लंडनची संसद बांधणाऱ्या 'शंकुतले'ला फसवू नका

१९ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये.

इंग्लंडसह युरोपमधे झालेल्या औद्योगिक क्रांतीला कच्चा माल पुरवण्यासाठी वसाहतवादाचा सारा डाव रचण्यात आला. त्यात कापड गिरण्यांचा वाटा फार मोठा होता. कापडनिर्मितीमधे मँचेस्टरला जगभरात मोठं नाव मिळालं. पण, या कपड्यासाठी कापूस जात होता तो महाराष्ट्रातल्या विदर्भातून. हा कापूस आणि इतर उत्पादनं बंदरापर्यंत आणण्यासाठी इंग्रजांनी भारतात रेल्वेचं जाळं विणलं. 

विदर्भातल्या कापसासाठी अचलपूर ते यवतमाळ या मार्गावर त्यांनी १९०३ मधे एक नॅरोगेज रेल्वे उभारली. तिचं पुढे जाऊन नाव पडलं शकुंतला एक्स्प्रेस. स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाईंच्या नावावरून गाडीला हे नाव पडलं असं सांगितलं जातं. पण, या नावापेक्षाही ही रेल्वे वऱ्हाडभागातल्या लोकांना परवडणारी वाहतूक सेवा म्हणून प्रचंड लोकप्रिय ठरली. आज ती बंद पडल्यानं, इथल्या जनतेचं प्रचंड नुकसान होतंय.

शकुंतला एक्स्प्रेस महत्त्वाची कारण

भारतातली रेल्वे ही इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केली, ही निर्विवादपणे सिद्ध झालेली गोष्ट आहे. पण, त्याचा फायदा इंग्रजांइतकाच भारतीयांनाही झाला. शकुंतला एक्स्प्रेसनं अनेक उत्पादनं युरोपात गेली तरीही, त्यातून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमुळे विदर्भातल्या जनतेला दिशा मिळाली. जंगलात राहणाऱ्या स्थानिकांसाठी प्रवासाची आणि रोजीरोटीची मोठी व्यवस्था या रेल्वेमुळे साधली, हेही नाकारता येत नाही. त्यामुळेच या रेल्वेला 'वऱ्हाडवासियांची जीवनरेखा' म्हणून ओळखलं जात होतं.

शंकुतला एक्स्प्रेसमुळे मेळघाटाच्या कुशीतला दुर्गम भाग मुख्य मार्गाशी जोडला गेला. त्यामुळेच मेळघाट, यवतमाळ इथल्या आदिवासी, शेतकरी, मजूर यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या रेल्वेचा मोठा वाटा आहे. पण जवळपास गेली चार वर्ष ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे स्थानिकांना प्रवासासाठी वणवण करावी लागतेय. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे ग्रामीण भागातलं अर्थकारणाचं गणित पुरतं कोलमडल्यानं, सर्वसामान्य जनतेनं कोणाकडे न्याय मागायचा, हेच कळेनासं झालंय.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

'इतिहास' म्हणून शकुंतला जपा

शकुंतला एक्स्प्रेस ही रेल्वे जशी गोरगरिबांसाठी महत्त्वाची आहे, तशीच ती इतिहास म्हणून जपणंही महत्त्वाचं आहे. जसं या रेल्वेनं इंग्लंडला वैभवाचे दिवस दाखवले, तसंच तिनं भारतालाही खूप काही दिलंय. आज विदर्भातून शिकून जगभर गेलेल्या अनेकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात याच रेल्वेनं प्रवास केला आहे. महात्मा गांधी हेही १९३० च्या दरम्यान अचलपूरच्या पथ्रोट इथं शकुंतला एक्स्प्रेसनं आले होते. 

या रेल्वेचे पूल, स्थानकं, सिग्नल यातल्या अनेक गोष्टी इंग्लंडमधे बनलेल्या आहेत. १९२१ मधे ब्रिटनच्या मँचेस्टर इथं बनवण्यात आलेल्या वाफेच्या इंजिनावर ही रेल्वे तब्बल ७० वर्ष धावत होती. या रेल्वेमार्गावरचा सिग्नलही ब्रिटिशकालीन असून, त्यावर 'मेड इन लिवरपूल' असं लिहिलेलं आजही वाचता येतं. १९९४ पर्यंत ही रेल्वे वाफेच्या इंजिनावर चालायची. त्यानंतर या गाडीला डिझेल इंजिन लावण्यात आलं. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला तर, ही ऐतिहासिक रेल्वे आहे. त्यामुळे उटी, सिमला, माथेरानसारखी 'विंटेज रेल्वे' म्हणूनही ही रेल्वे महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने विचार केला तर ऐतिहासिक ठेवाही जतन करता येईल आणि विदर्भातल्या सर्वसामान्यांची प्रवासाची सोयही होईल, असं मत शंकुतला बचाव सत्याग्रह समितीतले अग्रणी विजय विल्हेकर यांनी व्यक्त केलंय.

इंग्रजांनी सुरू केली, स्वकियांना बंद

१८५३ला तैनाती फौजेच्या खर्चासाठी वऱ्हाडचा सुभा ५० वर्षांसाठी निजामानं ब्रिटिशांना देऊ केला. वऱ्हाड म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा हे चार जिल्हे. पूर्वी वाशीम जिल्हा हा अकोला जिल्ह्याचाच भाग होता. या चार जिल्ह्यात कापसाचं मुबलक उत्पादन होत असे. हा कापूस युरोपात पाठवण्यासाठी तो आधी मुंबईत न्यावा लागायचा. त्यासाठी अकोला, मूर्तिजापूर यासारख्या ब्रॉडगेज असलेल्या रेल्वेस्टेशनवर आणणं गरजेचं होतं. त्यासाठी ही नॅरोगेज उभारण्यात आली.

शंकुतला एक्स्प्रेसबाबत आतापर्यंत सर्वात चर्चिलेली गोष्ट कोणती असेल, तर या रेल्वेमार्गावर असलेल्या ब्रिटनमधल्या खासगी कंपनीसोबत असलेला करार. क्लिक-निक्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीने शकुंतला रेल्वेची स्थापना केली. त्यानंतर सेंट्रल प्रोविन्सेस रेल्वे कंपनी हा मार्ग सांभाळत होती. स्वातंत्र्यानंतर देशातल्या संपूर्ण रेल्वेचं राष्ट्रीयीकरण झालं, पण हा रेल्वेमार्ग इंग्रजांकडेच राहिला, असं बोललं जातं.

त्याबद्दल भारतीय रेल्वे, इंग्लंडमधल्या कंपनीला अजून रॉयल्टी देते, असंही बोलतात. प्रत्यक्षात मात्र यासंदर्भातले कोणतेही कागदपत्र अद्यापही सार्वजनिक झालेले नाहीत. तसंच ही रेल्वे ज्या जमिनीवर आहे, त्या जमिनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर अद्यापही शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यामुळे या रेल्वेची नक्की मालकी कुणाची, याबद्दल संभ्रमाची परिस्थिती आहे. हे सगळं मार्गी लावणं भारतीय रेल्वेला अवघड नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी, दिल्लीतल्या रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात पारदर्शकरित्या लोकांपुढे यायला हवं.

हेही वाचा: झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार

शकुंतलेला ब्रॉडगेजचं आश्वासन

इंग्रजांचं पारतंत्र्य संपलं असून, फक्त आर्थिक कारणांसाठी ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. या मार्गावरचे पूल, रस्ते सुस्थितीत आहेत. फक्त सरकारी दिरंगाईमुळे सर्वसामान्यांची अडचण होत असल्याचं, या भागातल्या नागरिकांचं मत आहे. लोकांच्या प्रवासाचं परवडणारं गणित लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. इंग्रजांच्या जाचातून सुटलो तरी अद्याप स्वकियांच्या वनवासात शकुंतला का? असा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे.

शंकुतला एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींबद्दल, ग्रामीण जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोचवण्यासाठी  शंकुतला बचाव सत्याग्रह समिती स्थापन झाली. या समितीने आजवर पत्रव्यवहार, अहवाल, आंदोलनं करत हा विषय लावून धरला आहे.  आता या आंदोलकांना रेल्वेकडून असं सांगण्यात येतंय की, आम्ही या रेल्वेमार्गाचं ब्रॉडगेजमधे रुपांतर करू आणि ही रेल्वे सुरू करू. हे सारं कधी होईल, याबद्दल मात्र निश्चित काहीच सांगितलं जात नाहीय.

यासंदर्भात आमदार हरीश पिंपळे यांनी केलेल्या पत्रव्यवहारावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्राद्वारे उत्तर दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, मूर्तिजापूर-यवतमाळ आणि मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरोगेज मार्गाचं प्रमाणभूत रुपांतर करून ही रेल्वे सुरू करण्यात येईल. या प्रमाणभूतीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

ब्रॉडगेजला विरोध नाही, पण

आता नॅरोगेजमधे असलेला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याबद्दल रेल्वे करत असलेला विचार हा अभिनंदन करावा असाच आहे. पण, या सगळ्या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे गेज कन्वर्जन होईपर्यंत शकुंतला एक्स्प्रेस आहे. त्या परिस्थितीत सुरू करावी. लोहमार्गावर वाढलेली झाडं, झुडपं काढून लोहमार्ग सुरळीत करावा, असं मत बचाव समितीतले सत्याग्रही प्रकाश बोनगिरे यांनी व्यक्त केलंय.

एकंदरीतच ही रेल्वे ब्रॉडगेज झाली तर त्याला लोकांचा विरोध असण्याचं कोणतंच कारण नाही. पण, आता रेल्वेच सुरू नसल्यानं होणारे हाल अधिक आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सोपी पावलं उचलत लोकांच्या प्रश्न सोडवण्याला प्राथमिकता देणं गरजेचं आहे. 

खरं तर, रेल्वेच्या नियमानुसार ताशी ४२ किलोमीटर वेग असलेल्या रेल्वेला एक्स्प्रेस म्हणतात. पण शकुंतला ताशी २० किलोमीटरच्या वर कधी गेलीच नसेल. ती इतकी हळू धावायची की, अनेकजण चालत्या गाडीतूनही चढउतार करायचे. त्यामुळे तिला गमतीनं एक्स्प्रेस हे नाव पडलं आणि तेच रुढ झालं. नावापासून फसवणूक वाट्याला आलेल्या या रेल्वेला आता पुन्हा ब्रॉडगेजच्या नावानं फसवलं जाऊ नये, एवढीच विदर्भातल्या जनतेची अपेक्षा आहे.

हेही वाचा: 

'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?

सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?

नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण

इन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल?