तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

२९ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.

मध्ययुगीन महाराष्ट्रात महिलांच्या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम वारकरी परंपरेने केलं. ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास, साधुसंते ऐसे केले मज’ या अभंगचरणेत साधुसंतांमुळे बाई म्हणून वाटणारी परात्मता संपली असल्याचं संत जनाबाईंनी म्हटलंय. यातच वारकरी संप्रदायाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन स्पष्ट होतो.

तुकोबांच्या जीवनाच्या सहभागीदार

'पंढरीच्या वाळवंटी कथा करती चांभारीण, तिच्या किर्तनाला लुब्ध झालाय नारायण’ या अक्काच्या सामवेदातल्या ओवीतली चांभारीण जातीव्यवस्था आणि पुरूषसत्ता या दुहेरी शोषणप्रक्रियेची बळी ठरलीय. तरीही प्रत्यक्ष नारायणाला लुब्ध करणारं कीर्तन करते. यातून वारकरी परंपरा हा जातीअंतक स्त्रीमुक्तीचा सांस्कृतिक प्रयोग आहे हे स्पष्ट होतं. 

सतराव्या शतकात तर तुकोबांच्या विचारांनी महाराष्ट्र हादरून गेला. वारकरी परंपरेच्या विचारसरणीचा हा कळस होता. धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन मातब्बर सत्तांशी झुंज देणाऱ्या तुकोबारायांचं शिष्यत्व स्वीकारणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम असल्याचं बोललं गेलं. हे काम अनगडशहा फकीर, संताजी जगनाडे, नावजी माळी, गंगाधरपंत मवाळ, गवारशेठ वाणी आणि महादजीपंत देहूकर आदी शिलेदारांनी केलं.

या पुरूष संतांबरोबर या कामात संत बहिणाबाईंचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्या केवळ तुकोबांच्या जीवनाच्या साक्षीदारच नव्हे तर सहभागीदारही आहेत.

हेही वाचा: ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

भाऊबंदकीच्या त्रासाला कंटाळून सोडलं गाव

औरंगाबाद जिल्ह्यातल्या देवगावच्या आऊजी कुलकर्णी आणि त्यांची बायको जानकी यांच्यापोटी जन्माला आलेलं तिसरं अपत्य म्हणजे बहिणाबाई. वयाच्या पाचव्या वर्षी गंगाधरपंत पाठक या बीजवराशी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या नवऱ्याचं वय त्यावेळी जवळपास ३० वर्ष होतं. भाऊबंदकीच्या त्रासाला कंटाळून बहिणाबाईंसह त्यांचं कुटुंब घराबाहेर पडलं.

भिक्षाटन करत करत ते कोल्हापूरला आले. तिथे त्यांना हिरंभट या विद्वानाने आश्रय दिला. इथेच त्यांनी जयरामस्वामी वडगावकरांची तुकोबांच्या अभंगावरची कीर्तने ऐकली. खरंतर बहिणाबाईंचं घर शाक्त परंपरेतलं. बहिणाबाई लिहतात, 'तयाचिये घरी शक्ती उपासना, तयाची अंगना केली मज' पण शाक्त असूनही त्यांच्या नवऱ्याचा जातीय आणि पुरूषी अहंकार तसाच होता.

बहिणाबाईंचा नावलौकिक पाहून त्यांच्या नवऱ्याला वाईट वाटत होतं, असे बहिणाबाईंनीच नोंदवलंय. 'भ्रतार म्हणे आम्ही की ब्राह्मण, वेदाचे पठण सदा करू' यातूनच त्यांच्या नवऱ्याची वृत्ती स्पष्ट होते. केवळ नवराच नाही तर सगम्र कुळच वारकरी परंपरेच्या विरोधात होतं. वारकरी परंपरेचा आधारभूत ग्रंथ गीता आणि नामस्मरण ही मुख्य साधना याला आमच्या कुळाचा विरोध असल्याचं बहिणाबाई सांगतात.  

संत बहिणाबाई लिहितात, 'नामाचा विटाळ आमुचे घरी, गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा' अशी पार्श्वभूमी लाभलेल्या बहिणाबाईंच्या विचारात परिवर्तन घडवण्याची किमया जयरामस्वामी वडगावकरांनी साधली. जयरामस्वामी वडगावकर त्याकाळचे विख्यात क्रांतीकारी सत्पुरूष होते. त्यांचे गुरू कृष्णादास यांनी न्हाव्याच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. यावरून ब्राह्मणांनी त्यांचा खूप छळ केल्याचं बा. र. सुंठणकर यांनी नोंदवलंय. असा आंतरजातीय विवाह करणाऱ्या कृष्णादासांचं शिष्यत्व जयरामस्वामींनी स्विकारलं होतं.

जयरामस्वामींचं शिष्यत्व स्वीकारण्याचं धाडस

अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या डोंबीशी आंतरजातीय विवाह केल्यानंतर काश्मीरचा राजा चक्रवर्मा याचा डामरांनी क्रूरपणे खून केला होता. बसवण्णांच्या अनुभव मंटपात केलेल्या आंतरजातीय विवाहाने त्या जोडप्यांसह शरणगणांचे अमानुष हत्यासत्र झाले. या दोन 'सैराट’ घटनांच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन समाजव्यवस्थेत वर्णसंकर हा किती गंभीर गुन्हा समजला होता याची आपणास कल्पना येईल.

असा गंभीर गुन्हा करणाऱ्या कृष्णादासांचं शिष्यत्व स्विकारण्याचं धाडस जयरामस्वामींनी दाखवलं. यावरूनच जयरामस्वामींच्या विचारांची जातकुळी समजून येतं. जयरामस्वामींचे परमगुरू शांतलिंगस्वामी हे लिंगायत होते. त्यांनी चन्नबसवण्णांच्या करणहसीगे या ग्रंथाचा अनुवाद केला. ते मालोजीराजांचे गुरू होते. त्यांच्याकरवी लिंगायत तत्त्वज्ञानाचा वारसा जयरामस्वामींना लाभला. 

स्वतः शिवरायांसारख्या नीतीमान राजाने जयरामस्वामींकडून अपरोक्षनुभव नावाचा ग्रंथ ऐकला होता. यावरून जयरामस्वामी यांच्या विचार आणि कार्याची महत्ता स्पष्ट होते. अशा बंडखोर विचारसरणीच्या सत्पुरूषाला कीर्तन करण्यासाठी तुकोबांच्या अभंगाची गरज भासणार हे उघड आहे. या जयरामस्वामींमुळेच तुकोबांशी बहिणाबाईंची वैचारिक भेट झाली.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

तुकोबांशी बहिणाबाईंची वैचारिक भेट

जयरामस्वामी वडगावकरांसारख्या क्रांतीकारी सत्पुरूषाच्या मुखातून तुकोबांची बहिणाबाईंना ओळख झाली. त्यांना स्वप्नातच तुकोबांनी उपदेश केला आणि बहिणाबाईंनीही त्यांना गुरू म्हणून मनोमन स्विकारलं. या अनपेक्षित घटनेने त्यांच्या नवऱ्याला धक्काच बसला. ‘कैसा शूद्र तुका स्वप्निच दर्शनी, बिघडली पत्नी काय करू’ तुकोबारायांसारख्या शूद्र जातीच्या संतांना गुरू मानणं त्यांच्या नवऱ्याला पसंत पडलं नाही. त्यांच्या नवऱ्याची जयरामस्वामींनी समजूत काढली.

समजूत काढताना त्यांनी बहिणाबाईंचं केलेलं वर्णनच बहिणाबाईंची योग्यता स्पष्ट करणारं आहे. ते म्हणतात, ‘इच्या समागमे करिती जे वास, तेही भक्तीरस घेती सुखे’ अशारितीने गंगाधरपंतांचे जयरामस्वामी आणि बहिणाबाई यांनी मनपरिवर्तन केलं आणि ते तुकोबांच्या दर्शनास जायला तयार झाले. देहूगावी आल्यावर त्यांची मंबाजीशी भेट झाली. मंबाजीने त्यांना आपलं शिष्यत्व स्विकारण्याची सुचना केली.

तथापि बहिणाबाईंनी तुकोबांच्या स्वप्नदर्शनाची घटना सांगून तुकोबांना गुरू केल्याचं सांगितलं. ‘स्वप्निचा उपदेश गुरू केला शूद्र, तो ही बळीभद्र ज्ञानहीन’ असं म्हणत मंबाजीने बहिणाबाईंचा उपहास केला. केवळ एवढं करून न थांबता पुण्याच्या अप्पाजी गोसाव्यांकडे तक्रार केली, धर्मशास्त्राचे नियम मोडून तुकोबांनी बहिणाबाईंसारख्या सवर्ण स्त्रीचं गुरूत्व स्वीकारलंय. ‘गुरू तो सकळांशी ब्राह्मण, जरी जाहला क्रियाहीन’ असा उद्घोष ज्याकाळी ऐकू येत होता त्याकाळी तुकोबांना गुरू म्हणून स्विकारण्याची क्रांतीकारी कृती बहिणाबाईंनी केली.

अगोदर नवऱ्याने आणि नंतर मंबाजीने तुकोबांची जात काढून त्यांचं शिष्यत्व स्विकारायला केलेला विरोध बहिणाबाईंनी मोडित काढला. भक्तीच्या प्रांतातलं जातीचं प्रदूषण दूर करण्यासाठी तुकोबांना गुरू मानण्याची जातीअंताची कृती बहिणाबाईंनी केली आणि या कृतीला तत्वाचं अधिष्ठान देण्यासाठी जन्माधिष्टित चातुवर्ण्याचं खंडन करणाऱ्या वज्रसुचि या काव्याचा मराठी अभंगानुवादही बहिणाबाईंनी केला. वज्रसुचिचा मराठी अभंगानुवाद करण्याची प्रेरणा अर्थातच तुकोबांची होती.

हेही वाचा: संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानाचा प्रवास

‘संत कृपा झाली, इमारत फळा आली’ या अभंगात संत बहिणाबाईंनी स्वतःला या इमारतीवरची पताका म्हणवून घेतलंय. या अभंगात स्वतःसह वारकरी परंपरेच्या जाज्वल्य आत्मभानाचा अविष्कार बहिणाबाईंनी व्यक्त केलाय. हा अभंग वारकरी परंपरेचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करतो.

वज्रसूचीचा बहिणाबाईंनी केलेला मराठी अभंगानुवाद तुकोबांना गुरू मानताना जातीचा प्रश्न उभा राहत होता. त्याला तात्विक उत्तर देण्याच्या तात्कालिक गरजेतून झाला असला तरी ते मूळ आणि एकमेव कारण नव्हतं. गीतेच्या मराठी अनुवादापासून सुरु झालेल्या वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानाच्या प्रवासातला तो शेवटचा निर्णायक आणि अपरिहार्य टप्पा होता.

तेराव्या शतकात स्त्री शूद्रांची कोंडी झाली होती. धर्मप्रधान समाजव्यवस्थेत स्त्री शूद्रांना धर्माचा कोणताच अधिकार नसल्याने त्यांचं जिणं पशुवत बनलं होतं. अशा परिस्थितीच्या प्रवाहाला ज्ञानदेवांनी वेगळं वळण लावलं. ईश्वर अवतार घेतो तो चातुर्वर्ण्याच्या म्हणजेच पर्यायाने गोब्राह्मणांच्या प्रतिपालनासाठी म्हणूनच कृष्णाला अनेकांनी गोब्राम्हणप्रतिपालक म्हटलंय. ज्ञानदेवांनी मात्र कृष्णावताराचं प्रयोजनच बदलून टाकलं.

विषमताग्रस्तांच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग

स्त्री शूद्रांना वगळणारा, निद्रितावस्थेत सांगितलेला आणि कर्मकांडाचा पुरस्कार करणारा वेद बदलून स्त्री शूद्रांना सामावून घेणारा, जागृतावस्थेत सांगितलेला आणि कर्मकांडाला नकार देणारा गीता नावाचा नवा निर्दोष वेद तयार करण्यासाठी कृष्णावतार आहे, असं ज्ञानदेवांनी सांगितलं. म्हणजेच कृष्णावतार हा स्त्री शूद्रांसाठीच असल्याचा उलटा निष्कर्ष ज्ञानदेवांनी काढला.

ज्ञानदेवांनी याच गीतेवर भाष्य लिहिल्याने वैदिकांचा स्त्रीशूद्रांशी अबोला धरणारा वेद फोल ठरला असल्याचा नामदेवरायांचा अभिप्राय अगदी खराय. स्वतः बहिणाबाईंनी संत नामदेवरायांना वारकरी परंपरेचा 'विस्तारक' म्हटलेलंय. ज्ञानदेवांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर स्त्री शूद्रांची बाजू घेतली होती. नामदेवरायांनी मात्र त्याचा विस्तार करत अभंग छंदाची निर्मिती करून साहित्य, सामूहिक वारकरी कीर्तन परंपरेचा प्रघात पाडत कला आणि काल्याच्या उत्सवाद्वारे क्रीडा या क्षेत्रातही स्त्री शूद्रांचा कैवार घेतला.

अस्पृश्य चोखोबांची समाधी बांधून, मोलकरिण जनाबाईंना कीर्तन संचलनाची जबाबदारी देऊन आणि कुष्ठरोगी केशो कलंदरांना उत्तराधिकारी नेमून नामदेवरायांनी बहिष्कृत ज्ञानदेवांच्या समतेच्या तत्वाला व्यवहारात प्रस्थापित करण्याचं आणि अखिल भारतीय स्तरावर विस्तारित करण्याचं अपूर्व कार्य केलं. एकनाथ महाराजांनी ज्ञानदेवराय आणि नामदेवराय या दोघांच्याही भिन्न पण परस्परपूरक कार्यक्षेत्रात एकांडा शिलेदार बनून पैठण या विषमताग्रस्तांच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावला.

हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

तुकोबांच्या अभंगांना तात्त्विक अधिष्ठान

भागवताच्या एकादशम स्कंधावर भाष्य करत असताना स्त्री शूद्रांना वगळण्याच्या वेदाने केलेल्या पापाचा पुनरुच्चार करत कृष्णाने उद्धवाला सांगितलेल्या आणि स्त्री शूद्रांना खुल्या असलेल्या ज्ञानाला मराठी भाषेत भाषांतरित करून ज्ञानदेवांच्या भूमिकेला तर भारुड नावाच्या नव्या कलाप्रकाराला उजाळा देऊन अस्पृश्यांच्या घरी जेवण करत नामदेवरायांच्या कार्यक्षेत्रात एकनाथ महाराजांनी 'आधारस्तंभाची' भूमिका बजावली.

सतराव्या शतकात तुकोबारायांनी तर वारकरी परंपरेचा कळसच करून टाकला. ज्ञानदेवांनी वेदाचा अधिकार शूद्रांना नाही म्हणून गीताभाष्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र तुकोबारायांनी वेदांचा खरा अर्थ ईश्वरी प्रसादामुळे आम्हा शूद्रांनाच समजला असून जातीय अहंकारात बुडालेल्या ब्राह्मणांनी फक्त वेदाच्या गोण्या वाहण्याचं हमालीचं काम केलंय, अशी उलटी भूमिका मांडली.

खरंतर वेद हा चातुर्वर्ण्याचं महत्तम प्रतिक म्हणजेच गोब्राह्मणांच्या हितसंबंधाचं रक्षण करणारा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. तुकोबारायांनी मात्र माझा वेद हा गोब्राह्मणहितसंबंधाच्या पलीकडे गेल्याचा बार उडवून दिला. तुकोबारायांच्या या अभंगाला बहिणाबाईंनी तात्विक अधिष्ठान मिळवून दिलं.

तात्त्विक विजयाची पताका फडकवली

जन्माधिष्ठित चातुर्वर्ण्याचं म्हणजेच ब्राह्मण्याचं विध्वंसन करणारा बौद्धाचार्य अश्वघोषांनी लिहिलेला आणि नंतर उपनिषद म्हणून प्रतिष्ठा पावलेला वज्रसुचीकोपनिषद नावाचा गोब्राम्हणहिता निराळा झालेला नवा वेद मराठी भाषेत अभंगअनुवादीत करून ब्राह्मणांचं ब्राह्मणत्वच बहिणाबाईंनी उडवून लावलं. जन्म, देह, वर्ण,कर्म याआधारे ब्राह्मणत्व ठरत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

लिंगायत शरणांच्या सामूहिक हत्यासत्रानंतर अत्यंत सावधपणे अपूर्व अशा विचारव्यूव्हाची आखणी करत तीन ते चार शतकं सुरू असलेल्या वारकरी परंपरेच्या या लढ्यात तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील निर्णायक विजयाची पताका बहिणाबाईंनी संत कृपेच्या इमारतीवर फडकावली.

ज्ञानेश्वरी, नामदेवादी संतांची अभंगवाणी, एकनाथी भागवत, तुकोबांची गाथा असा क्रमाने उत्क्रांत होत गेलेला वारसा जपत बहिणाबाईंनी कृतिशील तत्वज्ञ बनून वारकरी परंपरेचा हा सारा इतिहास सूत्रबद्ध आणि क्रमबद्ध पद्धतीने एका अभंगात सांगून टाकला. चार-पाच शतकं चाललेल्या या परंपरेचा इतका विलोभनीय इतिहास मांडायला हवं असणारं जाज्वल्य आत्मभान बहिणाबाईंना होतं याची हा अभंग साक्ष देतो.

हेही वाचा: शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

समानधर्मा बहिणाबाई

बहिणाबाईंच्या सारखी आणखी एक घटना गोपाळनाथांच्या बाबतीत घडली. गोपाळनाथ ब्राम्हण असून त्यांचे गुरु रंगनाथ हे सोनार होते. याविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्याना उत्तर देण्याच्या निमित्ताने 'श्वपच हो का ब्राम्हण, असे ब्रह्म ज्ञानसंपन्न, तया प्रति मी वंदीन, स्वंये श्रीकृष्ण म्हणत असे’ अशा आशयाच्या क्रांतिकारी ओव्या गोपाळनाथांच्या चरित्रात विठ्ठलनाथांनी विपुल प्रमाणात लिहिल्या आहेत.

गोपाळनाथांचे कनिष्ठ बंधू शामराज नाना यांनी वज्रसुचीचा सात अभंगात अनुवाद केला होता. विशेष म्हणजे गोपाळनाथ आणि शामराजनाना वारकरी विचारांचा वारसा जपणारे नाथसंप्रदायी होते. त्यांनी स्वतः एकनाथ महाराजांची आरती लिहिली. ती वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. ते एकनाथस्वामींची पुण्यतिथी साजरी करायचे. वज्रसुचीचा अनुवाद करणारे त्यांचे बंधू पंढरीच्या वारीला जाताना जेजुरी इथे समाधिस्थ झाले. यावरून त्यांचे वारकरी परंपरेशी असलेले अनुबंध स्पष्ट होतात.

गोपाळनाथांचे शिष्य विविध जाती, जमातीतील तर होतेच पण परधर्मीयही होते. गोपाळनाथ आणि संत बहिणाबाई म्हणूनच भवभूतीच्या भाषेत समानधर्मा वाटतात.

संत बहिणाबाई आणि वारकरी संप्रदाय

वारकरी परंपरेचे अखेरचे संत निळोबाराय यांनी बहिणाबाईंच्यावर आरती लिहिली होती. यावरून वारकरी परंपरेत बहिणाबाई या अधिकारी संत आहेत हे स्पष्ट होतं. बहिणाबाई अतिशय महत्त्वाच्या स्त्री संत असूनही वारकरी परंपरेत मात्र त्या उपेक्षित राहिल्या हे वास्तव आहे. त्यांच्या क्रांतिकारी भूमिकांमुळे ब्राह्मणांनी डोळेझाक केली तर त्या ब्राम्हण असल्याने बहुजन अभ्यासकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं.

महात्मा जोतिराव फुले यांचे सहकारी तुकाराम तात्या पडवळ यांनी त्यांच्या जातीभेदविवेकसार नावाच्या ग्रंथात बहिणाबाईंचे काही अभंग आधार म्हणून घेतले होते. अलीकडच्या काळात डॉ. सदानंद मोरे आणि शरद पाटील यांनी बहिणाबाईंचं स्थान ओळखून तशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला.

शालिनीताई जावडेकर यांनी बहिणाबाईंची स्वतंत्र गाथाही प्रकाशित केलीय. अलीकडच्या संत तुकारामांवरच्या सिनेमातही बहिणाबाईंना योग्य स्थान दिलं गेलंय. अशा बहिणाबाईंच्या विचार आणि कार्याचा प्रसार व्हावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून संत बहिणाबाई पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!

हेही वाचा: 

संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

(लेखक हे तरुण पिढीतले कीर्तनकार आहेत.)