकऱ्यांची ही कर्मक्षेत्रं असल्याचा भास होतो. पुराणकथांचा संदर्भ स्पष्ट करताना दिसणारी पेंटिंग्ज डोळ्यांचं पारणं फेडतात. त्यातून सिरिजचं उत्तम कलादिग्दर्शन दिसतं.

दुसरा सिझन येईल, अशा वळणावर संपणारी ही सिरिज नव्या सिझनची प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहायला लावतेय. पाहून संपल्यावरही डोक्यात घोळत राहणारी, प्रेक्षकांना केवळ विचारच नाही, तर आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी ही सिरिज अलीकडच्या वेबसिरिजमधे वरचढ आहे, यात शंका नाही.

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!