संत रविदासांसारख्या महामानवांचा युटोपिया कशासाठी अभ्यासायचा? (भाग १)

१० ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!

संत रविदासांच्या विचारांत नवं, आधुनिक असं काही आहे का? असा प्रश्न विचारला, तर उत्तर ' हो, आहे ’ असंच देता येईल! त्यांच्या ‘बेगमपूर’ या कवितेत ती आधुनिकता आलीय. आधुनिक भाषेत ज्याला ’युटोपिया’ म्हणतात असा आदर्शवाद त्यांच्या त्या कवितेत अभिव्यक्त झाला आहे. त्यांच्या या कवितेची ओळख अनेक अंगांनी मांडता येईल अशी आहे.

सध्या या साहित्यकृतीचं मूल्य ठरवण्यापूर्वी आपण या कवितेत असलेल्या ‘युटोपिया’ या संकल्पनेविषयी थोडक्यात पाहू. हे समजून घेणं यासाठी आवश्यक आहे की एखाद्या महामानवाला, कवीला संकुचित दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि त्याच्या ध्येयवादाला, त्याने मनात बाळगलेल्या भव्यदिव्य स्वप्नाला दुर्लक्षित केलं जातं. हे असं करण्यामागेही दोन कारणं आहेत. 

एखाद्या विचारधारेच्या, समाजव्यवस्थेच्या विरोधात हा महामानव लढलेला असतो, त्या व्यवस्थेच्या समर्थकांना नव्या पिढीतून असं बंड पुन्हा पुकारलं जाऊ नये यासाठी त्या महामानवाच्या मूळ विचारांकडे नव्या पिढीला जाऊ द्यायचं नसतं. याउलट तो महामानव ज्या जातीत जन्माला आलेला असतो  त्या जातीच्या जात्यभिमानी अनुयायांना 'आपल्या जातीचा किती मोठा माणूस होऊन गेला,' हे फक्त मिरवायला हवं असतं. 

असे अनुयायी व्यक्ती पूजा करतात, पण महापुरूषाच्या ध्येयवादापर्यंत पोचत नाहीत किंवा प्रस्थापित जाती गट विविध वाद, भ्रम निर्माण करून त्यांना तिकडे जाण्यापासून रोखतात. नवं जग आणू पाहणाऱ्या, त्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने म्हणूनच महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!

हेही वाचा : वारी : सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार

शोषित समुहाचा आदर्शवाद

सर थॉमस मूर यांनी १५१६ आणि १५१८ या काळात ‘The best state of a common wealth and new island of Utopia’ या खंडात लिहिलेल्या पुस्तकात पहिल्यांदा ‘युटोपिया’ या संकल्पनेची मांडणी केली. नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. समता आणि सामुहिक मालकी ही मूल्य आणणं, या युटोपिया संकल्पनेत अपेक्षित आहे. या संकल्पनेच्या विरोधकांनी जरी तिला 'वस्तुस्थितीला किंवा वास्तवाला धरून नसणारी' किंवा 'स्वप्नाळू गोष्ट' असं म्हणून हिणवलं असलं, तरी तिचं म्हणून काही महत्त्व, मूल्य आहे!

कार्ल मॅनहेम यांनी त्यांच्या १९३६ मधे आलेल्या  ‘आयडीयालॉजी अँड युटोपिया' पुस्तकात ‘युटोपिया’ या संकल्पनेवर भाष्य केलंय. त्यात ते म्हणतात, ‘Certain oppressed groups are intellectually so strongly interested in the destruction and transformation of a given condition of society that they unwittingly see only those elements in the society which tend to negate it. Thus the utopian mentality is also, at some level, unrealistic. The difference is nevertheless important, utopianism is necessary for action leading to transformation. If utopianism is lost, “man would lose his will to shape history and his ability to understand it.”

कार्ल मॅनहेम यांचे युटोपियासंदर्भातलं भाष्य पुरेसं बोलकं आहे. दबलेल्या, शोषित समूहाला आपल्या समोर जी परिस्थिती आहे, त्यात बदल हवा असतो. त्यासाठी ती प्रस्थापित व्यवस्था नष्ट करून नवी व्यवस्था आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा लोकांना प्रत्यक्ष कृती करण्यासाठी, लढण्यासाठी युटोपिया ही गोष्ट सक्रिय करत असते. त्यामुळे बदल घडण्याची शक्यताही निर्माण होते.

नवी मूल्य, नवं जग आकारास येऊ शकतं. इतिहासाला आणि पर्यायाने भविष्यालाही आकार देण्याची जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी युटोपियानिझमचं आकलन करून घेतलं पाहिजे किंवा ते झालं पाहिजे, असं कार्ल मॅनहेम मांडतात, ते खरंच आहे.

नव्या आदर्श युगाची स्वप्नं

डॉ. गेल ऑमवेट त्यांच्या ‘Seeking Begumpura, The social vision of anticaste intellectuals’ या पुस्तकात युटोपियाबाबत त्या काय म्हणतात, ते पाहणंही उद्बोधक ठरेल. त्या लिहितात, ‘Utopias, the posing of alternatives remain a crucial aspect of any struggle. They are, in other terms, the part of social movement discourses or frames that inspire people to action by uniting ideas with an analysis that makes a claim to possible realization. They unite ecstasy and reason, projecting a future that is achievable by present action.’

अशा तऱ्हेनं युटोपिया शोषित समूहाला नव्या आदर्श युगाची स्वप्न बहाल करतो आणि ते युग वास्तवात येण्यासाठी काम करण्याची, त्यासाठी लढा देण्याची प्रेरणा देतो. सर थॉमस मूरच्या मूळ वर्णनानुसार युटोपिया म्हणजे असं एक आदर्श बेट, अशी एक आदर्श जागा किंवा काल्पनिक ठिकाण जिथं सर्व सुखं मिळतील; जिथे समता असेल, संपत्तीत सामूहिक मालकी असेल ! व्यक्तिगत संपत्ती आणि त्यातून येणारं शोषण नसेल, संघर्ष नसेल!

हेही वाचा : सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

ध्येयवाद वास्तवात येऊ शकतो

डॉ. गेल ऑमवेट म्हणतात त्याप्रमाणे, ‘Utopias provide hope and even ecstasy for masses. Once, however, the realization becomes possible, reason can be used to delineate the path towards the achievement of such Utopias’.  युटोपिया समूहाला आशा देतो आणि अत्यानंदाची भावुकता, परम आनंदाची उत्कट भावना निर्माण करतो. जर तशी जाणीव झाली तर ज्ञान, कार्यकारण भाव याच्या प्रकाशात युटोपियाकडे जाणारा मार्गही लोकांना दिसू शकतो. 

डॉ ऑमवेट पुढे म्हणतात, ‘Utopias are projected visions, sometimes imagined in the past, sometimes located in a different world, sometimes inscribed in future possibility. But they all lay a claim to some kind of reality; the reality of being possible and in doing so provide the motivation for efforts at social transformation’.

लोकांसमोर मांडलेली युटोपियन कल्पना, ध्येयवाद अवास्तव वाटू शकते. पण हेही खरं की, ते स्वप्न किंवा तो ध्येयवाद वास्तवातही येऊ शकतो. त्यातून समाज बदलासाठी काम करण्याचं बळ मिळतं, प्रोत्साहन मिळतं.

वेड्यात काढण्याचा वेडेपणा

‘युटोपिया’ मांडणारे लोक असामान्य बुध्दीचे, असामान्य दूरदृष्टीचे असतात. ते प्रचंड ध्येयवादी आणि भविष्यकाळाचा अचूक वेध घेऊन बदलाचा मार्ग दाखविणारे द्रष्टे महामानव असतात. ज्या कालखंडात हे लोक वावरतात, जगतात, त्या काळात हा दृष्टीकोन, उराशी बाळगलेली स्वप्नं ही त्या काळातल्या लोकांना अव्यवहार्य, स्वप्नाळू वाटण्याचीच शक्यता असते.

कल्पनेत रमणारा, स्वप्नाळू, व्यवहार न कळणारा माणूस अशा शब्दात या व्यक्तींची हेटाळणी केली जाते. हे असं चुकीचं मूल्यमापन करणारे लोक स्वकीय असतात तसेच परकीय किंवा शत्रूही असतात. स्वकीय लोक अज्ञानामुळे असं करतात. तर शत्रू स्वतःच्या स्वार्थासाठी अशा संकल्पक, ध्येयवादी लोकांना वेड्यात काढत असतात.

तसं बघायला गेलं तर ‘युटोपिया’ ही संकल्पना एखादी भूतकाळातली कल्पित, स्वप्नरंजक, दिशादर्शक गोष्ट असू शकते. उदा. गांधींची ‘रामराज्या’ ची कल्पना, वैदिकांची ‘सत्य युगा' अर्थात सुवर्णयुगाची कल्पना, क्रांतिबा फुल्यांचे ‘बलिस्थान’ म्हणजे बळीराज्य, इत्यादी. हृदयात जपलेला ‘युटोपिया’ कदाचित भविष्यात अवतरेल, सत्यात उतरेल अशी ही गोष्ट असू शकते. उदा. मार्क्सवाद्यांची ‘कम्युनिजम व्यवस्था,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘प्रबुद्ध भारत’, संत कबीराचे ‘अमरापूर’ किंवा प्रेमनगर, रविदासाचे' बेगमपूर’ किंवा तुकोबाचे ‘पंढरपूर’  इत्यादी.

हेही वाचा : आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?

भारतीय युटोपियांचं डॉक्युमेंटेशन

युटोपियाचा उद्गाता हा युरोपियन असल्यामुळे ही संकल्पना सुरवातीला युरोपात जन्माला आली किंवा निर्माण झाली, असं म्हटलं जातं. पण वस्तुस्थिती अशीच आहे का? डॉ. गेल ऑमवेट याविषयी म्हणतात, ‘It is a striking fact that in India we can see the emergence of Utopia at almost the same time as in Europe. But these are found at a lower level of society (as contrasted with the high intellectual Thomas More, writing in Latin ). Utopias were not available in sanskrit. Rather they are found in the visions of dalit - bahujan intellectuals of radical bhakti movement of the 15th to 17th centuries.' युरोप आणि भारतात एकाचवेळी युटोपियाची संकल्पना निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

थॉमस मूरने आपली ही युटोपिया संकल्पना १५१६ ते १५१८ या काळात मांडली. संत कबीरांचा काळ साधारण  १३९८ ते १५१८. संत रविदासांचा काळ १४५० ते १५२० सांगतात. काही लोक कबीर आणि रविदास यांना समकालीन मानतात. ते काही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, की थॉमस मूरच्या अगोदर कबीर, रविदासांनी असा युटोपियानिझम आपल्या कवितेत मांडलाय. थॉमस मूरच्या साहित्याचं दस्तावेजीकरण झालं असल्यामुळे त्याचा युटोपिया सखोल आणि विस्तृत प्रमाणात आढळतो.

त्याच्या उलट कबीर, रविदासांच्या साहित्याचं आणि कामाचं व्यवस्थित असं दस्तावेजीकरण न झाल्यामुळे त्यांचा युटोपिया दुर्लक्षित, संक्षिप्त आणि विखुरलेल्या अवस्थेत आढळतो. १५ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंत विखुरलेल्या अशा या भारतीय युटोपियांचं समग्रपणे दस्तावेजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन करण्याचं महत्त्वाचं काम डॉ. गेल ऑमवेट यांनी त्यांच्या ‘Seeking Begumpura : The social vision of anticaste intelectuals’ या पुस्तकात केलंय.  ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

आता प्रत्यक्षात गुरु रविदासांच्या बेगमपूर या युटोपियाविषयी जाणून घेऊया.

भाग २ : बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

हेही वाचा : 

अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!

योद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

विवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली नव्हती

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

(लेखक हे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांच्या शोध रविदासांचा या आगामी पुस्तकाला भाग इथे देत आहोत.)