पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काही तरी आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्सबरोबर मॅन वर्सेस वाईल्डमधे जीम कॉर्बेट जंगलाची सफर केलीय. त्यात ते काय काय एडवेंचर करणार हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण त्यांच्यावरच्या मिम्सने आपल्याला एवढं हसवलंय की काय विचारायलाच नको.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर वायरल होतेच. २९ जुलैला व्याघ्र दिनाच्या दिवशी डिस्कवरी चॅनलने मॅन वर्सेस वाईल्डचा एक ट्रेलर लाँच केला. आणि सोशल मीडियावर तो वायरलच झाला. कारण त्यात आपले पंतप्रधान मोदी आणि एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्स एकत्र जंगल सफारी करत होते.
मॅन वर्सेस वाईल्डच्या ४६ सेकंदांच्या या ट्रेलरला आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त व्यूज मिळालेत. याचं शुटिंग उत्तराखंडमधल्या जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानात झालं. हा कार्यक्रम बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता डिस्कवरी चॅनलवर टेलिकास्ट होईल. यात मोदींनी प्राणी संवर्धन आणि निसर्गातील बदलांवर आपले विचार मांडलेत. आणि या संधीबद्दल स्वत: मोदींनी ट्विटरवरुन बेअर ग्रिल्स आणि डिस्कवरी वाहिनीचे आभार मानलेत.
मॅन व्हर्सेस वाईल्डच्या सिरीजमधे बेअर ग्रिल्स नेहमीच आपल्यासाठी निसर्गातल्या नवनवीन गोष्टींशी भेट घालून देतो. या सिरीजमधे यापूर्वी अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावलीय. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, अमेरिकी अभिनेत्री केट हडसनने, इंग्लंडचा फूटबॉलपटू डियॉन सँडर्सने, हॉलिवूड अभिनेता आणि गायक जॅक एफरॉनने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
हेही वाचा: प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत
आपल्याला बेअर ग्रिल्स माहितीय ते फक्त मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामुळे. पण हा पठ्ठ्या १९९८ ला जगातलं सगळ्यात उंच माऊण्ट एव्हरेस्ट शिखर ९० दिवसांत सर करणारा सगळ्यात तरुण गिर्यारोहक ठरला. त्याची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधेही नोंद आहे.
बेअरने तीन वर्ष ब्रिटनच्या संरक्षण दलातही काम केलं. तो स्पेशल एअर सर्विसमधल्या ‘एसएएस २१’ दलामधे होता. तिथेच त्याने दुर्गम भागात कसं राहायचं याचं प्रशिक्षण घेतलं. त्याला २००६ ला मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात संधी मिळाली. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. म्हणून २०० देशांमधे कार्यक्रम दाखवू लागले. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ७ सीझन झालेत.
आता हा अवलिया जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तेथील जंगलांची आपल्याला सफर घडवतो, संकटकाळी काय करायचं, खायला काय नसेल तर काय खायचंपासून सगळं काही शिकवतो. आपण तर त्याला गांडूळापासून ते उंटाच्या पिशवीतलं पाणी पितानाही बघितलंय. आपणही आपल्या मित्रांच्या ग्रुपमधे प्राणीस्नेही मित्र किंवा मैत्रिणीला सहज बेअर म्हणतो. पण या बेअर ग्रिल्सचं नावं एडवर्ड ग्रिल्स आणि बेअर हे त्याच्या बहिणीने ठेवलेलं त्याचं टोपण नाव.
एडवेंचर ग्रिल्स आपल्या पंतप्रधानांबरोबर काय कारनामे करणार हे बघायला मजा येईल. या कार्यक्रमाचं शूट १४ फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या ३० मिनिटं आधी झाल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने छापली होती. यामुळे विरोधी पक्षांना मोदी आणि भाजपवर निशाणा साधण्याचा चान्स मिळाला. पण नेटकऱ्यांनीही मोदींवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
हेही वाचा: मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?
या कार्यक्रमाच्या ट्रेलरवरुन आलेले मिम्स तर ट्रेलरपेक्षाही जास्त इंटरेस्टींग आहेत. ग्रिल्स आणि नमो यांच्यावरच्या मिम्सना नेटकऱ्यांनी ट्रेलरपेक्षा जास्त लाईक्स ठोकलेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश, हातात भगवा झेंडा असलेला ग्रिल्स आणि मंदिर वही बनायेंगे अशा संदेशाचं, मोदी आणि ग्रिल्स बोलता बोलता होडीत बसून नाशिकला पोचतात, सफारीदरम्यान ग्रिल्स मोदींना म्हणतो आता आपल्याला काहितरी खाल्लं पाहिजे. त्यावर मोदी म्हणतात ना खाऊंगा, न खाने दूंगा इत्यादी.
हे मिम्स फेसबुक, ट्विटर, वॉट्सअप आणि इंस्टाग्राम सगळीकडे शेअर होतायत. हे मिम्स स्टेटसवर ठेवले जातायत. तसंच हेराफेरी आणि वेलकम या सिनेमांवरुन पंतप्रधान आहेत म्हणून सहन करू, जंगलात पैसाचं पैसा असेल, परेश रावल आणि मोदींच्या चालण्याची तुलना केलीय.
हेही वाचा: नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?
हे सगळे वायरल मिम्स चक्क बीजेपीच्याच सोशल मीडिया पेजेसवर मोठ्या प्रमाणात टॅग आणि पोस्ट होताहेत. बीजेपीच्या आयटी सेलमधल्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
तसंच #पीएममोदीडिस्कवरी हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंडिंग आहे. मेल्टव्होटर या खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार हा हॅशटॅग दोन कोटी लोकांपर्यंत पोचलाय. आणि जगातही ट्रेंडिंग झालाय.
मॅन वर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याचं कसब शिकवतो. उद्या आपण बर्फाळ प्रदेशात किंवा वाळवंटात गेलो आणि तिकडे अडकलो तर काय? अशावेळी काय करायचं हेच शिकवल्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांच्या आवडीचा बनला.
बाकी काहीही म्हणा पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्सला घेऊन आपल्याला प्राणी संवर्धनाचे धडे कसे देतायत हे बघायलाच हवं. त्यासाठी सोमवारी १२ ऑगस्टपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे.
हेही वाचा:
बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?
विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?