कोरोना वायरससाठी शेतीच्या औद्योगिकीकरणाला जबाबदार धरायला हवं : रॉब वॅलेस

०३ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय.

रॉब वॅलेस हे अमेरिकेतल्या मिनेसोटा युनिवर्सिटीतले मोठे संशोधक. त्यांनी जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी या विषयातत पीएचडी केलीय. वायरस आणि बॅक्टेरियाच्या उत्क्रांतीशास्राचे ते तज्ञ आहेत. अमेरिकेतल्या मंथली रिव्ह्यु या प्रकाशनाकडून प्रसिध्द झालेलं त्यांचं ‘बिग फार्म्स मेक बिग फ्ल्यू’ हे पुस्तक फार गाजलंय. औद्योगिक शेतीमुळे कोरोनासारखे मोठे साथरोग येतात, असं वॅलेस यांनी या पुस्तकात सांगितलंय.

जर्मनीतल्या सोशालिस्ट प्रकाशन संस्थेच्या याक बास्ट या प्रतिनिधीनं २१ मार्च २०२० ला त्यांची मुलाखत घेतली होती. Dead Epidemiologists: On The Origins of Covid-19 या पुस्तकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली असून या मुलाखतीचा शिरीष मेढी यांनी केलेला मराठी अनुवाद इथं देत आहोत.

याक बस्ट : नवीन वायरस किती धोकादायक आहे?

याचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. कोविड-१९ म्हणजेच कोरोना वायरसची साथ तुमच्या भागात आली तेव्हा आणि ती साथ सर्वोच्च पातळी गाठत असताना तुम्ही कुठं होता, तुमच्या भागातल्या सार्वजनिक आरोग्य सेवा साथ कशी हाताळत होत्या तसंच तुमचं वय किती आहे, तुमची प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि तुमचं एकूण आरोग्य किती व्यवस्थित आहे यावर अवलंबून आहे.

हेही वाचा : कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?

याक बस्ट : मग कोरोनाची भीती अनाठायी आहे, असं म्हणायचं का?

नाही, नक्कीच नाही. वुहानमधे कोरोनाची लागण सुरू झाली तेव्हा तिथं २ ते ४ टक्के मृत्यूदर होता. वुहानच्या बाहेर हा दर एक टक्क्यांपेक्षा कमी झाला. आता इटली आणि अमेरिकेत हा दर वाढलाय. पण तरीसुध्दा तुलनेने हा दर कमीच म्हणावा लागेल. 

सार्सच्या साथीमधे मृत्यूदर १० टक्के होता. १९१८ ला आलेल्या इनफ्लुएन्झा साथरोगात हा दर ५ ते २० टक्के होता. इबोलामधे तर काही ठिकाणी हा दर ६० टक्के होता. पण या दरापेक्षा साथ समाजात किती जणांना बाधित करते हे बघणं महत्त्वाचं आहे.

आता जगभर विमानांचं जाळं प्रचंड वाढलंय. अजून कोरोनाविरोधी लस निर्माण झाली नाही आणि अँटिवायरल औषधंही उपलब्ध नाहीत. तसंच ज्याला हर्ड इम्युनिटी किंवा समुह प्रतिकारशक्ती म्हणलं जातं ती कुठेही साध्य झालेली नाही. त्यामुळे मृत्यूदर १ टक्का असला तरीही एकूण बाधितांची संख्या जास्त असेल तर एकूण मृत्यूंची संख्या खूप मोठी होईल. तसंच एखाद्यास लागण झाल्यानंतर तो कोरोनाग्रस्त आहे हे कळायला साधारण १४ दिवस थांबावं लागतं. त्यामुळे कुठेही कोरोनामुक्त ठिकाण असणं अशक्य आहे.

याक बस्ट : हे आकडे भयावह आहेत.

नक्कीच. आणि ही तर सुरवात आहे. काळाच्या ओघात अनेक वायरस स्वतःमधे बदल घडवून आणतात. १९१८ मधे आलेल्या इनफ्लुएन्झाच्या पहिल्या टप्प्यांत  कमी माणसं मेली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत लाखो माणसं गेली.

याक बस्ट : हे दोन्ही वायरस तोंडावर आणि घश्यावर परिणाम करतात.

रॉब वॅलेस : दोन वायरसची तुलना करणं चुकीचं आहे. इनफ्लुएन्झाबाबत आपल्याकडे बरीच माहिती आहे. पण कोरोना कशाप्रकारे कार्यरत राहिल ते अजून माहीत नाही. प्रश्न कोरोना विरुद्ध इनफ्लुएन्झा असा नाही. प्रश्न कोरोना आणि इनफ्लुएन्झा असा आहे. अनेक वायरस एकाच वेळेस आपल्यावर हल्ला करू शकतात. म्हणून परिस्थिती गंभीर आहे.

हेही वाचा : आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

याक बस्ट : तुम्ही साथीच्या वायरसबाबत नेहमी संशोधन करत असता. ‘बिग फार्म्स मेक बिग फ्ल्यू’ या पुस्तकात तुम्ही औद्योगिक शेती, नैसर्गिक शेती आणि साथीचे रोग यामधल्या संबंधांबाबत मांडणी केलीय. तुम्हाला नक्की काय सांगायचंय?

रॉब वॅलेस : प्रत्येक नवीन कोरोना साथ ही अनेक जुन्या साथींशी जोडलेली आहे हे समजून घेण्यात आपण अपयशी ठरलोत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अन्न निर्मिती करणारे उद्योग आणि बहुराष्ट्रीय उद्योगांची नफेखोरी यांच्याशी जोडलाय.

नवीन वायरस अधिकाधिक धोकादायक का होतोय हे समजून घेण्यासाठी औद्योगिक शेती उत्पादन आणि मांस निर्मिती उद्योग याबाबत चौकसपणे विचार करणं आवश्यक आहे. पण हे केलं जात नाही. नवीन साथ येते तेव्हा सरकार, मीडिया आणि वैद्यकीय व्यक्ती तेवढ्यापुरताच विचार करतात. एकूणच हे वायरस कोणत्या कारणांमुळे माणसाच्या संपर्कात येतात याकडे ते दुर्लक्ष करतात.

याक बस्ट : यासाठी कुणाला जबाबदार धरायला हवं?

रॉब वॅलेस : शेतीच्या औद्योगिकीकरणाला. जगात उरलेल्या मूळ जंगलांचे शेवटचे तुकडे आणि छोट्या शेतकऱ्यांची जमीन भांडवलदार वर्ग स्वतःच्या ताब्यात घेतायत. त्यामुळे जंगलांचा विनाश होतोय आणि विकास प्रक्रियेमुळे साथींचा प्रसार होतोय. या क्षणाला पृथ्वीचं रुपांतर जैविकदृष्ट्या एका मोठ्या शेतात झालंय. कृषी उद्योग संपूर्ण धान्य बाजारावर स्वतःचा कब्जा प्राप्त करू पहातोय.

संपूर्ण जगातला नवउदारवादी उद्योग प्रगत देशातल्या उद्योगांना अविकसित, गरिब देशातल्या जमिनी आणि संसाधनं विकत घेण्यास मदत करतोय. परिणामी जंगलांचा विनाश वेगाने होतोय. भांडवलाच्या आधारे होणाऱ्या नवीन शेती पध्दतीत काही नवीन वायरस मुक्त होतायत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मोडकळीस आलीय. त्यामुळेच सगळं जग संकटात सापडलंय.

याक बस्ट : उत्पादन पध्दतींचा कसा परिणाम या वायरसवर झालाय?  

रॉब वॅलेस : वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय. न्यूयाँर्क, लंडन आणि हाँगकाँग ही शहरं साथींची केंद्रं झालीयत.

हेही वाचा : आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा

याक बस्ट : हे कोणत्या रोगांसाठी लागू पडतं?

रॉब वॅलेस : हे सगळ्याच रोगांबाबत खरं आहे. कोणताही पँथोजेन म्हणजेच वायरस आता भांडवलापासून मुक्त नाही. ईबोला, झिका, सगळ्या प्रकारचे इनफ्ल्युन्झा वायरस, कोरोनाचे वायरस हे सगळे शहरांतल्या वस्त्यांमधे, विभागीय राजधान्यांमधे शिरलेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विमानांत त्यांनी शिरकाव केलाय.

पाळीव प्राण्यांचे एक समान वंशज निर्माण केल्यामुळे जी प्रतिकारशक्ती शिल्लक होती ती नष्ट झाली. जगात आणि चीनमधे जंगली प्राण्यांचं मांस खाणं ही नेहमीचीच बाब झालीय. परिणामी हा एक उद्योग झालाय. या खाद्यांचा शोध जंगलात खोल आतपर्यंत केला जातो. परिणामी धोकादायक वायरसशी संपर्कात वाढ झालीय.

याक बस्ट : चीनमधे कोरोना वायरसची लागण झाली का?

रॉब वॅलेस : हो. पण ही बाब युरोप आणि अमेरिकेलाही लागू पडते. नवीन इनफ्लुएन्झाची साथ युरोप आणि अमेरिकेत सुरू झाली. अलिकडेच एच१एन१ आणि एच५एक्स२ या वायरसमुळे पश्चिम अफ्रिकेत इबोला आणि ब्राझिलमधे झिका यांची लागण झाली.

हेही वाचा : 

मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

भारताच्या किनाऱ्यावर धडकेल का कोरोनाची दुसरी लाट?

उत्तर प्रदेश प्रकरणानंतर काँग्रेसला फुटेल का नवी पालवी?

इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?