२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
मित्रहो,
सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानानं आयोजित केलेल्या या अखिल भारतीय सह्याद्री कविता महोत्सवाचं अध्यक्षपद देऊन तुम्ही माझा सन्मान केलाय. हे मला विशेष मोलाचं वाटतं. मला याचं विशेष मोल यामुळेसुद्धा आहे की या महोत्सवाचे आयोजक, कर्तेधर्ते हे मराठवाड्यातले आहेत. हा महोत्सव गेल्या दोन दशकांपासून त्यांनी अतिशय नेटानं, आत्मीयतेनं चालवलेला उपक्रम आहे आणि तो औरंगाबादेत होत आलाय. त्यामुळे मी कवी पी. विठ्ठल, कैलाश अंभुरे, रमेश रावळकर आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार मानतो.
ज्या गावात मी जन्मलो, वाढलो आणि जिथं कवितेची ओळख झाली त्या गावातल्या कविताप्रेमी मित्रांनी आयोजित केलेल्या महोत्सवात सहभागी होणं म्हणूनही माझ्यासाठी विशेष आनंदाचं आहे. गेलं जवळ जवळ वर्षभर आपण जगातल्या सगळ्या नागरीकांनी ज्याप्रकारचं नवस्वाभावीक किंवा न्यू नॉर्मल जगणं स्वीकारलेलं आहे, त्याला अनुसरूनच हा महोत्सवही आभासी प्रकारे इंटरनेटच्या कृपेनं संपन्न होणार आहे. अर्थात त्यामुळे आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटून अनौपचारिक संवादातून जे हाती आलं असतं, त्याला आपण मुकणार आहोत.
तीस वर्षांपूर्वी नोकरीनिमित्तानं मी औरंगाबाद सोडलं. हेही एक विस्थापनच. पण आपली नाळ जिथं पुरलेली असते ते ठिकाण आपण कुठेही गेलो तरी आपल्यासोबतच चालत आलेलं असतं. त्यामुळे आयुष्यातल्या पहिल्या पायाभरणी करणाऱ्या अडीच दशकांनी मला या गावाच्या इतिहासाबद्दल, त्यानं पुरवलेल्या जीवरसाबद्दल, गाठीला बांधल्या गेलेल्या अनुभवांबद्दल माझ्या कुतूहलासाठी आणि माझ्या कवितेसाठी भरभरून दिलंय.
त्यामुळे आज मी प्रामुख्यानं कवितेविषयी बोलणं अपेक्षित असलं तरी मी थोडं या माझ्या गावाविषयीसुद्धा बोलणार आहे आणि ते यासाठी की हा अवकाश आणि गेली साडेतीन दशकं मी कविता लिहित असलेला काळ या दोन अक्षांवरूनच आपल्याला कवितेची कळ सापडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं
शाळेत असतानाच कविताच लिहीन असं मी ठरवलेलं होतं. त्या शालेय वयातच माझं पहिलं लेखन ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकात प्रकाशित झालं. रझाकारीत रातोरात विस्थापित होऊन शहरात आलेलं आमचं कुटुंब होतं. शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून जी पहिली पिढी शिकली त्यातला मीही होतो. त्यात विशेष असं काही नाही, कारण आमच्या पिढीत तर असं खूपच होतं. पण योगायोग इतकं चांगलं होतं की वाचनाचा नाद लागल्यानं जुन्या पुस्तकांची दुकानं धुंडाळण्याची सवय लागली होती.
औरंगपुऱ्यात विद्या बुक्ससमोर असं एक लहान दुकान होतं आणि एक शहागंजात स्टेट टॉकीजजवळ होतं. तर एकदा पुस्तकं शोधतांना एक जुनाट पुस्तक सापडलं. ‘अर्वाचीन मराठी काव्याचे विहंगम दर्शन’ असं काहीतरी ते नाव होतं. त्या पुस्तकाची सुरूवातीची पानं फाटलेली होती. पण एके ठिकाणी त्यावर ‘नांदापूरकर’ अशी सही होती. हे मी पाठ्यपुस्तकात वाचलेलं नाव होतं.
मी ते पुस्तक गोष्ट वाचावी तसं वाचत गेलो आणि त्या वयातल्या समजुतीनुसार लक्षात आलं की त्यात संतकाव्याचे उल्लेख केल्यानंतर मराठी कवितेची १८८५ सालापासून लिहिलेली एकप्रकारे गोष्टच आहे. पुस्तकाच्या अखेरीला कुठेतरी नवकवी म्हणून जी काही नावं होती, त्यात पु. शि. रेगे, आणि विंदा करंदीकर यांची नावं होती. ही गोष्ट वाचतांना मला केवळ विहंगम दर्शनच झालं नाही, तर स्वतःपुरता गुप्तपणे मी गपकन गंभीरच झालो.
मी कविता लिहिणार असेन तर ही गेल्या हजार वर्षांची ओळ आपल्याला नीटपणे कधी ना कधी वाचावी लागणार हे माझं मलाच लक्षात आलं होतं. मी काही भाषा आणि साहित्याचा विद्यार्थी कधी होऊ शकलो नाही, पण त्या पुस्तकांतल्या जीर्ण पडलेल्या पानांनी मला पुन्हा पुन्हा वाटेवर आणलं.
नांदापूरकरांनी तर पुढेही पिच्छा पुरवला. कारण नंतर त्यांनी मराठवाड्यातील स्त्रीगीतांचे जे तीन खंड केले, किंवा बोलींचा लिहिलेला इतिहास वाचला तेव्हा कवी असलेला हा माणूस संशोधक आहे, उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि जिब्रानसारख्याचं साहित्य मराठीत आणणारा भाषांतरकर्ताही आहे हे पाहून विस्मित होत गेलो होतो.
हेही वाचा : एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा
माझ्या शालेय विद्यार्थीजीवनात आणखी एक चांगला योगायोग म्हणजे मला बाबा भांड आणि आशाताई भांड हे शिक्षक म्हणून लाभले. भांड सरांनी मला वाचनासाठी आणि लेखनासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळेच वाचनाच्या वाटेची एक शिस्त मला लागू शकली. ते वळण लावण्याचं सगळं श्रेय भांड सरांचं आहे. त्यांच्या संग्रहातल्या पुस्तकांनी आणि त्यांच्या प्रोत्साहनानं मला मराठी मराठी साहित्यजगताची ओळख झाली. योग्य वेळी योग्य मार्गदर्शक तुम्हाला हवा असतो. तसा मला तो गुरुवर्य भांडसरांमुळे मिळाला.
आपण जिथं जन्मलो आणि वाढत आहोत त्या ठिकाणावर उमटून गेलेल्या मुद्रा ही गोष्ट विस्मय आणि अभिमान वाटायला लावणारी होती. या प्रदेशात गाथासत्तसई लिहिली गेली. ज्ञानेश्वर, एकनाथ, जनाबाई, बहेणाबाई, चक्रधरांचा स्पर्श या भूमीला झालाय. युवा चळवळी इथं झाल्या. आंबेडकरांचं वास्तव्य इथं घडलेलं आहे. आता अलीकडे पुन्हा रा. भि. जोशी यांची औरंगाबादची रोजनिशी वाचतांना तत्कालीन छावणी, मिलिंद परिसर आणि शहागंजचे उल्लेख वाचणं सुखावणारं होतं.
मराठवाडा हा विविध संप्रदायांचा समन्वय झालेला प्रदेश. महानुभाव, वारकऱ्यांचा भक्तिसंप्रदाय, सुफी संप्रदाय, वैष्णव, जैन आणि बौद्धही तिथं नांदलेत. इतिहासानं या भूमीला अनेक भाषा, धर्म, पंथ आणि विविध दर्शनांचं एकजीवीकरण करण्यासाठी निवडलं होतं. हा या सगळ्या गोष्टींचा मेल्टिंग पॉट होता.
संत एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामीं हे शेख महंमदाचे गुरुबंधू होते. हे सूफी संत चांद बोधले यांचे शिष्य होते. सूफी दर्शनाचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणार. एकनाथांनी धर्मातल्या कर्मकांड, विषमता यावर कोरडे ओढलेत. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या नावाचं जे स्फुट लिहिलंय, त्यात ते अखेरीला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं सूत्रच सांगतात.
“ऐक्यवाक्य विवाद । विवादीं जाहला अनुवाद ।
एका जनार्दनीं निजबोध । परमानंद दोहींसी ॥”
असं म्हणून ते कबीरवाणीशी आपलं नातं सांगतात.
बीड जिल्ह्यातल्या धारूर इथं जन्मलेले शेख महंमद मराठी संतकाव्यपरंपरेतले महत्त्वाचे कवी. त्यांच्या वडलांचे म्हणजे राज महंमदांचे शिष्य म्हणजे हिंदू साधू चांद बोधले. त्यांचं मूळ नाव चंद्रभट बोधले असं होतं. त्यांनी सूफी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. दौलताबादच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे. शेख महंमद यांचे शिष्य. त्यांचा आणखी एक शिष्य होता जनार्दनस्वामी. संत एकनाथांचे गुरु म्हणजे हेच ते जनार्दन स्वामी. म्हणजे संत एकनाथांचे गुरु आणि शेख महंमद हे गुरुबंधू होते.
ही परंपरा पुढे १६४८ साली औरंगाबादेत जन्मलेल्या वली दकनीपर्यंत आणि पुढे सिराज औरंगाबादी यांच्यापर्यंत पोचते. वली दकनी यांना दकनी उर्दू आणि उर्दू गझलचा प्रणेता मानलं जातं. प्रेम हे ईश्वराच्या निकट जाण्याचं एकमेव साधन आहे, असं ते म्हणतात. त्यांच्या शायरीत हिंदू दर्शन आहे त्याचप्रमाणे स्थानिक लोकभाषेतील देशज, तद्भव शब्दही आहेत.
पिरत, पीतम, बांसली, पेमनगर, बचन, देवल, चितरा, शास्तर, पुजनहारी, दास. मुख, नयन, कंवल, जल, हुलास. त्यांनी फारसी आणि संस्कृत शब्दांचे समास बनवलेले दिसतात. इथं जन्मलेले वली औरंगाबादी पुढे गुजरातेत जाऊन वली सुरती आणि वली गुजराती झाले. या थोर भारतीय कवीची औरंगाबादपुत्राची अहमदाबादमधली समाधी २००२ बुलडोझरनं उखडून टाकून तिथं डांबरी रस्ता केला गेला.
भक्ती आणि सूफी काव्यातून आपल्याला दोन्ही धर्मातल्या सहसंबंध आणि परस्परप्रभाव लक्षात येतात. हे प्रभाव भाषेवरही पडले होते. त्यातून त्यांनी एकमेकांच्या तत्त्वज्ञानातली मूल्यं, भाषा आणि प्रतिमा स्वीकारून विरघळवून टाकल्या. आणि मानवतेचं शिल्प एकजिनसी उभं केलं.
या काव्यातली भाषा सामान्यांची आहे. त्या भाषेत समता, प्रेम, सहिष्णूता ही मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न आहेच. त्याबरोबरच आणि अंधश्रद्धा, कर्मकांडे, बहुदेवतावाद, अस्पृश्यता, विषमता यासारख्या अनिष्ट गोष्टींना प्रखरपणे विरोध केला. या गोष्टी आजच्या काळातल्या कोणत्याही एकसत्तावादी फासीवादी राजवटींना मान्य होणाऱ्या नाहीत.
विस्तारानं माझ्या गावाची ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण हे की मोठ्या स्थित्यंतरातून एकेक वीट ठेवत उभारलेली अनेक शतकांची वैविध्यातल्या भारतीयतेची कल्पना जिला रवींद्रनाथ टागोरांनी आयडिया ऑफ इंडिया असं संबोधलं होतं, त्या कल्पनेचा आपणच विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकात विस्कोट होऊ दिला. इतिहास आणि परंपरेतल्या धवल मूल्यांचं विस्मरण होऊ न देण्याची जबाबदारी कवितेची असते. आम्ही कवी म्हणून ती कशी निभावलेली आहे हे या नेपथ्यात तपासून पहाता येईल.
हेही वाचा : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर
मी लिहायला सुरूवात केली तेव्हा वाङ्मयीन समज आणि आवड वाढण्यासाठी उपकारक वातावरण औरंगाबादेत होतं. मराठी कवितेचे कार्यक्रम आणि उर्दू काव्याचे मुशायरे सतत होत, विद्यापीठातल्या भाषा विभागांमधे, सतत गजगजलेल्या मसापच्या गच्चीवर सुधीर रसाळ, पानतावणे सर, प्रभाकर मांडे, कुरुंदकर, यु. म. पठाण, ब्रह्मानंद देशपांडे, रा. रं. बोराडे, जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या थोरामोठ्यांची व्याख्यानं ऐकायला मिळत होती.
ना. धों. महानोर, गजमल माळी, लक्ष्मीकांत तांबोळी यांच्यापासून तुळसी परब, चंद्रकांत पाटील, गोविंद कुलकर्णी, भ. मा. परसावळे, फ मुं शिंदे, फ.म. शहाजिंदे, अनुराधा पाटील यांच्या कविता वाचायला मिळत होत्या. काझी सलीम, कमर इक़्बाल, साहेर सईदी, बशर नवाझ यांचं उर्दू काव्यही ऐकायला मिळत होतं.
भालचंद्र नेमाडे तेव्हा औरंगाबादेतच होते आणि का कोण जाणे आम्हा काही तरुण मुलांसाठी तरी ते स्वागतशील होते. त्यांनी तोवर कधीही कुठे जाहीर मुलाखती दिलेल्या नव्हत्या पण आम्ही त्यांना एकदा विनंती केल्यावर ते तयार झाले होते आणि त्याची पहिली जाहीर आणि प्रकट मुलाखत आम्ही विशीतल्या मुलांनी घेतली होती. ती नंतर त्यांच्या ‘टीकास्वयंवर’ या पुस्तकातही छापली गेली.
बरोब्बर १२० वर्षांपूर्वी मनमाड-काचीगुडा ही रेल्वे सुरू झाली आणि निजामीतल्या मराठवाड्याचा महाराष्ट्रातल्या इतर भागांशी-विशेषतः पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क सुलभ झाला. त्यानंतर १९१८ साली उस्मानिया विद्यापीठ सुरू झालं आणि बरोबर पाच वर्षांनी औरंगाबादेत शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय सुरू झालं. हे मराठवाड्यातलं पहिलं कॉलेज.
त्याच दरम्यान नवी ग्रंथालयं आणि साहित्यविषयक नियतकालिकं सुरू झाली. स्वाभावीकच विसाव्या शतकात काव्यलेखन सुरू झालेलं असलं तरी नवतेचा स्वीकार करण्याची वृत्ती मराठवाड्याच्या मानसिकतेत अद्याप आलेली नव्हती. सुरूवातीच्या ईशस्तुतीपर आणि भक्तीपर काव्याचा जोर ओसरल्यानंतर वा. रा. कांत, बी. रघुनाथ, ना. गो. नांदापूरकर, र. लु. जोशी आणि दलित कवितेचा आद्यस्वर असलेले हरिहर सोनुले यांच्या कवितांनी तिसऱ्या-चौथ्या दशकापासून मराठवाड्याच्या कवितेत खऱ्या अर्थानं आधुनिक कविता आणली असं म्हणता येतं.
अद्यापही मराठवाडा निजाम संस्थानाचा अंकित होता. उर्वरित महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात साहित्य व्यवहार रुळायला लागून अर्धशतक झालेलं होतं. मराठीतली अनेक नियतकालिकं स्थिरावलेली होती.
आमची पिढी लिहू-वाचू लागली तेव्हा आमच्यासमोर साठच्या पिढीनं केलेलं लेखन, चांगला दर्जा सांभाळून असलेली नियतकालिकं आणि एक सतत हलतं असं वाङ्मयीन वातावरण होतं. साठनंतरच्या या पिढीवरील कवितेवर यापूर्वीच पुरेसं लिहून बोलून झालेलं आहे. त्यामुळे त्या कवितेच्या, त्याकाळातील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय वैशिष्ट्यांच्या तपशिलात जाणं मी टाळतो. पण त्या पिढीचं विश्वभान प्रखर होतं.
त्याचवेळी आपल्या परंपरेतल्या सशक्त प्रवाहांना ते ओळखून आणि जाणून होतेच, त्याचबरोबर समकालीन भारतीय वास्तवाविषयी आणि भारतीय वाङ्मयीन चळवळींशी ते परिचित होते. जागतिक कवितेतले नवे प्रवाह ते सजगपणे निरखत होते. या पार्श्वभूमीवर त्यांची कविता आपली शक्यता आणि क्षमता तपासत होती. परिणामस्वरुप त्यांनी कवितेतून केलेले भाषिक उपयोजन सहेतुक आणि अर्जित भानामुळे केलेलं होतं. त्यामुळे या कवितेची मुद्रा ठसठशीतपणे उमटलेली आपल्याला दिसते.
समकालीन कविता आणि कवींविषयीची माझी निरीक्षणं ही निव्वळ एका आस्थावान वाचकाची आहेत. वाचक म्हणून मला असं वाटतं की, चांगल्या कवितेसाठी उत्साहवर्धक वातावरण आणि कवितेसाठीचं पोषक आशयद्रव्य आपल्या आसपास उपलब्ध आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. निव्वळ गेल्या पाच-दहा वर्षात लिहू लागलेले कवीही जोमाने आणि सातत्यानं कविता लिहित आहेत. शहरी-निमशहरी महानगरी ग्रामीण या सीमारेषा त्यांच्या कवितांमधून धूसर झालेल्या दिसतात.
या कवींची उपस्थिती मुख्यतः सोशल मीडियावरून आणि नियतकालिकांमधून दिसत आहे. कारण महाराष्ट्रात आजच्या घडीला निव्वळ आजचे असे ५०-६० तरुण कवी कविता लिहितांना दिसत आहेत. अशी स्थिती यापूर्वी फारशी नव्हती.
हेही वाचा : जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार
१९८०नंतर मराठवाड्यात जी कविता लिहिली गेली त्यात प्रकाश कामतीकर, विश्वास वसेकर, रेणू पाचपोर, विलास पाटील, केशव देशमुख, श्रीकांत देशमुख, इंद्रजित भालेराव, विलास वैद्य या आधीच्या पिढीतल्या कवींसोबतच आजही लिहिते असलेले अविनाश साळापूरीकर, दासू वैद्ययांसारखे कवी आहेतच.
कविता महाजन या मुळच्या मराठवाड्यातल्या दिवंगत कवयित्रीचा उल्लेख करणं इथं आवश्यक आहे. तिनं मराठीतली स्वतःचा ठसा असलेली लखलखीत कविता लिहिली. शिवाय ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ ही तिची दीर्घकविता विलक्षण आहे. मंगेश काळेची ही दीर्घकविता अनेक दृष्टींनी हा गेल्या दशकातला विलक्षण प्रयोग होता. अलीकडे मंगेशच्या कवितेत ज्या रीतीनं तो भाषेचे प्रयोग करून संकेतव्यूहाना आणि पारंपरिक रूपांना वाकवत प्रयोग करीत हे हे दाद देण्यासारखं आहे.
आजही किमान ३०-४० कवी जे लिहिताहेत त्यातली काही नावं घ्यायची झाली तर अभय दाणी, पी. विठ्ठल, बालाजी मदन इंगळे, शंकर झुल्पे, उत्तम अंभोरे, सुरेश सावंत, राजा होळकुंदे, रवी कोरडे, केशव खटिंग, संदीप जगदाळे, डी. के. शेख, प्रिया धारूरकर, उर्मिला चाकूरकर, विनायक येवले, वीरा राठोड, सुचिता खल्लाळ, सुदेश इंगळे, रंजन कंधारकर, अक्षय घोरपडे, संतोष आळंजकर, श्रीराम गव्हाणे, शिवाजी अंबुलगेकर, प्रेषित सिद्धभट्टी, पृथ्वीराज तौर, प्रमोद जकेकूर, मनोज बोरगावकर, शर्मिष्ठा भोसले, संजय बालाघाटेहे कवी मराठी कवितेत मोलाची भर घालत आहेत. आणखीही बरेच कवी आहेत ज्याची नावं या यादीत घेता येतील.
१९२१ मधे टागोरांनी मित्राला लिहिलेल्या पत्रात ‘भारताची कल्पना’ किंवा आयडिया ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग केला होता. आपल्याच लोकांपासून वेगळेपणाची जाणीव ही संघर्षाला निमंत्रण देणारी असते, त्या भावनेला भारताच्या कल्पनेत थारा नाही. वैविध्य असेल पण त्यात सौंदर्य आहे म्हणूनच ते जिवंत आणि सळसळतं आहे असं टागोर म्हणाले होते. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादावर प्रखर हल्ले करणारी ती तीन प्रसिद्ध व्याख्यानं दिली होती.
मराठवाड्यातल्या मातीतून वाहणारे भक्ती आणि सूफी दर्शनातले झरे हेच सांगत होते. पण चालू दशक जणू त्या कल्पनेचा भंग करणारं आहे. आताचा काळ दमनकारी व्यवस्थेचा, जनविरोधी विचारांच्या सत्ताधिशांचा आहे असं असंख्य उदाहरणांवरून जाणवत आहे. नफा, स्पर्धा आणि अधिक नफा हीच नवउदारमतवादाची मूल्यं आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरिकाच्या सुविधा या दुय्यम तरी आहेत किंवा पुन्हा त्या नफेखोरीसाठीचं साधन तरी झालेल्या आहेत.
कॉर्पोरेटआश्रित आणि भांडवलस्नेही राजकारण म्हणजे मोठमोठाले देखावे उभारण्याचा खेळ झाला आहे. समाजातला तळातला सामान्य माणूस हे देखावे बघत बधीर झाला आहेत. देखाव्यातली दृश्यं त्याच्या टप्प्याबाहेरची, कल्पनेपलीकडची आहेत. दुसरीकडे झगमगाटातलं आभासी वास्तव आहे.
या परिस्थितीतही देशाच्या वेगवेगळ्या भागातली कविता मात्र वास्तवसन्मुख होऊन माणूस आणि त्याच्या सद्यस्थितीला केंद्राकडे आणतेय. गेल्या काही वर्षांत आसाममधे लिहिली जाणारी मिया पोएट्री असेल, सीएए एनआरसीविरुद्ध झालेल्या जनांदोलनांचा स्वर टिपणारी तमिळ, मल्याळम, बंगाली आणि हिंदी कविता असेल, लॉकडाऊनच्या काळात आपापल्या गावी पायी परतणाऱ्या हजारो मजूरांची व्यथा मांडणारी कविता असेल, ती जरूर सामान्यांच्या बाजूनं आजच्या काळोख्या काळात काळोखाचं गीत लिहिणारी आहे.
सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा आवाजही भारतीय कवितेत उमटतांना दिसतोय. सुरजित पातरसारखा ज्येष्ठ पंजाबी कवी आपली पदवी सरकारला परत करतो. मराठी कवितेत भारतीय पातळीवर घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब क्वचितच पडलेलं दिसतं. गोध्रा हत्याकांडानंतर हिंदीतल्या दोनशे कवींच्या कवितांचं संकलन प्रकाशित झालं होतं. मराठी कवितेत त्या पातळीवर सामसूमच दिसली. मराठवाड्यातही १९६८ पासून दंगली झाल्या. आपण एका मोठ्या जागतिक, राष्ट्रीय समूहाचा भाग असण्याबद्दल मराठी मानसिकतेनं संकोच पाळलेला आहे का, असं म्हणावं लागतं.
या दशकात अनेकांच्या हत्या झालेल्या आपण पाहिल्या. सामान्य निरपराधांच्या झाल्या, विचारकांच्या झाल्या. जी मारली गेली ती माणूसपणाची मोठी रूपकं होती आणि त्यांना मारलं जाणं भेकडपणा असलेली क्लीबता आहे. कवितेची अट ही आहे की तिनं माणूसकीचं पुन्हा स्मरण करून द्यावं. कविता नेहमी सत्ता, भांडवलाच्या विरोधात आणि माणसाच्या बाजूनं असली पाहिजे.
दुसरा एक मुद्दा आहे आणि तो पूर्वाध्यक्ष नीरजा यांनी मागच्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला होता. महाराष्ट्रात आलेल्या कवितेच्या अमाप पिकाचा त्यांनी उल्लेख केला होता. हे खरं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जात आहे की त्यात चांगली कविता शोधणं कठीण झालंय. चांगल्या कवितेला कृतक कवितेनं झाकोळलंय. मोठ्या प्रमाणावर भराभर कविता छापल्या जात आहेत, त्यावर परीक्षणं आणि पाठराखणी लिहिल्या जात आहेत.
हे फक्त मराठी कवितेतच होत नाही तर हिंदी कवितेतही होत आहे. अलीकडेच दिवंगत झालेले हिंदीतले श्रेष्ठ कवी मंगलेश डबराल यांनी याविषयी खंतावून म्हटलं होतं की, ‘आज आपण एकाच प्रकारच्या सपाट, सुलभ आणि अतिपरिचित कवितांनी ग्रस्त झालेलो आहोत. ही कविता अस्वस्थता, बेचैनी उत्पन्न करीत नाही. यात नवनिर्माणासाठी तोडफोड, विखंडन नाही. ती वाचून थोडा वेळ बरं वाटतं; पण ती वाचकाला अनुभवाच्या निबिड अरण्यातून, तापातून नेत नाही. या कवितांमधे कोणतंच संकट नाही. संकट आहे ते हेच. चांगल्या समाजासाठी, मानवतेसाठी एक महास्वप्न पाहाण्याची उर्मी दिसत नाही. उलट पॉलिटिकल करेक्टनेसचा दबाव आहे असं वाटतं. अशा कवितांचीही पुढे धाटणी बनून जाते.’ समकालीन मराठी कवितेला हे लागू व्हावं.
अनेक तरूण मराठी प्राध्यापक भेटतात तेव्हा दरवेळी मला त्यांच्याविषयी ईष्या वाटते. कारण मला कधीही मराठी साहित्याचा किंवा भाषेचा विद्यार्थी होता आलं नाही. आम्ही एकदा राम बापटांना विचारलं होतं, सर, मराठीत कॉलेजमधला शिक्षक किंवा लेखक व्हायचं असेल तर तुमच्या मते कोणत्या प्रकारचं पूर्वशिक्षण आवश्यक आहे?
खरं तर अशी काही प्रिस्किप्शन्स देता येत नसतात. तरीही ते गंभीरपणे म्हणाले होते, मराठीत गेल्या हजार वर्षात काय-काय लिहून बोलून गाऊन झालं, त्याचा ठळक अंदाज येण्याइतपत तरी वाचन हवंच, महाराष्ट्राचा किमान गेल्या ३-४ शतकांचा इतिहास-भूगोल पक्का माहीत हवा, भाषावैविध्य आणि त्याची वैशिष्ट्यं माहीत हवीत. समकालीन साहित्याच्या लेखनविषयक घडामोडींचं भान हवं. शिवाय दोन्ही महायुद्धं, मार्क्स यांचंही वाचन झालेलं हवं.
सरांची यादी संपतच नव्हती. बापट सरांच्या अपेक्षा अतिवादी म्हणून बाजूला ठेवल्या तरी यातून लसावि काढता येतो. आणि किमान तेवढ्या अपेक्षा तरी प्राध्यापक पुऱ्या करतात काय? हा अतिशय खेदानं आणि धास्तावून विचारलेला प्रश्न आहे. मला वाटतं, प्रश्न विचारण्याच्या खेदात आणि धास्तीतच त्याचं उत्तरही लपलेलं आहे. मला मराठी प्राध्यापकांवर जाता जाता शेरेबाजी करायची नाही. पण अतिशय खेदानं असं मात्र जरूर वाटतं की, ते ऐहिक उन्नतीपायी, एपीआयच्या मागे जात ‘पब्लिश ऑर पेरिश’च्या सापळ्यात अडकलेत.
याची दुसरी बाजूही मला माहीत आहे की, त्यातल्या बऱ्याच जणांना नोकरी मिळवण्यासाठी काय काय किंमत द्यावी लागलेली आहे. हे खरं असलं तरी व्यवस्थेच्या या खेळखंडोबात बळी गुणवत्तेचा आणि अध्यापनाच्या लखलखीत परंपरेचा जातोय.
सामाजिक माध्यमं किंवा सोशल मीडिया ज्याला म्हणतात तिथं कवितेचे बारमाही पूर पाहाता येतात. वस्तुतः या माध्यमानं अभिव्यक्तीच्या प्रक्षेपणाचं लोकशाहीकरण केलं. इंटरनेटमुळे बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणावरचं मुद्रित साहित्य मिळवण्याच्या संधी वाढल्या. या माध्यमावर चांगलं काही वाचायला मिळणंही शक्य झालं. तिथं तात्काळ आपली कविता, लेखन प्रकाशित करता येतं. आपणच आपले संपादक असतो, त्यामुळे सतत तिथं लिहिलेलं टाकणं सुलभ झालंय.
त्यातून तिथं मोठ्या प्रमाणावर टाकाऊ आणि दुय्यम दर्जाची कविताही येऊन पडू लागली. या प्रतिमांच्या युगात दिसत राहणं आणि न्याहाळत राहाणं हा मंत्र झालेला असल्यानं त्याची निकड व्यसनासारखी वाढत चाललेली आहे. परंतु मीडियावर जेव्हा आपण आपलं अस्तित्व प्रक्षेपित करत असतो, त्याचवेळी ते करता करता मीडिया ते नष्टही करत असतो याचं भानही आपण ठेवायला हवं.
गिरीश कार्नाडांनी ‘ओडाकालू बिंब’ नावाचं एक नाटक लिहिलं होतं. मराठीत त्या शीर्षकाचं ‘विखुरलेल्या प्रतिमा’ असं भाषांतर करता येईल. चोहिकडे वाढत चाललेल्या प्रतिमा आणि हे प्रतिमांचं युग ही त्या नाटकाची प्रेरणा आहे. आहे. आपण चोहीबाजूंनी प्रतिमांनी वेढले गेलेलो आहोत.
वास्तवाच्या या प्रतिमा वास्तवाहूनही मोठ्या करून दाखवल्या जात आहेत. त्या प्रतिमा इतक्या खऱ्या झालेल्या आहेत की त्या वास्तवाचं विस्मरण किंवा वास्तवाचा तिरस्कार करणाऱ्या बनत आहेत. अशा एकीकडे पाशवी गती लादलेल्या आणि दुसरीकडे प्रतिमांच्या आरश्यांनी दृष्टी बधिर करणाऱ्या अतिशय क्रूर काळात कवीवर मोठी जबाबदारी आहे.
कविता समाजाला बदलू शकत नाही, पण ती व्यक्तीला संवेदनशील बनवू शकते, आणि संवेदनशील व्यक्तीला त्यासाठी प्रेरित करू शकते. कधी नव्हे ते आजच्या कवितेनं आजच्या काळातलं बधिरपण, अमानुष काळातले आघात, मूल्यांच्या अधःपाताविरुद्ध आणि संविधानातल्या मानवी मूल्यांच्या समर्थनासाठी निकडीनं जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कविता काळाची सच्ची साक्षीदारही होईल आणि भाषेच्या संपन्नतेतही हातभार लावील.
हेही वाचा :
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास