भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!

२८ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत.

'जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म सुरू होते; म्हणून ते सुपर सायन्स आहे,' या थोतांडाची लोकमानसात प्रतिष्ठापना करण्यासाठी, अक्कल पाजळण्याचा खोटेपणा देशात गेली काही वर्षं राजरोस सुरू आहे. तो धर्मवादाला उधाण आणून राजकीय सत्तास्वार्थ साधणाऱ्यांसाठी होता आणि आहे. या थोतांडाच्या प्रचारार्थ, स्वतःला उच्च- अतिउच्च शिक्षित म्हणून मिरवून घेणारे, 'विज्ञान आणि अध्यात्म यात किती सूक्ष्म फरक आहे,' ते सांगण्यासाठी आपल्या बुद्धीला ब्रह्मगाठ मारून जातीनिशी लिहीत-बोलत होते. त्यात 'परम कॉम्प्युटर'च्या कथित संशोधनाने 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार पटकावलेले 'विज्ञानाचार्य' डॉ. विजय भटकर हे म्हणजे पुण्यातल्या 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई'च्या गणपतीच्या तुलनेत; सदाशिव पेठेत अंगभूत मुकुट असलेला तीन फुटी 'चिमण्या गणपती'च म्हणा ना!

या सार्यान 'सुपर सायन्स'वाल्या अध्यात्म प्रचारकांचे थोबाड 'कोरोना'ने फोडलेय. गेले ५ महिने अवघं जग 'कोरोना'च्या जीवघेण्या दहशतीने हवालदिल झालंय. महासत्तांचा माज उतरलाय. व्यापार-व्यवहार थांबलाय. अर्थ व्यवस्थेची घडी पार विस्कटलीय. विदेश भ्रमंतीची चैन करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही तोंडाला फडकं बांधून देशात फिरावं लागतंय. ही वेळ का आली? तर वैज्ञानिक विचारशक्तीचा अभाव! या विचारशक्तीचा अंगीकार करीत भारतानंतर स्वतंत्र झालेले छोटे छोटे देशही भारताच्या कित्येक पटीने प्रगत झाले. पण आपण कुठे आहोत?

पुण्याएवढं कतार जास्त प्रगत

अलीकडेच फ्रान्सकडून खरेदी केलेली 'राफेल' ही ५ लष्करी विमानं भारतात आली. ही विमानं आधुनिक तंत्रज्ञानयुक्ते आहेत. त्यांचे पूजापाठाने स्वागत झाले. हा आपला आध्यात्मिक बाणा! प्रत्येकी १,७०० कोटी रुपयांच्या या विमानांना पाकी-चिनी-अफगाणी-नेपाळी 'नजर' लागू नये, म्हणून विमानाच्या पुढच्या चाकांना लिंबू-मिरच्या-कोळशाच्या तुकड्याचा 'तोडगा' बांधला असेल, तर ती आपली श्रद्धा! विमानाच्या आधुनिकतेला फासली जाणारी ही 'काळोखी' खुल्या डोळ्यांनी पाहायची, ही तर आपली भक्ती! पण यात बुद्धी- विचारांची शक्ती किती आणि ती तपासायची कशी ?

आपल्या देशाचं एकूण क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार ५९० चौरस किलोमीटर आहे. यातील पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ १५ हजार ६४२ चौरस किलोमीटर आहे. इराणचे आखात आणि सौदी अरेबिया यांच्या बेचकीत 'कतार' हा छोटासा देश आहे. तिथे पारंपरिक राजेशाही आहे. 'इस्लाम' हा 'कतार'चा राजधर्म आहे. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला कतार ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान झाले. १९७१ मध्ये 'कतार'ला स्वातंत्र्य मिळाले. या 'कतार'चं एकूण क्षेत्रफळ ११ हजार ५७१ चौरस किलोमीटर आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यापेक्षा ३० टक्के कमीच!

'कतार'कडे आज २४ 'राफेल' विमानं आहेत आणि त्यात १२ची भर पडणार आहे. भारताच्या लष्करी ताफ्यात आता कुठे ५ राफेल विमानं दाखल झालीत. लवकरच ऑर्डरीनुसार, ३६ राफेल विमानं दाखल झाली तरी, या वाढत्या बळाची ताकद पुणे जिल्ह्यापेक्षा लहान असलेल्या 'कतार' एवढीच असणार, हे अध्यात्मयोगात गटांगळ्या खाणाऱ्या भक्तांना कसे आणि कधी कळणार ?

हेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'!

लस हेच सत्य!

दारुडे एका बाटलीत टोलेजंग मशीद कसे हलवतात, ते मिर्झा गालिबने नेमक्या शब्दांत सांगितले आहे. तसाच पराक्रम भक्त मंडळींनी देशात 'कोरोना लॉकडाऊन' जारी असताना ५ 'राफेल' विमानं येताच; ५०० 'राफेल' आल्यासारखा धिंगाणा 'सोशल मीडिया'वर घालून केला! हा 'पिंडी ते ब्रह्मांडी' या मुंगीलाही मेरू पर्वत गिळायला लावणाऱ्या अध्यात्माचा पराक्रम आहे. तिथे 'राफेल'सारखं आधुनिक तंत्रज्ञानाचं विमान आपण का बनवू शकलो नाही, हा प्रश्न फिजूल ठरतो. कारण तेव्हा या भक्त मंडळींना 'आद्य विमान निर्मिती'चा 'रामायणा'तला दाखला आठवत नाही ना!

तसेच आता 'कोरोना' महामारीने गेले ५ महिने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले तरी; विज्ञानाला हलकं, दुय्यम ठरवण्यासाठी 'देव-धर्म-संस्कृती-दैव-मोक्ष-पुनर्जन्म-ज्योतिष- कर्मफळ' यांना एकत्र वाटून-घाटून पकवलेलं अध्यात्म ऊर्फ 'सुपर सायन्स' काय करतंय? याचा जाब विचारायचं कुणाला सुचतच नाही.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'महाभारत' मधील १८ दिवसांच्या युद्धाचा दाखला देत, २१ दिवसांचा देशव्यापी पहिला 'लॉकडाऊन' जाहीर केला. २१ दिवसांचे २१ आठवडे उलटले, तरी 'कोरोना' विरुद्धचे युद्ध अजून संपले नाही. म्हणजे दाखल्याप्रमाणेच 'महाभारत' हेदेखील  कल्पनाविलासच आहे, हे सिद्ध झाले. मग सत्य काय आहे? वैज्ञानिक संशोधनातून निर्माण होणारी लस-वॅक्सिन हेच सत्य आहे!

साधू कोरोना का संपवत नाहीत?

या लसीच्याच प्रतीक्षेत आज जगभरातील सारी मानव जात आहे. या 'वॅक्सिन'च्या प्राप्तीसाठी कोणी सिद्धपुरुष हिमालयात तपस्येला बसलेला नाही. 'सनातन'चे स्वामी जयंत आठवले यांनी आपले पंजे एकमेकांवर घासले की, त्यातून सोन्याचे कण निघतात, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी 'पत्रकार परिषदे'तून दिली होती. मग या 'पपूं'ना जगाच्या कल्याणा जाऊ देत; केवळ 'हिंदूरक्षणार्थ' हात चोळून 'वॅक्सिन'ची धार काढायला का सुचत नाही?

विद्यमान चार शंकराचार्यांचे 'बाप' म्हणजे 'स्वयंघोषित जगद्गुरू' झालेले 'माजी फ्रॉड ग्रामसेवक' नरेंद्र महाराज!  ते  ५ रुपयांच्या पेनाला आपला फोटो लावून, ते 'जगबुडी पासून वाचवणारं सुरक्षाकवच' म्हणून ५० रुपयांना आपल्या भक्तांना विकत. तरीही या 'सुरक्षाकवचा'सह त्याचे शेकडो भक्त 'कोरोनाच्या फटक्यात' कसे गेले? 'तुमच्यावर बलात्कार झाला, तर या बापूला हाक मारा. मी तो बलात्कार अंगावर घेईन,' असे हौसेने सांगणाऱ्या अनिरुद्धबापूने 'अंबज्ञ- नाथ संविद' म्हणत एकाचे तरी 'कोरोना' संकट अंगावर घेतलं का?

कॅन्सर, किडनी डिसीज सारख्या आजारांचे रिपोर्ट केवळ ज्याच्या नामस्मरणाने 'पॉझिटिव'चे 'निगेटिव' झालेत; अशी ख्याती असलेल्या अनिरुद्ध बापूचा वापर 'ठाकरे सरकार'ने 'कोरोना'मुक्त महाराष्ट्रासाठी करून घेतला पाहिजे होता. त्याने 'कोविड सेंटर-हॉस्पिटल' उभारण्यासाठी सरकारचे करोडो रुपये खर्च झाले, ते वाचले असते! पण हेही सगळे मोदींच्या 'महाभारता'च्या दाखल्यासारखेच खोटे निघाले.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं! 

विज्ञानात खात्री आहे

जागृत देव-देवताही दगडासारखा वागल्यात. दारूच्या वा मटक्या अड्ड्यावर व्यसनीने तिरीमिरीत वेळेवर जावं; तशी वेळ गाठण्यासाठी भाबड्या भाविकांना हातातलं काम सोडून धावायला लावणाऱ्या सत्संग- स्वाध्याय- बैठकीचा बाजार किती खोटा आहे, तेही 'कोरोना'ने दाखवून दिलंय. याच्या साक्षीसाठी बाबा महाराज सातारकर यांची मुलगी-नातवाच्या भजन-प्रवचनाची 'यू-ट्यूब'वरची यंदाची 'पंढरीची वारी' पहा. ही मंडळी आपल्या 'दिव्य दर्शना'च्या हव्यासासाठी नटून-थटून 'विज्ञान-तंत्रज्ञाना'चा वापर करतात, पण बाता भाकड अध्यात्माच्या मारतात! 'अं...हं'च्या पालुपदात आपल्या अहंकाराचे प्रदर्शन घडवतात. समोर गिऱ्हाईक नसली तरी, 'आमचे दुकान जोरात आहे,' हे दाखवण्यासाठी साधकांच्या नामस्मरणाची आकडेवारी लॉटरीच्या निकालासारखी सांगतात.

अध्यात्म-भक्ती काही वाईट नाही. पण त्यातले साक्षात्कार, चमत्कार, अनुभूती संकटकाळात कामाला येत नसतील, तर अध्यात्म काय चाटायचंय? पुण्य संचयाची, पापक्षालनाची, मोक्षाची लालूच दाखवून उजळणारे अध्यात्म, भक्ती, उपासना हे 'कोरोना'सारख्या संकटकाळात खोटेच ठरणारच होते. कारण अध्यात्मामुळे फक्त मन:स्थिति बदलते; परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलण्याचे काम विज्ञान करते. ते विज्ञानच आज जगातल्या प्रत्येक माणसाला सांगतंय, 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!'

हा 'स्वामी समर्थ'ची विकाऊ बोध नाही. कारण विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. अब्जावधी रुपये या संशोधनासाठी खर्च होत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत. माणूस म्हणून एवढं समजून घेतलं तरी, त्यांना संशोधन, बुद्धी- शक्ती, श्रम सार्थकी लागल्याचं समाधान लाभेल!

हेही वाचा : 

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या ताज्या अंकातील आहे.)