संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक

२६ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय.

आपल्या घरी एखादा नवा पदार्थ बनवला जातो. पदार्थ बनवणारा शेफ अनेकदा घरातली गृहिणी किंवा आई असते. असा नवा पदार्थ बनवला की मग आई काय करते? आई तो पदार्थ बाबांना, आपल्याला, घरातल्या कुणालातरी खायला देते. त्या माणसानं चव घेतली की मग आई विचारते, ‘काय? कसा लागतोय? तिखट, मीठ बरोबर आहे की नाही? काही कमी नाही ना?’ मग यावर आपलं उत्तर काय असतं?

‘आई मीठ कमी पडलं बरं का!’ किंवा ‘आई, एकदम परफेक्ट. मस्त!’ असं?  बरोबर. मग आई स्वतः त्या पदार्थाची चव घेऊन बघते आणि खरंच मीठ कमी पडलाय की पदार्थ बेस्ट झालाय याची खातरजमा करून घेते. एखादा पदार्थ तयार झाला की तो पदार्थ बनवणारी व्यक्ती त्याची चव विचारात घेते. त्यात काय कमी जास्त असेल ते पाहते. आपल्या संविधानाचंही असंच झालं!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखादा पदार्थ म्हणजेच एखादं कलम बनवून आणायचे आणि संसदेत त्याची चव घ्यायला द्यायचे. त्याच्यात काय कमी, जास्त आहे हे सगळं त्यांनी जाणकारांना विचारलं. त्यावर चर्चा केली. स्वतः अभ्यास केला आणि मग ते कलम संसदेत मान्य केलं गेलं. याच पद्धतीनं तयार झालेली अनेक कलमं, कायदे, परिशिष्ट असा सगळा फाफट पसारा मिसळून एक ऐतिहासिक दस्तऐवज तयार झाला – भारताचं संविधान!

मुलांना समजेल अशी भाषा हवी

२६ नोव्हेंबर १९४९ ला भारताचं संविधान लिहून पूर्ण झालं. म्हणूनच गेल्या ७० वर्षांपासून आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. देशातल्या प्रत्येक शाळेत, कॉलेज आणि युनिवर्सिटीमधे संविधान दिन साजरा होतो. विशेषतः शाळेच्या पातळीवर हा दिवस महत्वाचा मानला जातो. शाळेत विद्यार्थी, शिक्षक संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करतात. संविधानावर बोलायला, भाषण द्यायला बड्या नेत्याला  किंवा अभ्यासकाला बोलावलं जातं. संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही आठवण काढली जाते.

काही जण तर चक्क संविधानाची पुजाही करतात. पण यातलं काहीही मुलांपर्यंत खरंच पोचत असतं का? संविधानाचं वाचन झाल्यावर सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्षता असे जड जड शब्द मुलांच्या कानावर पडत असतील. पण कानावर पडतात म्हणजे ते मुलांच्या मनापर्यंत पोचतात का? त्याचा अर्थ मुलांपर्यंत पोचतो का? आणि मुख्य म्हणजे वर्षातून एकदा संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन ऐकून त्यात सांगितलेली मूल्य मुलं आत्मसात करतील का? यावर संशोधन केलं तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नकारार्थीच असेल हे नक्की.

म्हणूनच मुलांना समजेल, उमजेल अशा भाषेत हे संविधान सांगितलं गेलं पाहिजे. त्यांच्या अनुभव विश्वाला हात घालून संविधान म्हणजे काय, त्यातली मूल्य म्हणजे काय आणि संविधान का गरजेचंय हे मुलांना सांगितलं पाहिजे. हाच विचार घेऊन लेखिका आणि बालसाहित्यिक नीलम माणगावे यांनी एक पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे – संविधान ग्रेट भेट.

हेही वाचा : संविधान निर्मात्यांना माहीत होतं, देशात विध्वंस करू पाहणारी शक्तीही आहे!

शिक्षक आणि मुलांचा संवाद

२००९ मधे सांगलीत संविधान साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनासाठी संविधानाविषयी, आंबेडकरांविषयी, स्वातंत्र्याविषयीची पुस्तक, कवितासंग्रह लिहिणारे लेखक, कवि, संविधानाचे अभ्यासक असे सगळे एकत्र आले होते. संमेलनाच्या काही दिवस आधी सुमेरू प्रकाशनाचे प्रकाशक श्रेणिक अन्नदाते यांनी लेखिका नीलम माणगावे यांना फोन केला आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक छोटं, ६०-७० पानांचं पुस्तक लिहा अशी विनंती केली. ते संमेलनात प्रकाशित करू असं आश्वासनही दिलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एवढी पुस्तक असताना, त्यात अभ्यासपूर्ण लिहिलेलं असताना आता आपण वेगळं काय लिहायचं, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा बाबासाहेबांपेक्षा आपण संविधानावरच एखादं पुस्तक लिहिलं तर? संविधानातली मूल्य मुलांना समजतील, त्यातले अवघड शब्द मुलांना कळतील असं पुस्तक लिहावं असं त्यांनी ठरवलं. मग संविधानावरची काही पुस्तकं त्यांनी वाचली आणि शिक्षक आणि आठवीतल्या मुला-मुलींचा संवाद अशा आकृतीबंधात एक छोटंसं पुस्तक लिहिलं.

संविधान संमेलनानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला! मुलांसाठी लिहिलं असलं तरी लहान, मोठे, म्हातारे, शिक्षक, पालक सगळ्यांनीच हे पुस्तक वाचावं असा सूर वाचकांमधून उमटू लागला. या पुस्तकाचं वेगवेगळ्या भाषेत भाषांतर व्हावं असाही अनेकांचा आग्रह होता. आता तब्बल दहा वर्षांनी विवेक जागर मंच आणि मुक्तबंध विचारमंचाच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढलीय. तीही चकचकीत, आकर्षक मांडणी आणि सुंदर मुखपृष्ठासह!

संविधान सांगताना मुलांशी नातं बांधायला हवं

पुस्तकात आठवीच्या वर्गातली मुलंमुली आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांचा संवाद रेखाटलाय. हे सर फारच भारी आहेत. आत्ताच्या भाषेत एकदम कूल आहेत. मुलांना मारणं, त्यांना रागावणं, शिक्षा करणं हे या सरांच्या गावीच नाही. म्हणूनच मुलांनाही हे सर खूप आवडतात. ते सांगत असलेल्या गोष्टी मुलं मन लावून ऐकतात. वर्गात चेष्टा, मस्करी चालते.

सर मुलांची, मुलं सरांची टर उडवतात. त्याचा कुणी राग मानुन घेत नाही. उलट असच हसत खेळत, आनंदमय वातावरणात सरांचा क्लास चालू असतो. वेळप्रसंगी शाळेचा अभ्यास बाजुला ठेऊन सर जगण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मुलांना शिकवत असतात.

सरांचा स्वभाव आणि शाळेतलं वातावरण लेखिकेनं अशापद्धतीनं रेखाटलंय. हे फार महत्वाचंय. मोकळ्या वातावरणात मुलं अधिक खुलतात. मोकळेपणाने विचार करतात. वेगवेगळे कंगोरे तपासून पाहतात. मोकळ्या मनाचे, विद्यार्थ्याला चौकटीत बसवू न पाहणारे शिक्षक मुलांना आवडतात. त्यांच्या सहवासात मुलं जास्त प्रगल्भ होतात. कारण फक्त अशाच वातावरणात दोन व्यक्तिमधे संवाद होऊ शकतो. हेच लेखिकेला यातून दाखवायचं असावं.

शिवाय पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीनं मुलांना संविधान समजावून द्यायचं असेल तर पुस्तकातल्या वर्गात असणारे सर आणि त्यांनी निर्माण केलेलं मोकळं वातावरण आपणही तयार करायला हवं. मुलांशी नातं बांधायला हवं. तरच मुलं आपलं ऐकून घेतात आणि त्यावर विचार करतात हे यातून उमगतं.

हेही वाचा : संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

पुस्तकात झालाय ज्ञानरचनावादाचा वापर

संपूर्ण पुस्तक ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतावर उभारलंय. ज्ञानरचनावाद म्हणजे अनुभवातून ज्ञानाची रचना करत जाणं. आपल्या अनुभवातून आपल्याला शिक्षण मिळत जातं. त्यातून ज्ञानाची निर्मिती करता येते असं ज्ञानरचनावादात सांगितलं जातं. हेच तत्त्व मुलांना संविधानातले अवघड शब्द समाजवताना सांगितलं गेलंय.

धर्मनिरपेक्ष, समाजवाद हे शब्द मुलांनाच काय तर मोठ्यांनाही समजायला अवघड जातात. अशावेळी मुलांच्या अनुभव विश्वाचा भाग असणाऱ्या गोष्टी या शब्दांशी जोडल्या की मुलांना पटकन समजते. बाबासाहेब आंबडेकरांनी संविधान एकट्यानं लिहिलं नाही. सगळ्यांची मतं विचारात घेऊन, त्यावर चर्चा करून, अभ्यास करून मग संविधान नावाचं काहीतरी अस्तित्वात आलं हे मुलांना पटकन समजत नाही.

कारण, आठवीच्या मुलांना चर्चासत्र, व्याख्यानं, संशोधनं याचा अनुभव कमीच असतो किंवा जवळजवळ नसतो. त्यांच्या अनुभवातली गोष्ट म्हणजे आईनं स्वयंपाक केला की पदार्थाची चव विचारणं. या गोष्टीशी संविधान बनवण्यामागची कृती जोडून घेतली की संविधान कसं तयार झालं याची किचकट प्रक्रिया मुलांना पटकन लक्षात येईल.

संविधानाची गरज काय?

पुस्तकातला एक प्रसंग या दृष्टीनं फारच बोलका आहे. शिक्षक मुलांना विचारतात, तुम्हाला अनेक दिवस शाळेत कोंडून ठेवलं. खायला, प्यायला नीट दिलं नाही, तुमचे फार हाल केले आणि एक दिवस अचानक सगळ्यांना सोडून दिलं तर तुम्ही काय कराल? मुलं उत्तर देतात की आम्ही नाचू, आनंद साजरा करू, पळत पळत घरी जाऊ वगैरे वगैरे.

स्वातंत्र्य मिळालं. ते मिळवण्यासाठी मुलांनी फार हालअपेष्ट सहन केली. पण आता शाळा नाही, बांधून ठेवणं नाही. हवं तसं वागण्याची मुभा आहे. मग या स्वातंत्र्याचं करायचं काय हे मुलांना कळणारंच नाही ही गोष्ट शिक्षक लक्षात आणून देतात आणि तिथं मुलांना संविधान का गरजेचंय हे कळत.

मुलांप्रमाणेच स्वातंत्र्याला वळण लागावं, त्याचा स्वैराचार होऊ नये, आपल्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये या सगळ्या जबाबदाऱ्या स्वातंत्र्यासोबत येतात याची जाणीव या प्रसंगातून होते. संविधानाचं महत्व कळतं. हा प्रसंग पुस्तकात अगदी सुरवातीलाच येतो. त्यामुळे एकदा संविधानाची गरज अधोरेखित झाली की संविधान म्हणजे काय हे समजून घ्यायची इच्छा आणखीनच उत्कट होते.

हेही वाचा : यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी

जगण्यातही संविधान हवं

संपूर्ण पुस्तक मुख्तत्वे संविधानाची प्रस्तावना समजावून देण्यावर भर देतं. त्यातले सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे महत्वाचे चार शब्द आणि सामाजिक, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही चार मूल्य, त्यांचे अर्थ लेखिकेनं मुलांच्या अनुभवाशी जोडून समजावून सांगितलेत.

एवढंच नाही, तर ही मूल्यं आणि हे चार अवघड वाटणारे शब्द आपल्या रोजच्या जगण्यातही कसं गरजेचे असतात याचे दाखले वेळोवेळी देण्यात आलेत. फक्त राजकीय भूमिका म्हणून नाही तर संविधानाच आपल्या रोजच्या जगण्यातही कसा स्वीकार करता येईल हेच हे पुस्तक सांगतं.

संविधानानं प्रत्येक भारतीयाला दिलेल्या हक्कांविषयी, स्वातंत्र्याविषयी हे पुस्तक बोलतं. विशेष म्हणजे, संविधानात सांगितलेले हक्क प्रत्येकाला मिळालेच पाहिजेत हे जितक्या प्रखरपणे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं तितक्याच प्रखरपणे हक्कांबरोबरच संविधानानं सांगितलेली कर्तव्य पाळणंसुद्धा गरजेचं आहे हेही मुलं शिकतात. मनाशी तशी खुणगाठच बांधतात.

पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीला डॉ. सुनीलकुमार लवटे यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत डॉ. लवटे म्हणतात, ‘संविधान हा २५०-३०० पानांचा आहे. तो विद्यार्थांना ५० पानांत आणि तोही गाभा घटक समजून देण्याच्या हेतूने सारबद्ध करणं हे अवघड काम. पण नीलम माणगावे या बालसाहित्यीक असल्याने त्यांनी सर्वसामान्य लेखकाला न उचलता येणारं शिवधनुष्य लीलया पेललंय.’ लवाटे सरांचं हे म्हणणं अत्यंत महत्वाचं वाटतं.

पुस्तक मोठ्यांसाठीही उपयोगाचं

पुस्तक वाचून त्यावर आपला अभिप्राय देणारी सहावीतली मुक्ता सरू सुनील म्हणते, ‘हे पुस्तक मला फार आवडलं. त्यातलं एक वाक्य ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही’ हे मला इतकं आवडलंय की मी पाठच करून ठेवलंय!’

मुक्ता पुढे म्हणते, ‘पुस्तकातली मुलं आपल्या घरी जाऊन संविधान म्हणजे काय हे आईवडिलांना विचारतात तेव्हा त्यांच्या पालकांना काहीच सांगता येत नाही. मला याचं आश्चर्यचं वाटलं. बरेच पालक मुलांना तुला काय करायच्यात नसत्या चौकशा असं म्हणून पिटाळून लावायचे. नाहीतर संविधान म्हणजे राज्यघटना असं मोजकं उत्तर द्यायचे.’

मुक्ताच्या निरीक्षणातून आलेले हे शब्द काय काय व्यक्त करतात! मुलांना संविधान म्हणजे काय हे शिकवण्याआधी आपण, मतदान करणारी सज्ञान माणसं संविधानाबद्दल काय जाणतो. संविधानाच्या बाबतीत आपणंही अजून आठवीच्याच वर्गात आहोत आणि म्हणूनच फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

संविधान म्हणजे काय? संविधान कशासाठी? रोजच्या जगण्यात संविधानाची काय गरज याचं प्राथमिक ज्ञान मुलांना आणि त्यांच्या पालकांना व्हावं एवढा हेतू ठेवून लिहिलेलं हे पुस्तक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क, आणि कर्तव्याच्या दिशेने दोन पावलं पुढे घेउन जाईल अशी आशा ठेवायला हरकत नाही.

हेही वाचा :

संविधान म्हणजे काय रे भाऊ!

सातवीच्या पुस्तकातलं संविधान वाचलंय?

संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?

संविधानासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त का ठरला?

सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

(पुस्तकाची प्रत मिळवण्यासाठी आपण राजवैभव शोभा रामचंद्र यांना ८६००८१००४३ या नंबरवर संपर्क साधू शकतो.)