वो सुबह कभी तो आयेगी!

२५ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : १५ मिनिटं


शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत.

आओ की कोई ख्वाब बुने, कल के वास्ते
वर्ना यह रात, आज के संगीन दौर की
उस लेगी जानो-दिल को कुछ ऐसे, कि जानो-दिल
ता उम्र फिर न कोई हंसी ख्वाब बुन सके
जुल्फों के ख्वाब, होटों के ख्वाब और बदन के ख्वाब
मेराजे फन के ख्वाब, कमाले सुखन के ख्वाब
तहजीबे जिंदगी के ख्बाब, फरोगे-वतन के ख्वाब
ये ख्वाब ही तो अपनी जवानी के पास थे
ये ख्वाब ही तो अपने अमल की असास थे

एक दिवस सिनेमा दिग्दर्शक रमेश सहगल साहिरकडे आला, एका नव्या चित्रपटाच्या गीत लेखनाची ऑफर घेऊन. तो उत्साहानं म्हणाला, ‘मी महान रशियन लेखक फ्यादोर डोटोवस्कीच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’वर आधारित समाजवादाचं तत्त्वज्ञान सांगणारा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. त्यासाठी साहिरसाब, तुमची गीतं हवीत.’

साहिरनं यापूर्वी रमेश सहगलसाठी १९५५ मधे प्रदर्शित झालेल्या प्रयोगशील कलात्मक सिनेमा ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’साठी गीतं लिहिली होती, त्यामुळे त्याला रमेशच्या प्रतिभेची आणि उच्च दर्जाच्या साहित्यिक अभिरुचीची पूर्ण कल्पना होती.

साहिरने ताबडतोब होकार दिला. म्हणाला, ‘पण या चित्रपटाच्या संगीतासाठी तू कुणाला घेणार आहेस?’

‘सिनेमाच्या हिरोचं काम राजकपूर करणार आहे. त्याला मी साईन केलंय आणि तुम्ही जाणताच की, राजकपूर म्हटलं की संगीत शंकर-जयकिशन देणार हे उघड आहे.’ 

ते ऐकून साहिर काही क्षण विचार मग्न झाला. मग हलकेच म्हणाला, ‘शंकर-जयकिशन हे नो डाऊट चांगले संगीतकार आहेत, पण हा काही केवळ बॉक्स ऑफिस यशासाठी तू काढणार नाहीस सिनेमा. हो ना?’

‘होय, मला प्रगतीशील लेखक चळवळ आणि इप्टाच्या परंपरेतला पुरोगामी आशय आणि विषय असणारा सिनेमा काढायचाय. मी ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’साठी पण कोणती कलाहिन तडजोड केली नाही हे तुम्ही जाणता साहिरसाब.’

‘मग या चित्रपटासाठी ज्यानं कुणी ‘क्राईम अँड पनिशमेंट’ कादंबरी वाचली असेल आणि त्यातली मानसिक अपराधी भावना आणि अन्यायी समाज व्यवस्था समजून घेतली असेल, ती इंटरनलाईज केली असेल असाच संगीतकार तू घ्यावास असं वाटतं. कारण त्याविना सिनेमासाठी मी जी गीतं लिहिन, त्याला न्याय मिळणार नाही. मुख्य म्हणजे संगीताच्या कल्लोळात माझे शब्द हरवता कामा नयेत.

रमेश सहगल आता चांगलाच गंभीर झाला होता. त्याला साहिरचं मत पटत होतं. मुख्य म्हणजे त्याला या सिनेमासाठी साहिरच गीतकार म्हणून हवा होता. कारण त्याच्या गीतानं ‘प्यासा’ला केवढ्या कलात्मक उंचीवर नेऊन ठेवलं होतं. आणि त्याला या ‘क्राईम अँड पनिशमेंट’वर आधारित चित्रपटातून जो पुरोगामी आणि सर्वहारा वर्गाच्या उन्नतीचा विचार द्यायचा होता, त्यासाठी साहिरच त्याला हवा होता. पण तो म्हणतो ते खरं होतं. शंकर-जयकिशन मोठा वाद्यवृंद वापरत आणि ऑर्केस्ट्रेशनसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या चालीवर गीतं साहिर आता लिहिणार नव्हता, हे स्पष्ट होतं.

हेही वाचा : कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

‘प्यासा’चं यश हे सचिनदेव बर्मन यांच्या संगीताचं का साहिरच्या गीताचा हा वाद गाजला होता. साहिर ‘प्यासा’चं यश आपल्या हार्डहिटिंग शायरीचं मानत होता, ते सचिनदांना अर्थातच मान्य नव्हतं. त्यामुळे वाद विकोपाला जाऊन त्यांची अठरा चित्रपटांची अभेद्य आणि जमलेली लोकप्रिय जोडी फुटली होती.

साहिरनं असाच पंगा ओ. पी. नय्यरशी ‘नया दौर’च्या संदर्भात घेतला होता आणि बहुतेक या जोडीचा सध्या सेटवर गेलेला ‘सोने की चिडियाँ’ हा अखेरचा सिनेमा ठरणार हे दिसत होतं! साहिरला इजा म्हणजे बर्मन आणि बिजा म्हणजे नय्यर नंतर तिजा म्हणजे शंकर-जयकिशन वाद नको होता. मुख्य म्हणजे त्याचा अभिमान होता - गीतकाराचे शब्द हे संगीतकाराच्या चालीपेक्षा गीत लोकप्रिय होण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठी त्याला शंकर-जयकिशन नको होते.

‘ठीक आहे, मी विचार करतो. पण तुमच्या नजरेसमोर कुण्या दुसऱ्या संगीतकाराचं नाव आहे का?’

क्षणभर विचार करून साहिर म्हणाला, ‘खय्याम. त्याची साहित्यिक अभिरूची उत्तम आहे आणि तो लिहिलेल्या गीतांवर उत्तम चाली बांधतो. पुन्हा तो गीतात दडलेली आंतरिक लय नेमकी ओळखून धून बांधण्यात माहिर आहे.’

रमेश सहगल हा १९४४पासून हिंदी सिनेमात सहाय्यक अभिनेता, कथा-पटकथाकार, संवाद लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याला खय्यामची संगीतकार म्हणून कारकीर्द आणि क्षमता माहीत होती. खय्यामच्या पहिल्या सिनेमा ‘बीबी’मधील मोहमद रफीचं ‘अकेले मे वो घबराती तो होगी’ हे गाणं बरंच गाजलं होतं. पण १९५३ च्या ‘फूटपाथ’नं तो खर्याल अर्थानं नावारूपास आला होता. त्यातलं तलत महमूदचं ‘शामे गम की कसम’ हे गाणं अत्यंत हळुवार हृदयाला विद्ध करणारं होतं! त्यामुळे साहिरनं सुचवलेलं नाव योग्यच होतं!

साहिरला खय्यामनं एका वेगळ्याच कारणानं प्रभावित केलं होतं. ते म्हणजे त्यानं साहिरच्या ‘तलखियाँ’च्या प्रत्येक नज्मला शब्दांचे वजन पाहात साजेशी चाल दिली होती. हे खय्यामनं त्याला प्रथम भेटीतच सांगितलं. तो किस्सा पुढे खय्यामनं त्याच्या संगीतावर लिहिलेल्या ‘खय्याम : दि मॅन, हिज म्युझिक’ या पुस्तकात आणि त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत वर्णिला आहे. 

खय्याम हे तेव्हा शाहिद लतिफ निर्मित ‘लाला रू  ख’ या चित्रपटासाठी संगीत देत होते. आणि त्यासाठी कैफी आझमीनं गीतं लिहिलं होती. हा सिनेमा १९५८लाच रमेश सहगलच्या ‘फिर सुबह होगी’ सोबतच प्रदर्शित झाला आणि त्याचीही गाणी कमालीची गाजली. मधल्या काळात शाहिद लतिफ आणि साहिरमधे झालेलं मानापमानाचं नाट्य संपलं होतं आणि साहिर शाहिद लतिफ दिग्दर्शित करीत असलेल्या ‘सोने की चिडियाँ’साठी ओ. पी. नय्यरच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीत लिहित होता. 

खय्याम हा त्या दिवशी शाहिद लतिफकडे आला होता. आणि त्यांची म्युझिक सिटिंग चालू असताना तिथं गीतकार जानिसार अख्तर यांच्यासह साहिर शाहिदकडे काही कामासाठी आला होता. शाहिदनं खय्यामची दोघांना ओळख करून दिली.

खय्याम आणि साहिरची ती प्रथम भेट होती. पण खय्यामनं साहिरला प्रोग्रेसिव्ह रायटर्सच्या मीटिंगमधे आणि मुशायर्याभत नज्म-गझल पेश करताना पाहिलं-ऐकलं होतं. तोही पंजाबहून सिनेसृष्टीत नाव कमवायला आला होता. खय्यामनं नमस्कार वगैरे उपचार झाल्यावर म्हणलं,

‘साहिरसाब, मैने आपकी ‘तलखियाँ’ बडी शिद्ददसे पढी है, और शायद आप यकिन नही करेंगे, लेकिन ये सच है कि, मैने शौकिया दिली ख्वाइश से आपकी ‘तलखियाँ’ दिवान में शामिल हर नज्म-गझल की धून बनाई है...!’

साहिरला हा प्रचंड असा सुखद धक्का होता. कुणी संगीतकार आपल्या काव्याच्या प्रेमात पडून त्यातल्या नज्म-गझलांना चाली लावतो, ही कुणाही शायरसाठी आनंदाची गोष्ट होती. तरीही त्याचा क्षणभर विश्वा स बसला नाही. तो ‘अच्छा’ एवढंच म्हणून चूप राहिला. तेव्हा खय्यामच्या लक्षात आलं की, साहिरचा आपल्या बोलण्यावर विश्वाास बसलेला नाहीय. आणि बसणार तरी कसा? ते एकमेकांना प्रथमच भेटत होते.

खय्यामनं मग म्हणलं, ‘ठीक आहे. यदी आपके पास कुछ समय हो, तो मै आपकी एक नज्म को धुन के साथ अभी इसी वक्त पेश कर सकता हूं’
तेव्हा साहिरनं ‘हो’ म्हणलं आणि सिग्रेट ओढीत डोळे मिटून खय्यामची धून ऐकायला सज्ज झाला.

‘साहिरसाब, अभी आपको मैं ‘फनकार’ ये नज्म धून मे ढालकर सुनाना चाहता हूँ!’ आणि त्यानं हार्मोनियमवर बोटं फिरवली, त्यातून मधूर स्वर निघाले आणि बंद डोळ्यांनी बसलेल्या साहिरच्या कानावर त्याची नज्म मधूर चालीसह पडली,

‘मैने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे आज उन गीतों को बाजार में ले आया हूँ’

गीताच्या शब्दांवर योग्य ते आघात देत आणि त्यात भाव ओतत खय्यामनं तन्मयतेनं ‘फनकार’ ही नज्म पूर्ण म्हणाली, तेव्हा सिगरेटचं अर्धवट जळलेलं थोटक भिरकावत साहिर उठला आणि खय्यामला मिठी मारत म्हणाला, ‘वा, खय्यामसाब! आपने कमाल कर दी । लगता है की ‘फनकार’ मैने नही, आपने लिखी है, इस गहाराईसे आपने ये नज्म बडीही खूबसूरत ढंगसे पेश की। आपका बहोत बहोत शुक्रिया।‘

त्यामुळे खय्यामचं नाव साहिरला रमेश सहगलशी बोलताना सुचलं. दिग्दर्शक म्हणून त्याला रमेशची दिग्दर्शकीय प्रतिभा माहीत होती. कारण त्याच्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ हा सिनेमा म्हणजे एक कलात्मक प्रयोग होता. त्यानं साहिरच्या गीतांना पूर्ण न्याय दिला होता. त्यातलं ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा’ हे मदनमोहनच्या संगीतानं सजलेलं रफीचं गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं. साहिरनं इथं आपलं पुरोगामी  आशयाचं तत्त्वज्ञान असं मांडलं होतं,

‘सोने चांदी मे तुलना हो जहाँ दिलों का प्यार
आंसू भी बेकार वहाँ पर आहे भी बेकार
दुनिया के बाजार में आखिर चाहत भी व्यौपार बनी
मेरे दिल से उसके दिल तक चांदी की दिवार बनी
हम जैसों के भाग में लिखा चाहत का वरदान नही
जिसने हमको जनम दिया वो पत्थर है भगवान नही
बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा
लेकर दिल का इकतारा...’

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘नास्तिक’ या चित्रपटातल्या ‘देख तेरे इन्सान की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान’ या कवी प्रदीपच्या गीताचं फर्मास विडंबन केलं होतं. चित्रपटातली जी मूठभर माणसं पैशांच्या जोरावर इतरांची विपरीत परिस्थितीतही लूट करताना पाहून तो भगवान काही करत नाही, म्हणजेच भगवान कलीयुगात किती बदलला आहे, अशी कल्पना करीत साहिरनं शोषण आणि भ्रष्टाचारावर जळजळीत भाष्य केलं, ते फारच खुमासदार आहे,

‘देख तेरे भगवान की हालत क्या हो गयी इन्सान
कितना बदल गया भगवान !
भुकों के घर पे डेरा न डाले
सेठों के हो मेहमान
कितना बदल गया भगवान !
उन्ही की पूजा प्रभू को प्यारी
जिनके घर लक्ष्मी की सवारी
जिनका धंदा चोर बाजारी
उन्हीसे खुश है ब्रिजबिहारी
हम को दे भूक और बेकारी
इन को दे वरदान
कितना बदल गया भगवान !

म्हणून साहिरला रमेशच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’वर आधारीत निर्माण होणार्या  ‘फिर सुबह होगी’साठी खय्यामसारख्या गीतांना न्याय देणारा संगीतकार हवा होता. कारण त्याचा ठाम विश्वा स होता की, ‘प्यासा’ हा त्याच्या गीतांमुळे गाजला, न की सचिनदांच्या संगीतानं. तसंच पंजाबी ठेका असलेली उडत्या चालीची गाणी ओ. पी. नय्यरच्या ‘नया दौर’मधे असल्यामुळे ती हिट झाली, तरी त्यातील गीतांमुळे ती रसिकांच्या मनात बसली हे साहिरचं मत होतं. त्यामुळे त्याचे आणि ओपींचे खटके उडाले होते.

हेही वाचा : `मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`

बर्मनदा हे खऱ्या, अर्थाने बंगाली ‘भद्रलोक’ होते, तरीही त्यांना वाटायचं की गीतकार आणि गायकांपेक्षा संगीतकार मोठा असतो आणि त्याच्यामुळेच गाणी गाजतात. ओ. पी. नय्यरचं पण हेच मत होतं. त्यानं ‘नया दौर’ हिट होताच आपलं मानधन चक्क एक लाख रुपये केलं. म्हणून बी. आर. चोपडांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘साधना’साठी नव्या एन. दत्ताला घेतलं आणि साहिरला कायम ठेवलं!

१९५७ च्या दोन गाजलेल्या ‘प्यासा’ आणि ‘नया दौर’ चित्रपटाच्या श्रेयावरून वाद झाल्यामुळे बर्मन-नय्यर यांनी साहिरसोबत नंतर कधीही काम करायचं नाही, असं ठरवलं होतं.पण त्यांच्या या निर्णयाला धूप न घालता साहिरनं पण जणू कृतनिश्चहय केला होता की, मीही त्याच्याविना माझ्या गीतांच्या बळावर आणि माझ्या शब्दप्रतिभेवर सिनेमा गाजवून दाखवीन.

त्याला बी. आर. चोपडांच्या ‘साधना’द्वारे हे सिद्ध करून दाखवायचं होतं. पण त्याला आणखी एक सिनेमा आपल्या लेखणीची कमाल दाखवायला हवा होता. त्याला त्यासाठी ‘फिर सुबह होगी’ हा सिनेमा योग्य वाटत होता. एन. दत्ता आणि खय्याम या बर्मन-नय्यर यांच्या तुलनेत नवे आणि लोकप्रियतेत त्यांच्या पासंगासही पुरणार नाहीत, अशांना घेऊन हे दोन्ही सिनेमा गीतांनी लोकप्रिय बनवायचं जणू त्याचं स्वप्न होतं! 

‘प्यासा’चं यश हे निर्विवादपणे बर्मनदांपेक्षा साहिरचं होतं, असं जानिसार अख्तर, जे बर्मनदादांना फार मानायचे, त्याचंही हेच मत होतं!  पण ओ. पी. नय्यरची बात और होती. तो कमालीचा इगोइस्ट आणि हटवादी होता. ‘मोडेन पण वाकणार नाही’ आणि ‘खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी’ या म्हणी सार्थ व्हाव्यात असा त्याचा कर्मठ स्वभाव आणि अहंकाराचा पीळ होता. तेव्हा झाडून सारे संगीतकार लता मंगेशकरांच्या दैवी आवाजाच्या प्रेमात होते.

तिच्या आवाजानं सामान्य दर्जाचं गीतही लोकप्रिय होतात, अशी साऱ्यांची श्रद्धा होती. त्यामुळेच तिच्याविना मी यशस्वी संगीतकार होईन असं नय्यरनं मनानं घेतलं आणि आपल्या पूर्ण कारकिर्दीत त्यानं एकदाही लताकडून गीत गाऊन घेतलं नाही. त्या वेळी त्याचा मानी आणि हटवादी स्वभाव दर्शवणारं त्याचं एक वाक्य सिनेमा सृष्टीत प्रसिद्ध होतं,  'I have a king size ego. Nothing and no one can change that.'

‘नया दौर’ हा बी. आर. चोपडाचा आज क्लासिक गणला जाणारा १९५७ मधे ‘प्यासा’च्या जोडीनं प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. ‘माणूस विरुद्ध यंत्र’ हा एकविसाव्या शतकात उग्र बनलेला आणि हातातलं काम हिरावून घेणार्या. काळात या चित्रपटानं दिलेला संदेश आजही रिलिवंट आहे. तेव्हा १९५६ मधे भारतानं मोठ्या उद्योगांना आणि अवजड यंत्रांद्वारे गुणाकार पद्धतीनं वाढणार्यां उत्पादन वाढीला प्राधान्य देणारं औद्योगिक धोरण स्वीकारलं होतं, त्यामुळे अशिक्षित आणि अकुशल कामगारांच्या हाताचं काम कमी होण्याचा धोका जाणवू लागला होता. त्यावर भाष्य करणारा चोपडाचा हा सिनेमा होता. 

मानवी श्रम विरुद्ध मशिनचा वापर यामधे कोणता मार्ग स्वीकारावा या प्रश्नावची उकल करताना चोपडांनी एक अत्यंत रंजक कथा सिद्ध केली होती, त्यात प्रेम होतं, नृत्य-संगीत आणि विनोदाचा सढळ वापर होता. तरीही कथेचा आशय कुठेच पातळ होणार नाही, याची त्याने काळजी घेतली होती. चित्रपटाच्या सुरुवातीला एका फ्रेममधे महात्मा गांधीचं एक वचन येतं, ती या चित्रपटाची प्रेरणा होती, असं बी. आर. चोपडाने म्हणलं आहे. ते गांधींचं वचन पुढील प्रमाणे आहे.

आपण सारे त्या दैवी झाडाची पाने आहोत, ज्याचा बुंधा झाडाची भूगर्भात खोलवर पसरलेली मुळे हलवू शकत नाही. इथे मानवी श्रमाला बाद करणार्याा कोणत्याही यंत्रांला स्थान नको, जे मूठभरांच्या हाती उत्पादन सत्ता केंद्रित करेल. श्रमाला संस्कृती मानवी जीवनात अनोखे स्थान आहे. म्हणून मृत यंत्रांशी गावकर्यांबच्या रूपात भारतातील सात लाख खेड्यात राहणार्यां जिवंत यंत्रांना स्पर्धा करायला लावू नका. सध्याचा यंत्राचा वापर हा मूठभरांच्या हाती अधिकाधिक संपत्ती गोळा होण्यासाठी होत आहे.

साहिरला ‘नया दौर’ची कथा-कल्पना आवडली, त्यामुळे त्यानं या चित्रपटासाठी समाजवादाचा संदेश देणारं एक गीत लिहिलं, ते सदाबहार तर आहेच, पण अर्थपूर्ण आणि आजही प्रासंगिक असं आहे,

‘साथी हाथ बढाना
एक अकेला थक जायेगा
मिलकर बोझ उठाना’

महात्मा गांधी विचारांचा मागोवा घेत या गीतात साहिर श्रमाचं महत्त्व याप्रमाणे सोप्या आणि थेट भाषेत मांडतो,

‘मेहनत अपने लेख की रेखा
मेहनत से क्या डरना?
कल गैरों की खातीर की
आज अपनी खातीर करना
अपना दु:ख भी एक है साथी
अपना सुख भी एक
अपनी मंझिल सच की मंझिल
अपना रस्ता नेक
साथी हाथ बढाना...’

किती सरळ सोप्या शब्दांत साहिर समता, एकता आणि श्रमप्रतिष्ठेचे आणि नेकीनं जगण्याचं तत्त्वज्ञान कथन करतो. त्यामुळे त्याचा प्रश्नत रास्त आहे की, इथे महत्त्व चालीला आहे की गीताला? माझं उत्तर साहिरच्या बाजूनं आहे.

‘नया दौर’मधे साहिर स्टँप असलेली आणखी दोन गीतं आहेत. त्यातलं पहिलं आहे,

‘बिन मांगे ही मिलती है यहां मन की मुरादे
दिल साफ हो जिसका वो यहां आ के सदा दे
मिलना है जहां न्याय वो दरबार यही है
संसार की सबसे बडी सरकार यही है
आना है तो आ राह में कुछ देर नही है
भगवान के घर देर है अंधेर नही हैं’

नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारत देशाचं वर्णन अनेक गीतकारांनी आपापल्या परीनं केलं आहे, पण ‘नया दौर’मधे देश म्हणजे तिथली रसरशीत जिवंत माणसं, त्यांच्या मानवी भावना, सभोवतालचा निसर्ग आणि दिलदारी, बहादुरी आणि नेकी या उदात्त भावनांनी सिद्ध झालेली संस्कृती अशी कल्पना करून साहिरनं एक प्रकारे राष्ट्रगान रचलं आहे, ‘ये देश हैं वीर जवानों का...’ त्यात साहिर किती वेगळ्या नजरेनं देशाकडे पाहात तिची पूजा बांधतो,

‘यहां चौडी छाती वीरों की, यहां गोरी शकले हीरों की
यहां गाते है रांझे मस्ती में, मचती है धुमे बस्ती में
कही दंगल शोख जवानों के, कही करतब तीर कमानों के
दिलवर के लिए दिलदार है हम
दुश्मन के लिए तलवार है हम
मैदां में अगर डट जाए, मुश्किल है किसीसे हट जाए
ये देश वीर जवानों का
अलबेलों का, मस्तानों का
इस देश का यारो क्या कहना?
ये देश है दुनिया का गहना !’

बी. आर. चोप्राच्या सिनेमा म्हणजे सामाजिक प्रश्नांवर आधारीत कथानक आणि संदेश-प्रबोधन. पण तो प्रेम, नृत्य-गीतांच्या रंजक पाकात मधुरपणे तळलेला... त्यामुळे ‘माणूस विरुद्ध मशिन’ संघर्षाची कहाणी त्यांनी प्रेमकथेद्वारे रंजकतेनं मांडली. त्यामुळे साहिरला काही मन मोहरून टाकणारी प्रेमगीतं पण लिहायला मिळाली.

हेही वाचा : जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

प्रेम आणि छेडछाडीत प्रियकर प्रेयसीच्या रूपाचं गुणगान करतो, पण इथे साहिरची नायिका प्रियकराच्या रूपाचं जे बिनधास्त आणि खट्याळपणे वर्णन करते, ते हिंदी सिनेमासाठी त्या वेळी एकदम नवं होतं! ती त्याच्या वार्या्वर उडणार्यान केसामुळे कुंवार मुलींची मनं उचंबळून येतात असं म्हणते. त्याला ‘यार’ संबोधते.

‘उडे जब जब जुल्फें तेरी
कंवारीयों का दिल मचले जिंद मेरीये
हो उस गांव पे सवार कभी सजके
के जहां मेरा यार बसता...’

पण या चित्रपटातलं सर्वाधिक लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे ‘मांग के साथ तुम्हारा’. हे घोड्याच्या टापावरचं उडतं प्रसन्न गीत आहे. त्यात सहजीवनाचं जे आदर्श चित्र साहिरनं संसार न करताही रेखाटलं आहे, ते प्रत्येक जोडण्याचं स्वप्न असतं. असावं.

‘मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार
दिल कहे दिलदार मिला, हम कहे हमे प्यार मिला
प्यार मिला, हमे यार मिला, इक नया संसार मिला
आंस मिली, अरमान मिला, जीने का सामान मिला
मिल गया, एक सहारा
दिल जवां और रूत हंसी, चल यू ही चल दे कही
तूं चाहे ले चल कही, तुझ मे है मुझको यकीं
जान भी तूं है, दिल भी तू है
राह भी तूं, मंझिल भी तूं है
और तुही आस का तारा...
मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार !’

ओ. पी. नय्यरची पंजाबी ढंगामधे लयदार संगीतानं नटलेली धून-चाल बांधण्याची एक विशिष्ट शैली आहे, त्यामुळे तो नि:संशय लोकप्रिय संगीतकार होता. पण ‘नया दौर’ नंतरची तशीच किती ठेकेदार गाणी रसिकांच्या किती लक्षात आहेत? कारण तिथे साहिर गीतकार नव्हता, तर त्याच्या चालीत शब्द बसवणारे गीतकार होते. त्यामुळे ती गीते एक-दोनदा ऐकल्यावर शिळी होतात, पण ‘नया दौर’ची गाणी आजही तरुण पिढीस पण आकर्षित करतात. कारण या गीतात प्रभावी भावभावनांचा आविष्कार आहे, म्हणून ती चालीच्या लयीवर शब्दातील भाव सौंदर्यानं रसिकांच्या मनात घर करून राहतात. 

आज ए. आर. रहेमान या प्रतिभावंत संगीतकाराला पण चांगले गीतकार मिळत नसल्यामुळे गीत कानात रुंजी घालतात, पण मनात उतरत नाहीत. चाल कितीही चांगली असली तरी ‘टेलिफोन बुथ में रहनेवाली’ कितीदा माणूस गुणगुणेल?

जसं जानिसार अख्तरनी ‘प्यासा’च्या यशाचं माप बर्मनदादांपेक्षा साहिरच्या पदरात टाकलं, तसंच बी. आर. चोप्राने ‘नया दौर’च्या संगीतमय यशाचं कारण नय्यरच्या संगीतापेक्षा साहिरच्या गीतांना आहे, असं मानलं. पुढे त्यांनी साहिरची तो हयात असेपर्यंत कधी साथ सोडली नाही.

ते संगीतकार बदलत राहिले, पण गीतकार साहिरच असायचा. म्हणून साहिरला ‘फिर सुबह होगी’साठी त्याच्या गीतांना न्याय देणारा संगीतकार म्हणून खय्याम हवा होता. ते रमेश सहगलला पटलं होतं, पण राजकुमार हा तेव्हाचा सुपरस्टार आणि ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘बरसात’ आणि ‘अंदाज’मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर होता आणि त्यानं ‘बरसात’पासून केवळ शंकर-जयकिशन, शैलेंद्र-हसरत जयपुरीसोबतच प्रामुख्याने काम करायचं ठरवलं होतं.

त्याला शंकर जयकिशनऐवजी खय्यामला चालवून घे, असं कसं सांगायचं हा प्रश्न् पडला. तेव्हा साहिरच्या या चित्रपटासाठी लिहिलेल्या गीतांना चाली लावून खय्याम-राजकपूरची भेट घडवून आणावी आणि त्याला चालीसह गीतं ऐकवावीत असा प्लॅन सहगल आणि खय्यामनं केला. आणि वेळ आणि दिवस ठरवून राजकपूरला त्याच्या आर. के. स्टुडिओत भेटायला रमेश सहगल खय्याम आणि साहिरला घेऊन गेला.

जेव्हा रमेशनं राजला ‘फिर सुबह होगी’साठी खय्यामला मी संगीतकार म्हणून घेणार आहे, असं सांगितलं, तेव्हा राजकपूरच्या चेहर्याठवर नाराजीच्या आठ्या पसरल्या. त्याला वाटलं होतं, रमेश शंकर-जयकिशनला संगीतासाठी करारबद्ध करेल.पण दिलीपकुमार अभिनित ‘फुटपाथ’चं खय्यामचं संगीत राजला आवडलं होतं. तसंच त्यानं निर्मित केलेल्या  आणि १९५६मधे प्रदर्शित झालेल्या ‘जागते रहो’साठी संगीतकार म्हणून दिग्दर्शक शंभू मित्राच्या आग्रहानं सलील चौधरीला निवडलं होतं. 

मग आता प्रतिभावंत दिग्दर्शक रमेश सहगल खय्यामला ‘फिर सुबह होगी’साठी घेणार असेल, तर विरोध कसा करायचा? पुन्हा या चित्रपटाचा गीतकार साहिर होता. राजकपूरला ‘प्यासा’ची गीतं विलक्षण आवडली होती. त्याची नायिका नर्गिसनं तर चक्क ‘प्यासा’च्या गीतांची तारीफ करणारा एक लेख लिहिला होता. त्यामुळे साहिरमुळे खय्यामला घेणार असशील तर गीतकारासह संगीतकारही बदल, हे सांगायचं धाडस राजकपूरला झालं नाही.

त्यामुळे त्यानं विषय बदलत त्याच्या खोलीतील नीट लावून ठेवलेल्या तानपुऱ्याकडे बोट दाखवत म्हणलं, ‘खय्यामसाब, जानते हो, ये तानपुरा मुझे लता मंगेशकरजीने तोहफे के रूप में दिया हैं।’ खय्यामला त्याचा इशारा कळला. तो म्हणाला, ‘राजसाब, ये तानपुरा बजाकर मैं धून सुनाऊ तो चलेगा?’

आपल्या सिनेमासाठी राज स्वत: म्युझिक सिटींगला बसून चाली निवडतात, हे सिनेमा सृष्टीतलं उघड गुपीत होतं. हे खय्यामला चांगलं माहीत होतं. राजला संगीताचा चांगला कान आहे, हे पण सर्वश्रुत होतं. त्यानं निवडलेली धून हिट होतेच होते, असं त्या काळी म्हणलं जायचं. अगदी ‘जागते रहो’ची वेगळी गीतंही हिट झाली होती. त्यामुळे खय्यामला पूर्ण आत्मविश्वाउस वाटत होता की, त्याच्या चाली राज नक्कीच पसंत करेल. त्यासाठी त्यानं साहिरनं लिहिलेल्या गीतांना चाली लावून राजकपूरकडे पूर्ण तयारीनिशी आला होता. 

राजनं संमती देताच गवसणी काढून तानपुर्याूच्या तारा छेडत खय्यामनं साहिरच्या एका गीताला लावलेली एक धून ऐकवली. राज तन्मयतेनं ऐकत होता. धून गाऊन संपली, तरी राज कसलीस प्रतिक्रिया न देता शांत स्तब्ध होता. खय्यामला वाटलं, राजला ही चाल पसंत पडली नाही की काय? 

तो म्हणाला ‘इस गीत की और पाच अलग अलग किस्म की धूने मैंने बनाई है, वो भी सुनो!’ आणि खय्यामनं एका मागोमाग आणखी पाच चाली तानपुरा छेडत राजला स्वत:च्या आवाजात ऐकवल्या. पण त्या अर्ध्या तासात राज अगदी शांत-स्तब्ध होता. खय्यामनं मग तानपुर्यावला गवसणी चढवून तो आधी जिथं होतं तिथं ठेवला.

राज कपूरनं उठत रमेश सहगलला बाहेर चलण्याचा इशारा केला. रमेश त्याच्यासोबत बाहेर निघून गेला आणि खय्याम आणि साहिर त्यांची प्रतिक्षा करत राहिले.

राज आणि रमेश तब्बल अर्ध्या तासानी परत आले आणि आल्या आल्या राजनं खय्यामचे खांदे धरून त्याला उठवलं आणि मिठी मारत म्हणलं, ‘वा खय्यामसाब, आपने तो कमाल कर दी. इस गीत की हर धून बेमिसाल है। उसमे से कौनसी चुनू ये बडा पेचिदा सवाल है। मैं आपपे छोडतो हूँ, आपको जो सबसे अच्छी लगती है, वो आप फिल्म में इस्तेमाल करो’ आणि मग तो साहिरचे हात चुंबित म्हणाला, ‘आपके बारे में क्या कहूँ? ये गीत तो मास्टरपीस साबीत होगा फिल्म रिलिज होने के बाद.’

राज कपूर त्याचे वडील पृथ्वीराज कपूर आणि त्याचा गीतकार शैलेंद्रमुळे ‘इप्टा’ जोडला गेला होता. मुख्य म्हणजे त्यानंही ‘आवारा’, ‘श्री 420’द्वारे ख्वाजा अहमद अब्बासच्या पटकथेच्या साह्याने समाजवादाचा रंजक पद्धतीनं संदेश दिला होता. तो पंडित नेहरूंच्या समताधिष्ठित समाजवादी विचारांचा पुरस्कर्ता होता. त्याचा एक संदर्भ सुनील भट्ट यांनी ‘साहिर लुधियानवी - मेरे गीत तुम्हारे’ या पुस्तकात दिला आहे, तो खालीलप्रमाणे आहे -

‘नेहरूजी की मृत्यू से दो माह पहले लिखे एक लेख में राज कपूर कहते हैं, ‘दरअसल पचास के दशक में पूरी फिल्म इंडस्ट्री ने जैसा नेहरूजी से एक घनिष्ठ रिश्ता कायम कर लिया था... पंडितजी का सिनेमा के प्रति बड़ा आदर्शवादी दृष्टिकोन था । वो समाजवादी थे और मानते थे कि सिनेमा का माध्यम ऐसा माध्यम है, जो राष्ट्र की समस्या के समाजवादी ढंग से समाधान का रास्ता सुझा सकता है... वस्तुत: उनके आदर्शों का मुझ पर इतना गहरा प्रभाव था कि उनके आदर्श मेरी फिल्मों में प्रतिबिंबित होने लगे।

यद्यपि मेरी अधिकांश फिल्मों का ताना-बाना भारतीय था, लेकिन उनमें से अधिकांश में, और खासकर उन फिल्मों में, जो मैंने अपने कैरियर के मध्य-चरण में बनाई, नेहरू प्रणित समाजवाद की छाप थी । पचास के दशक में नेहरू आर्थिक दिक्कतों के अलावा जातिगत कु-रितियों आणि सांप्रदायिक विद्वेष के खिलाफ भी लड़ रहे थे । फिल्म जगत उनके इस संघर्ष में उनका साथी था।'

हेही वाचा : देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो

वे एक गरीब आणि अशिक्षित मुल्क में जागरुकता फैलाने का काम कर रहे थे, चेतना जगा रहे थे । फिल्म उद्योग में हल्के लोग तब भी थे, आज भी हैं, पर ये चंद जिम्मेदार गीतकार, निर्देशक, प्रोड्युसर थे, जिन्होंने अपनी नैतिक जिम्मेदारी समझा और इस किस्म की फिल्में आणि गीत बनाए । ये लोग संस्कार करने वाली पिढ़ी थी, जो बॉक्स ऑफिस और मुल्क दोनों के अपनी जिम्मेदारियां निभाने की हिम्मत आणि हुनर रखती थी ।’

साहिरवरही नेहरूंच्या समाजवादी विचारांचा आणि नवनिर्माण कामाचा प्रभाव होता. मोठी धरणे बांधून शेतीला पाणी देणं आणि शेतकर्यां चं उत्पन्न वाढवणं; ग्रामीण रस्ते बनवणं, हे समाजवादी वळणाचं काम प्रगतीशील लेखकांना पसंत होतं. जरी स्वातंत्र्योत्तर काळात बेरोजगारी वाढत असल्यामुळे आणि गरीबी कमी होत नसल्यामुळे साहिरसह अनेक प्रगतीशील कलावंतांचा मोहभंग व्हायला प्रारंभ झाला होता.

नेहरूंखेरीज तेव्हा देशाला पर्याय नव्हता. आणि काही आक्षेप असले तरी नेहरूंच्या समाजवादी विचारधारेच्या निष्ठेबद्दल त्यांना शंका नव्हती. त्यामुळे साहिरनं किमान दोनेक गीतात नेहरूंच्या नवनिर्माणाच्या कामाचा संबंध गरिबांच्या खुशहालीशी जोडला आहे. त्याबाबत सुनील भट्टनी त्याच्या पुस्तकात असं लिहिलं आहे –

‘फिल्मों ने नेहरू के बांध आणि नहरों के काम को काफी रोमँटिक किया । सड़कों, नहरों, मिलों के बनने पर कई गीत लिखे गये । ख्वाजा अहमद अब्बास की चार दिल चार राहें (१९५९) में नई सड़क बनने पर साहिर ने लिखा –

‘ये रास्ता सुनहरी मंज़िलों को जाएगा
ये रास्ता खुशी की बस्तियां बसाएगा
बिछुड़ गए थे जो उन्हें करीब लाएगा
ये रास्ता वो है जो दिल से दिल मिलाएगा
कि अब तमाम फासले मिटा रहे हैं हम ।’

बी. आर. चोप्रा की फिल्म आदमी और इन्सान १९६९ में इसी तरह के एक गीत में

साहिर कहते हैं –

‘बहता चलेगा मीलों नहरों का पानी
झुमेगी खेती जैसे झूमे जवानी
चमकेगा देश हमारा मेरे साथी रे
आंखों में कल का नज़ारा मेरे साथी रे
नवयुग का वरदान ज़माना देखेगा ।’

जे गीत ऐकून राज कपूर साहिरला ‘ते मास्टरपीस आहे’ असं म्हणाला होता आणि ज्याच्या सहाच्या सहा चाली राजला पसंत पडल्या होत्या, ते गीत साहिरचं आयकॉनिक गीत आहे, 

‘वो सुबह कभी तो आयेगी’
‘इन काली सदियों के सरसे
जब रात का आंचल ढलकेगा
जब दुख के बादल पिघलेंगे
जब सुख का सागर छलकेगा
जब अंबर झूम के नाचेगा
जब धरती नगमें गायेगी
वो सुबह कभी तो आयेगी...!’

हेही वाचा : 

इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण