किसन पाटील : खानदेशात साहित्य चळवळ रुजवणारे प्राध्यापक

१४ मार्च २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी.

जळगावच्या बाहेती महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन पदवीधर झालो. पदव्युत्तर शिक्षणासाठी मू.जे.महाविद्यालयात आलो. मार्क जेमतेम होते म्हणून अनुदानीत तुकडीला प्रवेश मिळाला नाही. विनाअनुदानीतची फी परवडणारी नव्हती. माझा मित्र मोरेश्वर सोनार आणि मी खूप विचार करून निर्णय घेतला. मराठीचा नाद सोडायचा. पत्रकारिता करायची. झटपट नोकरी मिळेल हाही हेतू होता.

एमसीजेसाठी प्रवेश परीक्षा दिली. पास झालो. त्याचीही फी कशी भरायची याची चिंता लागलेली. पत्रकारिताचे वर्ग सुरू व्हायचे होते. एमए मराठीचे वर्ग नियमित सुरू झालेले. आम्ही जाऊन बसलो. धनराज धनगर, विनोद भालेराव हे आमचे गावातले मित्र. यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही शिकत होतो. पदवीला मराठी विषय यांच्यामुळेच घेतला होता. किसन पाटीलांविषयी यांच्याकडून खूप ऐकून होतो. 

सरांच्या तासाला बसलो. त्यांच्या विद्वात्तेची प्रचिती झाली. तासभर एक वेगळ्या विश्वात फिरून आलो. हरवून गेलो. आम्ही नियमित यायला लागलो. सरांना शंका विचारायला लागलो. चर्चा करायला लागलो. सरांची मुलगी ममता याच वर्गात भेटली. ती आमची मैत्रीण बनली. तिच्याकडून आमची हकीकत सरांना कळली. त्यांनी आम्हाला ऑफिसमधे नेलं. आम्हा दोघांचे प्रवेश अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरले आणि केवळ शंभर रुपये भरून एमए मराठीच्या अनुदानित तुकडीत राखीव जागांमधे आमचा प्रवेश झाला.

हेही वाचा : बगळा : बोकील, संतांना न सापडलेली शाळा भेटवणारी कादंबरी

चित्रकलेमुळे संकल्पना कळाल्या

छोट्या गावातून छोट्या कॉलेजातून आलेल्या आमच्यासारख्या खेडुतांसाठी हा समुद्र होता. इथलं ग्रंथालय तर महासागरचं जणू. महाविद्यालयात सरांचा सगळीकडे दरारा होता. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून अनेक मुलं शिकायला यायची. सर काहींना मासिक बस पाससाठी तर कधी परीक्षा फीसाठी मदत करत. आम्ही कमवा शिका योजनेत काम करू लागलो. वाचनाची आवड पाहून त्यांनी मला ग्रंथालयात काम मिळवून दिलं. दोन वर्ष मी या समुद्रात मुक्त पोहत राहिलो. पुस्तकांच्या अजब दुनियेत हरवलो.

अनेक साहित्यिक त्यांना भेटायला येत. कुणी पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी तर कुणी पुस्तकावर परीक्षण लिहावं म्हणून भेटायला येत. त्या नवनव्या पुस्तकांवर ते आमच्याशी चर्चा करत. प्रस्तावना आणि पुस्तक परीक्षण तर ते एकटाकी लिहून काढत. आम्हा विद्यार्थ्यांना स्थानिक साहित्यिक कार्यक्रमात घेऊन जात. पुण्या-मुंबईला गेलेले सर प्रवास करून कीतीही थकलेले असले तरी ते सकाळी पहिल्या लेक्चरला हजर असत.

सरांनी तासाला दांडी मारली कधी घडलं नाही. उपस्थितीत नसलेल्या प्राध्यापकांच्या तासिका तर ते घ्यायचेच पण बऱ्याचदा तास संपल्याचं भान न आल्याने सर पुढचा तासही सलग घेत. त्या तासाचे प्राध्यापक बाहेर ताटकळत उभे राहत. फळा आणि खडूचा पुरेपूर वापर ते करत. चित्रकार असल्यामुळे अक्षर तर सुंदर होतंच. पण एखादी संकल्पना आकृतीच्या माध्यमातून ते समजावून सांगत त्यामुळे कठीण गोष्ट सहज आकलन होई.

गणित, विज्ञानाचाही अभ्यास

सरांचे केस पांढरेशुभ्र होते. खडूच्या अतिवापरामुळे त्यांचे केस पांढरे होत असावेत असं आम्ही गमतीने इतरांना सांगायचो. खडूच्या पांढूरक्या धुळीकणांमुळे त्यांना घश्यात इन्फेक्शन व्हायचं. डॉक्टरांनी त्यांना खडूचा वापर कमी करा म्हणून सुचवलं होतं. कामचुकार प्राध्यापकांना ते कायम शिव्या देत. तासाला घरच्या गोष्टी सांगणाऱ्या किंवा खुर्चीत बसून नोट्स लिहून देणाऱ्या प्राध्यापकांविषयी त्यांना चीड होती. 

गणित, विज्ञान सामाजिकशास्त्रं विषयांचा त्यांचा अभ्यास असल्याने सगळ्या शाखांच्या प्राध्यापकांमधे त्यांचा वावर असे. बोलता बोलता केव्हाच सर आपली विकेट घेतील म्हणून त्यांच्या बोलण्यात कुणीही उडी घेत नसत. भल्या भल्यांची भंबेरी उडे त्यांच्यासमोर.

हेही वाचा : कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

मानधनाचं पाकीट स्पर्धकाला दिलं

जुन्या स्कुटरवर शिव कॉलनीतून सर कॉलेजात येत. येण्याचा वेळ निश्चित होता पण जाण्याचा नाही. लिहिणाऱ्यांविषयी त्यांना आदर होता. हा प्रस्थापित किंवा नवोदित लेखक असा भेद ते करत नसत. तोंडावर ते कुणाचंही मनभरून कौतुक करत नसत. आवडलं तर मनभरून दाद देत. 

एकदा वक्तृत्व स्पर्धेत परीक्षण म्हणून गेलेल्या सरांना एका विद्यार्थ्याचं भाषण आवडलं तर त्यांना मिळालेलं मानधनाचं पाकीट त्या विद्यार्थ्याला देऊन टाकलं. त्यांच्या बरोबरीच्या प्राध्यापकांशी त्यांचं कधीच बनलं नाही. वक्तशीरपणा त्यांनी कायम पाळला. कुठे कार्यक्रमाला पाहुणे म्हणून निमंत्रित असतील तर ते वेळेच्या आधीच पोचलेले असायचे. आपल्यामुळे कार्यक्रम खोळंबू नये याची त्यांना काळजी असायची. 

शिक्षणातल्या भ्रष्टाचाराची चीड

प्राध्यापकीची शेवटची काही वर्ष ते अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयात प्राचार्य होते. या काळात खानदेशातील साहित्य चळवळीचे ते केंद्र बनले. अनेक उपक्रम त्यांनी राबवले. साहित्यिक कार्यक्रम घेतले. बाहेर कोणत्याही कामाचं मानधन मिळालं की ते एका डब्यात जमा करत त्यातून गरीब, होतकरू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करत.

प्राचार्य म्हणूनही ते फारसे रमले नाही. त्यांचा स्वभावही त्याला जबाबदार होता. खोटी स्तुती करून समोरच्याला अज्ञानात ठेवणं त्यांना पसंत नव्हतं. कुठे प्रमुख पाहुणा म्हणून गेलेले सर आयोजकांवरही भाषणातून धारेवर धरत. पुस्तक प्रकाशनाला तर लेखकालाच कुठे कमी पडलात ते सांगून कानमंत्र देत.

हे सगळं माहीत होतं म्हणून मी भीत भीत माझ्या कविता त्यांना वाचायला दिल्या. त्यांनी आवश्यक ते बदल करून त्या कविता थेट शो-केसमधे लावल्या आणि माझी ओळख कॉलेजमधे 'कवी' म्हणून झाली. 

विभाग प्रमुख असताना त्यांनी आम्हाला साहित्यिक उपक्रमांना अनेक ठिकाणी पाठवलं. त्यानिमित्तानेच बाहेरच जग कळलं. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध हुद्द्यांवर असल्याचं त्यांना फार समाधान वाटे. पण तासिका तत्वावर काम करणाऱ्या तसंच गुणवत्ता असूनही मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांविषयी कळवळा वाटे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविषयी ते जाहीर बोलून नाराजी व्यक्त करत.  

हेही वाचा : स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

खानदेशात रुजवली साहित्य चळवळ

सरांनी खानदेशातली अनेक कवी लेखकांना लिहितं केलं. भाषा, साहित्य आणि विविध कलांकडे एका वेगळ्या दृष्टीने ज्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना बघायला शिकवलं. स्वतःला मोठ्या संघर्षातून सिद्ध करत केजी ते पीजी अशा सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं. रावेर तालुक्यातल्या वाघोड सारख्या छोट्या खेड्यातुन शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राध्यापक - विभागप्रमुख - अधिष्ठाता ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

सरांच्या तासाला बसलो की विषयाचं आणि विषयबाह्य कितीतरी ज्ञान मिळे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं उत्तम उदाहरण म्हणजे किसन पाटील सर. तत्वनिष्ठा, वक्तशीरपणा, स्पष्टोक्तेपणा, बहुश्रुतता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख गुण आहेत. लोकसाहित्याचे ते गाढे अभ्यासक.

स्वतःची समीक्षेची, कवितेची आणि संपादित डझनभर पुस्तकं आहेत, शेकडो पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या. विविध साहित्यिक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी खानदेशात साहित्य चळवळ रुजवली. २००६ मधे त्यांनी भरवलेलं 'बोली साहित्य संमेलन' कायम स्मरणात राहील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी पूर्णवेळ साहित्य आणि समाजसेवेचा वसा चालू ठेवला होता.

खानदेशातली साहित्यिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान मोठं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. सरांच्या मार्गदर्शनामुळे मी लिहिता झालो. साहित्य चळवळीत सक्रिय झालो. माझ्या प्रत्येक कृतीच्या पाठीशी सर होते. सरांच्या जाण्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सर गेलेत यावर विश्वास बसत नाही. सरांचा आदरयुक्त धाक कायम राहील.

हेही वाचा : 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह