आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी

०१ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.

ज्येष्ठ-आषाढ महिना म्हणजे 'पाऊस पाणी आबादानी' म्हणण्याचा महिना! आकाशात भरल्या ढगांच्या राशींवर राशी चढत जातात. 'मल्हार महुडे गगनी दाटले', अशी अवस्था होते. भरून आलेलं  निळं सावळं आभाळ आणि वैशाख वणव्यात तापून तगमगलेली काळी धरित्री यांच्या मीलनाला समृद्ध सुख सोहळ्यात रूपांतरित करण्यासाठी शेतकरी कष्टत असतो.

आकाशातल्या काळ्यासावळ्या मेघराजाला हात जोडतानाच या बळीवंताच्या हृदयात पंढरीच्या विठुरायाची मूर्ती जागी झालेली असते. मग शेतकामातून उसंत मिळताच, 'भेटी लागी जीवा लागलिसे आस' अशी त्याची अवस्था होते. खरे तर घरच्या देव्हार्याीत हा काळा सावळा विठू असतोच. गावात त्याचे छोटे साधे मंदिरही असते. दर एकादशी द्वादशीला तिथे भजन रंगते. परंतु पंढरीची ओढ ही अनावर असते.

विठू सगळीकडे सारखाच पण देव- स्थळ-तीर्थ आणि भक्त एकवटलेली पुण्यवंत भूमी म्हणजे पंढरी. या पंढरीत येऊन मनोभावे दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्यांच्या मनाचे समाधान होत नाही. 'आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी' अशी श्रद्धा असणारे वारकरी मैलोन् मैल चालत, हरिनामाचा गजर करत, संतांचे अभंग आळवत पंढरीच्या दिशेने जाऊ लागतात आणि एक अनुपम्य भक्तिसोहळा साकारत राहतो.

हेही वाचा : वारी चुको नेदी हरी

नामदेवांना आतली सोय माहीत नाही

भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.

श्रेष्ठ हरिभक्त म्हणून पंढरीत नावलौकिक मिळविलेल्या नामदेवांच्या कानावर आळंदीत ब्रह्मवृंदाकडून शुद्धिपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रज्ञावंत परंतु रंजल्या-गांजल्या ज्ञानेश्वरादी भावंडांची हकीकत पोहोचली. नामदेव या भावंडांच्या भेटीस आले. तिथेच प्रथम नामदेवांच्या अज्ञानाचा मुद्दा पुढे आला. रोखठोक मुक्ताबाईने 'या नामदेवाला आतली सोय ठाऊक नाही,' असे सांगितले. ही आतली सोय म्हणजे योग मार्गाद्वारे साधना करून समाधी लावून निर्गुण निराकार परमेश्वराची अनुभूती घेणे.

ज्ञानदेवादी भावंडे, विसोबा खेचर, गोरा कुंभार या सगळ्यांनी नामदेवांना  ज्ञान मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण नामदेव पूर्णतः ज्ञानमार्गी योगी झाले नाहीत, हे महाराष्ट्राचे परमभाग्य होय. पंढरपुरात गुंतलेल्या, अडकून पडलेल्या नामदेवांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर नेऊन एकांतात सहज हितगूज साधण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी केला. देव चराचरात सामावलेला आहे. त्याचा ज्ञान मार्गातून अनुभव घ्या, असे सांगितले. परंतु नामदेव बधले नाहीत. 

त्यांनी नमन, भजन, मनन, ध्यान, श्रवण, भक्ती, धृती, विश्रांती अशा टप्प्यांवर आपला भक्तिमार्ग कसा आहे, ते सांगितले.  नामदेवांच्या विठ्ठलावरील एकनिष्ठ भक्तीबाबत, श्रद्धेबाबत 'धन्य तुझा भाव एकविध', असा उद्गार काढणारे ज्ञानदेव पुढे म्हणाले,

भक्त भागवत बहुसाल ऐकिले
बहु होऊनि गेले होती पुढे
परि नामयाचें बोलणें नव्हे हे कवित्व
हा रस अद्भुत निरूपमु।।

वाळवंटात वारकऱ्यांचे राज्य

नामदेवांचा भक्तिमार्ग ज्ञानदेवांनी समजून घेतला. इतकेच नव्हे तर आपला योगमार्ग थोडा बाजूस सारून नाथपंथी ज्ञानदेव वारकरी झाले. असंख्य रंजल्या-गांजल्या दीनदुबळ्या स्त्री-पुरुषांना, अबालवृद्धांना, शूद्रांना, अंत्यजांना सहज सोपा उन्नतीचा मार्ग या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सापडला होता. सनातनी ब्राह्मणांचा विरोध असला तरी ते या संतांना आणि पंढरीत येणाऱ्या भाविकांना रोखू शकत नव्हते.

मंदिराच्या गाभार्यायत बडवे-उत्पातांचे राज्य होते. मात्र रंगशिळेवर म्हणजे मंदिराच्या आवारात, सभामंडपात जिथे भजन-कीर्तन चालते तिथे आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांचे राज्य होते. हा भक्तिमार्ग पुढे नेण्यासाठी, त्याला भक्कम वैचारिक आधार देणे गरजेचे होते. संप्रदायात काय करावे, काय टाळावे हे सांगणे गरजेचे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने नामदेव-ज्ञानदेव या संतद्वयांमध्ये याबाबत झालेली चर्चा म्हणजे एक महामन्वंतर होते. त्यातूनच वारकरी संप्रदायाला बळ मिळाले. नवी दिशा मिळाली.

संतांनी जाणीवपूर्वक विठ्ठलाला मायबापाच्या स्वरूपात पाहिले व संबोधले. स्वतःच्या आई-वडिलांकडे जाताना मध्यस्थाची गरज लागत नाही. त्यामुळेच वारकरी संप्रदायात भटजी, बडवे-उत्पात यांना महत्त्व नाही.

विटेवरी उभा दीनांचा कैवारी।
भेटाया उभारी दोन्ही बाह्या।।
गुणदोष त्याचे न पाहेचि डोळा।
भेटे वेळोवेळां केशिराज।।
ऐसा दयावंत घेत समाचार।
लहान आणि थोर सांभाळतो।।
सर्वांलागीं देतो समान दरुशन।
उभा तो आपण समपायीं।।
नामा म्हणे तया संतांची आवडी।
भेटावया कडाडी उभाची असे।।

हेही वाचा : माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

दिंडीला आहे नामदेवांचा धाक

अशा सर्वांकडे समभावाने पाहणाऱ्या विठ्ठलाला भेटायला लोक धावू लागतात. 'विठोबाच्या गांवा जाईन धांवोनी। घालीन लोळणी चरणांवरी' असे म्हणतात. 'पंढरीची वारी करील जो कोणी। त्याच्या चक्रपाणि मागें पुढें', अशी ग्वाही संत नामदेव देतात. 'सांडोनी पंढरीची वारी। मोक्ष मागी तो भिकारी।।' असेही संतांचे वचन असते. इतकेच नव्हे तर या वारकऱ्यांचा धाक दरारा इतका असतो की यमदूतदेखील या भक्तांसमोर हतबल होतात. ते रिकाम्या हाताने यमाकडे जातात. यमाला नामदेवाचे गाऱ्हाणे सांगतात.

दूत सांगती यमा। दिंडी पुढे चाले नामा।।
ते नागविती आम्हा। विष्णुदूत म्हणोनी।।

या संत नामदेवांचा धाक इतका आहे की कुणीही ही दिंडी अडवू शकत नाही. वारकऱ्यांना
यमसदनी पाठवू शकत नाही. कारण

दिंडी पताका गजर टाळघोषांचा।
नाद उमटतो अंतरीचा।।
तेथे पाड नाहीं काळाचा।
शिंपी नामा तळपतो केशवरायाचा।।

निर्भय होऊन वारकऱ्यांनी, साध्याभोळ्या भाविकांनी पंढरीची वाट चालावी या कारणानेच नामदेव दिंडीच्या अग्रभागी आहेत. या वारीचे, वारकऱ्यांचे माहात्म्य इतके आहे की, 'पंढरीची वारी जयाचिये कुळीं। त्याची पायधुळी लागो मज।।' अशी सामान्य जनांची भावना आहे. म्हणूनच ही वाट चालणाऱ्या वारकऱ्याचे पाय धुण्याचा प्रघात आजही गावोगाव सुरू आहे. आणि पंढरीहून गावी परतलेल्या वारकऱ्यांच्या पायी माथा टेकवून साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा अनुभव आजही घेतला जातो. या वारकऱ्याच्या हातून कपाळावर बुक्का आणि मूठभर खडीसाखर लाह्या मिळाल्या की पंढरीला गेल्याचा आनंद होतो.

पंढरीच्या वाटेवर वारकरी व्हावं

या विठ्ठलाबद्दल, पंढरीबद्दल अपार आत्मीयता, अभिमान सर्व संतांना आहे. म्हणूनच नामदेवराय म्हणतात, 'आमचा विठ्ठल प्रचंड। इतरा देवांचे न पाहूं तोंड।।' अनेक ठिकाणी देवदेव करणारे, तीर्थयात्रा करणारे मूढ भक्त म्हणजे नामदेवांच्या सात्विक संतापाचा विषय आहेत. 'सांडुनी पंढरी जासी आणिका तीर्थां। लाज तुझ्या चित्ता कैशी न ये।।'असा जाब ते विचारतात. निढळावर हात ठेवून भक्तांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाला अव्हेरणे म्हणजे अज्ञानाचे, मूर्खपणाचे लक्षण आहे, असे त्यांना वाटते.

वारीचे, भक्तीचे हे सुख अनुपम्य आहे. अलौकिक आहे. म्हणूनच नामदेवराय म्हणतात,

आषाढी कार्तिकी हेचि आम्हा सुगी।

शोभा पांडुरंगीं घनवटे।।

संतांची दर्शने हेचि पीक जाण।

देतां आलिंगन देह निवे।।

देह निवे किती नवल सांगावें।

जीवासी दुणावे ब्रह्मानंद।।

नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग।

त्याचेनि अव्यंग सुख आम्हां।।

अशा निर्भेळ, निकोप, अव्यंग सुखासाठी, संतसंगतीचा लाभ घेण्यासाठी, संसाराचा प्रपंचाचा शीणभाग हलका करण्यासाठी पंढरीच्या वाटेवर वारकरी होऊन चालावे, यापरता आनंद सोहळा दुसरा नाही.

हेही वाचा : 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका

(श्यामसुंदर मिरजकर यांच्या ब्लॉगवरून साभार)