बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख.
‘बाहुबली’सारखा भव्यदिव्य सिनेमा देणाऱ्या राजामौलींच्या आगामी ‘आरआरआर’ सिनेमाबद्दल देशभर उत्सुकता आहे. येत्या २५ मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय. नुकतंच या सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं युट्यूबवर रिलीज केलं गेलं. यात छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख असल्याने महाराष्ट्रात या गाण्याची जोरदार चर्चा चालूय.
छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शहीद भगतसिंग यांच्याशिवाय आणखी चार स्वातंत्र्ययोद्ध्यांना या गाण्यामधे मानवंदना दिली गेलीय. पळस्सी राजा, राणी चेन्नम्मा, वलीयप्पन उलगनादन चिदंबरम पिल्लई आणि तंगुतुरी प्रकाशम पंतुलू हे चारही जण दक्षिण भारतातल्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आहेत.
‘केरला वर्मा’ आणि ‘केरला सिंहम्’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळस्सी राजा यांचा जन्म केरळच्या कोट्टायममधे झाला. पळस्सी राजा यांनी मलबार प्रांताचं रक्षण करण्यासाठी इंग्रज आणि म्हैसूरच्या सुलतानशाहीशी लढा दिला. त्यांनी हैदर अली आणि टिपू सुलतान या बापलेकांच्या तावडीतून मलबार प्रांत वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. यावेळी टिपूला हरवण्यासाठी पळस्सी राजा यांनी इंग्रजांच्या मदतीने १५०० लढाऊ नायर सैनिकांची फौज उभी केली होती.
१७९२मधे तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपूचा पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी हळूहळू मलबार प्रांतावर कब्जा करायला सुरवात केली. यावेळी मात्र पळस्सी राजा यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढाईचा पर्याय निवडला. पुढची तेरा वर्षं ते शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढत राहिले. पळस्सी राजा यांना निष्प्रभ करण्यासाठी इंग्रज सरकारने कोट्टायमची जबाबदारी दुसऱ्या राजाला देत सक्तीची करवसुली चालू ठेवली.
दुसरीकडे, पळस्सी राजा यांनी वायनाडमधेही आपला दबदबा निर्माण करत अनेक बंडखोरांना आपल्यासोबत घेऊन गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले करण्याचं सत्र सुरूच ठेवलं होतं. १७९७मधे पेरीया घाटातल्या लढाईत पळस्सी राजा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हातघाईच्या लढाईत इंग्रजांना लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या लढाईचा परिणाम म्हणून १७९७ला पळस्सी राजा आणि इंग्रजांमधे यांच्यात शांतता तह झाला. हा पळस्सी राजा यांचा पहिला राजकीय विजय होता.
इतिहासकार कुरूप यांच्या मते, इंग्रजांविरुद्ध सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातला सगळ्यात प्रदीर्घ लढा पळस्सी राजा यांनी दिला होता. स्पेनमधे नेपोलियनच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी इंग्रजांनी पळस्सी राजा यांच्या गनिमी कावा तंत्राचा वापर केला होता, अशी नोंद ‘केरला हिस्टरी अँड इट्स मेकर्स’ या संदर्भग्रंथात आहे. विसाव्या शतकाच्या सुरवातीला केरळमधल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांना पळस्सी राजा यांच्या लढ्याने प्रेरणा दिली.
हेही वाचा: सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
कर्नाटकातल्या काकती गावात जन्मलेल्या चेन्नम्माचं लग्न कित्तूरच्या देसाई राजघराण्याचे राजे मल्लसर्जा यांच्याशी झाला. १८२४मधे राजे मल्लसर्जा यांचं निधन झालं. त्याचवर्षी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचंही निधन झालं. राणी चेन्नम्मांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. पण वखवखलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात आपलं राज्य जाऊ नये, यासाठी त्यांनी शिवलिंगप्पा या दत्तक पुत्राला कित्तूरच्या गादीवर बसवलं.
कित्तूरवर कब्जा करण्याच्या तयारीत असलेल्या इंग्रज सरकारने राणीच्या या निर्णयाला विरोध केला. त्यामुळे युद्धाला तोंड फुटलं. ऑक्टोबर १८२४मधे झालेल्या पहिल्या युद्धात राणी चेन्नम्माच्या आदेशावरून लढणाऱ्या सैन्याने इंग्रजांची दाणादाण उडवत विजय मिळवला. कित्तूरच्या सैनिकांनी मिळवलेल्या या विजयाला आजही ‘कित्तूर उत्सव’ या नावाने कर्नाटकमधे साजर केलं जातं.
पराभूत झालेल्या इंग्रजांनी अपमानाचा बदला चुकवण्यासाठी पुन्हा एकदा युद्ध पुकारलं. या लढाईत स्वतः राणी चेन्नम्मा घोड्यावर बसून या लढाईत सामील झाली. यावेळी मात्र फितुरीच्या जोरावर इंग्रजांना कित्तूरचा किल्ला काबीज करण्यात यश आलं. राणी चेन्नम्माला कैद केलं गेलं. पुढे चार वर्षांनी बेलहोंगळ किल्ल्यात कैदेत असताना राणीचा मृत्यू झाला.
कर्नाटक राज्याची ओळख बनलेल्या राणी चेन्नम्माला स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या यादीत योग्य स्थान मिळालेलं नाही. राणी चेन्नम्मासारखाच पराक्रम पुढे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवला. भारतभर त्यांचं नाव झालं. पण राणी चेन्नम्माच्या कर्तृत्वाला मात्र लिंगायत समाज आणि कर्नाटकापुरतं बंदिस्त केलं गेलं. तिच्या शौर्याचा यथोचित गौरव झाला नाही. पण इंग्रजांच्या जुलमी राजवटीला आव्हान देणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्रीचा मान राणी चेन्नम्मालाच जातो.
‘कप्पलोटीयन तमिळन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चिदंबरम पिल्लई यांचा जन्म तिरुनलवेलीमधे झाला. कप्पलोटीयन हा तमिळ शब्द जहाजावर नियंत्रण असणारा या अर्थाने वापरला जातो. लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय यांच्या प्रभावामुळे पिल्लई स्वदेशी चळवळीशी जोडले गेले. १९०६मधे पिल्लई यांनी ‘स्वदेशी स्टीम नेविगेशन कंपनी’ची स्थापना केली. त्यावेळी जहाजांमधून होणाऱ्या मालवाहतुकीच्या व्यवसायावर इंग्रजांची हुकुमत होती.
पिल्लई यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात वकील म्हणून केली होती. १९०८मधे त्यांनी कोरल मिलच्या कामगार संपाला पाठबळ दिलं. इंग्रज सरकारच्या मनमानी कारभारावर त्यांनी आपल्या भाषणातून टीका केली. हा संप यशस्वी झाल्यावर इतर कंपन्यांमधल्या कामगारांनीही पिल्लई यांच्याकडून प्रेरणा घेत आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. आधी स्वतःची सागरी मालवाहतूक कंपनी आणि नंतर कॉंग्रेसच्या संपर्कात आल्यावर कामगारांसोबत दिलेल्या लढ्यामुळे पिल्लई इंग्रज सरकारच्या निशाण्यावर आले.
क्रांतिकारक बिपिनचंद्र पाल यांच्या सुटकेनंतर पिल्लई भाषण करतील, अशी कुणकुण लागताच इंग्रजांनी त्यांना अटक केली. पिल्लई यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मद्रास प्रांतात उमटले. पोलीस चौक्या, सरकारी कार्यालयांमधे जाळपोळ केली गेली. दंगली झाल्या. इंग्रजांविरुद्ध भाषण केल्यामुळे राजद्रोहाचा आरोप ठेवत चिदंबरम यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध केला गेला. त्यानंतर ही शिक्षा कमी केली गेली.
तुरुंगात त्यांना राजकीय कैद्यांसारखी वागणूक न देता, सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यांना तेलाच्या घाण्याला जुंपलं गेलं. आपल्या लोकांसाठी तेलाच्या घाण्याला जुंपून घेतलेला माणूस म्हणून त्यांना ‘सेक्कीळुता चेम्मल’ अशी पदवी दिली गेली. हातात कोणतंही शस्त्र न घेता इंग्रजांविरुद्धचा आर्थिक स्वातंत्र्यलढा मजबूत करण्याचा मान पिल्लई यांना निश्चितच जातो.
हेही वाचा: हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?
तत्कालीन मद्रास प्रांतातल्या ओंगोलमधे जन्मलेल्या तंगुतुरी प्रकाशम पंतलू म्हणजेच टी. प्रकाशम यांच्या कारकिर्दीची सुरवात वकील म्हणून झाली. १९०७मधे बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या भाषणांनी मद्रास प्रांत ढवळून काढला होता. प्रकाशम यांच्यावरही त्या भाषणांचा प्रभाव पडला होताच. ते कॉंग्रेसच्या सभांना हजेरी लावू लागले. तिथं त्यांना गांधीजींना जवळून पाहता आलं. पुढे त्यांनी ‘स्वराज्य’ नावाचं वर्तमानपत्र इंग्रजी, तेलुगू आणि तमिळ भाषेतून सुरु केलं. १९२१मधे कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड केली गेली.
१९२८मधे मद्रास दौऱ्यावर आलेल्या सायमन कमिशनचा निषेध करण्यासाठी ‘सायमन गो बॅक’ अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यावेळी इंग्रज सैनिकांनी ‘एक इंच जरी पुढे सरकलात, तर गोळ्या घालू’ अशी धमकी निषेधकर्त्यांना दिली. तेव्हा प्रकाशम उघड्या छातीने इंग्रज सैनिकांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. त्यांची ही हिंमत बघून इंग्रज सैनिकांनी माघार घेतली. प्रकाशम यांच्या धाडसाचं कौतुक म्हणून त्यांना जनतेनं ‘आंध्र केसरी’ हा किताब बहाल केला.
१९४१मधे वैयक्तिक सत्याग्रह लढ्यात भाग घेणारे प्रकाशम हे दक्षिण भारतातले पहिले नेते होते. गांधीजींनी दांडी यात्रा केल्यानंतर मद्रासमधेही मिठाचा सत्याग्रह झाला, ज्यात प्रकाशम आघाडीवर होते. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात प्रकाशम यांना तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांपैकी एक असलेल्या प्रकाशम यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात भाग घेतला. पुढे ते आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री बनले.
‘आरआरआर’ सिनेमाच्या ‘शोले’ गाण्यात या चार स्वातंत्र्ययोद्ध्यांचा उल्लेख असल्याने सध्या चर्चेला पेव फुटलंय. हा सिनेमा अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अल्लुरी यांची भूमिका राम चरण तेजा याने, तर भीम यांची भूमिका ज्युनियर एनटीआर याने साकारलीय. हे गाणं आलिया भटसोबतच राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर या मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर चित्रित केलं असल्याने या गाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
‘शोले’ची प्रेरणा ही स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या गौरवावर आधारित असली, तरी त्यामागचा मूळ उद्देश हा बॉक्स ऑफिस कमाईशी संबंधित आहे. या गाण्यात स्वातंत्र्ययोद्ध्यांचा उल्लेख करण्याबरोबरच नकळत प्रादेशिक अस्मितेलाही हात घातला गेलाय. या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या आडून त्यांच्यावर प्रादेशिक अस्मितेचा हक्क गाजवणाऱ्या प्रेक्षकांना या गाण्यातून भावनिक साद घातली गेलीय.
मूळचा तेलुगू असलेला हा सिनेमा इतर भाषांमधे डब करून भारतभर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक अस्मितेचा चष्मा लावून हे गाणं नीट पाहिलं तर पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र असा क्रम यात दिसून येतो. ही अशी वर्गवारी करणं चुकीचं असलं तरी बॉक्स ऑफिसवरच्या कमाईसाठी हीच वर्गवारी सिंहाचा वाटा उचलणार आहे, यात तिळमात्रही शंका नाही.
हेही वाचा:
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य
सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला