भगवान श्रीरामाच्या लोकोत्तर चरित्रामधे त्याच्या कुटुंबातल्या अनेकांचा स्पष्ट उल्लेख संस्कृत आणि प्राकृत रामायणांमधून मिळतो. पण दशरथ आणि कौसल्याची मोठी मुलगी तसंच श्रीरामाची मोठी बहिण असलेल्या शांताविषयी असं दिसत नाही. रामायणातल्या या काहीशा उपेक्षित पण महान स्त्रीविषयी सांगणारा हा लेख.
को न्वस्मिन्सांप्रतं लोके गुणवान्कश्च वीर्यवान।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः॥
महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणामधला हा दुसरा श्लोक आहे. त्यात ते महर्षी नारदांना विचारतात की सध्याच्या काळात पृथ्वीवर गुणवान, बलशाली, धर्मज्ञ, कृतज्ञ अशी लोकोत्तर व्यक्ती कोण आहे? या श्लोकावरूनच असं समजून येतं की महर्षी वाल्मिकींनी त्यांच्या समकालिन असलेल्या श्रीरामाच्या चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून, त्यांना स्फुरलेल्या अनुष्टुभ छंदात ते काव्यबध्द केलं.
श्रीरामाचं जुळे पुत्र लव आणि कुश हे वाल्मिकींच्याच आश्रमात जन्मले आणि वाढले. या रामपुत्रांनाच त्यांनी रामायण शिकवलं. आदिकवी वाल्मिकींच्या रामायणानंतर संस्कृत आणि प्राकृत भाषांमधे अनेक रामायणं लिहिली गेली.
अयोध्येचा राजा दशरथ यांच्या राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या चार अलौकिक पुत्रांविषयी वाल्मिकी रामायण आणि इतर काही रामायणांमधून आपल्याला सविस्तर माहिती मिळतेच, पण भगवान श्रीरामाला एक थोरली बहिणही होती हे अनेकांना माहिती नसतं. दशरथ आणि कौसल्या यांच्या या थोरल्या कन्येचं नाव शांता. दशरथाचा मित्र असलेला अंग देशाचा राजा रोमपाद याने तिला दत्तक घेतलं होतं आणि विभांडक ऋषींचे पुत्र ऋष्यशृंग यांच्याशी तिचा विवाह झाला होता.
रामायणात नारीशक्तीचं प्रतिकच असलेल्या अनेक महिलांचं वर्णन आहे. अगदी माता कौसल्यापासून ते देवी सीतेपर्यंत तसंच ऊर्मिला, तारा, मंदोदरी अशा अनेक महिलांची माहिती आपल्याला रामायणातून सहज मिळते, पण प्रत्यक्ष श्रीरामांची थोरली बहिण असलेल्या शांताविषयी पण फारशी माहिती मिळत नाही.
दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं त्यावेळी त्याचं पौरोहित्य करण्यासाठी म्हणून ऋष्यशृंग यांना पाचारण करण्याचं ठरलं. ऋष्यशृंग ऋषींच्या निमित्ताने राजा रोमपाद आणि शांता यांचा नामोल्लेख वाल्मिकी रामायण आणि इतर काही रामायणांमधून मिळतो. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातल्या दहाव्या सर्गात तिच्याविषयी अतिशय जुजबी माहिती मिळते.
विशेष म्हणजे ती दशरथाचीच कन्या आहे असा तिथं कुठेही उल्लेख नाही. तिचा उल्लेख अंग देशाचा राजा रोमपाद याची कन्या असाच आहे. आपल्या राज्यातला दुष्काळ हटवण्यासाठी राजा रोमपादाने अरण्यातल्या आश्रमातून ऋष्यशृंगाला युक्तीने पाचारण केलं होतं. त्याच्या नुसत्या आगमनानेच पावसाचं आगमन होईल असा सल्ला त्याला देण्यात आला होता.
विभांडक ऋषींना उर्वशीपासून झालेला हा मुलगा जंगलातच जन्मला आणि तिथंच वाढला. त्याने तरुण वयात येईपर्यंत स्त्रीदर्शनही घेतलं नव्हतं. त्यामुळे राजा रोमपादाने पाठवलेल्या स्त्रियांना भुलून तो त्यांच्या पाठोपाठ अंगदेशात आला आणि या शुभागमनाने तिथं पावसाचंही आगमन झालं. त्यानंतर विभांडक ऋषींना राग येऊ नये म्हणून राजाने आपली कन्या शांताचा ऋष्यशृंगांशी विवाह लावून दिला.
हेही वाचा: अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
पुढे दशरथाने शांतासह ऋष्यशृंगांना अयोध्येत बोलावून त्यांच्या पौरोहित्याखाली शरयुकाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. श्रीमद् भागवत पुराणाच्या नवव्या स्कंधातही रामकथा आहे. तिथंही तिचा उल्लेख अशाच स्वरुपाचा आहे. महाभारतात पण राजा रोमपाद याने आपला मित्र दशरथाची कन्या दत्तक घेतल्याचा उल्लेख आहे. त्यानंतरच्या साहित्यात ही कन्या म्हणजेच शांता असे उल्लेख येऊ लागले. विशेषतः प्रादेशिक भाषांमधून, लोकसाहित्यामधून असे अनेक उल्लेख आढळतात.
तेलुगू लोकगीतांमधेही तिचे उल्लेख आहेत. रामाने लोकापवादाला भिवून सीतेचा त्याग केल्यावर ती संतापली असं या लोकगीतांमधे वर्णन केलंय. आपल्या साध्वी वहिनीविषयीचं तिचं प्रेम आणि अन्यायाविरुध्दची चीडही यामधून दिसून येतं. ओडिसी भाषेतल्या रामायणात शांताने कडक ब्रह्मचर्य पाळलेल्या ऋष्यशृंगाशी विवाह केल्यानंतर इंद्राच्या कोपाने निर्माण झालेलं अवर्षण दूर झाल्याचं वर्णन आहे.
राजा दशरथाला आपल्या रघुवंशाला पुढे नेण्यासाठी पुत्राचीच आस होती. त्यामुळे शांताचा पिता म्हणून त्याचं फारसं वात्सल्य दिसून येत नाही. कौसल्येच्या पोटी शांताचा जन्म झाल्यानंतर त्याने पुत्रप्राप्तीसाठी सुमित्रेशी आणि नंतर कैकेयीशी विवाह केला. त्यानंतरही पुत्रप्राप्ती न झाल्याने त्याने आपल्या कन्येच्या मदतीनेच ऋष्यशृंगाला अयोध्येत आणून त्याच्याकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करवून घेतला, असं दिसून येतं.
जनक पिता आणि दत्तक पिता या दोघांच्याही वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शांताने त्यागच केल्याचं दिसून येतं. शांता ही दशरथ आणि कौसल्या यांचं पहिलं मूल. अयोध्येची थोरली राजकन्या. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासारख्या अलौकिक भावांची थोरली बहिण. अयोध्येत ती अर्थातच एका सुखी राजकुमारीप्रमाणेच वाढली. वेदविद्या, कला, युध्दकौशल्य यांचं तिने शिक्षण घेतलं.
कालांतराने तिला अंगदेशाचा राजा रोमपाद याने दत्तक घेतलं आणि रोमपाद आणि त्याची पत्नी वर्षिणी यांनी तिला प्रेमाने वाढवलं. रोमपादाच्या इच्छेनुसार या सुंदर राजकुमारीने राजवैभव सोडून अरण्यात वाढलेल्या एका ऋषीकुमाराशी विवाह केला. जनक पित्याची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा पतीसह आपल्या जनकगृही, अयोध्येला गेली. तिच्याच त्यागामुळे श्रीराम आणि इतर भावंडांचा अवतार होण्यास मदत झाली.
हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक
पण तरीही तिला जे स्थान रामकथेत मिळायला हवं होतं, ते मिळालेलं नाही असंच दिसून येतं. म्हणजेच ती दशरथाचीच कन्या होती हे निश्चित म्हणता येणार नाही असं अनेकांना वाटतं. मूळ वाल्मिकी रामायणातही तसं कुठेही म्हटलेलं नाही. पण वाल्मिकी रामायणात लक्ष्मणरेषेचा किंवा अहिल्या शिळा झाल्याच्या घटनेसारख्या अनेक घटना, ज्या नंतर प्रचलित झाल्या, त्यांचा उल्लेख नाही.
त्यामुळे शांता ही दशरथाची कन्या होती हे तिथं म्हटलं नसलं तरी नंतर ते म्हटलं जाऊ लागल्यावरही तिला हवे ते स्थान मिळालं नाही हे खरं. श्रीमद् भागवत पुराण हे श्रीकृष्णाचं अधिकृत चरित्र मानलं जातं. पण त्याच्या दहाव्या स्कंधात कुठेही राधेचा साधा नामोल्लेखही नाही. तरीही आज कृष्णाच्या आधी ‘राधा’ हे नाव येतंच! तसं भाग्य श्रीरामाची ज्येष्ठ भगिनी असलेल्या शांताला लाभलं नाही.
कुंती ही राजा शुरसेनाची कन्या आणि वसुदेवाची सख्खी बहिण होती. तिलाही राजा कुंतीभोज याने दत्तक घेतलं होतं. पण तिच्या दोन्ही कुळांची स्पष्ट माहिती महाभारत आणि इतर ग्रंथांमधे आहे, तसं शांताबाबत दिसून येत नाही.
राजा रोमपाद हा दशरथाचा मित्र होताच, पण त्याची पत्नी वर्षिणी ही राणी कौसल्याची जवळची नातेवाईकही होती. वर्षिणीला अपत्यप्राप्ती झाली नसल्याने तिने शांता आपल्याला द्यावी अशी मागणी केली आणि दशरथाने तसं वचन देऊन आपला शब्द पाळला. रामाला ही एकच बहिण नसून ‘कुकबी’ नावाची आणखीही एक बहिण होती असं म्हटलं जातं, पण तिच्याविषयी शांताइतकीही माहिती मिळत नाही.
आजचा विचार केला तर आपल्या देशात रामभगिनी शांताची दोन मंदिरं आहेत. त्यापैकी पहिलं मंदिर हिमाचल प्रदेशात कुलू इथं आहे. तिथं शांताची पती ऋष्यशृंग यांच्यासोबत पूजा होते. दुसरं मंदिर कर्नाटकात शृंगेरी इथं आहे. तिथंही तिची पूजा पती ऋष्यशृंग यांच्यासोबत होते. याच ठिकाणी ऋष्यशृंग यांचा जन्म झाला आणि त्यांच्यावरूनच ‘शृंगेरी’ हे नाव पडलं असं म्हटलं जातं.
नेपाळच्या ललितापुर जिल्ह्यातही शांता आणि ऋष्यशृंग यांचं मंदिर आहे. या मंदिरांमधे दोघांची पूजा केल्यावर श्रीरामाचीही कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं भगिनीप्रेम इथं अशा पध्दतीने दिसतं!
हेही वाचा:
गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल