खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

२७ मे २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.

‘कोरोना वायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी युरोपियन देशांनी तयार रहायला हवं,’ असा इशारा युरोपियन सेंटर फॉर डिसिज प्रिवेन्शन अँड कंट्रोल म्हणजेच ईसीडीसीच्या संचालक अँड्रिया आमोन यांनी द गार्डियनशी बोलताना दिला.

त्याचं म्हणणं वाचून आपल्या अंगावर काटाच येतो. दुसरी लाट म्हणजे नेमकं काय? एवढा धुमाकूळ घातल्यावर, एवढ्या लोकांना आजारी पाडून काही जणांचे जीव घेतल्यावर आणि आम्हाला लॉकडाऊनमधे बसवल्यावर अथक प्रयत्नांनी आटोक्यात येणारा हा कोरोना वायरस पुन्हा येणार? कोरोना वायरसची दुसरी लाट येणार? अशी लाट पुन्हा आली तर काय होईल? पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल? पुन्हा आधीसारखे लोक मरतील की त्यापेक्षा जास्तच मरतील?

कोरोना वायरसची सेंकड वेव म्हणजे दुसरी लाट येणार असं म्हटल्यापासून देशाची सरकारं आतून बाहेरून हादरून गेलीयत. पहिल्या लाटेतच देशाची, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी करणारा कोरोना वायरस पुन्हा परतून येणार या विचाराने सगळे चिंतातूर झालेत. पण कोरोना वायरसची दुसरी लाट येणार म्हणजे फक्त पुन्हा लोकांच्यात कोरोना वायरसचा प्रसार वाढणार, असं नाही. तर त्याचबरोबर आधीपेक्षा कोरोना वायरस जास्त धोकादायकही होईल.

हेही वाचा : कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?

जगातल्या ८५ टक्के लोकांना कोरोनाचा धोका

कोरोना वायरसची पहिली लाट म्हणजे पहिला उद्रेक झाला तो जानेवारी महिन्यात. फेब्रुवारीपर्यंत हा कोरोना वायरस जगभरात पसरला. मार्चच्या मध्यापर्यंत जवळपास सगळ्या देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. आणि कोरोना वायरसची लागण झालेले नवीन पेशंट समोर येणं बंद होत नाही तोपर्यंत सगळ्या देशांनी लॉकडाऊन तसाच ठेवला होता.

पण अजूनही काही देशांनी लॉकडाऊन कायम ठेवलाय. काही देशांनी एकदा लॉकडाऊन उघडून देश पुन्हा बंद केलाय. पण कुठल्याही देशाला फार काळ लॉकडाऊनमधे राहता येणार नाही. ते त्यांच्या अर्थव्यवस्थेला परवडणारंही नाही. पण लॉकडाऊन उघडल्यानंतर लोक पुन्हा एकमेकांत मिसळतील आणि त्यातूनच कोरोना वायरसची दुसरी किंवा अगदी तिसरीही लाट येऊ शकेल अशी भीती वैज्ञानिक व्यक्त करतायत.

अँड्रिया आमोन म्हणतात, ‘वेगवेगळ्या देशांतल्या फक्त २ ते १४ टक्के लोकांनी कोरोना वायरसविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती मिळवलीय. याचा अर्थ अजून ८५ ते ९० टक्के लोकसंख्येला कोरोना वायरसची लागण होण्याचा धोका आहे. वायरस आपल्या आसपासच फिरतोय. मला भयावह चित्रं उभं करायचं नाही पण आपण वास्तववादी व्हावं असं मला वाटतं. आपल्याकडे कोरोना वायरसपासून सुटका मिळाली असं म्हणून निवांत व्हायला अजिबात वेळ नाही.’

साथरोगाची दुसरी लाट म्हणजे काय?

वैद्यकीय भाषेत एखाद्या साथरोगाची दुसरी लाट म्हणजे वायरसचा प्रसार अचानक वाढण्याची घटना असं म्हटलं जातं. एखाद्या साथरोगाचा पहिल्यांदा उद्रेक होतो तेव्हा काही लोकांच्या एका गटाला याची लागण होते. त्यानंतर प्रसार कमी झालाय असं आपल्याला वाटतं. आणि मग लोकसंख्येच्या दुसऱ्या गटाला याची लागण सुरू होते. तेव्हा आपण वायरसची दुसरी लाट आली, असं म्हणतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लूएचओनंही कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता बोलून दाखवलीय. ‘जागतिक साथरोग हे नेहमी वेवमधे म्हणजे लाटेसारखे येतात. याचा अर्थ असा की पहिल्या लाटेदरम्यान साथरोगाची तीव्रता कमी करणं शक्य झालं अशा ठिकाणी पुन्हा काही महिन्यांनी साथरोगाचा उद्रेक होऊ शकतो. पहिल्या लाटेवेळी लावलेले निर्बंध अचानक काढले तर दुसऱ्या लाटेत आधीपेक्षा जास्त वेगाने प्रसार होण्याचीही शक्यता असते,’ असं डब्लूएचओचे आणीबाणी परिस्थितीतज्ञ डॉक्टर माईक रायन यांनी सांगितलं. २५ मेला ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याचं उदाहरण आपल्याला चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया अशा देशांमधे दिसूनही येतं. जर्मनीमधे सापडलेल्या नव्या पेशंटच्या डाटावरून या रोगाच्या प्रसाराचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. एका ठराविक लोकसंख्येत एका ठराविक काळात एखाद्या वायरसचा प्रसार किती जणांना होऊ शकतो याचा विचार करून रोगाच्या प्रसाराचं प्रमाण काढलं जातं. जर्मनीत ही गती ०.६५ वरून १.१३ झाल्याचं समोर आलंय. दक्षिण कोरियामधेही एका माणसामुळे नाईट क्लबमधल्या जवळपास १५० लोकांना एका रात्रीत लागण झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झालीय.

कोरोना वायरसला जन्म देणाऱ्या चीननं तर सगळ्या देशांच्या आधी लॉकडाऊन उघडला. मात्र दहा दिवसांपूर्वी तिथंही कोरोना वायरसचे काही नवीन पेशंट सापडल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे, आधीपेक्षा हा वायरस जास्त धोकादायक असल्याचंही समोर आलंय. याचा संसर्ग काळ म्हणजे वायरसची लागण झाल्यापासून ते त्याची लक्षणं दिसेपर्यंतचा काळ हा आधीपेक्षा जास्त वाढल्याचं लक्षात आलंय. शिवाय, ताप, खोकला ही कोरोना वायरसची प्राथमिक लक्षणंही आता या नव्या पेशंटमधे दिसत नाहीत.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

भारतात कधी येणार दुसरी लाट?

कोरोना वायरसच्या उद्रेकाची दुसरी लाट भारतातही येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जातेय. शास्त्रज्ञांच्या हवाल्यानं टाईम्स ऑफ इंडियामधे आलेल्या बातमीनुसार, भारतात जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. पण दुसरी लाट नेमकी कधी येईल, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. आपण कोरोनाला रोखण्यासाठी किती प्रभावशाली उपाययोजना करतो, त्यावर लाट कधी येईल, याचं गणित अवलंबून आहे.

द वीकच्या वेबसाईटवर पीटीआय या न्यूज एजन्सीच्या हवाल्यानं एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार, भारतात जुलै किंवा ऑगस्टमधे कोरोनाची दुसरी लाट येईल. ऐन मान्सूनच्या काळात कोविड-१९ च्या पेशंटची संख्या वाढताना दिसेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात दुसरी लाट येईल, असं सांगितलं असलं तरी ती तेव्हाच येईल, असं नाही.

भारतात किती प्रभाविपणे फिजिकल डिस्टन्सिंगचा अंमल केला जातो, तसंच भारत लॉकडाऊन कधी उठवतो, यावरही दुसऱ्या लाटेचा कालावधी अवलंबून आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रभावी अंमल करण्यात अपयश आलं, तर ही लाट अपेक्षेहून खूप लवकर येऊ शकते.

शिव नाडर युनिवर्सिटीतले गणित विभागप्रमुख समित भट्टाचार्य सांगतात, ‘जेव्हा अचानकपणे कोरोनाच्या केसेसमधे खूप मोठी वाढ होईल, तेव्हा त्या वाढीला दुसरी लाट म्हणता येईल. भारतात जुलै किंवा ऑगस्टमधे मान्सूनच्या काळात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. या काळात आपण फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम किती काटेकोरपणे पाळतो, यावर दुसऱ्या लाटेचा उद्रेक अवलंबून आहे.’

बंगळूरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधे प्रोफेसर असलेले राजेश सुंदरेसन हेही भट्टाचार्य यांच्या मताला दुजोरा देत सांगतात, ‘आपण दैनंदिन गोष्टी करण्यासाठी नेहमीसारखं घराबाहेर पडू तेव्हा कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग आणखी वाढेल. चीनमधेही प्रवासावरचे काही निर्बंध उठवल्यावर आपल्याला ही गोष्ट दिसलीय.’

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी २६ मेला इंडिया टुडे चॅनेलशी बोलताना सांगितलं,  'मुंबई शहर १० जूनला कोविड-१९ च्या एका सॅच्युरेशन पॉईंटवर असेल. पण रोजच्या वाढत्या संख्येनं घाबरून जाण्याची गरज नाही. मृत्यूदर कमी झालाय. वायरसवर आपण नियंत्रण मिळवू.'

दुसरी लाट रोखता येते

कुठल्याही साथरोगाची दुसरी लाट येते आणि ती लाट जास्त धोकादायक असते हे आपल्याला इतिहासानंही आपल्याला वारंवार दाखवून दिलंय. बीबीसी इंग्लिशच्या एका लेखामधे सांगितल्याप्रमाणे, मध्ययुगात म्हणजे साधारण १४ व्या शतकात ब्लॅक डेथ म्हणजेच प्लेग साथीचा पहिल्यांदा उद्रेक झाला. मात्र त्यानंतर प्रत्येक शतकात त्याची लाट येत राहिल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. अगदी १८ व्या शतकापर्यंत प्लेगचा पुन्हा पुन्हा उद्रेक होत होता.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगभरात आणि भारतातही इन्फ्लुएन्झा किंवा स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. जगभरातल्या एक तृतीयांश लोकांना या फ्लूची लागण झाली. याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी या रोगाच्या दुसऱ्या लाटेनं आधीपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी आत्तासारख्या चांगल्या वैद्यकीय सुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध नव्हतं.

आता आपल्याकडे ते उपलब्ध आहे. त्यामुळेच अगदी काही वर्षांपूर्वी उद्रेक झालेल्या सार्स आणि मर्ससारख्या वायरसची दुसरी लाट येण्यापासून आपण वाचू शकलो. पण हे वायरस आत्ताच्या कोरोना वायरसपेक्षा कमी वेगाने पसरत होते, हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, २००८ मधे स्वाईन फ्लूची दुसरी लाट आली होती आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

R0 नंबर एकपेक्षा कमी करावा लागेल

आत्तापर्यंत आलेला प्रत्येक वायरस हा वेगळा होता. प्रत्येक वायरसचं वैशिष्ट्य आणि त्याची माणसाला हल्ला करण्याची पद्धतही वेगवेगळी होती. कोणतेही दोन वायरस एकसारखे नसतात तसेच कोणत्याही दोन वायरसमुळे होणारा आजारही सारखा नसतो. पण सगळ्या संसर्गजन्य रोगांमधे एक गोष्ट सारखी असते आणि ती म्हणजे माणसाचा माणसाशी संपर्क आल्याने साथरोगाचे वायरस पसरतात.

म्हणूनच कुठल्याही वायरसची अगदी आपल्या कोरोना वायरसची दुसरी लाट थांबवायची असेल तर एक माणसाकडून दुसऱ्या माणसाला त्याची लागण होणार नाही, याची पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावी लागेल. थोडक्यात कोरोना वायरसचा R0 म्हणजेच आरनॉट आपल्याला एकपेक्षा खाली ठेवायचाय, असं या बीबीसी स्टोरीत म्हटलंय.

एखाद्या साथरोगात वायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे साधारणपणे किती लोकांना लागण होऊ शकते हे दाखवण्यासाठी या R0चा वापर केला जातो. सध्या कोरोना वायरसबाबतीत हा R0 भारतात १.२९ इतका तर जगात ५.७ इतका सांगितला जातो. हा R0 एकपेक्षा कमी होईल तेव्हाच कोरोना वायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे दुसऱ्या माणसाला कोरोनाची लागण होणार नाही. साहजिकच, साथरोग पूर्णपणे आपल्यातून गेला, असं म्हणता येईल.

हेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

बचावाची त्रिसुत्री

आनंदाची गोष्ट अशी की, आरनॉट नंबर एकपेक्षा कमी ठेवण्यासाठी नेमकं काय करायचंय हे आपल्याला आधीच माहीत झालंय. तेच उपाय आपण आणखी जोराने केले पाहिजेत. त्यातले तीन मुख्य उपाय म्हणजे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाईन.

दक्षिण कोरियाला कोरोना वायरसविरोधात लढणारं रोल मॉडेल म्हणून ओळखलं जातं. मात्र आता तिथेही कोरोना वायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट येऊ नये म्हणून दक्षिण कोरिया काय पावलं उचलतेय याची माहिती डीडब्लू न्यूजचे दक्षिण कोरिया प्रतिनिधी फ्रॅंक स्मिथ यांनी दिलीय. ते म्हणतात, ‘दक्षिण कोरियानं टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन हे तीन उपाय करून याआधीही संसर्ग रोखून दाखवला होता. आताही दक्षिण कोरिया हेच उपाय करणार आहे.’

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना वायरसची लागण झालेला एक माणूस आणखी किती जणांच्या संपर्कात आला असावा याचा शोध घेणं. त्या सगळ्या लोकांची टेस्टिंग म्हणजे कोरोना वायरसची लागण झालीय की नाही याची तपासणी करणं. आणि तिसरं म्हणजे, तपासणी केलेल्या लोकांना क्वारंटाइन करणं हे तीन उपाय मोठ्या प्रमाणावर करत राहिल्याने कोरोना वायरसची दुसरी लाट येण्यापासून थांबवलं जाऊ शकतं. 

थंडीत दुसरी लाट येईल?

कोरोना वायरसची लागण झालेले आणि त्यातून बरं झालेल्या लोकांमधे या वायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असते. आता ही प्रतिकारक शक्ती आयुष्यभर टिकते की काही काळच टिकते यावरही संशोधन सुरू आहे. कारण रोगप्रतिकार शक्तीचा काळ संपला तर पुन्हा एकदा वायरसची लागण त्यांना होऊ शकते, असं काहींचं म्हणणं आहे.

सोबतच, हा वायरस एखाद्या ऋतुमधे जास्त सक्रिय होतो का हेही तपासून पहावं लागेल. वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार, थंडीच्या दिवसात साध्या फ्लूचं प्रमाण वाढतं तेव्हा कोरोना वायरसची भीती जास्त गडद होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. बर्फ पडणाऱ्या देशांमधे थंडीच्या दिवसांत कोरोना वायरस जास्त सक्रिय होईल, असं यात सांगण्यात आलंय. त्यावेळी काय विशेष काळजी घ्यायची यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील.

शारीरिक अंतर पाळणं, तोंडाला मास्क बांधणं आणि सतत आपले हात साबणाने धुत राहणं खूप महत्त्वाचं आहे. या तीन गोष्टी केल्याने कोरोना वायरसची लागण होण्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. पण, लॉकडाऊन संपल्यावर हे उपाय करणं अवघड जाऊ शकतं. विशेषतः भारतासारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या म्हणजे कमी जागेत जास्त लोक राहत असलेल्या देशात शारीरिक अंतर पाळणं अशक्य होतं. त्यामुळेच कोरोनावरची लस निघाल्यावरच किंवा सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी विकसित झाल्यावरच हा कोरोना वायरस पुर्णपणे आपली पाठ सोडेल.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

मुख्यमंत्री ठाकरेंना तोंडाला मास्क लावलेल्या तरुणाचं अनावृत्त पत्र

लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय