कंटेंटच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केला होता. स्वतःला ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर’ म्हणवणारे हे लोक आजच्या तरुणाईचा आदर्श ठरू पाहतायत.
भारतात टॅलेंटची मुळीच कमतरता नाहीय. पण बऱ्याचदा ते चुकीच्या ठिकाणी वापरलं जातं. ‘म्युझिकली’चं ‘टिकटॉक’ झाल्यावर या ‘टॅलेंट’ला अक्षरशः उत आला. अवघ्या पंधरा ते तीस सेकंदाचे, फिल्मी गाणी किंवा संवादावर लिपसिंक केलेले वीडियो नव्या पिढीचा ‘कंटेंट’ म्हणून वायरल होऊ लागले. टिकटॉक भारताचं नवं सोशल मीडिया अॅप बनतंय की काय असं वाटत असतानाच सरकारने त्याच्यावर बंदी आणली. त्याची जागा इंस्टाग्रामच्या ‘रील्स’ने घेतल्यावर मात्र सगळं चित्रच पालटलं.
एक चित्र १०० शब्दांपेक्षा जास्त प्रभाव पाडतं, असं म्हणतात. इंस्टाग्रामची निर्मिती याच आधारावर केली गेलीय. इथं फेसबुकसारखी पोस्ट लिहण्यापेक्षा फोटो किंवा वीडियोमधून युजर व्यक्त होतात. सिनेजगतातल्या सेलिब्रिटींसोबतच वेगवेगळ्या ब्रँड्सने कुशीत घेतलेला हा प्लॅटफॉर्म रील्स आल्यानंतर जनसामान्यांच्या आणखी जवळचा झाला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं रील पोचवण्यासाठी टिकटॉकवरच्या कंटेंट क्रिएटरनी वेगवेगळा फंडा वापरायला सुरवात केली.
टिकटॉक भारतातून कायमस्वरूपी बंद होण्यापूर्वी त्यावर वायरल होणाऱ्या अश्लील कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. सेन्सॉरचं बंधन नसल्यामुळे नग्नता किंवा अश्लीलता वायरल झाल्याची बोंब उठल्यावर टिकटॉक भानावर आलं. पण तोवर पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं होतं. आपला कंटेंट जास्तीत जास्त वायरल कसा करायचा याचं सूत्र आता जगजाहीर झालं होतं.
भारतीय प्रेक्षक हा शिवीगाळ, नग्नतेने भरलेल्या कंटेंटचा मोठा दिवाना आहे, हे वेबसिरीजवाल्यांना आधीच कळालं होतं. ते लोण या कंटेंट क्रिएटर्सपर्यंत उशिरा का होईना, शेवटी पोचलंच! तुमचे फॉलोवर्स जास्त असतील तर तुमचा कंटेंट वायरल होतोच! पण हे फॉलोवर्स कमावण्यासाठी काही तरी कंटेंट हवा असतो. या समीकरणाला लक्षात घेऊन कंटेंट बनवणं सुरु झालं.
त्यात इंस्टाग्रामच्या कंटेंटवर सेन्सॉरचं बऱ्यापैकी लक्ष असल्यामुळे नग्नता किंवा अश्लीलता असलेला कंटेंट पोस्ट करता येणार नव्हता. त्यामुळे ‘भडक’ कंटेंटची जबाबदारी घाणेरड्या शिव्यांवर येऊन पडली. जितक्या घाण आणि किळसवाण्या शिव्या, तितका त्या कंटेंटचा पोच वाढू लागला. हळूहळू या शिव्यांच्या जोडीला गुन्हेगारी स्वरूपाचे संवादही वाऱ्याच्या वेगाने वायरल होऊ लागले आणि यातूनच गल्लीबोळात स्वयंघोषित क्वीन, भाऊ, किंग जन्माला आले.
हेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय
मुंबईच्या खारमधला विकास फाटक हा सोशल मीडियावर ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याच्या स्थानिक वर्तमानपत्रासाठी क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणारा विकास गेली तीन वर्षं प्रसिद्धीच्या झोतात आहे. लाजाळू स्वभावामुळे कारमधे बसून वीडियो बनवण्याची त्याची स्टाईल त्याला ‘बिग बॉस’सारख्या मोठ्या रिअॅलिटी शोमधे घेऊन गेली. ‘जय हिंद दोस्तो’ म्हणत आपल्या वीडियोला सुरवात करणारा विकास त्याच्या अनुयायांच्या नजरेत एक सच्चा देशभक्त आहे.
विकासच्या गळ्यातलं सोनं, ऐशोआरामाचं राहणीमान हे त्याच्या प्रसिद्धीचं कारण नव्हतं. तो वायरल झाला ते त्याच्या शिव्यांमुळे. सुरवातीला पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर्सला शिवीगाळ करत चिडवणाऱ्या विकासने नंतर भारतातल्या कंटेंट क्रिएटर्सकडे मोर्चा वळवला. कधी ‘ब्राम्हण असल्याचा माज आहे’ बोलत, तर कधी कुराणमधली पाठ असलेली ‘आयत’ म्हणून दाखवत तो फॉलोवर्ससाठी ‘हिंदुस्तानी भाऊ’ बनला.
त्याच्या शिव्यांमुळे त्याचं युट्यूब आणि इंस्टाग्रामवरचं अकाऊंट काढून टाकण्यात आलं. पण तरीही तो वेगवेगळे अकाऊंट बनवून वीडियो बनवतच असतो. इंडियन एक्सप्रेसच्या मते, त्याचं पहिलं युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाऊंट बंद होण्यापूर्वी त्याच्या फॉलोवर्सची संख्या जवळपास ३० लाखाच्या घरात होती. मोठमोठ्या सिनेकलाकारांपासून ते अरुण गवळीसारख्या कुख्यात गुन्हेगारापर्यंत विकासची क्रेझ पोचलीय.
नुकतीच चर्चेत आलेली ‘थेरगाव क्वीन’ हे ‘हिंदुस्तानी भाऊ’चंच लेडी वर्जन मानलं जाऊ शकतं. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधे राहणाऱ्या साक्षी श्रीश्रीमाळ आणि साक्षी कश्यप या तरुणी हे इंस्टाग्राम अकाऊंट चालवतात. आमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही, अशा थाटात या मुली शिवीगाळ करत वीडियो बनवायच्या. त्यांचा हा बिनधास्त, बेधडक अंदाज पाहून यांचे फॉलोवर्स झटपट वाढले. काही हजारांमधे या अकाऊंटचे फॉलोवर्स आणि चक्क फॅनपेजेसही आहेत!
फेसबुकवर ‘फ्रेंड्स’ म्हणजेच मित्र असतात तर इंस्टाग्रामवर ‘फॉलोवर्स’ म्हणजेच अनुयायी असतात. तांत्रिकदृष्ट्या दोघेही वापरकर्तेच असले तरी त्यामागचा अर्थ आणि महत्त्व फार वेगळं आहे. इथं वाचनापेक्षा जास्त भर बघण्यावर असतो. ‘जो दिखता है वही बिकता है’ हे सरळसोपं धोरण इंस्टाग्रामवरच्या कंटेंटची उपयुक्तता ठरवतं. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा कंटेंटही तुम्हाला रंक किंवा राव बनवतो. ‘जितका भडक कंटेंट, तितका मोठा प्रेक्षकवर्ग’ या सूत्रानुसार क्वीन आणि भाऊचा कंटेंट दिवसेंदिवस भडक होत राहिला.
वीडियो पोस्ट केला तर बाद होतोय हे कळल्यावर भाऊने इंस्टाग्राम स्टोरीवर लाइव बोलणं सुरु केलं. या ‘इंस्टाग्राम स्टोरी’ साधारण वीडियो कॉलसारख्या असतात. पण आपण कुणाशी, काय, कसं बोलतोय हे आपले फॉलोवर्स बघू शकतात, हाच काय तो दोघांमधला फरक. कुणालातरी कॉल करणे आणि शिवीगाळ करणे हा भाऊचा नवा कंटेंट बनला. यात त्याच्या हिटलिस्टवर दीपक कलाल हा त्याच्यासारखाच एक कंटेंट क्रियेटर आला.
भाऊच्या स्टोरीमधे दीपक कलालला त्याच्या समलैंगिक असण्यावरून, त्याच्या हावभावांवरून चिडवलं जायचं. समलैंगिकांचा द्वेष करणं किंवा होमोफोबिया हा भारतात गुन्हा नसला तरीही ते निंदनीयच आहे. समलैंगिकांना, विशेषतः गे किंवा क्रॉसड्रेसर्सना मिठा, हाफ बिर्याणी, कन्या रास म्हणून हिनवण्याची कुप्रथा भाऊसारख्याच तथाकथित ‘इंफ्लुएंसर’नी सुरु केली. दुर्दैवाने, त्यांच्या फॉलोवर्सनीही हे सगळं नॉर्मल असल्याच्या थाटात ती प्रथा सुरूच ठेवलीय.
‘थेरगाव क्वीन’चा कंटेंट म्हणजे बलात्काराच्या धमक्या देणं, अश्लील शिवीगाळ करणं, महिलांची विटंबना करणं, खुनाची धमकी देणं अशा गुन्ह्यांची चालतीबोलती जंत्रीच जणू. कुठल्यातरी प्रतिस्पर्ध्याला हिणवण्यासाठी वीडियोमधे सॅनिटरी पॅडचा वापर करत क्वीनच्या कंटेंटनं विकृतीचा कळस गाठला होता. ‘सरकारी नोकरीवाला नको तर गुन्हेगार नवरा हवा’ अशा आशयाचा वीडियो करत ‘येरवडा जेल’ला पुण्यभूमीचा दर्जा देणारी ही क्वीन हजारोंच्या गळ्यातला ताईत आहे.
हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊने बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी मुलांना आंदोलन करण्याचा इशारा दिला. दुसऱ्याच दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या धारावीतल्या घरासमोर हजारो विद्यार्थ्यांनी निदर्शनास सुरवात केली. या आंदोलनाचा मागोवा काढताना हिंदुस्तानी भाऊचं नाव समोर आलं. त्याच्याच सांगण्यावरून राज्यभरातल्या शिक्षण महामंडळांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले होते.
मोर्चा जमल्यानंतर काही तासांनी भाऊ घटनास्थळी पोचला. पण त्यावेळी विद्यार्थ्यांचा जोश पाहता पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता मोर्चा पांगवला. निवेदन न देता आंदोलन करणं चूक आहे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू आणि वर्षा गायकवाड यांनी भाऊला चर्चेचं आमंत्रण दिलं. त्यानंतर चिथावणीच्या आरोपाखाली भाऊला अटक केली गेली. पोलीस चौकशीत मात्र ‘रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांची जबाबदारी मी का घेऊ’ म्हणत या भाऊने हात झटकलेत!
पोलिसी खाक्या दाखवल्यावर गेंड्याच्या कातडीचे खरे गुन्हेगारही वरमतात, तिथं या तथाकथित भाऊ आणि क्वीनचा काय निभाव लागणार? ‘थेरगाव क्वीन’ आणि तिच्या साथीदारांना पुण्याच्या वाकड पोलीस स्टेशनमधे आणल्यावर त्यांची गुर्मी बरोबर उतरली. आम्ही फक्त लाईक मिळवण्यासाठी असे वीडियो बनवत असल्याचं त्यांनी मान्य केलं. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली.
फक्त मनोरंजन म्हणून सुरु झालेला हा ट्रेंड उद्याच्या पिढीसाठी किती घातक आहे याची प्रचिती आता धारावी आंदोलन आणि थेरगाव प्रकरणावरून आलीय. या शिवराळ इंफ्लुएंसर प्रजातीला फॉलो करणाऱ्यांमधे किशोरवयीनांचा टक्का मोठा आहे. बिनधास्त, बेधडक अंदाजात शिव्या देणारे भाऊ, क्वीनसारखे बरेचजण आहेत.
आपण कितीही शिवीगाळ केली, धमक्या दिल्या तरी आपलं अकाऊंट बंद करण्यापलीकडे व्यवस्था आपलं काही बिघडवू शकत नाही, असा या इंफ्लुएंसर लोकांचा समज आहे. दुर्दैवाने, हाच गैरसमज त्यांच्या फॉलोवर्समधेही पसरलाय. मनोरंजनाच्या नावाखाली आपण नक्की कोणत्या विकृतीला पाठीशी घालतोय, याचं भान हे फॉलोवर्स गमावून बसलेत.
कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली न वावरणारा, शासनमान्य विद्यार्थी संघटनांशी काडीचाही संबंध नसलेला भाऊ आपल्यासाठी रस्त्यावर उतरला याचं त्यांना अप्रूप आहे. सोशल मीडियावर खुलेआम बलात्कार आणि लैंगिक हिंसेच्या धमक्या देणाऱ्या पोरी यांना महाराण्या वाटतात. नव्या पिढीला यांची शिवराळ भाषा म्हणजे प्रचलित व्यवस्थेविरोधात बंड आणि विद्रोहाचं प्रतिक वाटते. पण या बंडाचा उथळपणा खाकीसमोर उघडा पडला.
आता या कारवाईनंतर हे लोक किती सुधारतील हा मोठा प्रश्नच आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधे उपेंद्र लिमये म्हणतो तशी ‘पोलीस चौकी म्हणजे या लोकांसाठी ज्युनियर, सिनियर केजी!’ आपल्या वीडियोमधून गुन्हेगारी जगताचं उदात्तीकरण करणारे हे दादा, क्वीन या कारवाईने आता कदाचित सुखावलेही असतील. त्यांचे सोशल मीडियावरचे आंधळे अनुयायी या कारवाईला टाकीचे घाव समजून त्यांना देवपणाला पोचवू नयेत म्हणजे मिळवलं.
हेही वाचा :
ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर
फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?
सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?