कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

२९ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना बाधित व्यक्तीला पोलिस उचलून नेतात, हॉस्पिटलमधे टाकून देतात अशी भीती लोकांच्या मनात बसलीय. म्हणूनच कोरोनाची लागण झाली तरी घरीच कसं राहू दिलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साध्या फ्लूसारखा असतो. कोविड-१९ चा आपला हा सारा अनुभव लेखिका सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्याशी शेअर केलाय.

मी मुंबईत राहाते. त्यामुळे मी त्यापुरतंच बोलेन. कोविडची चाचणी करण्यासाठी तुम्हाला लक्षणं असण्याची गरज आहे. लक्षणं नसतील तर उगीचच वाटतंय म्हणून तुम्ही चाचणी करू शकत नाही. त्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांच्या सहीची चिठ्ठी आवश्यक आहे. प्रिस्क्रिप्शन नसताना चाचणी करता येत नाही. कोविडसाठीची काही केंद्रं सरकारनं नेमून दिलीत. कस्तुरबा, सायन हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटल्समधेच ही चाचणी होते.

सरकारी केंद्रांमधे सवलतीच्या दरात किंवा मोफत चाचणी होते. खासगी लॅबमधेही चाचणी होते. आम्ही मेट्रोपोलिस लॅबकडून चाचणी करून घेतली होती. यासाठी प्रत्येकी ४५०० रूपये खर्च आला. ज्यांना शक्य आहे आणि परवडू शकतं त्यांनी खासगी लॅबमधून पैसे भरून चाचणी करावी म्हणजे ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मोफत चाचण्या उपलब्ध राहतील.

हेही वाचा : माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

कोरोना असून घरीच कसं राहू दिलं?

काही लोकांनी आम्ही सेलिब्रिटी असल्यानं आम्हाला महापालिकेकडून चांगली वागणूक मिळाली असा हास्यास्पद दावा केलाय. पहिली गोष्ट, आम्ही कुणीही सेलिब्रिटी नाही. दुसरी गोष्ट, महापालिकेचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा प्रोटोकॉल आहे त्यानुसारच काम होतं. कुणी सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना वेगळी ट्रिटमेंट आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष असं अजिबात होत नाही.

पॉझिटिव आल्यावर तुम्हाला पोलिसांनी पकडून नेलं नाही का? तुम्हाला उचलून दवाखान्यात नेऊन टाकलं नाही का? तुम्ही सेलिब्रिटी असल्यानं तुम्हाला घरी राहायला दिलं का? असे प्रश्न लोकांनी विचारले. पॉझिटिव आलात म्हणून पोलिस कुणालाही पकडून नेत नाहीत. हे समज कुठून करून घेतलेले आहेत माहीत नाही.

नवीन प्रोटोकॉलनुसार तुमची लक्षणं सौम्य असतील, तुम्हाला कुठलीही को-मॉर्बिडिटी म्हणजे डायबेटिस, ब्लडप्रेशर, श्वासनाचे, किडनीचे आजार नसतील आणि तुमच्या घरात आयसोलेशनसाठी स्वतंत्र खोली आणि बाथरूमची सोय असेल तर घरीच राहण्याची परवानगी दिली जाते. घरात पुरेशी जागा नसेल, स्वतंत्र खोली आणि बाथरूम नसेल त्यांना रूग्णालयात किंवा आयसोलेशन केंद्रात राहायला लागतं.

बरं झालं तरी परत लागण होऊ शकते

पूर्वी कोविड पेशंट आढळले की संपूर्ण सोसायटी सील केली जायची. कारण तेव्हा संसर्ग प्राथमिक टप्प्यात होता. आता तसं नाहीय. आता एखाद्या घरात कोविड पॉझिटिव पेशंट आढळतील त्यांना घरातच राहायला सांगतात. फक्त तो मजला किंवा फ्लॅट इतरांसाठी बंद करतात. संपूर्ण सोसायटी सील करत नाहीत. हा नियम संपूर्ण मुंबईत लागू आहे. आमच्या सोसायटीला कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट दिली गेलेली नाही. आम्ही सर्वजण नियमानुसार वागतोय. आम्हाला डबे येतात ते दाराबाहेर ठेवून जातात. आमचा कुणाशीही प्रत्यक्ष संपर्क येत नाही.

एकदा कोविड होऊन गेला म्हणजे पुन्हा कधीच होणार नाही, असं नाही. कोरोना वायरसपासून होणाऱ्या संसर्गानंतर जशी १ ते दीड वर्षांची इम्युनिटी मिळते तशीच कोविड होऊन गेल्यानंतर मिळत असावी, असा समज सध्या आहे. अजूनही याबद्दल संपूर्ण माहिती नाही. आपल्याला फ्लू अनेकदा होतो तसाच हाही आजार होऊ शकतो. ही एक शक्यता आहे. एकदा कोविड झाल्यानंतर अँटिबॉडीज शरीरात तयार होतात त्यामुळे पुढच्या वेळी सौम्य इन्फेक्शन व्हायची शक्यता असते.

एकदा कोविड पॉझिटिव आल्यानंतर आणि लक्षणं दिसायला सुरवात झाल्यानंतर १०-११ दिवसांत तुमच्या शरीरात कोरोना वायरसच्या अँटिबॉडी तयार होऊ लागतात. त्यानंतरही अनेक दिवस तुमच्या शरीरात कोरोना वायरस सक्रिय असतो. पण तो दुसऱ्याला संसर्ग देऊ शकत नाही. त्यामुळे चाचणी केली तर पॉझिटिव येते. पण त्यामुळे इतरांना संसर्ग होत नाही. म्हणून कोविड निगेटिव येईपर्यंत परत परत चाचणी करत राहण्यात अर्थ नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

  

डॉ. उडवडियांचा मोलाचा मेसेज

अनेकांनी मुंबईमधल्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलचे डॉक्टर फरोख उडवडिया यांचा मेसेज शेअर करायची विनंती केलीय. तोही करतेय. ते म्हणतात,

चांगली प्रतिकार शक्ती असलेल्या सर्वसाधारणपणे ८५% लोकांसाठी कोरोना वायरसचा संसर्ग हा एखाद्या सध्या फ्लू सारखाच असू शकतो. त्यातून ते सहजतेने बरे होऊ शकतात. याचा अर्थ तुम्ही कोरोना वायरसच्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, असं अजिबात नाहीय. कोरोना वायरसच्या लक्षणांकडे पुढील टप्प्यांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन मग कोरोना चाचणीचा निर्णय घ्या. 

१) सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्यात शरीरात जर 'फ्लू' सदृश्य लक्षणं आढळली तर स्वतःला विलग करा. म्हणजे इतर लोकांमधे मिसळू नका.

२) तुमच्या शरीरात कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवेल.

३) तिसऱ्या दिवशी तुम्हाला सौम्य ताप, घशात खवखव आणि खोकल्याचा त्रास होईल.

४) चौथ्या दिवशी या लक्षणांसोबत हलक्या डोकेदुखीचा त्रास सुरू होईल.

५) पाचव्या दिवशी पोटाच्या संदर्भात काही त्रास सुरू होतील. अपचन किंवा जुलाबांचा त्रास होईल. सोबत डोकेदुखी आणि तापाचं प्रमाण कमी-जास्त होत राहील.

६) सहाव्या आणि सातव्या दिवशी अंगदुखीचा त्रास होऊ लागेल. डोकेदुखी मात्र कमी होईल. पोटाचा त्रास सुद्धा कमी-जास्त होत राहील.

७) आता यात सर्वात महत्वाचा टप्पा हा आठव्या आणि नवव्या दिवशी येईल. यात तुमचा सर्दी आणि खोकला कायम राहील. पण त्यावेळी तापाचं प्रमाण, अंगदुखी अशी लक्षणं कमी झालं आणि शरीरातली तरतरी वाढेल. असं झालं तर तुमच्या शरीरात कोरोना वायरसविरुद्धची प्रतिकार शक्ती निर्माण झालीय आणि तुम्हाला कोरोना चाचणीची किंवा काही अधिक खास उपचारांची आवश्यकता नाही.

तुमच्या शरीराने कोरोनाच्या अँटीबॉडी स्वतः तयार केल्यात. पण तुमचा त्रास अधिक वाढला आणि 'फ्लू' ची लक्षणं अधिक तीव्र झाली तर तुम्ही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना हेल्पलाईनशी संपर्क करून कोरोनाची चाचणी नक्कीच करून घेतली पाहिजे.

अजून एक महत्त्वाचं म्हणजे आवश्यकता नसताना विनाकारण एन९५ मास्कचा वापर करू नका. कारण यामुळे खरंच या प्रकारच्या मास्कची गरज असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्यांना तो उपलब्ध होत नाहीयेत.

हेही वाचा :  

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

 

मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मेलाच का साजरा केला जातो?

लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

कोरोना वायरसच्या काळात प्रत्येकाला पेशंटचे १७ हक्क माहीत असायला हवेत!

(सायली राज्याध्यक्ष या पत्रकार, लेखिका, अनुवादक असून त्यांनी आपला हा अनुभव फेसबूकवर शेअर केलाय. त्या पोस्टचा हा संपादित अंश आहे.)