सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात.
महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतले एक प्रतिभासंपन्न कवी, एक उत्तम प्राध्यापक, शाहिरी कलेचे अभ्यासक म्हणून शाहीर प्राध्यापक कुंतिनाथ करके यांची महाराष्ट्रभर ओळख होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या हेरले या गावी १० एप्रिल १९३६ ला त्यांचा जन्म झाला.
लहानपणापासूनच लोकगीते, पोवाडे लिहिण्याची त्यांना आवड होती. उपजत गोड आवाज, बोलके डोळे, मिश्किल आणि विनोदी स्वभाव, समाजाचं सूक्ष्म अवलोकन, सतत वाचन, प्रासादयुक्त ओजस्वी काव्यरचना, उत्तम भाषा, स्पष्ट शब्दोच्चार आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे शाहिरी क्षेत्रात प्राध्यापक करके यांनी मानाचं स्थान मिळवलं.
हेही वाचा : ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया
कॉलेजमधे असतानाच ‘चल जाऊ कोल्हापुरी’ ही सुप्रसिद्ध लावणी त्यांनी लिहिली. ती १९५६ ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानात सादर केल्यानंतर त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी लिहून शाहिरी साहित्य परंपरेत त्यांनी मोलाची भर घातली.
त्यांची ‘पाझर,’ ‘चैत्रपालवी,’ ‘कांचन कुंभ,’ ‘जलधारा’ हे काव्यसंग्रह, तर ‘रणझुंजार,’ ‘शाहिरी झंकार,’ ‘रंगदार लावण्या,’ ‘नवा शाहीर,’ ‘मानाचा मुजरा’ हे शाहिरी काव्य उल्लेखनीय आहे. ‘खुळं पेरलं, येडं उगवलं’ हे त्यांचं नाटक गाजलं. सोंगड्या सिनेमातलं ‘बिब्ब घ्या’ हे त्यांचं गीत गाजलं. ‘रंगू बाजाराला जाते,’ ‘औंदा लगीन करायचं,’ ‘बोला दाजीबा,’ ‘सख्या सजना,’ ‘बायको आली बदलून,’ ‘अन्याय,’ ‘प्रतिकार,’ ‘सुळावरची पोळी’ या चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं.
हेही वाचा : आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत १९५९ ते १९९४ या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून काम केले. १ मे १९९४ ला ते निवृत्त झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. शाहीर करके यांचे कार्यक्रम प्रामुख्याने शालेय क्षेत्रात आणि मध्यमवर्गीय जनसमूहात अत्यंत प्रभावशाली आणि छाप टाकणारे ठरायचे.
‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत आणि ‘गणुचा गोंदा सोडूनी धंदा रिकामा गावातन फिरतोय रं, आईकडं रुपया मागतोय रं’, हे त्यांचं गाणं तर अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी शिवचरित्रावर, राजपूत वीरांवर, पेशवाई काळावर अनेक पोवाडे लिहून प्रकाशित केले. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे अशा स्वातंत्र्यवीरांच्या विषयांबरोबरच भगवान महावीर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा बसवेश्वर, महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही पोवाडे लिहून पुस्तके आणि कॅसेट रूपाने प्रकाशित केलेत.
हेही वाचा : म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!
त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले. १९६९ ला महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या शनिवारवाड्यासमोरच्या अधिवेशनात, १९७० ला शिवाजी पार्क मुंबई, कोल्हापुरातील शाहू महोत्सव, पाचड इथं शिवराज्याभिषेक महोत्सव अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपले शाहिरी कार्यक्रम बहारदाररीत्या सादर केले.
आकाशवाणी पुणे केंद्रावर गायक म्हणून, तर आकाशवाणी सांगली केंद्रावर कलाकार निवड समिती सदस्य म्हणून त्यांनी सन्मानपूर्वक काम पाहिलं. ‘मायबोली’ या शिवाजी विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश झालाय. विशेष सन्मानाची बाब म्हणजे ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनं त्यांचे पोवाडे आणि शाहिरी कवने ध्वनिमुद्रित केलीयत.
व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा, कॉलेजमधून ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना शाहिरी कलेची ओळख करून दिलीय. शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त झाल्यावरही पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच शाहिरी लिखाण, कार्यक्रम, व्याख्याने आदी त्यांचे उपक्रम सुरूच होते.
हेही वाचा :
यशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा
गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
(लेखक शाहीर आहेत.)