३२ वर्षांपूर्वी साताऱ्याने एसेमना वाहिलेल्या श्रद्धांजलीची गोष्ट

०१ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांचा आज स्मृतीदिन. १९८९ ला त्यांचं निधन झालं. त्यादिवशी शरद पवार यांची साताऱ्यात जाहीर सभा होती. पण, सभा सुरू होण्यापूर्वीच एस.एम. यांच्या निधनाची बातमी त्यांना कळाली. त्यानंतर शरद पवारांनी आदरांजली देणं साहजिकच होतं. पण नंतरच्या त्यांच्या वागण्यानं पवार साहेबांतलं वेगळेपण दाखवून दिलं.

स्थळ साताऱ्याचं गांधी मैदान. वेळ संध्याकाळी ६:१५ - ६:३०च्या सुमाराची. तारीख १ एप्रिल १९८९. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला गर्दी चांगलीच जमली होती. सभामंचावर नेतेमंडळी विराजमान होत होती. निवेदक सूचना करत होता.

प्रास्ताविक होताच एकदम सभेचं आकर्षण असलेले शरद पवार जागेवरून उठले. आणि माईकपाशी गेले. त्यांनी माईकवरून सद्गतीत होऊन बोलायला सुरवात केली ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र समितीचे झुंझार नेते, समाजवादी विचारवंत, मार्गदर्शक, साथी एस.एम. जोशी यांचं थोड्याच वेळापूर्वी पुणे इथं उपचार सुरू असताना निधन झालंय. या नेत्याला मी आदरांजली वाहतो. आपण  सगळ्यांनीच दोन मिनिटं शांत उभं राहून आदरांजली वाहूयात.’ 

हेही वाचा : अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

आज या घटनेला बत्तीस वर्ष झाली. या सभेला दिवंगत नेते भि.दा. भिलारे गुरुजी, शंकरराव जगताप,  माजी मंत्री अभयसिंह राजे भोसले, प्रतापराव भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ, पी.डी. पाटील, बकाजीराव पाटील तसंच दैनिक ऐक्यचे संपादक सुरेश पळणीटकर यांच्यासोबत अनेक मोठे नेते मंचावर हजर होते.
 
सभेला नागरिक जमत होते. हळूहळू गर्दी वाढू लागली होती. मी त्यावेळी सातारा इथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक ग्रामोद्धारमधे संपादकीय विभागात कार्यरत होतो. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या टेलिप्रिंटरवरून आलेल्या इंग्रजी बातम्यांचं मराठी भाषांतर करण्याचं काम मी आणि माझा एक सहकारी करत असू.

१ एप्रिल १९८९ लाही मी सातारातल्या मोती चौकात दैनिक ग्रामोद्धारच्या कार्यालयात काम करत बसलो होतो. टेलिप्रिंटरवर काय महत्त्वाचं आलंय हे बघत असताना मला एका बातमीचा फ्लॅश दिसला. ती फ्लॅश न्यूज होती ‘ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची प्रकृती गंभीर’ अशी. 

एस.एम. आजारी आहेत हे मी राष्ट्र सेवा दलाशी संबंधित होतो त्यामुळे समजलं होतंच. डोक्यात विचार घोळत होते. ग्रामोद्धारच्या कार्यालयापासून गांधी मैदान जवळच असल्याने सभास्थानी फेरफटका मारावा म्हणून तिकडे गेलो. सभेला गर्दी जमत होती. प्रमुख नेते लवकरच सभेच्या ठिकाणी येतील असं निवेदक माईकवरून सांगत होता. मी काही ओळखीच्या माणसांसोबत बोललो आणि सभेला वेळ आहे म्हणून पुन्हा ऑफिसमधे आलो.

नंतर पुन्हा काही वेळानंतर टेलिप्रिंटर मशीनजवळ जाऊन बातम्या पाहू लागलो. तर पुन्हा ‘एस.एम. अत्यवस्थ’ अशीं चार ओळींची न्यूज फ्लॅश आलेली दिसली. काही वेळातच टेलिप्रिंटरवर अर्जंट न्यूज फ्लॅश आली ‘एस.एम. जोशी इज नो मोअर’. बातमी वाचली. काय करावं काही सुचेना. मनात विचार घोळू लागले.

सातारातल्या अनंत इंग्लिश स्कूलच्या आवारातल्या सेवादल शिबीरातल्या सेवा दल सैनिकांना आणि पुण्यातल्या साने गुरुजी स्मारकात झालेलं एस.एम. जोशींचं मार्गदर्शन, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर मराठवाड्यात जातीय हिंसाचार उसळला त्यावेळी जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या एस.एम. जोशी यांच्या गळ्यात एका संतप्त युवकाने घातलेली जोड्यांची माळ, एकता शिक्षण संस्थेच्या मुक्तांगणच्या आवारात एस.एम. यांच्या उपस्थित झालेला कार्यक्रम या अलीकडच्या घटना डोळ्यासमोर तरळू लागल्या. 

हेही वाचा : बंद शाळांमुळे शिक्षणातल्या 'बहुजन हिताय'चे तीन तेरा

मी  टेलिप्रिंटरवर आलेला तो बातमीचा कागद आणि काही कागद घेऊन तसाच महात्मा गांधी मैदानात सभास्थानी गेलो. सोमण स्मारकाच्या समोर पत्रकारांची बसण्याची केली होती. तिथल्या एका खुर्चीवर बसलो. मन अस्वस्थच होतं. निवेदक बोलत होता. स्वागत झालं. प्रास्ताविक सुरू झालं. मी इकडे तो टेलिप्रिंटरचा बातमीचा कागद घेऊन बसलेलो. मला राहवलं नाही. मी सरळ एका कागदावर सन्माननीय शरद पवार यांना उद्देशून लिहलं,  

मा. शरदरावजी पवार, 
सा. न.
माझा आपला परिचय नाही. मी इथल्या स्थानिक दैनिक ग्रामोद्धारमधे कार्यरत आहे. मला पीटीआयच्या टेलिप्रिंटरवर साथी एस.एम. जोशी यांचं निधन झाल्याचं वाचनात आलं. तो कागद सोबत जोडला आहे. 

आपला, 
विजय मांडके.

हा लिहिलेला कागद कुणाकडे द्यावा असा विचार घोळत होता. मी विचारमंचावर बसलेल्या दैनिक ऐक्यचे संपादक सुरेश पळणीटकर यांच्याकडे देण्यासाठी गोपनीयच्या पोलिस हवालदाराकडे तो कागद आणि माझं चार ओळीचं पत्र दिलं. सुरेश पळणीटकर यांनी तो कागद वाचला आणि माझ्याकडे नजर टाकली. मी मानेनेच त्यांना एस.एम. आता नसल्याचं खुणावलं. त्यांनी तो कागद लगेचच माझ्याकडे खूण करून मी दिल्याचं सांगून थेट शरद पवार यांच्याकडे दिला.

इकडे प्रास्ताविक सुरूच होतं. पवारांनी तो दिलेला कागदावरचा मजकूर आणि बातमी वाचली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझे डोळेच त्यांच्याशी बोलले. तोपर्यंत प्रास्ताविक उरकलं होतं. पवार थेट खुर्चीतून उठले. माईकपाशी गेले. महाराष्ट्राच्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला हजारो सातारकर नागरिकांच्या उपस्थितीत गांधी मैदानावर आदरांजली वाहिली. आणि आदरांजली वाहिल्यानंतर चक्क सभा संपल्याचं जाहीर केलं. 

सभा संपली. लोक पांगले. मीही नंतर कामावर गेलो. रात्रीच कॉम्रेड किरण माने आणि डॉ. पु. बा. खुटाळे यांच्याशी संपर्क झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघे पुण्याच्या साने गुरुजी स्मारकात एस.एम. जोशी यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी गेलो. तिथंही शरद पवार सगळी व्यवस्था पाहत असल्याचं दिसलं. आम्ही गर्दीतून वाट काढत एस.एम. जोशी यांच्या पार्थिवापाशी पोचलो. अंत्यदर्शन घेतलं. 

एस.एम. यांच्यासारख्या महान नेत्याला हजारो सातारकरांनी शरद पवार यांच्या साक्षीने वाहिलेली आदरांजली आजही मला नजरेसमोर तशीच दिसते. आज एस.एम. जोशी यांच्या स्मृतिदिनादिवशी तर हा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो.

हेही वाचा : 

महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

(लेखक सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत)