समाजाच्या अंधारात विज्ञानाचा दिवा तेवत ठेवायलाच हवा

०८ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.

विज्ञानामुळेच आपण निसर्ग आणि निसर्गातल्या घटनांबाबत ज्ञान मिळवू शकतो. तसंच विज्ञान आपल्याला विचार करायची योग्य पध्दत कोणती आहे हे स्पष्ट करून देतं.

महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्रांवर काही थोड्या देशी आणि परदेशी व्यक्ती, संस्थांची मालकी असते. जनतेतल्या नेत्यांची काय घडतंय याचा बोध घेण्याची पात्रता नसते. लोकांना स्वतःसाठी काय योग्य आहे हेच ठरवता येत नाही किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं अशक्य होतं. जनता जन्मकुंडल्यांमधे मग्न होते. त्यांची टीकात्मक राहण्याची क्षमता संपते. एखाद्या गोष्टीतून लोकांना समाधान मिळतं आणि प्रत्यक्षात वास्तव काय आहे यामधे जनता फरक करू शकत नाही. तेव्हा आपण नकळत अंधश्रद्धा आणि भयानक अंधार असलेल्या जगात सामिल होतो.

जग काय आहे हे समजून घ्यायला विज्ञान बहुतांशी यशस्वी झालंय. अनेक गोष्टी समजून घेण्यात, सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यात विज्ञानाची प्रचंड मदत झालीय.

संकटं वाढली की विज्ञान कमी होतं

थॉमस अँडी नावाच्या शास्त्रज्ञाने १६५६ ला लंडनमधे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ‘कँडल इन द डार्क’ या पुस्तकात लिहून ठेवलंय की ज्ञान प्राप्त केलं नाही तर राष्ट्रं संपतील. टाळता येण्यासारखी दुःख अनेकदा आपल्या मूर्खपणामुळे निर्माण होत नसतात. तर उलट आपल्या अज्ञानामुळे आणि विशेषतः स्वतःबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण होत असतात.

समाजातली संकटं वाढत जातात, त्यानुसार समाज अंधश्रद्ध आणि सारासार विवेकहीन होण्याचा धोका खूप मोठा होतो. आपल्या धार्मिक, जमातीय ईर्षांना टंचाईच्या काळात, परकीय आक्रमणाच्या काळात आणि कट्टर भक्तपणाच्या झंझाटात जागृत केलं जातं. तेव्हा पुरातन काळातल्या चालीरिती आणि विचारसरणी जनतेच्या मानसिकतेवर आरुढ होतात.

हेही वाचा : २०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय

ज्ञान मिळवण्याचं परिपूर्ण साधन

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला समजून घेता आल्या नाहीत. आपलं विश्व अनेक शेकडो कोटी प्रकाशवर्ष अंतरावर पसरलंय. म्हणून अशी स्थिती कायमची असू शकेल. आपल्याला नेहमीच आश्चर्याचे धक्के बसत असतात. असं असूनही काही धर्मांध लेखक आरोप करतात. वैज्ञानिक असं मानतात की, त्यांना माहीतीय तेवढंच वास्तव आहे, असा त्यांचा आरोप असतो.

ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या गोष्टी वैज्ञानिक नाकारतात. पण याचा अर्थ असा नाही की वैज्ञानिक त्यांचं ज्ञान परिपूर्ण आहे, असं समजतात. ज्ञान मिळवण्याचं साधन म्हणून विज्ञान परिपूर्ण नक्कीच नाही. पण आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनांपैकी ते सर्वोत्तम साधन आहे.

विज्ञान कुणासाठी धोकादायक?

विज्ञानाच्या यशाची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक हे आहे की विज्ञानामधे चूक दुरूस्त करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते. आपण विज्ञानातल्या संकल्पनांची किंवा मांडणीची पडताळणी बाहेरच्या जगाशी जोडून करत असतो. यावर टीकात्मक दृष्टीने विचार करतो तेव्हा आपण विज्ञानाचा वापर करत असतो. मात्र आपण स्वमग्न होतो, टीकात्मक रहात नाही, वस्तुस्थिती आणि अपेक्षा याबद्दल गोंधळ निर्माण करतो, तेव्हा आपण खोट्या विज्ञानाला आणि अंधश्रद्दांना प्रेरणा देत असतो.

शुद्ध गणिताचा अपवाद वगळता विज्ञानाच्या कुठल्याही शाखेबद्दल आपण १०० टक्के ठाम नसतो. विज्ञानातल्या प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व असं सांगतं की ‘सत्ताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांवर विश्वास ठेऊ नका.’ काहींची नावं सोडली तर बहुतांश वैज्ञानिक या तत्त्वाचं पालन करतात. सत्ताधाऱ्यांची आणि नोकरशहांची अनेक विधानं ते खोटी ठरवतात.

सत्ताधा-यांनी त्यांचं म्हणणं अन्य माणसांप्रमाणे सिद्ध करणं आवश्यक आहे. पारंपरिक शहाणपण स्वीकारायला विज्ञान अनेकदा इच्छुक नसतं. यामुळे स्वतःबद्दल टीकात्मक नसणाऱ्या आणि आमचं ज्ञान हेच अंतिम ज्ञान आहे असं मानणाऱ्या विचारधारांसाठी विज्ञान धोकादायक गोष्ट ठरते.

हेही वाचा : ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?

विज्ञान नेहमीच नम्र असतं

काही व्यक्ती विज्ञानाला एकदम शिष्ठ आणि घमेंडखोर समजतात. विशेषतः अनेक पिढ्यांनी स्वीकारलेल्या एखाद्या तत्त्वाला किंवा संकल्पनेला विज्ञान चुकीचं आणि खोटं ठरवलं जातं. तेव्हा विज्ञान खूपच गर्विष्ठ ठरतं. भूकंपाच्या धक्क्यामुळे पायाखालची जमीन हादरुन जाते. त्याप्रमाणे ज्या श्रद्धांच्या आधारावर आपण जगत असतो त्यांना आव्हान दिल्यानंतर आपण अतिशय त्रस्त किंवा निराधार होतो. हे साहजिकच आहे.

पण खरं पाहता विज्ञान हे नेहमी नम्र राहिलंय. वैज्ञानिक त्यांच्या गरजा किंवा इच्छा निसर्गावर लादत नाही. उलट ते नम्रपणे निसर्गातले घटक तपासण्याचं काम करतात आणि विज्ञानाकडे अतिशय गांभिर्याने बघतात. अनेक मान्यवर वैज्ञानिकांच्या चुका अन्य वैज्ञानिकांनी शोधल्यात. वैज्ञानिकांना मानवी मर्यादांची जाणीव असते.

वैज्ञानिक कुठल्याही नवीन मांडणीची तपासणी स्वतंत्रपणे आणि शक्य असल्यास संख्यात्मक दृष्टीने करतात. ते त्या नवीन मांडणीबद्दल पर्यायी मांडणी उपलब्ध करण्याचं प्रयत्न करतात. वैज्ञानिक जेव्हा एखादी मांडणी चुकीची आहे हे खात्रीशीरपणे सिद्ध करतात, तेव्हा त्याची दखल सर्वोच्च पातळीवर घेतली जाते.

विज्ञानाचा दुरूपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी

अनेक उत्तम उदाहरणांपैकी एकच उदाहरण आपल्या समोर आहे. न्यूटन या महान वैज्ञानिकानं ३०० वर्षांपूर्वी गतीचे नियम आणि गुरूत्वाकर्षणाचा व्यस्त वर्गाचा नियमाबद्दल मांडणी केली. या नियमांचा वापर व्यवहारात अनेक उद्दिष्टांसाठी केला जातो. त्यापैकी एक उपयोग भविष्यातल्या ग्रहणांबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी होत असतो. अनेक वर्षांनंतर आणि शेकडो कोटी मैल अंतर पार पाडल्यानंतर पृथ्वीवरून पाठवलेलं अंतराळायान अपेक्षित ग्रहाच्या कक्षेत कधी पोचणार हे न्यूटनच्या शोधाचा उपयोग करून सांगू शकतो.

आईनस्टाईन या नंतरच्या महान वैज्ञानिकाने एका विशिष्ट परिस्थितीत न्यूटनचे नियम लागू होत नाहीत हे शोधलं. न्यूटनच्या नियमांत सुधारणा केली. अशी विशिष्ट परिस्थिती कमी वेळा येते ही बाब अलाहिदा. पण महान शास्त्रज्ञ न्यूटन यांनी खूप अचुकतेनं आपले नियम शोधून काढले.

विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येत नाही. समाजातले काही भाग विज्ञानाचा दुरूपयोग स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जाणीवपूर्वक करतात. याचा दोष विज्ञानाला देणं चुकीचं आहे.

विशेषतः गेल्या ६०-७० वर्षातल्या पर्यावरणाच्या विनाशाबाबत जगाला माहिती वैज्ञानिकांनीच पुरवली. हा विनाश रोखण्यासाठी काय केलं पाहिजे हेही स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करते. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.

हेही वाचा : 

सरकारी अधिकारी का व्हायला हवं?

मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

बाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार

अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!

कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?