सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक

१२ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.

सातार्‍यातल्या पावसाच्या सभेनं चमत्कार केला. सभेमुळं ८० वर्षांचे शरद पवार देशभरात परिवर्तनाच्या प्रक्रियेचे नायक ठरले. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली क्रांती नेहमीच देशाला दिशा देते. महाराष्ट्रात घडलेलं सत्तांत्तर देशातही घडवायचं असेल तर कोसळता पाऊस डोक्यावर घेणारा महानायकच देशाच्या समरांगणात केंद्रस्थानी आणून ठेवला पाहिजे, असा बुद्धीवादी विचार आता होवू लागलाय. इतिहासात हिमालय संकटात होता तेव्हा ‘सह्याद्री’ला हाक दिली गेली. तेव्हा यशवंतराव  चव्हाण साहेब धावले होते.

आताही शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आगडोंब उसळला असताना युपीएच्या चेअरमनपदावर शरद पवारांच्या नावाची चर्चा करुन हिमालयाच्या रक्षणाला पुन्हा एकदा सह्याद्रीला हाक दिली गेलीय. शरद पवार यांनी मात्र असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलंय. तरीही महाराष्ट्रातल्या जनतेला मात्र शरद पवार यांनी देशाचं संघटनात्मक नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर त्यात गैर काय? राजकारण हा बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. केंद्र सरकारमधल्या चाणक्यांना लोळवू शकणारा एकच नायक सध्या देशात आहे त्याचं नाव शरद पवार.

हेही वाचा: आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार

विरोधकांसाठी हुकमी एक्का

कुस्तीच्या आखाड्यातल्या कसलेल्या पैलवानाला सगळेच डाव माहीत असतात. वस्ताद तर एक डाव राखूनच खेळतो. शरद पवारांनीही एक डाव राखून ठेवलाय. त्याची चाल आता सुरु झालीय. महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार नाही असं कुणालाच वाटत नव्हतं. उलट भाजप पुन्हा सत्तेवर येईल म्हणून रथी, महारथी शरद पवारांना सोडून भाजपच्या छावणीत दाखल झाले. शरद पवार मात्र सर्वांना पुरुन उरले.

८० वर्षांच्या या तरुणाने महाराष्ट्र पिंजून काढला. नोटाबंदी, जीसएसटी, महागाई, कर्जबाजारीपणा हे मुद्दे घेवून  शरद पवारांनी सामान्य माणसांची मनं जिंकली. भाजपनं पहिल्या क्रमांकाची मतं घेतली. अशा परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेवून अशक्य वाटत असलेलं सरकार स्थापन करण्याची कामगिरी शरद पवारांनी करून दाखवली. न्यायालयासोबत, रस्त्यावरची, घटनात्मक अशी सर्वपद्धतीची लढाई पवार एकटे खेळले.

पुरोगामी महाराष्ट्रातला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने भाजपला मोठा फटका बसतोय. या परिस्थितीचं राजकीय मायलेज विरोधकांना मिळवून देणारा एकमेव हुकमी एक्का सध्यातरी शरद पवारच आहेत.

काँग्रेसची धुरा पवारांकडे असती

राष्ट्रपतींना भेटलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनीच केलं ही गोष्ट उल्लेखनीय आहे. त्यामुळेच युपीएच्या म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. शरद पवार यांनी काँग्रेसची नाळ कधीच तोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करतानाही काँग्रेस हा शब्द त्यांनी कायम सोबत ठेवला. आताही देशपातळीवर काँग्रेस अडचणीत असताना विरोधकांनाही शरद पवार ही एकमेव आशा वाटत असेल तर त्यात नवल काय?

खरंतर १९९६ सालीच शरद पवार यांना ही संधी आली होती. नरसिंहराव यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. सिताराम केसरी, राजेश पायलट आणि शरद पवार यांनी निवडणूक लढवली. वास्तविक शरद पवारांच्या धूर्त खेळीमुळेच अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळल्याची चर्चा  सुरु होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारच अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, निवडणूक झाली आणि पवारांच्या वाट्याला पराभव आला.

सोनिया गांधी यांच्या गटाचे सिताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याचवेळी काँग्रेसजनांनी शरद पवारांच्या  खांद्यावर काँग्रेसची धुरा दिली असती तर बरंच चित्र पालटलं असतं. त्यानंतर शरद पवार यांच्या राजकीय जीवनात बरेच हेलकावे आले. मात्र, वय असो किंवा विरोधातली राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी कधीच हार मानली नाही. विपरित परिस्थितीत मोजक्या विश्वासू सहकार्‍यांच्या जीवावर त्यांनी ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत, जिल्हा परिषदेपासून सहकारी कारखान्यांपर्यंत, खरेदी विक्री संघ ते दूध संघ आणि विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत अनेक मैदानं मारली.

हेही वाचा: महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट 

चाणक्यांचे खेळ बिघडवणारा धुरंदर राजकारणी

बहुजन आणि कष्टकरी कुटुंबातले अनेक नवे चेहरे त्यांनी राजकारणात आणले. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पवार प्रत्येक संकटात लोकांसोबत राहिले. जीव होरपळून टाकणारा कोरडा दुष्काळ असो किंवा आभाळ कोसळणारा महाप्रलय असो शरद पवार कायम संकटकाळात मदत करताना दिसले. सरकार कुणाचंही असुदे शरद पवारांची गाडी लोकांच्या गराड्यात दिसलीच. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळेच लोकांनी शरद पवारांना पुन्हा डोक्यावर घेतलं. महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राचा नायक त्यामुळेच रातोरात पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोचला.

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरवत शरद पवार देशाच्या राजकारणात आज पुन्हा एकदा केंद्रस्थानी जावून पोचलेत. युपीएकडे सर्व विरोधकांना एकत्रित ठेवू शकेल असं एकमेव ब्रह्मास्त्र म्हणून शरद पवार रणांगणावर दिसतायत. चाणक्यांनी मांडलेले कोणतेही खेळ मोडू शकणारा धुरंदर राजकारणी म्हणून शरद पवार आखाड्यात उतरलेत. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून खेळापर्यंत, समाजकारण ते शेती, सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा धडाडीचा नेता म्हणून शरद पवार सर्वांना एकत्र ठेवू शकतात याची जाणीव बहुधा प्रमुख पक्षांना झाली असावी.

राष्ट्रीय जनता दल, अकालीदल,  तृणमुल काँग्रेस, बिजु जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना, एवढंच काय नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल असे अनेक प्रादेशिक पक्ष सोबत ठेवून शरद पवार विरोधकांना नामोहरम करू शकतात.

महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न नव्यानं

इतिहासाची नेहमीच पुनरावृत्ती होत असते. हिमालयाला सह्याद्रीची आवश्यकता असते तेव्हा सह्याद्री धावून जातो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनाही दिल्लीने अशीच हाक मारली तेव्हा हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला होता. आताची परिस्थिती वेगळी असली तरी इतिहासाची पुनरावृत्ती यशवंतरावांच्या मानसपुत्राच्या रूपाने होत असेल तर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आनंद होईल.

हिमालयाने पुन्हा हाक मारली असेल आणि शरद पवार यांच्या रूपाने सह्याद्री हिमालयाच्या दिशेने धावणार असेल तर महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. शरद पवार यांनी युपीएच्या चेअरमनपदाचा प्रस्ताव नसल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या बर्‍याच नेत्यांनी मात्र या चर्चेला पुष्टी दिलीय. महाराष्ट्रातल्या जनतेलाही शरद पवार यांनी देशाचं संघटनात्मक नेतृत्व करावं असं वाटत असेल तर त्यात चुकीचं काय?

८० वर्षांचे बायडन अमेरिकेसारख्या विकसित देशाचे राष्ट्राध्यक्ष होवू शकतात. तर ८० व्या वर्षी महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं पंतप्रधान पदाचं स्वप्न का पूर्ण होवू शकत नाही? शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनी, हितचिंतकांनी त्यांच्यावर प्रेम करणार्‍या महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा हे स्वप्न उराशी बाळगलंय.

हेही वाचा: 

फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत

यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

(हरीष पाटणे हे दैनिक पुढारीच्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक आहेत)