काळजाचा तुकडा खरंच दान देता येईल का?

२६ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता.

नुकतीच एक बातमी वाचनात आली. तपस्या परिहार या आएएसएस अधिकारी २०१७च्या नॅशनल रँकर्स आहेत. त्यांनी २३व्या क्रमांकासह सेल्फ स्टडीच्या बळावर दुसर्‍याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. मध्यप्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यातलं जोवा हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. शेतकर्‍याच्या मुलीनं कोचिंग नसताना नॅशनल रँकसह यश मिळवल्यानं त्या चर्चेत होत्या.

जितकी प्रसिध्दी आयएएस झाल्यानंतर मिळाली त्यापेक्षा कैकपटीनं लग्नामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याचं कारण म्हणजे आपल्या लग्नात त्यांनी ‘कन्यादान’ ही विधी नाकारली. ट्रेनिंगमधे असताना त्यांचं आयएफएस अधिकारी गर्वित गंगवार यांच्यासोबत मैत्र जुळलं. नंतर त्याचं रूपांतर प्रेम आणि लग्नात झालं. दोन्ही परिवारांच्या संमतीनं लग्न मोठ्या उत्साहात झालं.

वैदिक परंपरेनुसार पुरोहित कन्यादान विधीची तयारी करत असताना त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. ‘बाबा मी आपली मुलगी आहे. कोणती वस्तू नाही. माझं दान कसं करू शकता तुम्ही?’ असा प्रश्न केला. तपस्यांच्या भूमिकेला पती गर्वित आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी मान्यता दिली. कन्यादान वगळता इतर सर्व विधींसह हा लग्न सोहळा तितक्याच उत्साहात पार पडला.

कन्यादानाच्या संकल्पनेला नकार

तपस्यांचा हाच प्रश्न आजच्या अनेक मुलींच्या मनात आहे. कारण ती आई वडलांना एकुलती एक आहे. आई वडलांची जबाबदारी तिचीच असणार हे तिनं मान्य केलंय. आज दोन किंवा एकाच मुलीवर थांबलेल्या आई बाबांची संख्या मोठी आहे.

हा विचार करताना लग्न सोहळ्यातली ‘कन्यादान’ ही संकल्पना नाकारण्याची वेळ आलीय. शिवाय आपल्या बहिणीला दान दिल्याचं पाहणं भावालाही आवडणार नसल्यानं तरुणांनी यासाठी पुढाकार घेणं अपेक्षित आहे.

दुसरीकडं तिचा जोडीदार हा काही दान स्वीकारणारा याचक नसतो. हा जोडीदार म्हणजे आपली आणि तिचीही निवड असते. ते दोघंही समान आहेत. म्हणून त्यांना आपल्या जोडीदाराला दान म्हणून स्वीकारणं काळाच्या कसोटीवर टिकणारं नाही.

हेही वाचा: क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

दानाला धार्मिक अधिष्ठान

‘आपल्याकडची वस्तू, संकल्पना गरज असलेल्या दुसर्‍यांना देणं म्हणजे दान’ अशी दानाची व्याख्या प्रचलित आहे. दानाला धार्मिक अधिष्ठान मिळाल्यानं दान दिल्यानं पुण्य मिळतं अशी धारणा आहे. साहजिकच पुण्य मिळवण्यासाठीही दान-धर्म केलं जातं.

दुसरीकडे आपल्याजवळच्या एखाद्या गोष्टीचा दुसर्‍यासाठी त्याग करणं यालाही दान म्हटलं जातं. दान देणारा दाता आणि स्वीकारणारा याचक अशी सरळ वर्गवारी आहे. दान दिल्यानंतर त्यावरचा दात्याचा हक्क संपतो. पदरात पडलं ते पवित्र झालं म्हणत याचक त्याचा स्वीकार करतो.

परंपरेच्या पगड्यामुळे ‘दिल्या घरी जाणारी’ म्हणून अगदी कालपर्यंत मुलींच्या संगोपनात त्रुटी होत्या. मात्र बदलत्या काळात आपण त्या त्रुटी दूर केल्या आहेत. समानतेच्या वातावरणात आजच्या घरी कन्या वाढतायत.

षोडश् दानाची संकल्पना

दानाची संकल्पना अगदी पूर्वापारपासून आहे. सगळ्याच धर्मांनी तिला सर्वोच्च महत्त्व दिलंय. दान म्हणून काय काय दिलं-घेतलं जावं याची यादीही तयार आहे. वैदिक संस्कृतीमधे सोळा प्रकारचं दान आहे. त्याला षोडश् दान म्हणलं जात.

गायीसह हत्ती, घोडा, शेळी, म्हशीसारखे उपयुक्त पशू, मुलगी, जमीन, तीळ, तूप, गूळ, धान्य, कपडे, धन, ज्ञान, घर, वाहन यांचा दान देण्याघेण्यात समावेश आहे. काही पुराणांमधे ही यादी आहेय. थोडक्यात या यादीवरून दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जाव्यात असं दिसतं.

हेही वाचा: पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

दान नाकारणारी शरण-संत परंपरा

महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी दान ही संकल्पना नाकारलीय. हवा, पाणी, जमीन, बैल, धान्य, प्रकाश हे सारं ईश्वराकडून मिळालेलं दान असल्याचं ज्येष्ठ शरण जेडर दासिमय्या सांगतात. ईश्वराकडून, निसर्गाकडून जे मिळतं ते दान. व्यक्ती समाजाला देतो ते ‘दासोह’ अशी शरणांची भूमिका आहे. कारण दाता सर्वश्रेष्ठ असतो. माणसांमधे दातृत्वाचा दंभ तर दान स्विकारणार्‍यांमधे याचकाची, उणेपणाची भावना येण्याची शक्यता शरणांनी वर्तवलीय.

दानाबद्दल तुकोबाराय काहीसे कठोर आहेत. ते म्हणतात, ‘न लगे तप तिर्थ करणे महादान, केल्या एकमन जोडे हरी’. संपूर्ण पृथ्वीचं दान करूनही जितकं पुण्य मिळणार नाही तितकं पुण्य फक्त परमेश्वराची निस्सिम भक्ती केल्यानं मिळतं अशी ग्वाही तुकोबाराय देतात. तुकोबारायांनी आपल्या अनेक अभंगांतून दानासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधणार्‍या पुरोहितवर्गाचा समाचार घेतलाय.

दानाचं आधुनिकीकरण व्हावं

कोणत्याही कृतीला दैवी किंवा धार्मिक अधिष्ठान दिल्यानंतर समाजाकडून त्याची अंमलबजावणी स्वयंप्रेरणेनं होते, हा इतिहास आहे. सर्वच धर्मांमधे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्याची शिकवण आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून गरजूंना मदत करण्याचं सांगितलंय. त्यात दान हे सर्वप्रथम येतं. दानाच्या या संकल्पनेमागे सोशल कमिटमेंट प्रत्येक धर्मानं सांगितलीय, पण आता त्या पूर्वापार दानांमधे बदल व्हायला हवा.

मंदिराबाहेर बांधलेल्या गाईला चारा देऊन मोक्ष मिळणार नाही, तर मोकाट गायींसाठी गोशाळा सुरु करण्याचा प्रयत्न व्हावा. सध्या ज्ञानदान हे मोठे दान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधांची उभारणी व्हायला हवी. अनाथांसाठी अनाथालये व्हायला हवीत. गरजू विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी घेणं, त्यांना शालेय साहित्याची मदत करणं हे ज्ञानदानापेक्षा वेगळं नाही.

हेही वाचा: कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

दानाचं स्वरूप बदलायला हवं

दानाचं रूपही काळानुसार बदलायला हवं. महिन्याच्या पहिल्या, दुसर्‍या आठवड्यात बँकेच्या शाखेत शासकीय पेन्शन घेणार्‍यांची खूप मोठी रांग असते. यातले बरेच जण अशिक्षित किंवा अर्धशिक्षीत असतात. त्यांना स्लीपही भरता येत नाही. काही जण थकलेले असतात. त्यांना रांगेत थांबता येत नाही. ज्यांच्या कडे वेळ आहे त्यांनी अशांसाठी दोन तीन तास दिले तर त्यांची सोय होईलच शिवाय या श्रमदानामुळे वेळ सत्कारणी लागल्याचं आपल्यालाही समाधान मिळेल.

कोरोनामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालंय. शासकीय रूग्णालयांतल्या गर्दीत नवे चेहरे दिसण्याचं प्रमाणही वाढलंय. रूग्णांसोबत असणार्‍या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टा, जेवणाची व्यवस्था काही संस्था करताना दिसतात. अशा संस्थांना बळ देता येतं. हे दान आर्थिक किंवा धान्याच्या स्वरूपात देता येईल. 

रक्ताच्या अभावी अनेक रूग्णांवर उपचार होत नाहीत. आरोग्यपूर्ण व्यक्तींना नियमित रक्तदान करता येतं. नेत्रदान आणि अवयवदान हे त्यापुढचे टप्पे आहेत. अपघातात आपला मृत्यू झाला तर आपण इतरांना दृष्टी देऊ शकतो, जीवन देऊ शकतो. अवयवांच्या रूपानं सहा जणांना जीवदान देऊ शकतो.

‘काळजाचा तुकडा’ कसा दान करणार

प्रतिकूल परिस्थितीमधे स्वत:मधे बदल करून तग धरण्याचं बळ निसर्गानं प्रत्येक सजीवाला दिलंय. माणूसही त्याला अपवाद नाही, हे आपण कोरोनानं ग्रासलेल्या या दोन वर्षात अनुभवतोय. जंगी सोहळे टाळून निवडक पन्नास-शंभर लोंकामधे लग्न होऊ शकतात हे पाहिलंय आणि स्वीकारलंही आहे. परिस्थितीनं लादलेली सक्ती स्वयंस्फूर्तीनं कायम ठेवायची की पुन्हा बॅन्ड-बाजा-बारातीसह धडाक्यात लग्नं लावायची हा सर्वस्वी आपला निर्णय राहणार आहे. 

म्हणूनच लग्नातले इतर विधी करायला हरकत नाही. प्रथा किंवा विधी म्हणून दान केल्या जाणार्‍या वस्तूंच्या यादीतलं मुलीचं नाव वगळायला हवं. धार्मिक सोपस्कार किंवा रीती-रिवाज म्हणूनही आजच्या काळात कन्यादान ही संकल्पना कालबाह्यच आहे. त्यामुळे आपल्या ‘काळजाचा तुकडा’ असलेल्या कन्येचं दान होणार नाही. कधीच नाही. कारण ती काय म्हणते ते ऐकायला हवं. 

बाबा मैं तेरी मल्लिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, 
उँगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, 
इक बार देहलिज पार करा दे..

हेही वाचा: 

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने