एस.एम. जोशी : रचनात्मक संघर्षाचे प्रणेते

०१ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ८ मिनिटं


समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत.

भारतातल्या लोकशाही समाजवादी चळवळीला वैचारिक स्पष्टता आणि संघटनात्मक मजबूती देण्यासाठी सतत काम करत राहिलेले जे मोजके नेते आहेत त्यात साथी एस.एम. जोशी यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

१७ मे १९३४ ला भारतात काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. आचार्य नरेंद्र देव, युसूफ मेहेरअली, कमलादेवी चटोपाध्याय, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्यासोबत एस.एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांचाही त्यात पुढाकार होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या सगळ्या सभासदांचा सक्रीय सहभाग होता. एस.एम. जोशी यांच्याही सार्वजनिक कार्याची सुरवात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या सहभागानेच झाली. 

इमाम अलीच्या वेशात एसेम

सुरवातीच्या काळात युसूफ मेहेरअली यांच्यासोबत ‘युथ लीगमधे’ एसेम सक्रीय होते. हे तेच युसूफ मेहेरअली ज्यांनी १९४२ च्या लढ्याला ‘क्वीट इंडिया’ म्हणजेच ‘छोडो भारत’ हे नाव देण्याची सूचना महात्मा गांधींकडे केली. एस.एम. जोशींचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान अभिमानास्पद आहे. आंदोलनातल्या सहभागामुळे त्यांना जवळपास सात वर्षे ब्रिटीशांच्या तुरुंगात काढावी लागली. या सात वर्षांपैकी साधारण निम्मी वर्षे त्यांनी सक्तमजुरीची शिक्षा भोगलीय.

‘छोडो भारत’मधे सुरवातीची काही वर्ष ते भूमिगत राहून ब्रिटीश सरकारविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रभावी काम करत होते. आपण ओळखलं जाऊ नये म्हणून त्या काळात अनेक महिने ते इमाम अलीच्या वेशात फिरत होते. ‘या वेशात फिरल्याने मुस्लिम समाजाचा स्वतःकडे बघण्याचा आणि मुस्लिमेतर समाजघटकांचा मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजण्यास मला मदत झाली,’ असं एसेम यांनी नंतर नोंदवून ठेवलंय.

हेही वाचा : महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

‘राष्ट्र सेवा दला’चे पहिले दलप्रमुख 

तरुणाईला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्याची प्रेरणा मिळावी तसंच सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या बाबतीत तरुणाई सजग आणि सक्रीय व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख समाजवादी नेत्यांनी आपापसात विचारविनिमय करुन ‘राष्ट्र सेवा दल’ या समाजवादी युवक संघटनेची स्थापना केली. त्याच वेळी या संघटनेचं नेतृत्व एस.एम. जोशी यांनी करावं, असं सर्वांचं मत पडलं. एसेम ‘राष्ट्र सेवा दला’चे पहिले दलप्रमुख बनले.

एसेम यांनी सुरुवातीपासूनच ‘राष्ट्र सेवा दला’ला प्रभावी नेतृत्व दिलं. १९४१ मधे स्थापन झालेल्या ‘राष्ट्र सेवा दला’च्या सैनिकांनी बेचाळीसच्या ‘चले जाव’ आंदोलनात अतुलनीय सहभाग नोंदवला. अनेक ‘राष्ट्र सेवा दल’ सैनिक भूमिगत राहून ब्रिटीश प्रशासनाची झोप उडवणारी कामं करत होते. अनेकांना तुरुंगवास सहन करावा लागला. अनेकजण शहीद झाले. नंदुरबार इथला हुतात्मा शिरीषकुमार हा ‘राष्ट्र सेवा दला’चा सैनिक होता. 

पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘तुफान सेना’ स्थापन झाली होती. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी.डी बापू लाड, धोंडीराम माळी अशा अनेकांच्या सहभागातून तत्कालीन सातारा जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन करून ब्रिटीश प्रशासनाचा पाया खिळखिळा केला होता. राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरातल्या प्रशिक्षणानंतर आम्ही ‘तुफान सेना’ स्थापन केली, असं क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी म्हणायचे.

एसेम आणि सेवा दलाची प्रेरणा

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाला अपेक्षित नव्या भारताच्या निर्मीतीसाठी भारतीय जनमनाची मशागत करण्याचं काम एस.एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्र सेवा दल’ सैनिकांनी केलं.

सरकारची धोरणं सामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या हिताची असावीत यासाठी शांततामय मार्गानं जनमताचा दबाव निर्माण करणारे अनेक जनआंदोलक, ग्रामीण भागाच्या समृध्दीसाठी रचनात्मक काम उभं करणारे अनेक कार्यकर्ते, संविधानाला अपेक्षित जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी औपचारिक शिक्षणक्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते तसंच सामाजिक समतेच्या लढ्यात आघाडीवर असणारे अनेक साथी आजही आपल्या प्रेरणांचं श्रेय आदराने एस.एम. जोशी आणि ‘राष्ट्र सेवा दला’ला देतात.

हाती शिक्षणसंस्था, साखर कारखाना, मंत्रीपद असं काहीही नसताना एसेम यांना लाभलेली सर्वदूर मान्यता आणि आदर हे फक्त गरीब, कष्टकरी माणसांच्या वेदनेशी त्यांची जी नाळ जुळली होती त्यामुळेच. समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मुल्यांसाठी आयुष्यभर एसेम यांनी केलेला ध्येयवादी प्रवास समजून घेण्याजोगा आहे.

हेही वाचा : डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

एसेमना निवडुंगाच्या फडात फेकलं

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातला बहुचर्चित वाद आपल्याला माहीत आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करायला सुरवात केल्याबरोबर या चर्चा थांबल्या. कारण गांधीजींनी हे द्वैतच संपवून टाकलं. राजकीय स्वातंत्र्याची लढाई आणि सामाजिक समतेची लढाई साथोसाथच करायची असते हे गांधीजींनी वैशिष्टपूर्ण कार्यक्रमांच्या रचनेतून दाखवून दिलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्वातंत्र्य कुणाचं आणि कुणापासून स्वातंत्र्य असे प्रश्न तीव्रपणे विचारुन स्वातंत्र्यलढ्याची गाडी रुळावर आणण्यास मदत केली. एस.एम. जोशी आणि बाकीचे समाजवादी नेते स्वातंत्र्यलढ्यासाठी सतत कार्यरत होतेच.

पुण्यात त्या काळात पर्वतीचा सत्याग्रह गाजला होता. पर्वतीच्या टेकडीवरील मंदिरात शोषित जातीसमुहांच्या लोकांनाही प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या सत्याग्रहात एस.एम. जोशी आघाडीवर होते. या मागणीला पुण्यातल्या धर्मांध सनातन्यांचा विरोध होता. तो विरोध हिंसक होता. विरोधकांनी आंदोलकांची डोकी फोडली. एसेमना उचलून रस्त्याच्या बाजूच्या निवडुंगाच्या काटेरी फडामधे त्यांनी फेकून दिलं होतं. तरीही त्या लढ्यातल्या त्यांचा निर्धार कायम होता.

सामाजिक लढ्याची बांधिलकी

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. एस.एम. जोशी यांनी तात्काळ साने गुरुजींची भेट घेऊन असं तडकाफडकी उपोषण करण्याऐवजी महाराष्ट्रातल्या जनतेला सामाजिक समतेचा मुद्दा आधी समजावून सांगूया आणि मग तुम्ही उपोषण करणं ठीक राहील असं सुचवलं.

साने गुरुजींनी एसेमचं म्हणणं मान्य केलं. मग वर्षभर साने गुरुजी आणि ‘राष्ट्र सेवा दला’च्या कलापथकाने विठ्ठल मंदिर प्रवेशाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रव्यापी प्रबोधन दौरा केला. त्यानंतर झालेलं साने गुरुजींचं उपोषण आंदोलन यशस्वी झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना खुले झाले. सामाजिक समतेच्या लढ्यासोबत एसेम यांनी आयुष्यभर बांधिलकी जपली.

हेही वाचा : महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेते

मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य आपला हीरकमहोत्सव साजरा करतंय. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी जो दीर्घ संघर्ष करावा लागला त्या संघर्षातलं एसेम यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीत वेगवेगळ्या विचारांचे अनेक पक्ष सामिल होते.

या सर्वांची मोट बांधून महाराष्ट्राच्या नागरिकांच्या एकीची वज्रमुठ उभारण्याचं अवघड काम एसेमसारखे नैतिक दबदबा असलेले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं कसब असलेले, संवादी, समन्यायी व्यक्तीमत्वच करू शकतं होते. हे हेरुन समितीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी एसेम वरती येऊन पडली होती.  ही जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पेलली. ते करताना त्यांना सुरवात तर स्वपक्षाच्या दिल्लीतल्या नेतृत्वालाच समजावून सांगून करावी लागली. 

गुजराती भाषिक आणि मराठी भाषिकांचं एकत्रित असलेलं द्वैभाषिक राज्य तोडून मराठी भाषिकांसाठीचा मुंबईसहित महाराष्ट्र आपल्याला हवा होता. एस.एम. जोशी आणि सहकारी नेत्यांनी घेतलेल्या भूमिका आणि दिलेले कार्यक्रम यांचं हे वैशिष्ट होतं की मराठी भाषिकांना मुंबईसह महाराष्ट्र राज्य तर मिळालंच. पण आंदोलनाच्या काळात आणि नंतरही गुजराती भाषिकांबद्दलचा द्वेष किंवा अविश्वास इथं निर्माण झाला नाही.

समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्र समितीत एसेमच्या बरोबरीने इतर पक्षांचे अनेक दिग्गज नेते होते. त्या सर्वांच्या भरीव योगदानातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. ते बनण्यासाठी या सगळ्या नेत्यांना तितक्याच ताकदीने साथ दिली होती कामगारांनी, शेतकऱ्यांनी आणि चाकरमान्यांनी. जनतेच्या हितासाठी स्थानिक भाषेत राज्याचा कारभार चालावा, शेतकरी आणि कामगारांच्या घामाला न्याय देणारे निर्णय व्हावेत, फुले, शाहू, आंबेडकर यांनी दाखवलेल्या विवेकाच्या आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल व्हावी ही संयुक्त महाराष्ट्र समितीची भूमिका होती.

महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात एस.एम. जोशींना अभिवादन करताना वरच्या उद्दिष्टांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य आज नेमकं कुठं आहे याबद्दल फार मोठं आत्मपरीक्षण आपल्या सर्वांना करण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली जायची. आज आपली वाटचाल नेमकी उलट दिशेने दिसतेय. संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीच्या वेळची जनभावना पुन्हा एकदा आजच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे.

हेही वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

राजकारणातले संत

एस.एम. जोशी तत्कालीन समाजवादी पक्षात सातत्याने सक्रीय होते. त्यांनी पुण्याचं महापौरपद भुषवलं. तसंच पुणे लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्वही त्यांनी केलं. ते कधी निवडणुका जिंकले. तर कधी हरले. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी तत्त्वांशी तडजोड मात्र त्यांनी कधीही केली नाही.

आज निवडणुकीच्या राजकारणात कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची प्रवृत्ती वाढलीय. विचारांची बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह म्हणजे काय असतो हे तरुणाईला समजावून सांगावं लागेल इतकं आजूबाजूच्या राजकीय वातावरणात भ्रष्ट आचरण वाढलंय. एस.एम. जोशी म्हणजे पारदर्शी आणि स्वच्छ राजकारणाचे दीपस्तंभ होते. ते राजकारणातले संत होते. जय किंवा पराजय सारख्याच निर्विकारपणे स्वीकारणारे स्थितप्रज्ञ होते.

ध्येयवादी आणि पारदर्शी राजकारण

१९५२ च्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’सोबत तत्कालीन समाजवादी पक्षाची युती झाली होती. एसेम अण्णा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पण नेमकं पुणे मतदारसंघात ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

सामाजिक समतेच्या लढ्यात सतत सक्रीय असल्याने ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’चे कार्यकर्ते एस.एम. जोशी यांना आपला माणूस मानत होते. त्यांना एसेम अण्णांचा प्रचार करायचा होता. त्यावेळी एसेम अण्णांनी स्वतःच एका जाहीर सभेत शेड्युल्ड ‘कास्ट फेडरेशन’च्या कार्यकर्त्यांना सांगितलं, ‘तुमच्या पक्षाने ज्या उमेदवाराला पाठींबा दिलाय त्याचाच प्रचार करणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या निर्णयाला बांधील रहा.’

आज अनेकांना हे वागणं अनावश्यक आदर्शवादी किंवा भोळसट वाटेल. पण निवडणुकीच्या राजकारणातून आदर्शवाद हळूहळू संपत गेलेला असताना आणि ‘निवडून येण्यासाठी वाट्टेल ते’ अशा प्रकारचा नंगा स्वार्थ बोकाळलेला असताना आणि त्यामुळेच भारतीय लोकशाही आजच्या धोकादायक वळणावर आलेली असताना एस.एम. जोशींच्या ध्येयवादी आणि पारदर्शी राजकारणाची तीव्रतेने आठवण येणं स्वाभाविक आहे.

हेही वाचा : यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

जबाबदार कामगार नेते

एस.एम. जोशी नुसते यशस्वी नाहीत तर एक जबाबदार कामगार नेते होते. कामगारांना सोबत घेऊन किमान वेतन, नियमीत पगारवाढ, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, कामगारांच्या भविष्याबद्दलची तरतूद असे अनेक मुद्दे ते लावून धरायचे. पण त्याचबरोबर कामगारांनी व्यसनांपासून लांब रहावं, आपलं काम प्रामाणिकपणे करावं, उत्पादनवाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत, घरातल्या महिलांशी सन्मानाने आणि बरोबरीनं वागावं याबाबत ते कामगारांशी सतत संवाद करायचे.

भांड्यांच्या कारखान्यातल्या मजूरांपासून ते संरक्षण आणि दारुगोळा उत्पादन कारखान्यातल्या कामगारांपर्यंतच्या संघटना एसेम यांच्या नेतृत्वाखाली काम करायच्या. त्यांच्या नैतिक अधिकाराचा आणि कामगारांच्या एकजुटीचा उपयोग कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी व्हायचा.

रचनात्मक संघर्षाचे प्रणेते

रचनात्मक संघर्ष हा शब्द महाराष्ट्राच्या समाजजीवनाला एसेमनी दिला. समाजवादी कार्यकर्त्यांसाठी तुरुंग, फावडे आणि मतपेटी ही त्रिसुत्री राम मनोहर लोहिया यांनी दिली. त्याचाच एक वेगळा अविष्कार एसेमनी रचनात्मक संघर्ष या संकल्पनेतून सांगितला.

साने गुरुजींच्या दुःखद निधनानंतर त्यांना आदरांजली वाहताना एस.एम. जोशी यांनी ‘राष्ट्र सेवा दल’ सैनिकांना सेवा पथकाचा उपक्रम दिला. त्यानंतर अनेक वर्षे सेवा दल सैनिकांनी गावोगावी जाऊन, गावकऱ्यांना सोबत घेऊन श्रमदानानं तलावातला गाळ काढणं, मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता बनवणं, झाडांसाठी खड्डे खोदून वृक्षारोपण करणं अशी अनेक रचनात्मक कामं पूर्ण केली. 

महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतल्या तरुणाईने नंतर हाच कार्यक्रम स्वीकारला, आपला मानला. ‘राष्ट्र सेवा दला’पासून प्रेरणा घेतलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी संस्थात्मक उभारणी करुन अनेक गावात माथा ते पायथा या सुत्रानुसार पाणलोट क्षेत्र विकासाची आदर्श कामं उभी केली. आदिवासी समुहांसोबत काम केलं, शाळा चालवल्या, सहकारी संस्था उभ्या केल्या. हे सगळं कार्यकर्ते एस.एम. जोशी यांच्या रचनात्मक संघर्ष या संकल्पनेने प्रेरित झाले होते.

राष्ट्र सेवा दलाच्या एका शिबीरात कार्यकर्त्यांना उद्देशून एसेम म्हणाले होते, ‘मेणबत्तीच्या कणाप्रमाणे क्षणाक्षणाला झिजणारे जिवंत हुतात्मे मला हवे आहेत.’ आज भारतीय लोकशाहीसमोर, भारतीय संविधानासमोर अस्तित्वाचं संकट उभं असताना एसेमच्या रचनात्मक संघर्षाच्या पाऊलवाटेवर चालणाऱ्या अशा जिवंत हुतात्म्यांची गरज आधीपेक्षा अधिक तीव्र बनलीय. साथी एस.एम. जोशी यांना विनम्र अभिवादन!

हेही वाचा : 

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

 कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

अनिश महाजन : सगळ्यांसाठी आरोग्याचं स्वप्न पाहणारे टायगर वूड्सचे डॉक्टर

(लेखक पुण्यातल्या एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव आहेत.)