बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर (भाग २)

१० ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.

भाग १ : संत रविदासांसारख्या महामानवांचा युटोपिया कशासाठी अभ्यासायचा?


संत रविदासांची ‘बेगमपूर’ ही अत्यंत वेगळी कविता. इथं ही कविता दोन भाषेत म्हणजे मूळ रविदासांची रचना आणि त्याचा इंग्रजी अनुवाद अशा स्वरूपात दिलीय. असं करण्याचे दोन हेतू आहेत. एक, मूळ कविता वाचून रविदासांच्या भाषेचा लहेजा कळेल, त्यातला गोडवा जाणवेल. दोन, इंग्लिशचं चांगलं ज्ञान असलेल्यांना या अनुवादामुळे ही कविता लवकर कळायला मदत होईल. ही कविता जागतिक पटलावर गेली आहे, हेही समजेल.

रविदासांची भाषा अत्यंत शालीन आहे. तसंच त्यात उत्कृष्ट अभिरुचीसंपन्नता आहे. अशा प्रकारची भाषा हे रविदासांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे! ही कविताही त्याला अपवाद नाही. कविता १५ व्या शतकातली आहे. पण त्यातला विचार अगदी आजचा, आधुनिक असा! डॉ. गेल ऑमवेट या रचनेचा 'भूतलावरचा युटोपिया', असा गौरव करताना दिसतात. अशी ही रम्य कविता हाऊले, जॉन स्ट्राऊघटन, मार्क जुईरगेस्मेयर यांनी इंग्रजीत अनुवादित केलीय.

'The regal realm with the sorrowless name :
They call it Begumpura, a place with no pain,
No taxes or cares, no own property there,
No wrong doing, worry, ferror or torture.
Oh my brother, I have come to take it as my own ,
My distant home , where everything is right.
That imperial kingdom is rich and secure,
Where none are third or second - all are one ;
It’s food and drink are famous, and those who live there
dwell in satisfaction and in wealth.
They do this or that, they walk where they wish,
They stroll through fabled palaces unchallenged
Oh, says Ravidas , a tanner now set free,
Those who walk beside me are my friends.'

आता मूळ कविता बघू.

'अब हम खूब वतन घर पाया। ऊंचा खेर सदा मन भाया ।।
बेगमपूर सहर को नांव। दुख अंदोह नाही तिस ठाव।।
न तसविस खिराज न माल। खौफ खता न तरस जवाल।।
कायम दायम सदा पातशाही। दोम न सोम एक सों आही।।
आबादान सदा मसहूर। वहां पै गण बैसं मामूर।।
सैर करो जहां भी भावै । महरम महल नको अटकावै।।
अब मोहिं खूब वतन गहि पाई। वहां खैर सदा मेरे भाई।।
कहैं रैदास खालस चमारा। जो हम सहरी सो मीत हमारा।।

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

कसं असेल बेगमपूर?

या साखीचा अर्थ डॉ. सूरजमल ‘सितम’ यांनी त्यांच्या ‘बोधिसत्व गुरु रैदास और उनके आंदोलन’ या पुस्तकात दिलाय. ‘संतजी कहते है कि हमारा राज्य का नाम बेगमपूरा होगा. अर्थात जहां राज्य की ओर से किसी को गम, चिंता, दुख नहीं दिया जाएगा। यहां समता का शासन होगा। कोई जन्म, जात ऊंच और नीच न होगा, गुलाम न होगा, बेगारी न कराई जाएगी।

गुरुजी कहते हैं कि यहां तीन प्रकार के दुख नहीं होंगे - १. तसवीस यानी बैचेनी या घबराहट. २. खिराज यानी चिंता, परेशानी, ३.माल यानी कर या टैक्स। अर्थात बेगारी करने के लिए जबरदस्ती पकड कर ले जाने की चिंता, घबराहट, बहन, बेटीयों कि अस्मत कि चिंता नहीं होगी।‘

खोफ यानी डर, भय, खता यानी धोखा, तरस यानी दयनीय हालत, ज्वाल यानी पतन या हानि नहीं होगी। यहां दयालुता सदा कायम रहेगी और दयालु बादशाह ही होंगे। यहां कोई सोयम यानी ऊंचा और न दोयम, दुसरी श्रेणी अर्थात नीचा न होगा। सभी एक समान रहेंगे। जहां आन, बान और दान के लिए प्रसिद्धी होगी। जहां गणतंत्र राज्य होगा, मामूल अर्थात जिसका मूल्यांकन उच्च कोटि का होगा।

बिना रोक - टोक, जहां जी चाहे मंदिर, कुएं, तीर्थ, विद्यालये, में जा सके। जहां महरम यानी संत्री - मंत्री, ब्राह्मण - आचार्य कोई पाबंदी न लगा सके। संतजी कहते है कि अब मुझे अपने प्राचीन वतन सिंधू सभ्यता, लंका राज्य कि याद ताजा हो गई है। वहां हमेशा खैर यानी कुशलता और रक्षा रहेगी। संत रैदास कहते है मै खालस खास चमार हूं। जो हमारा हम सहरी यानी हमारे शहर राज्य के बाशिंदे होंगे, वे सब हमारे मित्र होंगे।'

भारतीय नागर सभ्यतेकडे जाणारं मूळ

अनुवादित कविता आणि मूळ कविता आपल्यासमोर आहे. कवितेतल्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा स्पष्ट लक्षात येतील, असे हे अनुवाद केलेत. या कवितेत एक कल्पना केलेलं युटोपियन शहर आहे. कदाचित राज्यही म्हणता येईल. तर असं हे शहर ज्याचं भौगोलिक स्थान नाही, ज्याला इतिहास नाही. जुन्या काळात मांडलंय. पण पूर्ण आधुनिक मांडणी.

बेगमपूर हे असं शहर जिथं खाजगी संपत्ती नाही. कर नाही. राजकीय छळवाद नाही. राजा नाही. देऊळ नाही. धार्मिक नाच, गाण्याचा अत्यानंदी उन्माद नाही. इथं विकास आणि समानता आहे. मैत्री आहे. बंधुभाव आहे. जिथं जावं वाटतं, फिरावं वाटतं तिथं जाता येतं. श्रीमंत, उच्चजातीचे लोक नीच समजलेल्या जातींवर बंधन घालू शकत नाहीत. रविदासांचं हे शहर असं वेगळं शहर आहे.   

रविदासांची ही कविता अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. हे बे-गम-पूर आहे गम नसलेलं, दुःख नसलेलं शहर. हे पूर आहे. शहर आहे. रविदासांनी त्याचा गाव, खेडं म्हणून उल्लेख केला नाहीय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की खेड्यात, गावात चातुर्वण्यव्यवस्था अतिशय बळकट रूपात असते. त्या चातुर्वण्यव्यवस्थेचं गावातलं अतिशय हिंस्त्र, हिणकस रूप शूद्र अतिशूद्र असणाऱ्या रविदासांनी अनुभवले होते. रविदास इथे नगराचा, शहराचा ध्यास घेताहेत. 

श्रमण सभ्यतेचा त्यांच्यावर संस्कार आहेच. हडप्पा मोहेन्जोदडो़ या सिंधू सभ्यतेतल्या नागर सभ्यतेचा इतिहास त्यांनी ऐकला असेल. विध्वंस करून सगळंच नष्ट करता येत नाही. आधीच्या काळाच्या स्मृती या आठवणी, दंतकथा अशा कोणत्या ना कोणत्या रितीने पुढील पिढींसमोर येत असतातच. झाडांची मूळं जशी पाण्याच्या दिशेने जातात, तशीच माणसाचीही स्वप्नं आपलं मूळ शोधत असतात. रविदासांच्या स्वप्नाचेही मूलस्रोत या मूळ भारतीय नागर सभ्यतेकडेच जाणार! 

हेही वाचा : ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

खेड्यातून शहराकडे चला

इतिहासाचा मागोवा घेतला तर चातुर्वण्यव्यवस्था, जातीव्यवस्था या देशातल्या लोकांवर लादण्यापूर्वी या देशाची मूळ सभ्यता नागरी सभ्यता होती. हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल इथं उत्खनन केल्यानंतर ही नगरं होती तिथे नागर सभ्यता नांदत होती, असा शोध लागलाय. त्यांचा विध्वंस आर्य ब्राह्मणांनी केला, असं त्यांनीच लिहिलेले ऋग्वेदासारखे ग्रंथ सांगतात. आपली इतिहासाची पाठ्यपुस्तकं अगदी अलीकडच्या काळापर्यंत हेच सांगत होती.

या पराभूत मूळनिवासींवर प्रथम चातुर्वण्यव्यवस्था आणि नंतर जातिव्यवस्था लादली गेली. मूळचा नागरी समाज खेडेपाडे, गावगाडे यात कोंबला गेला. नंतर शहरातही कोंबला गेला. निष्ठुरपणे माणसांना विभागलं गेलं. रोहिदासांनी अशाच एखाद्या खेड्यापाड्यात, गाव वस्तीत जातीद्वेषाच्या वेदना सोसल्या होत्या. वाराणसीजवळच्या मांडूर गावात त्यांचा जन्म झाला, असा त्यांच्या पदातच उल्लेख केलाय. तिथेच त्यांना जातिव्यवस्थेचे पहिले चटके बसले.  म्हणूनच तर संत रविदास इथे शहराचा, नगराचा ध्यास घेत असावेत. 

म्हणून लागलाय नागरी सभ्यतेचा ध्यास

या कवितेतल्या 'नगराच्या' आठवणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘खेड्यातून शहराकडे चला’ या आदेशाची, संदेशाची आवर्जून आठवण येते. संत रविदास आणि डॉ आंबेडकर यांच्यात पाच शतकांचं अंतर असूनही शिकवणूकीत मात्र विलक्षण साम्य आहे! दोघाही महापुरुषांना नागरी सभ्यतेचा ध्यास आहे. गावांची, खेड्यांची संस्कृती ही सरंजामी, जातीयवादी स्वरूपाची असते. आजही त्याचे पूर्ण स्वरूप बदलेलं नाही. ते तसंच जातीय, सरंजामी वृत्तीचं आहे.

इतिहास सांगतो की गणसत्ताक व्यवस्थेत नगरांचा विकास झाला होता. या गणसत्ताक राज्यव्यवस्थेत प्राथमिक लोकशाहीचीच पद्धत अवलंबली जात होती. हडप्पा, मोहेंजोदडो काळातही तशीच गणव्यवस्था असण्याची शक्यता आहे. बुद्धपूर्व आणि बुद्धोत्तर काळातली भारतीय समाजव्यवस्था ही नागरी आणि पर्यायाने गणसत्ताक पद्धतीची होती, हे ऐतिहासिक सत्य आहे. या राजकीय पद्धतीत गण हे सत्ताकारणात असायचे. 

चातुर्वण्यव्यवस्था आल्यानंतर उच्च समजलेल्या जाती, त्यांच्यातला विशिष्ट वर्ण सत्ताकारणात आल्या. तेव्हापासून न बदलणारा, हिंसक, रानटी गावगाडा अस्तित्वात आला. संत रविदासांना अशा गावाविषयी, गावगाड्याविषयी ममत्व नसणं स्वाभाविकच आहे. म्हणूनच त्यांनी शहरी नागरी सभ्यतेचा ध्यास घेतला असावा.

हेही वाचा : केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासूनच

या कवितेतली दुसरी लक्षणीय गोष्ट म्हणजे बेगमपूर - ‘बेगम’ पूर! या शहराच्या नावात स्त्रीवाचक उल्लेख असण्याचीसुद्धा शक्यता आहे. हा शब्द ‘पर्शियन - तुर्क’ स्त्रीवाचक असला तरी तो उल्लेख स्त्रीसत्ताक व्यवस्थेचा गुणगौरव करणाराच आहे. मुळात प्राचीन गणव्यवस्था ही प्रथम स्त्रीसत्ताकच होती. कॉ. शरद पाटील यांनी त्यांच्या ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या पुस्तकात हे सिद्ध केलंय. 'राज्ञी' किंवा 'राष्ट्री ' हा बहुमान राज्यकर्त्या स्त्रीला दिला जायचा. या 'राष्ट्री' शब्दातील ‘राट्’ या शब्दाचा अर्थ ‘राज्य करणारी स्त्री’ असा आहे.

'निघण्टु'चा हवाला देऊन कॉ. शरद पाटील सिद्ध करतात की राजपद त्याकाळात अजूनही स्त्रीजनितच होतं. याचा अर्थ होतो, राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासूनच झाली. राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासूनच का झाली? त्याचा उलगडा करताना ते म्हणतात, 'कारण राजपदाची उत्पत्ती राष्ट् पासून झालीय. राष्ट्र जमीन गण घटकांमधे वाटायच्या सर्वात महत्त्वाच्या कामापासून झाली.

राष्ट्र या शब्दाचा अर्थ जनतेची, प्रजेची, गणाची जमीन वाटपाचं कार्य पहिल्यांदा स्त्रीच करत होती. म्हणूनच मानवांच्या या आद्य राज्यकर्तीचे नामकरण 'राष्ट्री' असं झालं. या 'राष्ट्री'नाच गणमाता असंही म्हणतात. 'माता' हा शब्द 'मा' या धातूपासून झाला असून त्याचा अर्थ मापणं, मोजणं असाच आहे. गणाला जमीन मापून देणारी माता ती गणमाता.

या राष्ट्री किंवा गणमाता ज्या काळात राज्य करत होत्या, त्याकाळी जमिनीची मालकी ही व्यक्तिगत किंवा खाजगी स्वरूपाची नव्हती तर ती सामूहिक मालकीची, गणाच्या मालकीची होती. बुद्ध काळापर्यंतसुद्धा ही, सामूहिक मालकीची पद्धत चालू होती. पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेत आणि राज्यव्यवस्थेत जमिनीची मालकी ही खाजगी मालकीमधे रूपांतरित झाली. तिथूनच खाजगी मालमत्ता अस्तित्वात आली, असे मानलं जातं.

बेगमपूर मधली ‘बेगम’

मूळ भारतीय समाज हा कृषक म्हणजे शेतकरी समाज, शेती कसून जगणारा समाज आहे. शेतीचा शोध स्त्रीने लावला असल्यामुळे त्यावेळचा कृषक समाज हा मातृवंशकच होता. हे सर्व भारतातच नव्हे तर जगातसुद्धा खरंय. मानव जेव्हा 'कुल' नावाच्या सामाजिक संघटनेचा सभासद होता, तेव्हा त्या कुलाच्या 'कुलमाता' जमिनीचं आणि त्यातल्या उगवणाऱ्या पिकाचं आपल्या कुल सदस्यांमधे सारखं समान वाटप करून द्यायचा.

संत रविदास यांच्या 'बेगमपूर' शहरात व्यक्तिगत, खाजगी मालमत्तेचा उल्लेख नाही. समाजाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेवर समाजाची सामूहिक मालकी आहे. म्हणूनच कदाचित रोहिदासांना प्राचीन गणव्यवस्थेचं, त्याच्या राज्यकर्त्या गणमातांची आठवण असावं. त्याकाळी मुस्लीम सत्ता अस्तित्वात होती. त्यातील एखाद्या चांगल्या राज्यकर्त्या 'बेगम'कडे बघून सुद्धा 'बेगमपूर' सुचलं असावं. 

एखादा प्रतिभाशाली कलावंत एखादा विशिष्ट शब्द वापरून त्यातून उद्भवणाऱ्या अनेक अर्थाना जन्म देऊ शकतो; त्यातून अनेक अर्थ निघू शकतात . बेगमपूर या शब्दाबद्दलही असंच म्हणता येईल.

बेगमपूर उतरलंय संविधानात

समाजाच्या साधनसंपत्तीवर जेव्हा खाजगी मक्तेदारी निर्माण झाली किंवा आली; व्यक्तिगत वर्चस्व आलं; तेव्हापासून भांडणं, कलह, युद्ध, घातपात, मारामाऱ्या, खून सुरू झालं. तेव्हापासून मानवी दुःखांना समूह दुःखांचं रूप आलं. मानव निर्मित दुःखांची वाढ झाली. रविदासांना याचं भान आहे. म्हणूनच त्यांच्या वांच्छित शहरात जमीन आणि उत्पादन साधनं समाजाच्या मालकीची, सामूहिक मालकीची आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ' states and minorities ' या ग्रंथात 'State socialism'ची संकल्पना मांडली आहे. तसा आग्रह धरला आहे. या पुस्तकात बाबासाहेबांनी 'राज्य समाजवादाची' कल्पना मांडली आहे. त्यात बाबासाहेबांनी जमिनीची आणि उद्योगधंद्यांची मालकी राष्ट्राकडे म्हणजे पर्यायाने समाजाकडे असायला हवी, असा विचार मांडला आहे. सामूहिक मालकीवरच बाबासाहेबांचा भर आहे.

संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघा महापुरुषांच्या विचारात, स्वप्नात, ध्येयात असं विलक्षण साम्य आहे! संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्याची गरज आहे.

हेही वाचा : 

आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

पुष्पाबाई : वैचारिक साथ पेरणाऱ्या आश्वासक विचारवंत

एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!

(लेखक हे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांच्या शोध रविदासांचा या आगामी पुस्तकाला भाग इथे देत आहोत.)