संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

१० सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्‍वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते.

प्राचीन भारतीय धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा वेध घेतला तर असं दिसतं, की सुरवातीच्या काळात संस्कृत भाषा बोलण्याचा अधिकार सर्वच वर्णांना होता. मात्र वेदांचा अधिकार त्रैवर्णिकांपुरता मर्यादित होता. तोसुद्धा त्रैवर्णिक पुरुषांपुरता. स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी व्यासांनी भगवद्‌गीता लिहिली. त्या काळात त्यांना संस्कृत भाषा बोलण्याचा अधिकार होता आणि म्हणून संस्कृत समजतही होते.

व्यासांच्या या कामगिरीचा ज्ञानेश्‍वरांनी आदरपूर्वक उल्लेख केला आहे. तो असा, ‘तैसे शब्दे जे न लभे। ते घडोनिया अनुपटुभे। स्त्रीशूद्रादि प्रतिभे। सामाजिले।।’ हा व्यासांचा मोठा उपकारच झाला. ‘म्हणोनी व्यासाचा हा थोरू। विश्‍वा झाला उपकारू। जे श्रीकृष्णउक्ती आकारू। ग्रंथाचा केला।।’ या ठिकाणी ‘शब्द’ याचा अर्थ ‘वेद’ होय. वेदांचा म्हणजेच शब्दांचा अधिकार नसल्यामुळे स्त्री, शूद्रांना शब्दांतून आध्यात्मिक ज्ञान मिळणं शक्‍यच नव्हतं. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन व्यासांनी अनुष्टुप छंदात भगवद्‌गीतेची निर्मिती केली.

व्यासांनी हे महत्कृत्य केलं तरी भाष्यकारांनी गीतेचाच अर्थसंकोच करून तिला पारंपरिक वैदिक चौकटीतच बसवण्याचा प्रयत्न केला. उपनिषदं आणि ब्रह्मसूत्रं यांच्याबरोबर गीतेला घेऊन प्रस्थानत्रयीची संकल्पना पुढे आणली, ती गीतेचा अर्थसंकोच करता यावा म्हणून. कारण वेदांचाच भाग असलेल्या उपनिषदांना श्रुती मानलं गेलं. श्रुती म्हणजे असे ईश्‍वरी, अपौरुषेय ज्ञान, की जे ऋषींनी श्रवण केलं किंवा पाहिले. ऋषी याचा अर्थ ज्याने मंत्र पाहिले असा द्रष्टा.

ब्रह्मसूत्रे ही या उपनिषदांचं सूत्ररूप सार असल्याने उपनिषदांमधे प्रतिपादन केलेले ज्ञानच ब्रह्मसूत्रात येणार हे उघड आहे. आता भगवद्‌गीतेलाही या दोन ग्रंथांच्या गटात बसवून तीन ग्रंथांची, म्हणजेच प्रस्थानत्रयीची कल्पना मांडली, म्हणजे या तीन ग्रंथांत मूलभूत आणि मुख्य कोणता हा प्रश्‍न निर्माण होतो. ब्रह्मसूत्र हा तो नव्हे. कारण ब्रह्मसूत्रांत उपनिषदांचं किंवा वेदांचं फक्त सूत्ररूप सार सांगितलंय. त्याचा स्वतःचा असा वेगळा प्रतिपाद्य विषय नाही.

हेही वाचा : वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

परंपरेनुसार गीता हा मुख्य ग्रंथ असू शकत नाही. कारण गीता ही श्रुती म्हणजेच वेदीप्रमाणे अपौरुषेय दिव्य किंवा ईश्‍वरी कृती नाही. ती व्यास नावाच्या मानवी व्यक्तीची निर्मिती आहे. म्हणून तर तिची गणना श्रुतिग्रंथांत न करता तिला स्मृती मानलं जातं. स्मृती ही पुरुषनिर्मित असल्यामुळे पुरुषाबुद्धीतील दोघांचा शिरकाव होऊन तिचा प्रमाद होऊ शकतो.

जेव्हा अर्थ लावण्याचा मुद्दा येतो, तेव्हा स्मृतीचा अर्थ श्रुतीशी अनुकूल असा लावावा, श्रुती प्रधान आणि पायाभूत धरावी असा परंपरेतील अर्थनिर्णय शास्त्रातील दंडकच आहे. त्यानुसार गीता ही स्मृती असल्याने गीतेचा अर्थ लावताना तो श्रुतिरूप उपनिषदांशी सुसंगत असाच लावला पाहिजे. उलट करता कामा नये असा हा पारंपरिक प्रमाण्यविचार आहे.

स्मृतीरूप मानल्या जाणाऱ्या गीतेच्या अर्थनिर्णयावर अशाप्रकारे श्रुतींच्या चौकटीचं बंधन आलं, की गीतेचा अर्थसंकोच करणं सोपं होतं. ज्ञानेश्‍वरांनी ही अर्थसंकोचता दूर करण्यासाठी अर्थविस्तार कसा केला. या अर्थविस्तारातून समता निष्पन्न झाली हे वेगळे सांगायला नको.

‘समता कवडी रे समता कवडी रे। माजी नामामृत भरले आवडी रे।।’ ही ज्ञानेश्‍वरांच्याच एका अभंगाची ओळ आहे. पण अर्थविस्तारापेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रामाण्याचा. पूर्वाचार्यांनी आपल्या अर्थनिर्णयकृतीवर श्रुतींचं बंधन घालून घेतलं ते ज्ञानेश्‍वरांनी मोठ्या शिताफीने दूर केलं.

भगवद्‌गीता व्यासांनी लिहिली असली आणि या अर्थाने तिचं कर्तृत्व व्यासांकडे जात असल्याने ती पौरुषेय स्मृती ठरत असली, तरी मुळात व्यासांनी गीतेत श्‍लोकबद्ध केलेला आशय हा श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला केला गेलेला उपदेश आहे. हा उपदेश महाभारत युद्धाच्या अगोदर कौरव आणि पांडवांच्या सैन्याच्या मधे कुरुक्षेत्र नावाच्या रणभूमीवर झाला. श्रीकृष्ण हा परमात्म्याचा पूर्णावतार मानला जातो. त्यामुळे गीता व्यासांनी लिहिली यापेक्षा ईश्‍वराने सांगितली या मुद्यावर ज्ञानेश्‍वर भर देतात. आणि मग ईश्‍वराने सांगितलेल्या या गीतेची ईश्‍वरानेच सांगितलेल्या वेदांशी तुलना करतात.

खुद्द वेदांमधेच असा उल्लेख आहे, की वेद हा परमात्म्याचा निःश्‍वास आहे. या वेदोक्तीचा उपयोग करून ज्ञानेश्‍वर निदर्शनास आणतात, की ज्या परमेश्‍वराचा वेद हा झोपेतला निःश्‍वास आहे, त्याच परमेश्‍वराने गीता ही जागृतावस्थेत प्रत्यक्ष उपदेशिली आहे. त्यामुळे ते प्रामाण्याच्या दृष्टीने पाहिले तर गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे.

‘हा वेदार्थ सागरु। जसा निद्रिताचा घोरु। तो स्वये श्री सर्वेश्‍वरु। प्रत्यक्ष अनुवादला।।’

ज्ञानेश्‍वरांनी प्रामाण्याच्या प्रांतात केलेल्या या उलथापालथीला धर्मक्षेत्रातील कोपर्निकसन क्रांती म्हणायला काहीच हरकत नाही. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाच्या पूर्वी युरोपात टॉलेमीप्रणीत ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. त्यानुसार पृथ्वी ग्रहमालेच्या केंद्रस्थानी असून, सूर्यासह सर्व ग्रह तिच्याभोवती फिरतात. कोपर्निकसने हा सिद्धांत खोडून काढला आणि असं प्रस्थापित केलं, की सूर्य हाच ग्रहमालेच्या केंद्रस्थानी असून, पृथ्वीसह सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरतात.

कोपर्निकसने अगोदरच्या सिद्धांतात जे केंद्रस्थानी आणि म्हणून मुख्य होते, ते परिघावर आणून दुय्यम बनवले. हे क्रांतिकारक परिवर्तन असल्यामुळे विज्ञानेतिहासात त्याला कोपर्निकस क्रांती असं म्हणण्याचा प्रघात आहे. ज्ञानेश्‍वरांनी अशाच प्रकारची क्रांती ग्रंथ प्रामाण्याच्या बाबतीत केली.

केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. हे करण्याचा फायदा म्हणजे वैदिक परंपरेतील अर्थनिर्णयाचे बंधन म्हणजे स्मृतीचा अर्थ श्रुतीशी सुसंगत असला पाहिजे. हा नियम पाळण्याचं आता काही कारण राहिलं नाही. हवा तसा अर्थविस्तार करण्यासाठी ज्ञानेश्‍वर मोकळे झाले. हे स्वातंत्र्य त्यांनी उपभोगलं ते समतेच्या समर्थनासाठीच. ज्ञानेश्‍वरांनी घडवून आणलेली ही एक क्रांतीच म्हणावी लागते.

गीतेच्या आधारे घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांना सर्व भूतमात्रांमधे समता आहे, असं म्हणता आलं. जे स्थान एखाद्या ब्राह्मणाचं तेच स्थान चोखोबासारख्या अंत्यजाचं ही त्याची निष्पत्ती होती. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रात समता स्थापन झाली. अठरापगड जातीतल्या लोकांना धार्मिक आणि सामाजिक जीवन समतेने जगणं शक्‍य झालं. चोखोबांना अभंग स्फुरतात आणि अनंतभट अभ्यंग नावाचा ब्राह्मण आपल्या जातीचा अभिमान सोडून ते अभंग लिहून घेतो, असं चित्र समाजाला पाहायला मिळालं.

भगवद्‌गीतेच्या या धोक्‍याची जाणीव असल्यामुळेच कर्मठ ब्राह्मणांच्या कुटुंबात गीतेला दूर ठेवलं जाई. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र वैरी कुली आम्हा।।’

हेही वाचा : गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

तुकाराम महाराजांच्या पश्‍चात खेड इथल्या सिद्धेश्‍वरभट ब्रह्मे यांच्या कुळात जन्मलेल्या कचेश्‍वरांना गीता वाचावी असं वाटू लागले, तेव्हा त्यासाठी त्यांना घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. कारण घरात गीता वाचायला बंदी होती! पण ज्ञानेश्‍वरांनी घडवलेलं परिवर्तन एखाद्या दुसऱ्या श्‍लोकाचा अर्थविस्तार करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी त्याहीपेक्षा अधिक मूलभूत स्तरावर परिवर्तन घडवलं.

स्त्री आणि शूद्रांना वेदांचा अधिकार नसल्यामुळे व्यासांनी त्यांच्यासाठी गीता रचली हे आपण पाहिलं. पण कालांतराने स्त्री, शूद्रांना गीता ज्या भाषेत आहे, ती संस्कृत भाषाच समजेनाशी झाल्यामुळे त्यांच्यासाठी गीता असून, नसल्यासारखीच झाली. त्यांना मिळालेला धार्मिक आणि आध्यात्मिक समतेचा अधिकार केवळ उपचारापुरता उरला. त्याची प्रत्यक्षात व्यवहारत अंमलबजावणी अशक्‍य झाली.

स्त्री, शूद्रांची ही कोंडी ज्ञानेश्‍वरांनी फोडली. ती फोडण्याचा एकच मार्ग त्यांना उपलब्ध होता, तो म्हणजे सर्व शूद्रांना समजणाऱ्या भाषेत गीतेचा अर्थ विशद करून सांगणं. महाराष्ट्रात अशी भाषा अर्थातच मराठी होती. म्हणून ज्ञानेश्‍वरांनी आपली भगवद्‌गीतेच्या अर्थनिर्णयाची टीका मराठीत लिहिली. ही फार मोठी भाषिक क्रांती होती.

भारतात तेव्हाही अनेक भाषा प्रचलित होत्या. पण त्यापैकी कोणत्याही भाषेत असा उपक्रम झाला नव्हता. तो पहिल्यांदा केला ज्ञानेश्‍वरांनी आणि अर्थात मराठी भाषेत. ‘त्या बड्या बंडवाल्यांत ज्ञानेश्‍वर माने पहिला,’ ही कवीची उक्ती अगदी अन्वर्थक आहे. त्यांचं बंड जसं प्रामाण्याच्या क्षेत्रात होतं, तसेच ते भाषेच्याही क्षेत्रात होतं.

संस्कृत ही देवांची भाषा आणि म्हणून पवित्र, म्हणूनच धर्मज्ञानाची आणि अध्यात्माची भाषा, असा प्रचलित समज ज्ञानेश्‍वरांनी मोडून काढला. त्यामुळे मराठीची अभिव्यक्तिक्षमता वाढली. मोठमोठी तात्त्विक प्रमेयं पेलण्याची क्षमता तिच्यात निर्माण झाली. ती साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची भाषा बनली. या दृष्टीने ज्ञानेश्‍वरीच्या बाराव्या अध्यायातील ओव्या महत्त्वाच्या आहेत.

श्रीगुरू निवृत्तिनाथ यांना माउली समजून ज्ञानेश्‍वरांनी मागणं मागितलं. ही त्यांची प्रार्थना मराठी भाषेसाठी केलेली प्रार्थना आहे. खरं तर तो तेव्हाच्या मराठी भाषेचा जाहीरनामाच आहे. मानवाच्या व्यवहारात भाषेचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. माणसामाणसांमधील भेद कमी करून त्यांना एकाच पातळीवर आणण्यासाठी भाषा हे महत्त्वाचं साधन ठरू शकतं. ज्ञानेश्‍वरांनी भाषेचा असा उपयोग केला.

हेही वाचा : आरंभशुरांनी धडा घ्यावा असं न्यायमूर्ती रानडेंचं व्यक्तिमत्त्व

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मराठा सत्तेच्या उत्कर्षाची मीमांसा करताना न्या. महादेव गोविंद रानडे यांनी या भाषाबंधाला विशेष महत्त्व दिलं. आपण एक समाज आहोत, ही भावना उत्पन्न होण्यासाठी या समाजातील लोक एक भाषा बोलणारे असायला हवेत, असा सामाजिक बंध उत्पन्न झाला, की अशा समाजाचं राजकीयदृष्ट्या एक राष्ट्र होऊ शकते. असं राष्ट्र निर्माण करण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं असलं तरी भाषिक आणि भावनिक ऐक्‍याची निर्मिती त्याआधी महाराष्ट्रातील संतांनी केली होती, असं न्यायमूर्ती रानडे यांचं प्रतिपादन आहे.

वरचे लोक आणि खालचे लोक एकच भाषा बोलतात. हा प्रकार पूर्वी नव्हता. वरचे लोक संस्कृत बोलायचे तर खालचे मराठी. संतांच्या भूमिकेमुळे मराठी ही सर्वांचीच भाषा झाली. इतकेच नव्हे तर या भाषेला आता धर्मभाषेची प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे सामान्य माणूस धर्मचर्चेत भाग घेऊ लागला. इतकेच नाही तर साहित्यनिर्मितीही करू लागला. चोखोबांच्या घरातील सर्वच्या सर्व कवी होऊ शकले. सोयरा, निर्मला, बंका, कर्ममेळा ही त्यांची नावं.

या मुद्याचं थोडं अधिक स्पष्टीकरण करायला हवं. खरे तर ज्ञानेश्‍वरांच्याही अगोदर मराठीतून धर्म सांगायचं कार्य महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी केलं. त्यांचं चरित्र सांगणारा ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ म्हादंभटाने लिहिला तो ज्ञानेश्‍वरीच्याही अगोदर. चक्रधरांनीही आपल्या धर्मपंथात सर्व जातींच्या लोकांना स्थान दिलं. मराठीचा अभिमान धरला.

असं असलं तरी चक्रधरांनी उत्तरापंथे गमन केल्यानंतर थोड्याच दिवसांत महानुभाव सांप्रदायिकांनी आपले मराठी ग्रंथ सांकेतिक गुप्त लिप्यांत लिहायचा निर्णय घेतला. त्यामुळे एरवी अफाट गुणवत्ता असलेलं महानुभाव साहित्य महानुभाव पंथाच्या बाहेरील माणसाला वाचायला मिळेनासं झालं. या प्रकारामुळे एकूण मराठी भाषेवर महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथांचा जो प्रभाव पडायला हवा होता तो पडण्याची शक्‍यता पूर्णपणे मावळली.

दुसरं असं, की महानुभाव पंथाने सर्व जातिजमातींच्या अनुयायांना धर्मज्ञानाचा अधिकार त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत देण्याचा पण केला असला आणि त्यामुळे असे अनेक अनुयायी या पंथाला लाभले असले, तरी ग्रंथ लिहिणारे बहुतांश लेखक उच्चवर्णीयच राहिले. बहुजन समाजातील लेखक त्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमीच दिसून येतात. चक्रधरस्वामींनी उपलब्ध करून दिलेल्या अवकाशाचा उत्तरकालीन सांप्रदायिकांनी पुरेपूर उपयोग करून घेतला असं म्हणता येत नाही.

असं असलं तरी महानुभवांनी केलेल्या मराठीच्या सेवेला आणि समतेच्या साधनेला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्यामुळे मराठीचा झेंडा पेशवाईच्या आधीच अटकेपार काबुलपर्यंत पोचला होता. धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी आणि वर्चस्व मोडून काढण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावलीय. ते मुख्य प्रवाहात न आल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानच झालं.

हेही वाचा :

गांधीजींना तुकोबा भेटले होते

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

ज्ञानाचा एकाः महाराष्ट्राचा जीवनधर्म घडवणारा वारसा 

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

(सदानंद मोरे हे ज्येष्ठ विचारवंत असून संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. हा लेख त्यांच्या ब्लॉगवरून घेतलाय.)