संत नामदेव : संयमित बंडखोरी करणारे राष्ट्रीय संत

०६ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय.

महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय म्हणजे प्रगल्भ बंडखोरीचा नवा आयाम. सगळे संत हे या वारकरी पंथाचे शिल्पकार. समाजाच्या बहिष्कृत जात वर्गातून हे संत पुढे आले. स्वतःच्या अलौकिक प्रज्ञेनं त्यांनी नवा आचार-विचार दिला. त्याला वास्तव अनुभवाची जोड दिली.

जनसामान्यांची दिशाभूल करणारे, शोषण करणारे कर्मकांड, धार्मिक आचार-विचार त्यांनी नाकारले. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य जर श्रमजीवी बहुजनांना अज्ञानी अपात्र ठरवून धर्मक्षेत्राच्या बाहेर ठेवत असेल आणि त्यांना त्रैवर्णिकांची सेवा करा हाच तुमचा धर्म आहे, असं सांगत असेल, तर ते नाकारणंच हिताचं असा विचार त्यांनी केला.

स्वतःचा स्वतंत्र उपासना मार्ग निर्माण करणं श्रेयस्कर, असं या सगळ्या संतांनी मानलं. त्यातून विठ्ठल हे दैवत, पंढरी हे क्षेत्र, चंद्रभागा हे तीर्थ यांना प्रमाण मानणारे वारकरी घडले. या वारकरी संप्रदायातले आद्य संत म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज. आज संत नामदेवांची पुण्यतिथी.

हेही वाचा :  ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

नव्या मिथक कथा

विठ्ठल हा गोपजनांचा देव. पंढरपूरचा प्राचीन उल्लेख इसवीसन ५१६ च्या ताम्रपटात पांडरंगपल्ली असा आढळतो. संत नामदेव आणि संत ज्ञानदेव या दोघांच्या कुटुंबात पूर्वापार विठ्ठलाची उपासना सुरू असल्याचं दिसतं. म्हणजेच विठ्ठल आणि पंढरपूर हे विकसित होत चाललेलं तीर्थक्षेत्र होतं.

संतांनी या दैवताच्या उपासनेचा नवा आचारधर्म घडवला. नव्या मिथक कथा रचल्या. देवाचं भक्तवत्सल रूप घडवलं. विठ्ठल आणि पंढरी माहात्म्य रचलं. वारकऱ्यांचे विधिनिषेध ठरवले. त्यातूनच हळूहळू हा संप्रदाय नावारूपाला आला. लोकप्रिय झाला.

कोणत्याही धर्मात विशिष्ट काळात नवा संप्रदाय का सुरू होतो? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या विशिष्ट काळात धर्माला आलेली अवकळा. धर्मामधे निर्माण झालेलं साचलेपण. आणि धर्माच्या नावाखाली माजलेली कर्मकांडाची बजबजपुरी.

रामदेव यादवाच्या राज्यात

संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात महाराष्ट्रावर रामदेवराय यादवांचं राज्य होतं. १२७१ ते १३१० असं दीर्घकाळ चाललं. त्या काळात हिंदू हा शब्दच प्रचलित नव्हता. तो नंतर मुस्लीम राजवटीत रूढ झाला. तर त्या काळातला महाराष्ट्राचा मुख्य धर्म हा वैदिक धर्म होता. त्याला वर्णाश्रमधर्म, ब्राह्मण धर्म, श्रौतस्मार्त धर्म असंही म्हटलं जात होतं. वेद वाङ्मयाला प्रमाण मानून यज्ञ, व्रत, उद्यापने यांच्या माध्यमातून धर्माचरण होत होते.

याकाळात रामदेवराय यादवांच्या दरबारात प्रधान असणाऱ्या हेमाद्री पंडिताने 'चातुर्वर्गचिंतामणी' हा एका वर्षात २००० व्रतं सांगणारा व्रतकोश रचला. अशाच प्रकारचा 'कृत्य कल्पतरू' हा ग्रंथ भट्ट लक्ष्मीधराने लिहिला. वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेचे नियम कडकपणे पाळले जात होतेच. त्यासाठी 'मनुस्मृति' बरोबरच 'याज्ञवल्क्य स्मृती' आणि विज्ञानेश्वराने लिहिलेला 'मिताक्षरा' हा ग्रंथ आधारभूत होता. 

त्यामुळेच आश्रमव्यवस्थेचा नियम मोडणाऱ्या ज्ञानदेवांच्या माता-पित्यांना देहदंडाची शिक्षा धर्मसभेने दिली होती आणि या कुटुंबाला ब्राह्मण ज्ञातीतून बहिष्कृत करून त्यांचा दर्जा अस्पृश्यांपेक्षा खालचा 'चांडाळ' असा ठरवला होता.

हेही वाचा : पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

मराठीतली पहिली अभंग निर्मिती

या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून नव्या संप्रदायाची सुरवात संत नामदेवांनी केली. त्यांनी सुरवातीला देव, जग आणि उपासना यासाठी वैदिक ब्राह्मण, शास्त्री, पंडित, पुराणिक, हरिदास यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही त्यांचं समाधान करू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र उपासना पद्धत निर्माण केली. 'माझिया मने मज उपदेश केला। तो मज बिंबला हृदयकमळी।।' असं ते एका अभंगात म्हणतात.

विठ्ठल मंदिरात तासनतास बसल्यावर त्यांना भावतंद्री लागत होती. ते विठ्ठलाच्या रूप गुणाचं वर्णन करत होते. त्यातून मराठीत पहिल्यांदा अभंग निर्मिती नामदेवांनी केली. त्याला चाल लावून ते गाऊ लागले. मग सामुदायिक भजन सुरू झालं. नंतर अभंगाचा अर्थ स्पष्ट करणारी वारकरी कीर्तनाची पद्धती त्यांनी सुरू केली.

हे करताना त्यांना पारंपरिक मान्यताना छेद द्यावा लागला. स्त्रीशूद्रातिशूद्रांना नीच, बुद्धिहीन ठरवणारे वेद, स्मृतिग्रंथ यांना बाजूस सारण्याची भूमिका नामदेवादी संतांनी स्वीकारली. वैदिक परंपरेत महत्त्वाचे मानलेले यज्ञ मंत्र दान सोवळेओवळे यांना नाकारणारी त्यांचं महत्त्व कमी करणारी भूमिका नामदेवांनी घेतली. दुसऱ्या बाजूला नामसंकीर्तनाला वेदांचा दर्जा दिला. वर्णजाती श्रेष्ठत्व नाकारून शुद्धाचरण असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला भक्तीचा अधिकार बहाल केला.

यज्ञविरोधी कृष्ण

वैदिक परंपरेने यज्ञाला सर्वश्रेष्ठ उपासना ठरवलीय. पण वारकरी संतांनी यज्ञयागादी क्रिया बाजूस करून त्यांना नामजपाचा पर्याय दिलाय. संत नामदेवांनी कृष्णलीला वर्णनाच्या काही अभंगात यज्ञाचं वर्णन केलंय. नामदेव गाथा अभंग क्रमांक १३०-१३४ या अभंगातून एक कथाकाव्य आहे.

जंगलात यज्ञ करणारे ब्राह्मण प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भोजन देत नाहीत. पण यज्ञात मात्र तूप, धान्य जाळतात. तिथं गेलेले गोपाळ परस्परांशी बोलू शकत नाहीत. कारण ते शूद्र आहेत. 'पडे प्रायश्चित्त बोलू नका कोणी। ऐकू नये कानी शब्द यांचा' असे ते एकमेकांना म्हणतात. हे ब्राह्मण 'स्वर्ग सुखासाठी करिताती यज्ञ।  टाकिती अवदान अग्निमुखे।।' असंही वर्णन नामदेव करतात.

गंमत म्हणजे याज्ञिक असल्याचा सबळ अभिमान असणाऱ्या ब्राह्मणांवर त्यांच्या पत्नीही विश्वास ठेवत नाहीत. त्या कृष्णाला भजतात, असं संत नामदेवांनी नमूद केलंय. म्हणजेच नामदेवांनी रंगवलेला कृष्ण हा यज्ञविरोधी आहे. पुढे गोवर्धन पूजेच्या प्रसंगात हा कृष्ण 'तुझा मोडीला म्या यज्ञ' असं इंद्राला उद्देशून म्हणतो, असं दिसून येतं. संत नामदेवांचं याज्ञिक ब्राह्मणांविषयी असणारं अनुभवसिद्ध मत त्यांच्या अभंगातून आलंय.

ते म्हणतात, 'यज्ञादिक कर्म करुनि ब्राह्मण। दंभ आचरण दावी लोका। लोकांसी दाविती मीच कर्मनिष्ठ। अभिमान खोटा वागविती। या अभिमानी याज्ञिकांना दंभ सोडून नामस्मरणाने वैष्णव होण्याचे आवाहनही नामदेव करतात. कारण 'यजन याजनें जीवाते दंडताती सदा' असा नामदेवांचा अनुभव आहे. म्हणूनच ते म्हणतात, 'न लगे करावे यज्ञयाग, न लगे आणिक मंत्रलाग, एक सेविलिया पांडुरंग, अनंत तीर्थे घडतील.'

हेही वाचा : गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

भक्तिभावाचं नामस्मरण

वैदिक परंपरेत मंत्रपठनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वैदिकांच्या मते, सगळं जग हे देवांच्या अधीन आहे. देव मंत्राच्या अधीन आहेत. मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण हेच माझं दैवत आहे, असं इतर लोकांनी म्हणावं. पण वारकरी संत याही गोष्टीला नाकारतात. वारकरी संतांनी मंत्र ज्या भाषेत आहेत, ती संस्कृत भाषाच नाकारली. आणि स्वतःचा भक्तिविचार लोकभाषेत म्हणजेच मराठीत सांगितला. सर्वजनसुलभ असा 'रामकृष्णहरी' हा ओंकार रहित नामघोष मंत्राला पर्याय म्हणून दिला.

बऱ्याच वेळेला मंत्रोच्चार करणाऱ्या पुरोहिताला आपण जे म्हणतोय, त्याचा अर्थही कळत नाही. त्यामुळे ते बोलणं व्यर्थ असतं, असं नामदेव म्हणतात. म्हणूनच त्यांनी या मंत्र पठनाची तुलना बेडकाच्या डराव डराव ओरडण्याशी केली आहे. 'दुर्दुराचे परी जिव्हा वटवटी। सांडोनि हरिगोष्टी आणिक सांगे' असं त्यांचं मत आहे.

'चावळी वटवट बोलणे बासर, हे तंव अवघे चार मर्कटांचे' असं त्यांचं प्रतिपादन आहे. कारण 'मंत्रतंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परी राम प्रत्यक्ष न करी केव्हा' असा त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच 'नामा परता मंत्र नाही वो आणिक, सांगती ते मूर्ख ज्ञान हीन' असा त्यांचा उपदेश आहे. म्हणजेच पावित्र्याचं अवडंबर माजवून म्हटल्या गेलेल्या संस्कृत मंत्रांपेक्षा आणि मंत्राचा अधिकार असणाऱ्या द्विजांपेक्षा आर्त भक्तिभावाने केलेलं नामस्मरण श्रेष्ठ, असं नामदेव म्हणतात.

भिकारपणाचे गुण किती वर्णावेत?

वैदिक परंपरेनुसार दान स्वीकारणं हा ब्राह्मणांचा विशेषाधिकार आहे आणि त्यांना दान देणं हे इतरांचं विशेष कर्तव्य आहे. त्यामुळेच आजही सगळ्या मंदिरातले पुरोहित दक्षिणेचा आग्रह धरताना दिसतात. प्रत्येक व्रताच्या उद्यापनाच्या वेळी विविध वस्तू दान म्हणून ब्राह्मणाला द्याव्यात, असं म्हटलं जातं.

वेगवेगळे पर्वकाळ, ग्रहणकाळ आणि पिडाकाळ ही तर दान दक्षिणा उपटण्याची पर्वणीच. खरंतर इथूनच भाविकांचं शोषण सुरू होतं. जर सगळ्या भक्तांनी मंदिरांना आणि भट पुरोहितांना दान देणं बंद केलं, तर खूप मोठ्या अंधश्रद्धा संपतील. देवाच्या नावावर चालणारी फसवणूक संपेल. या संदर्भात संत नामदेवांची भूमिका काय होती, हे आपण समजून घेऊ.

एका अभंगात संत नामदेव म्हणतात, 

काय आम्हापाशी आहे धन वित्त। 
दान तें उचित देऊ काय।।
देतां घेतां आम्हा पुरे पुरे झाले। 
संगती त्यागिले भिवोनिया। 
काय वाणूं गुण भिकारपणाची। 
होसी पंढरीची नामनौका।
नामा म्हणे पुढें दाखवी मारग। 
आम्ही तुज मागें येऊ सुखे।।

या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे की, आमच्या जवळ कितीसे धन-वित्त आहे? त्यामुळे उचित दान आम्ही कसे देणार? असे दान देऊन देऊन आम्हाला पुरेपुरे झालंय. त्यामुळे घाबरून आम्ही अशांची संगतच सोडलीय. त्यांच्या भिकारपणाचे गुण किती वर्णन करू! त्यामुळेच आम्ही पंढरीची नामरूपी नौका या भवसंकटातून तरून जाण्यासाठी धरली आहे. ती पुढे मार्ग दाखवेल आणि आम्ही तिच्या मागे सुखाने येऊ.

हेही वाचा : साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

पंढरपूरपासून पंजाबपर्यंत

'पद तीर्थ दान हे सर्व कुवाडें।' असंच नामदेवांचं मत आहे. कारण कोणी दानधर्म करत असेल तेव्हा 'धावतात तेव्हा विप्र सगळिक। एकावर एक पडताती! असंही त्यांचं निरीक्षण आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या वारकरी बांधवांना, कीर्तन-प्रवचनकारांना असा उपदेश केला आहे की,

नाम विक्रयो न करावा। दान प्रतिग्रहो न घ्यावा। 
कष्टें करुनी मेळवावा। तोची घास आपुला।।

आद्य वारकरी कीर्तनकार संतश्रेष्ठ नामदेवांनी सांगितलेला हा उपदेश आजचे बुवा, महाराज अनुसरतील का? खरंतर नामदेवांचा भक्तिमार्ग हा डोळस श्रद्धेतून आलेला आहे. या भक्तिमार्गात विठ्ठल हा माय बाप सखा आहे. या विठ्ठलाला भेटण्यासाठी कोणा मध्यस्थाची, कोणत्याही विशेष मंत्राची, दान-दक्षिणेची गरज नाही.

सासरी नांदणारी लेक अनिवार ओढीने माहेरी जाते, तसं या वारकऱ्यांचं पंढरीकडे धावणं आहे. इथं सोवळं-ओवळं नाही, योग तप नाही, शरीराला कष्ट देणं नाही. आहे ती फक्त भावसमृद्धता! मन निर्मळ करणं, आचरण शुद्ध करणं आणि भक्ताच्या भेटीसाठी आसुसलेल्या विठ्ठलाला कडकडून आलिंगन देणं. इतकंच करायचं आहे.

म्हणूनच 'ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारी नर। सर्वांशी आधार नाम सत्य।।' असं म्हणत नामदेव सगळ्यांना साद घालत आहेत. एक संयमित बंडखोरी करत आहेत. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म देत आहेत. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय.

हेही वाचा : 

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

ज्ञानाचा एकाः महाराष्ट्राचा जीवनधर्म घडवणारा वारसा

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न 

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

(शामसुंदर मिरजकर यांच्या ब्लॉगवरून साभार)