सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. परिस्थिती आवरण्यासाठी, काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला, छत्रपती शाहूंचा पुरोगामित्वाचा वारसा जोपासणारा, छत्रपती प्रतापसिंह महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जाणारा, शाह-फुले-आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाला समृद्ध करणारा, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतीयुक्त विचारधारेला जोपासणारा सातारा जिल्हा, ही अखंड भारतात सातारा जिल्ह्याची ओळख आहे.
शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासणारा, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा म्हणून उभ्या जगात ज्या सातार्याला नावाजले जाते. इथल्या गावगाड्यांमधेही सर्वधर्म समभावाचा वारंगुळा चालत आला आहे.
पण त्याच सातार्याच्या नावलौकिकाला गालबोट लागणार्या घटना अलिकडच्या काळात घडू लागल्या आहेत. आजवर उभ्या भारतात कुठेही दंगे फसाद झाले तरी सातार्याने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. माथी भडकवणाऱ्यांना, जातीय विद्वेष पसरवणाऱ्यांना, धर्मांधतेचे विष कालवणाऱ्यांना साताऱ्यानं कधी थारा दिला नाही. पण या सलोख्याला नख लावून कोणीतरी आपला स्वार्थ साधतंय.
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा कोणत्याही धर्माचा अभिनिवेष न बाळगता अखंड शेतकरी समाज एकमेकांच्या सुख-दु:खात घावून जाताना पूर्वांपार दिसला आहे. महाभयानक आपत्तीच्या काळात हिंदू-मुस्लिमांचा भाईचारा जिल्ह्याने अनुभवला आहे. महापूर असू दे अथवा दुष्काळ, संकट निसर्गनिर्मित असो अथवा मानवनिर्मित प्रत्येकवेळी हिंदू मुस्लिमांसाठी आणि मुस्लिम हिंदंसाठी धावून गेला आहे.
हिंदूंचे पवित्र सण साजरे करताना मुस्लिम बांधव दिसतात तर मुस्लिमांच्या सणांमध्ये हिंदू बांधव सामील झालेले दिसतात. सातार्याची ही भाईचाऱ्याची परंपरा अलौकिक राहिली आहे. त्यामुळेच हिंदूंची दिवाळी आणि मुस्लिमांची ईद दोन्ही धर्मियांसाठी सण म्हणूनच साजरी होते.
शहरांमध्येही कुठेही जातीय तणावाच्या घटना कित्येक वर्षे घडल्या नाहीत. गावगाड्याला तर जातीय मतभेदांचा स्पर्शच झालेला नव्हता. सातारा जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांत असे गुण्यागोबिंदाचे वातावरण असताना अलिकडच्या काही वर्षांमध्ये मात्र ठिणगीचा वणवा पेटवला जात आहे.
सोशल मीडियाचा वाढलेला अतिरेक माथी भडकवत आहे. फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवरील काही नतद्रष्ट नादवयात आलेल्या पोरांना देशोधडीला लावत आहेत. त्यातून देवदेवता, महापुरुष, स्वातंत्र्यासाठी 'लढलेली पिढी यावर खालच्या स्तरावर जाऊन टिकाटिप्पणी करणारी टाळकी सामाजिक वातावरण प्रदूषित करु लागली आहेत.
कामधंदा करण्याऐवजी सोशल मीडियाच्या मोहजालात अडकून संपूर्ण समाजाला वेठीस धरणार्या चारदोन टुकार टाळकयांमुळे संपूर्ण समाजयंत्रणा अडचणीत येत आहे. रात्री अपरात्री व्हॉटसअप स्टेटस्, इन्स्यग्रामवर हरामखोरी करत बसायचे आणि त्यातून भावना भडकवायचे उद्योग करणारी ही साखळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
असे मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यातून चिथावणी देणारे, या व्हायरल मेसेजचा आधार घेऊन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे तेवढ्याच वेगाने वाढू लागले आहेत. या विषारी मार्याला तेवढ्याच विषारी माऱ्याने प्रतिकार होऊ लागला आहे. त्यातून दंगली घडवण्याची कारस्थाने होत आहेत.
गेल्या वर्षभरात अनेकदा अशा घटना कानावरुन गेल्या. या एक-दोन वर्षातच या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? औरंग्याची आठवण आत्ताच का येत आहे? सुमारे पावणेचारशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण का केले जात आहे? माथी भडकवणार्या लिखाणानंतर पेटवापेटवी आणि जाळपोळ करुन ठिणगीचा वणवा का केला जात आहे?
पुसेसावळी हे सातारा जिल्ह्याचे टोकच. सर्व समाज इथे पूर्वांपार गुण्यागोविंदाने नांदतो. याच 'पुसेसावळीत होणारा पारायण सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. एक महिन्यापूर्वी हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येऊन पारायण सोहळा केला. सर्व धर्म समभावाची पताका घेऊन पुढे जाणाऱ्या 'पुसेसावळीत दोन समाजबांधवांमध्ये एवढी विषारी तेढ निर्माण होण्याचे कारण काय?
इन्स्टा आणि व्हॉटस्अँपवरुन फिरलेले मेसेज, पेटवलेल्या गाड्या, झालेली जाळपोळ पुसेसावळीच्या आजवरच्या परंपरेला गालबोट लावून गेली. सोशल मीडियावर विखारी मेसेज करणारे नामानिराळे राहिले आणि एका निरपराध युवकाचा बळी गेला. महापुरुषांविषयी खालच्या भाषेत गरळ ओकणे जेवढे चुकीचे; तेवढेच जाळपोळ करुन निरपराधाचा बळी घेणेही चुकीचे. दोन्ही कृत्यांचे समर्थन होणार नाही. सातारा जिल्हा अशा कृत्यांना स्वीकारणार नाही.
अलिकडच्या काळात वाढू लागलेल्या या घटनांवरुन आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन एक बाब प्रकर्षाने पुढे आली आहे ती म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेक. फोफावलेली बालगुन्हेगारी सोशल मीडियाचेच अपत्य आहे आणि वाढू लागलेली जातीय धार्मिक तेढही सोशल मीडियाचेच पाप आहे याची पोलिस यंत्रणेने व शासनानेही नोंद घेतली पाहिजे.
पोलिस दलाचा सायबर सेल केवळ गाजावाजा करण्यापुरता मर्यादित राहिला आहे. पुसेसावळीत रविवारी रात्री घडलेल्या प्रकारापूर्वी १५ दिवस अगोदर अशीच धुसफूस झाली होती. मात्र, त्यानंतर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्यात स्थानिक पोलिस दल कमी पडले. 'सायबरची यंत्रणा तर पूर्णपणे फेल आहे.
मध्यंतरी साताऱ्यातही अकाउंट हॅक करुन मेसेज केले गेले, राजकीय नेत्यांची, पत्रकारांची, सामाजिक कार्यकर्त्यांची अकाऊंट हॅक केली जात आहेत. मात्र, सायबरच्या यंत्रणेला आरोपीपर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागतो की तोपर्यंत ही विषवल्ली गावोगावी पोहोचलेली असते. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने सायबरची यंत्रणा अधिक ऑक्टिव्ह केली पाहिजे.
व्हॉटस्अप, फेसबुक, इन्स्टावर जातीय आणि धार्मिक ग्रुप आहेत. या ग्रुपवर जाती धर्माच्या पोस्ट सातत्याने पडत असतात, त्यावर सायबरची नजर असायला हवी. घटना घडल्यानंतर उपाययोजना करताना पोलिस दल घामाघूम होत आहे. मात्र, घटनांपूर्वीच पोलिस दलाने खबरदारी बाळगली तर अशा घटनांना आळा बसेल.
रात्री अपरात्री सामाजिक विद्वेष पसरवणारे, व्यक्तीगत रागापोटी बोलटाबोलटी करणारे चिंतातूर जंतू पोलिसांनी हेरून, चाळून, पिंजून उचलले पाहिजेत. गावोगावी निर्माण झालेल्या या विषवल्लींना लागलीच कायद्याचा उतारा दिला नाही तर सामाजिक विद्ठेषाचा हा डोह हा विशाल समुद्र प्रदूषित केल्याशिवाय राहणार नाही.
महापुरुषांची बदनामी करणारा एखादा नग रात्री अपरात्री एखादा मेसेज टाकून परागंदा होतो. कधी कधी
दुसर्याचे अकाऊंट हॅक करुन तिसराच ओकाऱ्या करुन जातो. कुठे कुठे एखादा विकृत 'व्यक्त व्हा, व्यक्त व्हा' अशा उलट्या करुन गावगन्ना डरंगाळत असतो. अशा नगांच्या उचापतींना बळी पडून माथी
भडकावली जातात. जातीजातीमध्ये विष कालवले जाते, वस्त्या उठवल्या जातात.
धर्म मारला, जात मारली अशा आरोळ्या ठोकत झोपड्या, घरे पेटवल्या जातात. पण खरं सांगा बाबांनो, खरंच धर्म मारला जातो का? खरंच जात मारली जाते का? खरंच धर्म पेटवला जातो का? खरंच जाती जाळल्या जातात का? मारला जातो तो माणूस! राखरांगोळी होतेय ती माणसांची! आयुष्याची बरबादी होताहे ती माणसांची! मग का दंगली घडवताय?
का शांतताप्रिय असलेल्या सातारा जिल्ह्याचे समाजमन पेटवताय? का अस्तनीतले निखारे होताय? थांबवा हे सगळं. लेकरं बाळं गोंधळलीत, माणूसमेळ बिथरलाय, शाळांमध्ये जाणारी मुलं कावरीबावरी झालीत, नोकरी धंद्यावर असणाऱया लेकरांच्या काळजीने आयाबाया घाबऱर्यागुबर्या झाल्यात, मायमाऊल्या रडवेल्या झाल्यात.
दंगली आपल्याला परवडणार्या नाहीत. होरपळणाऱ्या जीवांचा आक्रोश ऐका... महापुरुषांचे विचार ऐका... आणि थांबवा हे सारं!