झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला

११ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.

दैवावर विश्वास ठेवावा की नाही हा वादाचा विषय आहे. पण काही व्यक्तींचा जन्म आणि मग त्यांची भरारी बघितल्यावर दैव ही गोष्ट आहे असं वाटायला लागतं. नागपूरमधल्या बनसोड भागात जन्मलेला एका साध्या घरातला मुलगा आज टीम इंडिया प्रमुख आधारस्तंभ आहे हे एक ताजं उदाहरण. रोहित शर्मा त्याचं नाव.

घरातला जगण्याचा संघर्ष

नागपूर इथं ३० एप्रिल १९८७ ला रोहितचा जन्म झाला. रोहितचे वडील गुरुनाथ आणि मुळची विशाखापट्टनमची असलेली त्याची आई पूर्णिमा यांचा संसार कसाबसा चालला होता. रोहितला मुंबईला त्याच्या वडिलांनी आपल्या भावाकडे धाडलं. ते बोरिवलीला रहायचे. तिथे रोहित क्रिकेटकडे आकर्षित झाला. त्याचे वडील गुरुनाथ हे एका फर्ममधे केअरटेकर होते. त्यांच्या पगारातून रोहितचं क्रिकेट फुलणं अवघडच होतं. पण रोहितचे काका उदार. त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. ते त्याला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला धाडायचे.

बोरिवलीत दिनेश लाड यांच्याकडे ट्रेनिंगसाठी पाठवलं आणि रोहितचं दैव पालटलं. लाड यांनी सगळ्यात आधी रोहितमधले बॅट्समनचे गुण हेरले. आधी रोहित बॉलिंग करायचा. पण तो जेव्हा बॅटिंग करायचा तेव्हा तो चांगले फटके मारतो हे लाड यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी त्याला वरच्या क्रमांकावर धडायला सुरवात केली.

महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रोहितला आपल्या स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश घ्यायला लावलं. त्यामुळे तो सतत त्यांच्या नजरेसमोर राहिला. क्रिकेटमधे गुंतल्यावरही रोहित अधनंमधनं आई वडिलांनान भेटायला डोंबिवलीला जायचा. ते तिथे एका खोलीत रहायचे. रोहित ज्युनिअर स्तरावर चमकु लागला.

हेही वाचा: वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?

आयपीएलमुळे गुणवत्तेला चारचाँद

मग मुंबईसाठी निवडला गेला आणि भले भले माजी क्रिकेटपटू त्याच्या बॅटिंगच्या प्रेमात पडले. त्याचे सहजपणे फटके मारणं, उंच फटके मारणं, कष्ट केल्यासारखे न करता बॉलिंग झोडपणं हा सगळा प्रकार अनेकांना त्याच्यातली प्रतिभा दाखवणारा होता. रोहित हा हा म्हणता पायऱ्या चढत वर गेला. आयपीएलमुळे तर त्याच्या गुणवत्तेला चार चांद लागले. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व त्याच्याकडे आलं. मग तर तो तो जबाबदारीने अधिकच छान खेळायला लागला.

पण बऱ्याचदा तो सुरवातीलाच विकेट फेकायचा किंवा गडबडायचा. त्यामुळे कसोटी प्रकारात त्याचं नाव मागं पडलं. मर्यादित षटकांच्या प्रकाराला साजेसा त्याचा खेळ होत राहिला. त्याने २००७ मधे २०-२० वर्ल्डकपमधे पहिली चमक दाखवली आणि मग वन डेमधेही. पण मधल्या काळात रणजीमधल्या त्रिशतकाने त्याला आत्मविश्वास दिला. मात्र २०११ मधे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाने त्याला संधी दिली नाही. ही बाब त्याच्या मनाला लागली होती.

हेही वाचा: अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत

२०११ मधे आळशीपणाने गेली संधी

तो दिनेश लाड यांच्याकडे ढसाढसा रडला. मात्र त्याने उमेद हरली नाही. यानंतर तो २०१३ पासून खेळायला लागला आणि त्याने आपला नवा अवतार दाखवायला सुरवात केली. वन डेमधले अनेक विक्रम त्याने मोडले, नवे रचले. शिखर धवनबरोबर त्याची जोडी छान जमली. आयपीएलमधे आपल्या टीमला चारवेळा अजिंक्यपद मिळवून द्यायची करामतही त्याने केली.

त्याला वेळोवेळी सचिन तेंडूलकर, रिकी पॉंटिंग या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळत गेलं. हीसुद्धा त्याच्या कामगिरीसाठी मोलाची गोष्ट होती. झोपेला प्राधान्य देणारा रोहित बॅटिंग करताना कधी कधी आळसावलेला वाटायचा. पण मोठ्यांच्या सल्ल्याने त्याला त्याच्या चुका समजत गेल्या. त्याच्याकडे फटक्यांची वानवा तर नव्हतीच. उणीव होती खेळपट्टीवर टिकण्याची, जिद्द ठेवण्याची. ते त्याला जमायला लागलं आणि तो आता जगातल्या सर्वोत्तम वनडे बॅट्समनमधे गणला जातोय.

रोहितने कसोटी टीममधेही व्यवस्थित पुनरागमन केलंय. इंग्लंडमधे रोहितने आतापर्यंत पाच सेंच्युरी फटकावल्यात. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड, बांगला देश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळताने त्याने ही कामगिरी केलीय. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी त्याचा साथीदार नवा होता, केएल राहुल. त्याला पहिला बॉल खेळायला आवडतो म्हणून रोहितने त्याला तशी संधी दिली. रोहित आता परिपक्व झालाय. जबाबदार झालाय.

हेही वाचा: बलविंदर संधूची ती न विसरता येणारी विकेट

लग्नानंतर बॅटिंगमधे नवी चमक

२०० हून अधिक वन डे मॅच खेळल्यावर या गोष्टी यायलाच हव्यात असं तो म्हणतो. विशेष म्हणजे रोहित टीम इंडियामधे धोनीच्या खालोखाल सर्वाधिक वन डे खेळलेला खेळाडू आहे. शिखर धवनबरोबर तो सतत रहातो. य़ाचा फायदा मैदानातही होतो. मात्र त्याला आता आयुष्यात स्थैर्य आलंय. त्याची सहाय्यक असलेली रितिका पत्नी झालीय. तिने त्याला स्थैर्य मिळवून दिलंय.

शेवटी काळजी घेणारं सर्वार्थाने कुणी जवळचं असलं की माणूस निर्धास्त होतो. तो आपल्या आवडत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकतो. रोहितचंही तसंच झालंय. तशात मुलीच्या जन्मानंतर त्याला बापाचं हृदय काय असतं हेही उमगू लागलंय. या दोन्ही घटनांमुळे आज रोहित फॉर्मात आलाय, असं म्हटलं तर ते वावगे ठरू नये. तो जबाबदारीने बहारदार खेळ करू लागलाय.

खरंच त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. गुरुनाथ शर्मा यांनी बनसोड सोडलंच नसतं तर आज रोहित शर्मा कुठे असता? ते हे सांगणं सध्यातरी कठीण आहे.

हेही वाचा: 

टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा