म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?

०४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आर्थिक मंदी अर्थव्यवस्थेचे सगळे फासे उलटे सुलटे करत असताना म्युच्युअल फंड्समधली गुंतवणूक चालू ठेवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर खरंतर गुंतवणूकदाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. गुंतवणूक यशस्वी करण्यासाठी शिस्त आणि पद्धतशीरपणा हवा.

सामान्य माणसं त्यांच्या कष्टाचा पैसा म्युच्युअल फंडात गुंतवतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे एसआयपी. सध्या अर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेचे सगळे फासे उलटे सुलटे झालेत. अशात आता सामान्य माणसांनी म्युच्युअल फंड्स एसआयपीमधे गुंतवणूक करणं किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडू लागलाय. आता ही गुंतवणूक थांबविण्याची वेळ आली आहे का हे शोधायला हवं.

खरंतर या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देणं अवघड आहे. कारण या प्रश्नाचं उत्तर आपण म्युच्युअल फंडची गुंतवणूक कुठल्या कारणासाठी सुरू केली होती त्यावर अवलंबून असेल. चला, आपण यासंबंधी एक परिपूर्ण चर्चा करू या.

जीडीपी ८ वरून ५ वर घसरलाय

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा काही परस्परसंबंध आहे का, असा विचार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या मनात आला असेल. त्यात काही नवल नाही. मार्केट रेग्युलेटर सेबीच्या अर्थात सिक्युरीटी एँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या वर्गीकरणानुसार इक्विटी फंडाचे ११ प्रकार आहेत आणि सगळ्या प्रकारांमधे शेकडो योजना आहेत. पण काही मोजक्याच म्युच्युअल फंड योजनांनी मार्केट सेन्सेक्सच्या कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी बजावलीय.

भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय जीडीपीची वाढ ८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आलीय. बँकिंग, रियल इस्टेट, बांधकाम आणि नॉन-बँकिंग फायनान्स संबंधित क्षेत्र त्यांच्या आंतरिक व्यावसायिक चुकांमूळे कोसळलेत. आता ही सर्व क्षेत्रे त्यांच्या चुकांपासून मुक्त होण्यासाठी स्टिम्युलस म्हणजेच प्रेरित करणारे पॅकेज शोधत आहेत.

आज शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. निफ्टीने १२००० चा आकडा पार केलाय. बीएसई सेन्सेक्स ४०००० वर आहे. म्युच्युअल फंड एसआयपीच्या गुंतवणुकीचे योगदान पण वाढतच आहे. २०१९ च्या ऑगस्टमधे म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून ८२३१ कोटी रुपये, तर सप्टेंबरमधे ८२६२ कोटी रुपये गुंतवणूक झालीय.

हेही वाचा : सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार?

भारतातली परदेशी गुंतवणूक वाढतेय 

नवीन एसआयपी खात्यात लक्षणीय वाढ दिसते. रिटेल गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाच्या बाजारात सकारात्मक वाढ झालीय. मार्केट रेग्युलेटर सेबीने कर्ज गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. अर्थव्यवस्थेतली मंदी सरकारने स्वीकारली असून ते काही सकारात्मक पावले उचलत आहेत.

शेअर बाजार हळूहळू ध्रुवीकरण म्हणजेच पोलरायझेशनच्या प्रभावापासून दूर जातोय. त्याने व्यापक बाजार पकडण्यास सुरवात केलीय. जून २०१९ मधे भारतीय भांडवली बाजारात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी अर्थात एफपीआयने १०१३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं दिसून येतं. सध्या परदेशीय गुंतवणूकदार भारतासारख्या विकसनशील बाजारावर सकारात्मक आहेत.

वरील दोन्ही परिस्थिती या म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदार आणि गुंतवणूक बाजाराच्या अंतर्गत आवाजामधील असमतोलपणाचे वर्णन करतात. यांचा समग्र द़ृष्टिकोन लक्षात घेतल्यानंतर आपल्या म्युच्युअल फंड एसआयपीच्या विषयाकडे वळणं फायद्याचं ठरेल.

हेही वाचा : एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

एसआयपी आणि वैयक्तिक उद्दिष्टं एकाच नाण्याच्या २ बाजू 

एसआयपी गुंतवणूक सुरू करायची की बंद करायची की चालू ठेवायची हाच मुळात एक अपूर्ण प्रश्न आहे. त्यासाठी प्रथम आपलं आर्थिक लक्ष्यं शोधलं पाहिजे. एकदा हे लक्ष्यं सापडलं की नंतर ते आपल्या एसआयपीशी जोडता येईल. आपण ज्या कामासाठी पैसे गुंतवलेत ते आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्टं किती वर्षांनी येणार आहे, त्या ध्येयांच्या प्राप्तीसाठी किती रक्कम आवश्यक आहे, आपली रिस्क प्रोफाईल म्हणजेच जोखीम उचलण्याची ताकद काय आहे, इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करायला हवा.

उदाहरणार्थ, जर एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी आपण आपली एसआयपी ९-१० वर्षांपासून चालू ठेवलेलीय आणि आता आपल्याला त्याच ध्येयाच्या पूर्तीसाठी पैशांची गरज आहे. तर आपण एसआयपी थांबवणं आणि आपली रक्कम काढून घेणं रास्त ठरेल. हे अगदी बरोबर आहे. एसआयपी आणि वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. ते इतर कोणत्याही कारणास्तव विभक्त होऊ शकत नाहीत.

जर म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करण्याचं एकमेव कारण चांगले रिटर्न्स मिळवणं हेच असेल, तर वर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरं अगदीच सोपं आहे. आणि ते म्हणजे गुंतवणूक करत रहाणं. स्टे इन्वेस्टेड! जर आपण फक्त दीर्घकालीन गुंतवणूक करणार असू तर केवळ इक्विटीमधेच गुंतवणूक करायला हवी. त्यासोबतच एसआयपी थांबवून चालणार नाही. तो बंद केला तर त्यात आपलं नुकसानच आहे. आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध असणारे अनेक शेअर्स बाजारात उपलब्ध आहेत.

हेही वाचा : रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?

शिस्त आणि पद्धतशीरपणा महत्वाचा

आपल्याला दीर्घ मुदतीत त्याचा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीमधे पद्धतशीरपणा आणि नियमितपणा आणला पाहिजे. आपल्या एसआयपीची वेळ निश्चित करणं म्हणजेच बाजारपेठेच्या टप्प्यानुसार त्या सुरू करणं किंवा थांबविणं हे पूर्णतः चुकीचं ठरू शकतं.  एसआयपी आपल्याला शेअर बाजारातील भीती आणि लोभ या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवायला शिकवतं.

आपण एसआयपीमार्फत गुंतवणूक करणार असू तर सर्वात महत्त्वाचा घटक वेळ हा नसून शिस्त आणि विश्वास हा आहे. एखादी विशिष्ट म्युच्युअल फंड योजना बर्‍याच लांब अवधीपासून चांगली काम करत नसेल तर आपण अधिक चांगल्या योजनेकडे जायला काही हरकत नाही. गुंतवणूक करणं आणि विसरणं हीसुद्धा योग्य रणनीती नाही.

आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची कामगिरी, मालमत्ता वाटप म्हणजेच असेट अल्लोकेशन, जोखमीच्या प्रोफाईलचा नियमितपणे किंवा निदान वर्षातून एकदा आढावा नक्कीच घ्यावा. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला सकारात्मक चालना मिळेल. यात काही वादच नाही. पण एसआयपी गुंतवणूकच बंद करणं हा अगदी सोपा आणि पूर्णतः चुकीचा सल्ला किंवा निर्णय असेल.

हेही वाचा : 

गांधी घराण्यानं संन्यास घेणं देशाच्या हिताचं ठरेल

मधुमिता पांडे : १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणारी तरुणी

महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!

सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग

(लेखक हे सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असून त्यांचा हा लेख दैनिक पुढारीच्या १ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालाय.)