निवड समिती रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे नारळ देणार?

०३ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत.

भारताने गेल्या वर्षा दीड वर्षामधे टेस्टत आपला पाचवा सलामीवीर बदलला. या सलामीवीर बदलाचे वारे २०१७-१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून वाहायला सुरवात झाली. अखेर एमएसके प्रसादांची निवड समिती सर्व पर्याय चाचपून दमलेत. त्यामुळे त्यांनी मुळचा मधल्या फळीत खेळणारा, पण टेस्ट मॅचसाठीच्या टीममधे स्थान मिळवण्यासाठी झगडणारा वनडे, टी- २० टीमचा वाईस कॅप्टन रोहितला आता तू टेस्ट मॅचचं ओपनिंग कर असे फर्मान सोडले. 'मरता क्या नही करता'? रोहितने अंतिम अकरात खेळायला मिळणार म्हणून हे फर्मान शिरावर घेत सलामीची तयारी सुरू केली.

रोहितचा सरावाचा पहिला प्रयत्न शून्याने सुरू झाला. सर्वांनाच धडकी भरली हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. मर्यादित ओवरमधला किंग टेस्टमधे वेटिंवर. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे पहिल्याच सत्रात शतक ठोकत दिलासा दिला.

रोहित अजूनही अनसेटल

‘पण’ हा पण काही त्याची पाठ सोडणार नाही. त्यामागचं कारणही तसंच आहे. मुंबईचा रोहित शर्मा कधीही ओपनर नव्हता. त्याचं पदार्पण हे एक मधल्या फळीतला बॅट्समन म्हणून झालं. नंतर त्याला ओपनर करण्यात आलं. तो मर्यादित ओवरमधे चमकला. पण टेस्टमधे तो मधल्या फळातला बॅट्समन म्हणूनच ओळखला जातो. पण त्याची टेस्टमधली कारकीर्द काही वनडे आणि टी- २० सारखी अद्याप तरी फुललेली नाही.

रोहित युवराज सारखाच टेस्ट टीममधे आद्याप तरी जम बसवू शकला नाही. त्यातच त्याला टेस्टमधे तुटपूंजी संधी मिळत गेली. २०१३ ला पदार्पण करणाऱ्या रोहितने आतापर्यंत फक्त २७ टेस्ट सामने खेळलेत. त्यात त्याने ३ शतकं आणि १० अर्धशतकं केलीत. त्याची सरासरी जवळपास ४० ची आहे. असं असूनही तो टेस्टमधे अजूनम तरी अनसेटलच आहे. त्यातच संघव्यस्थापनाच्या अजब धोरणाने त्याला आपली हक्काची जागा गमवावी लागली.

हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

रोहितवर अन्याय कसा झाला?

भारतीय संघाच्या निवड समितीने मधल्या काळात संघात स्थान मिळवू पाहणाऱ्या युवा खेळाडूंना आयपीएलमधल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदा टी- २० संघात मग वनडे संघात त्यांनंतर कामगिरी पाहून टेस्ट संघात स्थान देण्यात येतं. भारतीय संघात आलेल्या जवळपास सगळ्याच बॉलर आणि बॅट्समन याच फॉर्म्युल्याने टेस्ट संघात आलेत. याला अपवाद ठरला तो फक्त रोहित शर्मा आणि हनुमा विहारी.

रोहितने वनडे, टी- २० मधे खोऱ्याने रन केलेत. पण टेस्टमधे म्हणावी तशी संधी मिळाली नाही. याला टीमची त्यावेळेची अष्टपैलू रणनीती तसंच निवड समितीची चुकलेली पॉलिसी या दोन्ही गोष्टींचा हातभार लागला. रोहितने ज्या-ज्या वेळी टेस्ट क्रिकेटचं दार ठोठावलं त्याला बेंचवरच बसावं लागलं. कारण टीम मॅनेजमेंचने एक बॅट्समन कमी खेळवून अष्टपैलू खेळाडू खेळवण्याची रणनीती अवलंबली. त्यामुळे त्याच्या जागी टीममधे हार्दिक पांड्या नाहीतर आर अश्निन, जडेजा खेळत राहिले.

हार्दिक जखमी होण्याने टीममधे आत बाहेर व्हायला लागल्यानंतर निवड समितीने पहिल्यांदा जयंत यादव आणि नंतर हनुमा विहारीला संधी दिली. दोघांनीही संधीचं सोनं केलं. आता हनुमा विहारीने मधल्या फळीतली आपली जागा पक्की केली. आता कामगिरी करुन जागा पक्की केल्यानंतर मग रोहितवर अन्याय कसा झाला? तर संधी देण्याबाबत जो शिरस्ता युवा खेळाडूंबाबत अवलंबण्यात आला त्याचा रोहितला संधी देताना विसर पडला. सध्याच्या घडीला वनडेत विराटनंतर भारताकडून सर्वाधिक शतकं रोहितच्या नावावर आहेत. मग टेस्टमधे त्याच्या आधी युवा खेळाडूंनी संधी कशी दिली?

हेही वाचा: अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

रोहितला कॅप्टन करा

या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर निवड समितीने रोहितचे पुर्नवसन करण्यासाठी त्याला सलामीला पाठवण्याची क्लुप्ती शोधून काढली. कारण गेल्या दोन वर्षापासून टेस्टमधे ना जुने ओपनर सेट झाले ना नव्या दमाचे ओपनर सेट झाले. त्यालाही ऑप्शन आहेत म्हणून सतत बदल करण्याची प्रवृत्ती कारणीभूत ठरली. बर त्यातही दुजाभाव केल्याचा संशय येण्यास वाव आहे. कारण मुरली विजयने दोन सिरीजच्या खराब कामगिरीमुळे संघातून डच्चू मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली.

आता वर्ल्डकपमधे सर्वाधिक रन, सर्वाधिक शतकं करणाऱ्या रोहितचा कद संघात वाढलाय0. भारताच्या पराभवाला विराटच्या काही स्ट्रॅटेजीही कारणीभूत असल्याच्या बातम्या आल्या. त्यातच विराट आणि रोहितमधे वाद, मतभेद आहेत असंही जाणवलं. काही माजी खेळाडूंनी विराटऐवजी रोहितला कॅप्टन करा अशी मागणीही केली.

हेही वाचा: अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

पृथ्वी शॉ संघात परतल्यानंतर?

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहितला टेस्ट क्रिकेटमधून डच्चू दिल्याने विराट टीम आणि निवड समिती चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता होती. पण, समितीने रोहितचं सलामीच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या टेस्टमधे विशाखापट्टणमच्या बाऊन्स नसलेल्या स्विंग न होणाऱ्या खेळपट्टीवर ओपनिंगला येत जवळपास पहिल्याच सत्रात शतक ठोकलं. या शतकाने विराटसह ड्रेसिंग रुम आनंदली असली तरी कॉमेंटरी बॉक्समधल्या एका तज्ज्ञाने हे टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले.

रोहितच्या ओपनिंगची खरी 'टेस्ट' लागणार ती परदेशात कारण भारताने गेल्या दोन वर्षात केलेल्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्याला सलामीची सर्व बेंच स्ट्रेंथ वापरावी लागली. भारताला या सलामीच्या क्रायसिसमधून सावरलं ते २० वर्षांच्या पृथ्वी शॉने. दुर्दैवाने त्याला पहिल्यांदा दुखापतीला सामोरं जावं लागलं. आणि त्यानंतर डोपिंग प्रकरणात ६ महिन्याच्या बंदीची शिक्षा भोगावी लागली.

शॉ परतल्यानंतर काय? हा प्रश्न आहेच कारण भारताचा दुसरा ओपनर मयांक अग्रवाल देशात आणि परदेशातही चांगली कामगिरी करतोय. हे दोघंही भारताच्या सलामीचे भविष्य आहेत. त्यांच्याकडे फारकाळ कानाडोळा करता येणार नाही. त्यामुळे रोहितचं हे पुर्नवसन तात्पुरतेच ठरण्याची शक्यता आहे. त्यावेळी निवड समिती त्याचा विचार मधल्या फळासाठी करणार की त्याला नारळ देणार?

हेही वाचा: 

नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?