ज्ञानाचे संपादक संत सोपानदेव

११ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख. 

नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये म्हणतात. संत सोपानदेवांच्या बाबतीत ते अनेकदा खरं वाटतं. त्यांनी आपलं आयुष्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कामात संपूर्णपणे झोकून दिलं. ते माऊलींची सावली बनले. प्रतिभा आणि कर्तृत्वाचा सूर्य माथ्यावर तळपत असताना सावली पायाजवळ घुटमळणार. दिसेनाशी होणार. माऊलींच्या या सावलीचंही तसंच झालं असावं.

स्थित्यंतरातला बापमाणूस विठ्ठलपंत

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांची गोष्ट एकटेसंत नामदेवरायच काय ती नीट सांगतात. नंतर मिसळलेलं हिणकसही असेलही त्यात, पण त्यातले नामदेवराय म्हणजे शंभर नंबरी सोनं. ते गोष्ट सुरू करतात विठ्ठलपंतांपासून. ती तिथेच सुरू होते. 

विठ्ठलपंत हा बापमाणूस. आपेगाव नावाच्या आजही आडवळणाच्या गावातला. खऱ्या ज्ञानाची प्रचंड आस. त्यासाठी काहीही करायची तयारी. देश पालथा घातला. ग्रंथ धुंडाळले. साधना केली. योग्य वाटलं म्हणून लग्न केलं. ज्ञानाच्या ओढीने पुन्हा संन्यास घेतला. त्याचा फोलपणा लक्षात आला तेव्हा संन्यास सोडून पुन्हा संसार मांडला. ज्ञान आलं की आंधळेपणाने निभावायच्या रुढीपरंपरा नाकारल्या जातातच. पण त्या नकारात बेफिकीरी नव्हती, तर ज्ञानी माणसाची विनम्रता होती. आळंदीने बहिष्कार घातला म्हणून गावाबाहेर नाथांच्या, सिद्धांच्या, वारकरी कष्टकऱ्यांच्या बेटावर येऊन राहिले. तिथेच बायको आणि चार मुलांसोबत बारा वर्षं संसार केला. संघर्ष केला. शेवटी पोरांच्या भवितव्यासाठी स्वतःला संपवलं. 

साधारण सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवास संन्यासाकडून संसाराकडे, नाथपरंपरेकडून वारकरी परंपरेकडे, ज्ञानाकडून भक्तीकडे,शिष्यत्वाकडून सख्यत्वाकडे, अद्वैताकडून चिद्विलासाकडे,विषमतेकडून समतेकडे झाला. त्या प्रवासाची सुरवात विठ्ठलपंतांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्यावरचा व्यवस्थेचा राग त्यांना संपवूनही संपला नव्हताच. सनातनी आळंदी त्यांच्या पोरक्या निरागस मुलांचाही धर्माच्या नावाखाली छळ करतच राहिली. 

हेही वाचा : संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

अन्याय भोगणारं बालपण

सोपानदेवांचं बालपण काय भयंकर असेल, याची कल्पनाही करवत नाही. एकमेकांच्या जीवाला जीव लावणारं सहा जणांचं कुटुंब. तरीहीनकळत्या वयातल्या आठवणीही त्या आवडत्या कुटुंबाच्या अवहेलनेच्याच असतील. त्यामुळे मौन आणि एकांत हा लहानग्या सोपानदेवांचा स्वभाव बनला,तर आश्चर्य नाहीच.मौनाच्या नोंदी होत नाहीतच. सोपानदेव शोधूनही सापडत नाहीत. पहिली लक्षवेधी नोंद सापडते तीही हृदय पिळवटून टाकणारी. शेंडेफळ मुक्ताईंची. 

तात आणि माता गेलीसे येथून। तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा।
निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न। सोपान सांभाळी मज लागी।।

आजच्या पाचवी आणि सातवीच्या वयाचे मोठे भाऊ भिक्षा मागायला गेलेत. दुसरी तिसरीच्या वयाचा छोटा आपल्या बालवाडीच्या वयाच्या बहिणीला सांभाळतोय. हे अंगावर काटा आणणारंच आहे. सोपानदेव ते भोगत होते. त्यावर विचार करत होते. हे घडत होतं केवळ तथाकथित धर्मामुळे. जातीपातीच्या, कूळवर्णाच्या भेदाभेदांमुळे. त्यामुळे सोपानदेवांचा राग मनात खदखदत असणारच. त्यामुळे या भावंडांत पैठणला जाऊनमुंजीची परवानगी मिळण्यासाठी चर्चा झाली,तेव्हा तो लाव्हा फुटला. 

कुळापेक्षा कर्तृत्व मोठं

तेव्हा झालेल्या चर्चेतली तिन्ही भावंडांची मतं नामदेवरायांनी नोंदवून ठेवलीत.निवृत्तीनाथ जीवनमुक्त योगीच. त्याच भूमिकेतून ते मुंजीची गरज नाकारत होते. ज्ञानदेव समाजात राहायचं तर त्याचे नियम पाळण्याचा आग्रह तोंडदेखलं सांगत होतं. कारण त्यामागचं त्यांचं कारण वेगळं होतं. सोपानदेव या दोघांपेक्षा वेगळ्या भूमिकेत होते. ते म्हणाले ते त्या काळात केवळ एक क्रांतिकारकच मांडू शकत होता, `आपल्याला कूळ काय करायचंय?पांडवांचं कूळ काय होतं?दुर्वास, वसिष्ठ, अगस्ती, गौतम, व्यास, वाल्मिकी यांची कुळं कोण बघतं? कुळापेक्षा कर्तृत्व मोठं. भक्ती असली की कुळाला अर्थच उरत नाही. भक्ति हे सरती जाति न सरती। ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य॥` 

आपल्या अन्यायाचं मूळ सामाजिक परिस्थितीमधे शोधण्याची प्रगल्भता सोपानदेवांनी या वयात मिळवली होती. त्यामुळे त्यांची भाषा जातीभेदाने गांजलेल्या प्रत्येकाची व्यथा सांगत होती. त्यात समग्र समाजाच्या भल्यासाठीचा विद्रोह होता. शेवटच्या माणसासाठीची करुणा होती. समस्येच्या मुळाशी जाणं आणि त्यावर नेमका उपाय शोधणं,या एका तत्त्वज्ञाला शोभणाऱ्या गोष्टी होत्या. म्हणून ते एका महान संताचं दर्शन ठरलं. 

हेही वाचा : बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

धर्मसत्तेचं पाखंड उघडं पाडलं

खरंतर ज्ञानदेवांचाही मार्ग हाच होता. पण वेदांच्या नावाने लोकांना छळणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी माऊलींना पैठणला जायचं होतं. तुम्ही ज्याला सर्वश्रेष्ठ मानता तो वेद काय एक क्षुल्लक रेडाही बोलू शकतो, असं दाखवून त्यांनी पैठणच्या धर्मपीठाला झुकायला लावलं. ते झुकलं. चौघांची देव म्हणून स्तुती केली. तेव्हा सोपानदेवांनीच मुद्द्याला हात घातला, `ते सोडा. तुम्ही मुंजीला परवानगी देणार का?`यावर न्यायाधीश काहीच बोलले नाहीत. उत्तर नाही आलं, तरी त्याचा अर्थ मुंज नाही असाच होता. सोपानदेवांनी धर्मसत्तेचं पाखंड साफ उघडं पडलं. 

आता पुढचा रस्ता क्रांतीचा होता. सोपानदेवांनी तो आधीच सांगितलेला होता. माऊलींनी ज्ञानेश्वरीतून दिलेलं मुक्तीचं तत्त्वज्ञान सोपानदेवांच्या विचारांशीच जुळणारा होता. त्यातून संतांची दिंडी गोळा झाली. माणुसकीचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचू लागला. त्याला खरा धर्म कळू लागला. देव कळू लागला. मग स्वतः विठुरायाही त्यांच्यात सामिल झाला. चंद्रभागेच्या तीरावर जातपात मोडणारा काला रंगला.`सोपान अखंड सोवळा प्रचंड` असल्याचा सोपानदेवांचा दावा त्याला बळ देऊ लागला. 

क्रांतीसाठी ज्ञानाचं संपादन

त्यामुळे एकांतात रमणारा `डिंगर सोपान` नाचत गात या दिंडीत अग्रभागी उभा ठाकला. भक्तीमुळे जात हरपताना पाहून अवघ्या एकोणीस वर्षांचे सोपानदेव समाधानी होते. त्यांनी सासवडला समाधी घेतली. आपल्याला चार पैसे कमवायची अक्कल नसते, त्या वयात सोपानदेव सगळ्या संतांना आदरणीय बनले होते. सोपानकाका बनले होते.  

निवृत्तीनाथ म्हणतात, `मला गुरूंनी ज्ञान दिलं. ते ज्ञानदेवांनी उलगडून सांगितलं. मुक्ताईने त्यातला अनुभव शोधला. पण त्याचं संपादन मात्र सोपानदेवांनीच केलं.` सोपानकाकांनी नव्या क्रांतीसाठी नेमकं कोणतं ज्ञान हवं, हे नीट निवडून मांडण्याचं काम केलं असावं. नवी विचारसृष्टी रचणारे ते ब्रह्मदेव ठरले. ते खरे संपादक ठरले. 

एखाद्या संपादकासारखंच त्यांनी पडद्यामागे राहून शांतपणे काम केलं. कधी कोणता चमत्कार केला नाही. शब्दांचे फुलोरे फुलवले नाहीत. सोप्या शब्दांत फक्त नेमका विचार तो मांडला. त्यामुळे ना कुणी त्यांचे अभंग कीर्तनात सोडवायला घेतो. ना भजनात गातो. ना त्यावर संशोधन करतो. पण सोपानकाका कधीच त्याच्या पल्याड गेलेत. एकांतात रमणारा सोपान कधीचाच निवांत झालाय. कऱ्हेच्या काठी बसून आपल्याला वाट दाखवतोय. त्यांच्या वाटेवर चालायलाच हवं.

हेही वाचा : 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'

( वार्षिक रिंगणच्या संत सोपानदेव अंकासाठी संपर्क – ९८६०८३१७७६ / ९४२१०५५२०६)