शरद पवारांचा कुटुंब कलह जेव्हा राष्ट्रीय प्रश्न बनतो…

०७ मे २०२३

वाचन वेळ : ८ मिनिटं


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील.

शरद पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले हे नर्मदेचा गोटाही लाजेल इतकं गुळगळीत वाक्य महाराष्ट्रातले धुरंधर राजकीय समीक्षक रोज फेकून मारतायत. प्रत्यक्षात शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची गत चक्रधर स्वामींच्या दृष्टांत कथेतला हत्ती पाहणार्‍या जन्मांध लोकांसारखी झालीय.

ज्याने पाय पाहिला तो म्हणाला हत्ती खांबासारखा. ज्याने फक्त सोंड पाहिली तो म्हणाला हत्ती मुसळासारखा. दोन्ही हात फिरवून हत्तीचा कान पाहणारा म्हणाला, हत्ती सुपासारखाच! पाठीवर हात फिरवणारा म्हणाला, हत्ती तर महाकाय भिंतीसारखा. ज्याच्या हाती हत्तीचे पोट आलं त्याने हत्ती कोथळ्यासारखा ठरवला आणि हाती फक्त शेपूट आलेला म्हणाला, हत्ती म्हणजे खराटा.

आपल्याला जाणवला तो म्हणजेच हत्ती असं या सर्व अंधांना वाटत होतं. एकमेकांचा हत्ती फेटाळून लावत ते भांडत होते. आपलं तेच खरं समजत होते आणि रेटत होते. शेवटी ज्याने पूर्ण हत्ती पहिला असा डोळस माणूस म्हणाला, तुम्ही हातांनी पाहिले ते हत्तीचे अवयव आहेत. हे सर्व अवयव मिळून संपूर्ण हत्ती होतो.

बंडाने बंड मोडले

सध्या हा डोळस माणूस चक्रधरीय दृष्टांतातच आहे. शरद पवारांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या घोषणेचा पूर्ण अर्थ माहीत असलेला एकमेव द्रष्टा खुद्द शरद पवारांच्याशिवाय इतर कुणी असू शकत नाही, असं त्यांचेच सांगाती सांगतात.

शरद पवारांच्या संगतीत राहून राहून या राजीनामा म्हणा की स्वेच्छानिवृत्तीच्या महानाट्याचे जितके अंक त्यांना उमगले, त्यातून पहिला निष्कर्ष हाती लागतो, तो म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारताना शरद पवारांनी पक्ष वाचवला. नाहीतर राष्ट्रवादीत फूट अटळ होती.

या फुटीचा मुहूर्त आठ-पंधरा दिवसांवर येऊन ठेपलाय याची चाहूल लागताच पवारांनी स्वेच्छानिवृत्तीच्या सोंगट्या टाकत अजित पवारांनी मांडत आणलेला डाव उधळून लावला. त्यासाठी काकांनी पुतण्याविरुद्ध बंड केलं आणि पुतण्याच्या बंडाची शक्यताच संपुष्टात आणली!

हेही वाचा: मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

अजित पवार एकटे पडले!

आता जरा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात हे नाट्य घडत असताना जे घडले, ते प्रसंग डोळ्यांसमोर आणा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी आज घेतलाय, असं शरद पवारांनी जाहीर करताच सारेच नेते, कार्यकर्ते हबकून गेले. अश्रूंचा बांध फुटला. 

एरवी अत्यंत शांत, स्थिर आणि तितकेच मिश्कील असणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही रडू आवरू शकले नाहीत. बोलता बोलता त्यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार आठवत होते आणि आतून येणारे कढ बोलू देत नव्हते. काहींनी स्वतःला शरद पवारांच्या पायांवर झोकून दिलं. निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी गळ घालत काहींनी तिथल्या तिथे पक्ष पदांचे राजीनामे जाहीर केले.

ही सारी रडारड सुरू असताना सर्वांना वसवस करत झाडणारा, खडे बोल सुनावणारा एकच नेता तिथं होता. ‘कधी ना कधी हे होणारच होते. पण साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष होणार असेल तर तुम्हाला का नकोय रे?’ असा खडा सवाल करत इतकं भावनिक होण्याची गरज नाही, असं एकदा नाही तर अनेकदा दरडावणारा हा एकमेव नेता म्हणजे अजित पवार!

शरद पवारांच्या स्वेच्छानिवृत्तीचं स्वागत करणारे अजित पवार एकमेव होते आणि अर्थात एकाकी, एकटे पडले. त्यांच्या बाजूने त्यांचा कुणीही समर्थक उभा नव्हता. ना सभागृहाबाहेर, ना सभागृहात. निवृत्ती मागे घ्या म्हणून शरद पवारांच्या पायांवर लोळण घेणार्‍यांमध्ये अजित पवारांचे समर्थकही मागे नव्हते.

सगळा पक्ष फिरवला

शरद पवारांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या नुसत्या घोषणेने व्याकूळ झालेल्या पक्ष पदाधिकार्‍यांना हाडतूड करणार्‍या अजित पवारांचं दुखणं वेगळं होतं. त्यांना काकांची संपूर्ण निवृत्ती हवी होती. अध्यक्षपदावरून आणि सार्वजनिक जीवनातूनही. त्यांनी आता सिल्वर ओकच्या बाहेर पडू नये, फार तर हवापालट म्हणून बारामतीच्या गोविंद बागेत बसावं. कुणी आलाच चरणस्पर्श करायला तर आशीर्वाद द्यावा. पण झालं भलतंच!

शरद पवारांनी फक्त अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आणि या निवृत्तीच्या घोषणेनंतर काही मिनिटांत अजित पवार समर्थकांसह संपूर्ण पक्ष आपल्या बाजूने उभा केला. काही दिवसांपूर्वी जे सवाल-जबाब या काका-पुतण्यात होता होता राहिले, त्यातल्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांनी अजित पवारांच्या हाती ठेवलं आणि भांबावून गेलेले अजित पवारच फक्त काकांच्या निवृत्तीचं समर्थन करत राहिले.

ते करताना कधी ते त्यांच्या काकी प्रतिभाताईंच्या जवळ आपला कान नेत, कधी दस्तुरखुद्द काकांच्या जवळ जात काही ऐकल्यासारखं करत. पुन्हा उभं राहून सर्वांना दरडावत विनम्र की काय म्हणतात तसं आवाहन नेत्यांना, पदाधिकार्‍यांना करत. एवढ्या मोठ्या सभागृहात आणि पक्षात अजित पवारांचं ऐकणारा एकही कार्यकर्ता पदाधिकारी पुढे आला नाही. सारेच शरद पवारांचा धावा करत राहिले. हा कुठला ताजा हिशेब शरद पवारांनी चुकता केला ?

हेही वाचा: काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

तळ्यात-मळ्यात अजित पवार

चेंबूरमधे युवामंथन करताना शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले. नेतृत्वबदलाचे संकेत देण्यासाठी शरद पवार नेहमीच हा गावाकडला वाक्प्रचार हाताशी ठेवत आलेत. यावेळचे संदर्भ मात्र वेगळे होते. विच्छा माझी पुरी करा म्हणत अजित पवार घायकुतीला आले होते.

मुंबई-पुण्यापासून तर अजित पवारांच्या सासुरवाडीपर्यंत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचे पोस्टर्स झळकले. घटनापीठाने सत्तासंघर्षाचा निकाल दिला की अजित पवार चाळीस-बेचाळीस आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार आणि आठ-दहा महिन्यांसाठी का होईना, पण मुख्यमंत्री होणार, असं वातावरण उभं राहिलं.

शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच असेन, असं भले अजित पवारांनी जाहीर केलं. पण भाजपसोबत जाणारच नाही, असं काही ते म्हणाले नव्हते. उलट शरद पवारांचे अत्यंत विश्वासू उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही अजित पवारांना ‘भाजपचा मुख्यमंत्री’ करण्यासाठी सर्वात पुढे होते. त्यातही अटी-शर्तीचे तट दूर करण्याचं काम तटकरे करत होते.

शिंदे-भाजपची मोर्चेबांधणी

याचवेळी ‘मन की बात’ची शंभरी साजरी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौर्‍यावर आले. पार्ल्यात त्यांनी पराग अळवणींच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी खलबते केली, इतकीच बातमी माध्यमांना मिळाली.

प्रत्यक्षात अजित पवार मुख्यमंत्री होण्यास सज्ज आहेत आणि त्यासाठी त्यांना आता सूट वगैरे शिवायला टाकायचीही गरज नाही, हे समजल्याने अस्वस्थ एकनाथ शिंदेंना भाजपची मन की बात जाणून घ्यायची होती. अळवणींच्या घरी अर्धवट राहिलेली बात विमानतळावरही पुढे सुरु राहिली. तिथल्या लाऊंजवर पुन्हा अमित शहा-फडणवीस-शिंदे अशी चर्चा झाली. मग फडणवीसांना बाजूला ठेवून शहा आणि शिंदे अशीही चर्चा झाली.

यातला कोणताही शब्द बाहेर येण्याचं कारण नाही. दुसरीकडे अजित पवारांची चर्चा थांबायचं नाव घेत नव्हती. केवळ पोस्टर लावून आणि चर्चा घडवून कुणी मुख्यमंत्री होत नसतो, असं अजित पवार मधेच बोलून गेले. पण अजित पवारांना पुन्हा शरद पवारांच्या नाकाखालून पळवायचं आणि मुख्यमंत्रिपदी बसवायचं या दिशेने भाजपची वाटचाल सुरुच राहिली.

हेही वाचा: सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

अजित पवारांच्या प्रश्नांची उत्तरे

मुख्यमंत्रिपद आणि आपल्यात फक्त शरद पवार उभे आहेत; नाहीतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत सत्तेपर्यंत सप्तपदी घालत येईल याची अजित पवारांना खात्री होती. या खात्रीशीर भ्रमातून अजित पवार थेट शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला की आव्हान देऊन बसले, असं म्हणतात. काका, तुम्ही आता निवृत्त व्हा, इतकंच सांगायचं अजित पवारांनी बाकी ठेवलं.

‘काही वेळा ज्येष्ठांनी स्वतःहून बाजूला होत तरुणांना जागा द्यायची असते’, असा सल्ला देताना अजित पवारांनी शरद पवारांचे नाव घेतलं नाही. मी निवृत्त व्हावं, ही तुझी व्यक्तिगत इच्छा आहे की पक्षाची, असा प्रश्न शरद पवारांनीही त्यांना विचारला नाही. आपल्या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात या प्रश्नाचं उत्तरच त्यांनी मिळवलं.

अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. यातून शरद पवारांनी एकाच वेळी अनेक गोष्टी साधल्या. आमदारांपेक्षा आमदार निवडून आणणारा पक्ष मोठा असतो आणि तो माझ्या पाठीशी आहे हे सिद्ध करत अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा पूर्ण थांबवली.

भाकरी फिरवण्याचा विचार शरद पवारांनी जाहीर केल्यानंतरही वेगळी चूल मांडण्याचं स्वप्न पाहणार्‍या अजित पवारांना त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या, अजित पवारांना फोडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव उधळून लावला, महाविकास आघाडीत वरचष्मा गाजवू पाहणार्‍या शिवसेनेला जागेवर आणत माझ्याशिवाय महाविकास आघाडी अशक्य आहे, हा निरोप ‘मातोश्री’पेक्षा नागू सयाजी वाडीत संजय राऊतांपर्यंत पोचवला.

राष्ट्रीय पातळीवरचं महाराष्ट्राचं नेतृत्व

सर्वात महत्वाचं, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला असला तरी पवारांनी आपला पक्ष राष्ट्रीय चर्चेत आणला. अशी राष्ट्रीय पातळी असलेले महाराष्ट्राचे आपण एकमेव नेते आहोत, हे शरद पवारांनी दाखवून दिलं. शरद पवारांनी अखंड चालवलेल्या राजकारणातून आणि विविध राज्यांतल्या नेत्यांच्या संपर्कातून हे स्थान कमावलं ते पुन्हा सिद्ध केलं.

ममता बॅनर्जींचा फोन आला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचाही फोन आला. फारुख अब्दुल्लाही फोनवर बोलले. दक्षिणेतून, उत्तरेतून, पूर्वेतून आणि पश्चिमेतून येणारे राज्यकर्त्यांचे फोन म्हणत होते, शरद पवार इतक्यात निवृत्त होऊ नका. विरोधकांसाठी मोठा कठीण काळ आहे आणि म्हणून तुमची गरज आज जरा जास्त आहे.

इकडे निवृत्तीच्या घोषणेपासून राज्यभर आणि खास करून मुंबईत रोज आपला जयजयकार करणारी निदर्शने होत राहतील याची त्यांना खात्री होतीच. दोन मे रोजी सुरु झालेलं शरद पवारांचं हे शक्ती प्रदर्शन पाच मेपर्यंत, जम्बो समितीच्या बैठकीपर्यंत सुरु राहिलं.

हेही वाचा: शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला

भाजपला रोखण्यासाठी महानाट्य

राष्ट्रवादीत उद्भवलेल्या या महानाट्याशी भाजपचा संबंध नाही, असं कोण म्हणेल? आज कोणत्याही राजकीय क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रसंगी राजकीय कारकिर्दीच्या उत्तरक्रिया भाजपशिवाय संभवतच नाहीत. अजित पवार आणि पर्यायाने भाजपला रोखण्यासाठीच पवारांनी हे महानाट्य घडवून आणलं. पवारांचा वारसदार कोण, या प्रश्नाचं उत्तर तसं कधीच मिळालंय. त्यासाठी या महानाट्याची गरज नव्हती.

राष्ट्रीय राजकारण सुप्रिया सुळेंकडे तर महाराष्ट्र अजित पवारच पाहतात. फक्त कोणताही निर्णय ते काकांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाहीत. या निर्बंधातून सुटल्याशिवाय कायम चिकटलेलं उपमुख्यमंत्रिपद सुटणार नाही असं त्यांना वाटलं. औटघटकेच्या मुख्यमंत्रिपदासाठी पक्षच भाजपच्या दावणीला बांधायला ते निघाले होते.

तसं झालं तर शरद पवार उद्याची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आजच गमावून बसले असते. त्यासोबत महाविकास आघाडीचाही शक्तिपात होऊन महाराष्ट्र भाजपच्या हाती विनासायास जाणार होता. हे संकट ओळखून पवारांनी आपला कुटुंब कलह नुसताच उभा केला नाही, तर हा कुटुंब कलह त्यांनी थेट राष्ट्रीय पातळीवर पक्षीय संघर्ष म्हणून पोचवला आणि विरोधकांना गारद करणारा एकच कोलाहल निर्माण केला.

कौटुंबिक लोकशाहीचा विजय

या राष्ट्रवादी कुटुंब कलहात आत्ता कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. जी आहे ती कौटुंबिक लोकशाही. तिची सूत्रं अर्थात पवार कुटुंबाच्या हाती एकवटली आहेत.

त्यामुळेच शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेताना आपणच नेमलेल्या कुणाही ‘बिन-पवार’ पदाधिकार्‍यांस शब्दानेही विचारलं नाही. हा निर्णय त्यांनी फक्त कुटुंबात बसून घेतला. पुतण्याला धडा शिकवणारी प्रतिक्रिया उसळून पुढे यावी, म्हणून त्यांनी हा उद्योग केला असला तरी त्यातून पक्षाची कुटुंबकेंद्रित किंवा पवारकेंद्रित रचना अधोरेखित झाली.

अशी कौटुंबिक लोकशाही स्वीकारणार्‍या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी खुद्द पवारांनी जी समिती जाहीर केली त्या समितीतही अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे होतेच. अध्यक्षपदाचे आघाडीचे दावेदारही हे दोघेच. तिसरं नाव औषधालाही नाही. नेतृत्वाची भाकरी घरच्याच चुलीवर फिरली पाहिजे.

निवृत्तीची घोषणा, पक्षात उडालेला हलकल्लोळ, कार्यकर्ते-नेत्यांकडून सुरु असलेली मनधरणी, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेल्या बैठका. असं सारं नेपथ्य असताना या निवृत्तीच्या महानाट्याची सांगता कशी होणार, हे ठरलेलंच होतं. त्यानुसार शरद पवारांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घेतला. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी फोडण्यास निघालेलं राजकारण चुलीत घालून शरद पवारांनी पुन्हा नव्याने भाकरी थापायला घेतली.

हेही वाचा: 

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष