होळी रे होळी पुरणाची पोळी, सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी

२० मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने आरोळ्याही ठोकल्या जातात. पण शिमग्यालाच शिव्या देण्यामागचं नेमकं गणित काय?

मायनाक बाळाच्या घरातली लाकडा चोरीक गेलली. ती लाकडा जाळून वाडीतील पोराटोरा, थोरलीमोठी त्येका शिव्या घालीत होती. बाळो निमुटपणानं सर्व ऐकून घेत व्हतो. तोंडान हूं नाय का चूं नाय. वाडीतल्या सर्वांनी ठरवलेला. बाळग्याचो शिगमो करायचो. त्यामुळे बाळग्याक पण बोलण्याची काय सोय नव्हती. बाळग्याक तर खुशी झालेली. आपल्या मागचो सगळो किलेस जातलो म्हणून वाडीतली लोका आपनाक शिव्या घालतत ह्या त्याका ठावूक होता. कोकणातलो शिमगो कोकणातच वाढलेल्या बाळग्याच्या चांगलो माहितीचो होतो.

बाळा मायनाक हे नाव काल्पनिक तरीही अशा घटना आज रात्री कोकणात घडणार. आंब्याची फांदी जमिनीत रुतवून त्या भोवती लाकडं गोळा करून होळी पेटवली जाणार. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी’ अशा आरोळ्याही ठोकल्या जाणार. आज रात्री वाडीत एकेकाचो शिगमो केल्याशिवाय कोकणच्या वाडीतल्या शहाळ्यांचं आणि फणसांचं मन शांत होणार नाही. त्यानंतरच त्यांना शांत झोप लागेल. खरंतर कसली झोप. पुढचे पाच दिवस त्यांचे आरोळ्या ठोकण्यात, शिव्या घालण्यात आणि पालखी नाचवण्यातच जाणार आहेत.

शिगमो आणि शिव्यांचो संबंध काय?

शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने,

आभळातून पडली टोपी आनी
गावात गजाली करणाऱ्याची फुटली गोटी रे...फो...दे
सोडो रे सोडो आनी चढलो घोडे फोदे

अशा आरोळ्याही ठोकल्या जातात. होळी पेटवल्यानंतर होळीभवती नाच केला जातो. काही होळीत वाहिलेल्या नारळाचं खोबरं चोरलं जातं. ते असंच किंवा भाजून खाल्लं जातं. त्यावेळी होणाऱ्या झटापटीत शिव्या देणं, ओरडणं, आरोळ्या ठोकणं, बोंबा मारणं आलंच.

शिगम्याला शिव्या कशासाठी देतात? तर परंपरेनुसार ज्या व्यक्तीला शिव्या देत आहेत त्याच्यामागील क्लेश जावा अशी त्यामागची भावना. या प्रत्येक शिवीला मात्र नारळ्याच्या खोबऱ्याची चव असते. एरवी तेरवी शिवी म्हटलं की तोंडाचा जाळ होतो. पण होळीतल्या शिव्या या खोबऱ्याच्या फोडीसारख्या कचकच चावून त्याच्या रसाची चव घ्यावी तशा असतात. यामधे हेवेदावे असतातच असं नाही. राग व्यक्त करण्याच्या भावनेपेक्षा गमतीचा, मजेचा भाग जास्त असतो.

खरंतर आपल्या शरीरात रागाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. या उर्जेचा निचरा होणं गरजेचं असतं. तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजेत कोकणातील शिमग्याची शिव्या देण्याची प्रथा, असं केईम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर सांगतात. डॉ. पारकर या कोकणातल्या. त्यांना कोकणातल्या या प्रथेचं कौतुक वाटतं. कोकणी लोकांचं पारंपरिक अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशा शब्दांत आहे, असं त्या या प्रथेचं वर्णन करतात.

होळीमागचा पारंपरिक उद्देश मुळात नकारात्मकता जाळणं, असा आहे. होलिका देवीची कथाही तशीच आहे. मानसशास्त्रामधे राग या भावनेला फार महत्व आहे. आपल्या मनातला राग योग्य पद्धतीने व्यक्त करणं गरजेचं असतं. कोकणातल्या शिमग्याची शिव्या देण्याची प्रथा या रागाला वाट करून देते. मनातला संताप होळीमधे भस्म व्हावा असा त्यामागचा उद्देश, असंही त्या म्हणतात.

हेही वाचा : मराठी गरबा का बंद झाला?

तरीही, एखाद्याचा शिमगा करावाच का?

एखाद्याला अपमानित करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं किंबहुना याला नकारात्मकतेची झालर आहे. कोकणात मात्र शिव्या प्रेमानेही घातल्या जातात. मुंबईहुन पाहुणे अचानक येऊन दारात थबकल्यावर, ‘मायझया हस खय?’ असा प्रेमळ प्रश्न विचारला जातो. त्यामुळे शिव्या या प्रेमानेही दिल्या जातात यावर कोकणी लोकांचा गाढ विश्वास आहे.

कोकणात जमिनीचे वाद हे पुर्वापार आहेत. त्यातून भावकीत अनेकदा हेवेदावे निर्माण होतात. हे हेवेदावे व्यक्त करण्यासाठी होळीच्या निमित्ताने ही परंपरा निर्माण झाली असावी असा अंदाज लेखक प्रभाकर भोगले व्यक्त करतात. मालवणी मुलखातले सण, उत्सव, रुढी परंपरा तसंच मालवणी शब्द, साधने आणि जीवनशैली अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

त्यांच्या मते, कोकणातल्या शिमग्याच्या उत्साहालाच आता काहीशी उतरंड लागलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण पट्ट्यात शिमग्याचे प्रमाण कमी झालेत. या भागातला चाकरमानी आता तितक्या उत्साहाने शिमग्याला हजेरी लावत नाहीत, असं निरीक्षण ते नोंदवतात.

पाच दिवस ते महिनाभराचा शिमगा

प्रभाकर भोगले यांनी दिलेल्या माहितीनूसार चिपळूण, रत्नागिरी या भागात शिमग्याचा उत्साह सिंधुदूर्गाच्या तुलनेत दुप्प्ट-तिप्पट असतो. होळीसाठी आंब्याचं झाड कोणाच्या अंगणातून तोडायचं याचा मान दरवर्षी ठरलेला असतो. यातही ‘वरसल’ असते. या भागातला चाकरमानी गणेशोत्सवाप्रमाणे रेल्वेचे तिकिट आधी बुक करून शिमग्याला हजेरी लावतात. त्यांच्या शिमग्याचा उत्सव हा महिनाभर असतो. त्यावेळी बोंबा मारणं, शिव्या घालणं, पालखी नाचवणं, सोंग घेणं या प्रथा महिनाभर चालतात.

देवगड, सिंधुदुर्ग या भागात शिमगा पाच दिवसाचा असतो. सिंधुदुर्गात काही भागात होळी सणाच्या दिवशी पेटवली जात नाही. ती महिनाभरानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला पेटवली जाते. काही ठिकाणी होळी अर्धवटच जाळतात आणि वर्षभर त्याची पूजा करतात.

हेही वाचा : रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा

शिव्या दिल्याच पाहिजेत का?

कोकणातील एक आजी या शिगम्याच्या आणि त्यातल्या शिव्यांच्या प्रथेची माहिती देताना म्हणाल्या, आता लोक सुशिक्षित झालेत. त्यामुळे शिव्या जास्त कुणी देत नाही. होळी पेटवल्यानंतर ज्या आरोळ्या देतात. त्यातही आजकालची मुलं काहीही वाईटसाईट बोलतात. ते बरं नाही. होळीच्या जवळपास या मुलांनी गोंधळ घालणं योग्य नाही. कारण ती पवित्र जागा असते. या आजी गावातल्या प्राथमिक शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यात.

दुसरीकडे आचऱ्याचे मंगेश मेस्त्री या परंपरेबाबत फारच उत्साहाने बोलतात. त्यांच्या गावात शिमग्याला शिव्या घालण्याच्या प्रथेचा जोश आजही कायम आहे. आचऱ्यात ३५० ते ४०० वर्ष जुन्या रामेश्वर मंदिराजवळ त्यांचं घर आहे. तिथला शिमगा मालवण पट्ट्यातल्या शिमग्याप्रमाणे पाच दिवस चालतो. तिथे होळीच्या उत्साहाला उद्यापासून म्हणजेच धुलिवंदनापासून उधाण येते. खरंतर लाकडं चोरण्याची आणि ती पेटवून भरभरून शिव्या देण्याची सुरवात रात्री होळी पेटवल्यानंतर होते.

ज्याच्या घरातले लाकड चोरून होळी पेटवण्यात येते, त्याच्याबद्दल अत्यंत अश्लील बोललं जातं. त्याचा पूर्णपणे अपमान होईल याची सगळी खबरदारी घेतली जाते. समजा गावकऱ्यांच्या मते गावात कुणी चुकीचं काम केलं असले. चोरी केली असेल किंवा एखाद्याच्या मुलीशी पळून लग्न केलं असेल तर त्याचा शिमग्याच्या निमित्ताने उद्धार केला जातो. त्याला अद्वातद्वा बोलण्यापासून त्याची पूर्ण राळ उडवली जाते. यावेळी त्या व्यक्तीला प्रत्युत्तर करण्याची मुभा नसते. आणि ही परंपरा लोक आजही तितकीच तंतोतंत पाळतात, असे मंगेश सांगतात.

धुलिवंदनाच्या दिवशी सोंगं घेतली जातात. एखादा पुरुष साडी नेसून ‘गोमू’ म्हणजेच शिगम्याचं सोंग घेतो. इतरही वेगवेगळी सोंग घेतली जातात. ज्याचा अपमान करायचा त्याचंही सोंग घेतलं जातं. नवरा नवरीचं सोंग घेऊन त्यांना विद्रुप केलं जातं. प्रत्येकाच्या घरी हे सोंगेकरी जातात. गाणी म्हणतात. या गाण्यांचे बोलही मजेशीर असतात.

आयना का बायना,
घेतल्याबिगर जायना

ते ‘शबय, शबय’ असं म्हणत पैसे मागतात. शबय म्हणजे सोंग. पैसे घेतल्याशिवाय ते माघारी जात नाहीत आणि गावातले लोकही त्यांना पैसे दिल्याशिवाय रिकाम्या हाताने जाऊ देत नाहीत. गावातले स्थानिक नेते पुढारी यांच्याही घरी हे सोंगेकरी जातात. कुसलेला नारळ आणि मातीचे खडे घेऊन त्याच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलवतात. त्याला आमंत्रण देऊन त्याचा कुसलेल्या नारळाने सत्कार करतात आणि त्याच्या घरावर खडे मारतात. मंगेश सांगतात गावाच्या बाजूलाच पोलिस चौकी आहे पण पोलिसही या प्रथेत हस्तक्षेप करत नाहीत.

शेतीच्या मशागतीची सुरवात

होळीचा सण म्हणजे कोकणातल्या शेतीच्या मशागतीची सुरवात. त्या मशागतीच्या आधी शेतातला पालापाचोळा गोळा केला जातो. याला कोकणात कवळ म्हणतात. कवळ जाळून काही ठिकाणी होळी साजरी केली जाते. काही ठिकाणी पोफळीच्या झाडाचा खांब होळीसाठी वापरला जातो तर काही ठिकाणी आंब्याचे खोड उभे केले जातात. कोकणातली माणसं होळीत गावी न येणाऱ्या मुंबईकरांसाठीपण आरोळ्या ठोकतात. त्या अशा,

चिंचेच्या झाडावर ठेवली मोटली
आणि जे होळीला गावी येणार नाहीत
त्यांची उंदराने नेली चोटली रे चोटली

ही आरोळी शेतातल्या कवळ्यासारखी मुंबईकरांना मारलेली मऊसुत हाक असते. त्याला वरून पोफळीचा टणकपणा असला तरीही त्यातली आंब्याची रस्सेदार चव कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ती फक्त चाखण्यासाठीच असते.

हेही वाचा : 

बदललेल्या दिवाळी फराळाची गोष्ट

रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)