जितके चविष्ट तितकेच राजकीयही असतात पोहे!

२५ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास.

बारीक चिरलेली कोथिंबीर, खिसलेलं ओलं खोबरं सजावटीसाठी वर टाकलंय. शेजारी लिंबाची एक फोड ठेवलीय. मस्तपैकी गरम गरम वाफा येणारे अशा पोह्याची एक प्लेट सकाळी सकाळी आपल्यासमोर ठेवलीय. झक्कास! हे वर्णन वाचतानाच तोंडाला पाणी सुटलं ना. जवळपास सगळ्याच मराठी घरांमधे नाष्ट्यासाठी पोह्याला सर्वाधिक पसंती असते. मग मुलगी बघण्याचा कार्यक्रम असो किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार असो झटपट बनणाऱ्या पोह्यांना नेहमीच पसंती मिळते. पोहे एवढे फेमस आहेत की आपल्याकडे कांदेपोहे नावानं एक सिनेमाही येऊ गेला.

याच पोह्यांवरून एक महाभारत घडलंय. जानेवारी महिन्यातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पोह्यांबाबत केलेल्या एका विधानावरून हे महाभारत सुरू झालंय. आपल्या घरी काम करणाऱ्या बांधकाम मजुराला आपण पोहे खाण्याच्या शैलीवरून तो बांग्लादेशी घुसखोर असल्याचं ओळखलं असं वक्तव्य विजयवर्गीय यांनी केलं. पीटीआय या न्यूज एजन्सीने आपल्या ट्विटर हँडलवरून जसं विजयवर्गीय यांचं हे विधान पोस्ट केलं तसं त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली.

हेही वाचा : मोदी मास्तरांचे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ७ गुरूमंत्र

पोहे खाण्याच्या प्रकारावरून ओळखले घुसखोर

विजयवर्गीय हे भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी आहेत. बरं हे विजयवर्गीय मराठी माणसांसोबतच्या बसण्याउठण्यातले आहेत. मराठी माणसांचा प्रभाव असलेल्या मध्य प्रदेशातल्या इंदुर शहरात ते जन्मले. इंदुरचे ते महापौरही होते. २४ जानेवारीला  इंदुरमधेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएवर एक चर्चासत्र सुरू होतं. विजयवर्गीय या चर्चासत्रात बोलत असतानाच पोह्याच्या महाभारताला सुरवात झाली.

विजयवर्गीय यांच्या मुलाचं लग्न आहे. लग्नानंतर नव्या जोडप्याला राहण्यासाठी एक नवी खोली त्यांच्या घरात बांधली जात होती. या खोलीचं काम करायला काही मजूर तिथं आले होते. ‘एकदा ते मजूर एकाच मोठ्या परातीतून कच्चे पोहे खात बसले होते. दहा बारा प्लेट पोहे त्या एका परातीत असावेत. मी त्यांच्याजवळ गेलो आणि तुम्ही नुसते पोहे काय खाता, चपाती वगैरे का खात नाही असा प्रश्न विचारला. ते काहीच बोलले नाहीत.’ असं विजयवर्गीय या कार्यक्रमात म्हणाले.

मजुरांच्या पोहे खाण्याच्या विचित्र पद्धतीवरून विजयवर्गीय यांना संशय आला. त्या मजुरांना तुम्ही कुठून आलात असं विचारलं तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालमधून आलो असं सांगितलं. पण बंगालच्या कोणत्या जिल्ह्यातून आलो हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हाच ते बांग्लादेशी घुसखोर असले पाहिजेत, ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याचा दावा विजयवर्गीय यांनी केला.

काही दिवसांनी ते मजूर कामावर येणं बंद झालं असंही विजयवर्गीय म्हणाले. आणि ते आपल्यावर पाळत ठेवायला आलेले दहशतवादी असावेत असा फायनल निष्कर्षही त्यांनी काढला. ‘मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. पण सगळ्यांनी दक्ष रहायला हवं. घुसखोर देशातलं वातावरण बिघडवत आहेत,’ असा दावा करायलाही ते विसरले नाहीत. जीवाला एवढा मोठा धोका असतानाही त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही, या मुद्द्यावरून विजयवर्गीय यांच्या या निष्कर्षामागच्या हेतूंवरच शंका घेतली जातेय. मागं पंतप्रधान मोदी यांनीही सीएएविरोधी आंदोलकांच्या कपड्यांवरून ते कोण आहे हे आपण ओळखतो, असा दावा केला होता.

पोहे बांगलादेशी आहेत?

पोहे महाराष्ट्रातच नाही तर आपल्या देशातलं लोकप्रिय खाद्य आहे. पोहे तयार करायची पद्धतीही खूप मजेशीर आहे. ‘पोहे तयार करण्यासाठी तांदूळ दोन-तीन दिवस पाण्यात भिजत ठेवतात. नंतर काही मिनिटं पाण्यात शिजवतात. थंड झाल्यावर तांदूळ काढून उथळ मातीच्या किंवा लोखंडाच्या तव्यात टरफल उकलेपर्यंत गरम केला जातो. मग उखळात लाकडी मुसळाने बडवून भात चपटा करतात आणि टरफल अलग करतात. यांत्रिक पद्धतीत रुळांचा वापर करून त्यावर योग्य दाब देऊन पातळ पोहे तयार करतात. पूर्वापार चालत आलेल्या या पद्धतीने तयार केलेल्या पोह्यांत उकड्या तांदळाप्रमाणेच जीवनसत्त्वं असतात. खराब न होता पोहे कित्येक महिने साठवून ठेवता येतात’, अशी माहिती मराठी विश्वकोशात सापडते.

तांदूळ दाबून किंवा सपाट करून पोहे बनवले जातात म्हणूनच इंग्रजीत पोह्याला ‘फ्लॅटण्ड राइस’ असं म्हणतात. त्याला भारतातही भाषेगणिक वेगवेगळी नावं आहेत. विकिपीडियावर ही सगळी नावं सहज वाचता येतात. महाराष्ट्रात ज्याला आपण पोहे म्हणतो त्या पदार्थाला कर्नाटकात अवलक्की म्हणतात. मल्याळम आणि तमीळमधे अवल असं नाव आहे. तिकडे वर गुजरात, राजस्थानमधे पोया किंवा पऊया असं म्हटलं जातं. विजयवर्गीय यांचे मजूर ज्या राज्यातून आले होते त्या राज्यातल्या बंगाली भाषेत पोह्याला चिरा असं म्हटलं जातं.

तांदळाची शेती करणाऱ्या अनेक देशात पोह्यासारखा पदार्थ आढळतो. तिथेही त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. कंबोडियात या पदार्थाला ओमबोक असं म्हटलं जातं. विएतनाममधे बानह कॉम तर फिलीपीन्समधे पाईनिंग किंवा ड्युमन असं नाव पोह्यासारख्या पदार्थाला दिलंय.

हेही वाचा : जीवघेण्या चिनी कोरोनो वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

आयुष्य म्हणजे कांदेपोहे

पोहे ही काही भारत किंवा बांग्लादेशच्या स्वातंत्र्यानंतर तयार झालेली गोष्ट नाही. महाभारतापासून चालत आलेली गोष्ट आहे. कृष्ण आणि सुदामाच्या पोह्यांची गोष्ट ऐकून तर आपल्यापैकी अनेकजण लहानाचे मोठे झालेत. शेकडो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ही गोष्ट सांगितली जातेय. भारत स्वतंत्र व्हायच्या आधीही आपल्या पूर्वजांनी त्यांच्या बालबच्च्यांना ही गोष्ट एकवली असणारच. हिंदूत्त्ववादाचा नारा लावणाऱ्या भाजपच्या नेत्यालाच आता सुदामाचे कच्चे, गार पोहे खाण्याची गोष्ट परत एकदा सांगावी लागेल.

एवढंच नाही, तर भारतात पोहे बवनण्याच्या हजारो पद्धती प्रचलित आहेत. काही कालबाह्यही झाल्या. पोहे भिजवून त्याला फोडणी देणं हा महाराष्ट्र आणि आपल्या आजुबाजुच्या राज्यातला कॉमन प्रकार आहेच. पण याशिवाय बटाटे पोहे, कांदे पोहे, दूध पोहे, कोकणातले चहा पोहे, दही पोहे, दडपे पोहे, पापड पोहे असे पोह्याचे अनेक प्रकार बनवले जातात.

विजयवर्गीय राहतात त्या इंदुर शहरातले इंदौरी पोहेसुद्धा फार प्रसिद्ध आहेत. पोह्याला फोडणी देऊन त्याच्यासोबत शेव, उसळ, चिरलेला कांदा आणि  जिलेबी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेले इंदौरी पोहे महाराष्ट्रातही खूप फेमस आहेत. पोह्याची ख्याती माहीत नसलेल्या माणसालाही इंदुरी पोह्याने भुरळ घातलीय.

इतकंच काय तर जगण्याची फिलॉसॉफी सांगतानाही पोहेच आपल्या कामी येतात. ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ हे तत्त्वज्ञान अवधुत गुप्ते यांच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्रात पोचवलंय.

वन नेशन वन पोहे नको

भारतात अन्न शिजवण्याच्या, खाण्याच्या इतक्या पद्धती असूनही एखादा माणूस या देशातला आहे की घुसखोर आहे हे त्याच्या पोहे खाण्याच्या सवयीवरून ठरवण्याच्या विजयवर्गीय यांच्या निष्कर्षावर लोकांनी सडकून टीका केली. लोकांनी त्यांना ट्विटरवर धारेवर धरलं.

मध्य प्रदेशात पोहे फार कमी किमतीत मिळतात. पोळी, भाजीसारखं जास्त पौष्टिक अन्नाऐवजी असं कमी किमतीत मिळणारं अन्न मजुरांना खायला लागतंय याविषयी विजयवर्गीय यांना काहीच वाटत नाही, असंही अनेकांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधे सर्वसामान्य लोक रोज वेगवेगळ्या पद्धतीने पोहे खात असतात. मग आम्हीही बांग्लादेशी घुसखोर होणार का असा सवालही अनेकांनी विजयवर्गीय यांना केलाय.

सुप्रसिद्ध भाषातज्ञ गणेश देवी यांनी भारतात बटाटे शिजवून खाण्याच्या हजारो पद्धती असल्याचं एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ज्यावेळी या सगळ्या पद्धती बंद पडून बटाटा शिजवण्याची एकच पद्धत सगळ्या देशभर लागू केली जाईल म्हणजेच ‘वन नेशन, वन पोटॅटो' लागू केलं जाईल, त्यावेळी देशात हुकूमशाही आलेली असेल, असंही देवी पुढे म्हणाले होते.

यातल्या बटाट्याच्या जागी पोहे आलेत. तेव्हा सीएए, एनआरसीचं प्यादं पुढे चालवून ‘वन नेशन, वन पोहे’ म्हणत इथल्या लोकशाहीला चेकमेट करण्याचा प्रयत्न विजयवर्गीय यांनी करू नये असा सूर आता सोशल मीडियावर उमटतोय.

हेही वाचा : 

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा

इन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल?