अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द!
११ सप्टेंबरला दुबईत श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवत आशिया कप जिंकला, ही आनंदाचीच गोष्ट होती. हा आनंद दोन कारणांसाठी होता. एक म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवल्याचा. पण त्याहून जास्त आनंद होता तो, होरपळलेल्या श्रीलंकेला या विजयानं कितीतरी दिवसांनी आनंदाचे क्षण मिळाले, त्याचा!
श्रीलंका आशिया कप जिंकेल, असं भाकीत कुणी जर स्पर्धेच्या सुरवातीला केलं असतं, तर ते स्वप्नरंजन ठरलं असतं. कारण या वर्षी खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ९ सामने हारून ते दुबईत पोचले होते. त्यात पहिल्या सामन्यात त्यांना अफगाणिस्ताननं धूळ चारली.
अफगाणिस्तानची टीम आज नवशिकी राहिली नाही. जगातला उत्तम फिरकी मारा त्यांच्याकडे आहे. पण, तरीही अफगाणिस्तानकडून पराभव ही जुन्या टीमला कायम नामुष्कीच वाटते. एखाद्या गोष्टीचा नीचांक गाठला की, पुढे एकच दिशा उरते, ती म्हणजे त्या रसातळाच्या पातळीवरून वर येण्याची. अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव हा श्रीलंकेचा तो नीचांक होता.
या पराभवानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. यात भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं आणि पाकिस्तानला सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचे हे विजय म्हणजे काही नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती ती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी मारायची जिद्द!
हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
वनडे वर्ल्डकपमधली एके काळची ही विश्वविजेती टीम गेली काही वर्षं नवीन टीम बांधायच्या संक्रमण अवस्थेतून जात होती. पण, संकटं एकटी येत नाहीत. तशी या संक्रमणावस्थेला जोड होती, ती श्रीलंकेतल्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीची. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ यथार्थ ठरेल, असं हे पाचूचं बेट दृष्ट लागावं असं. पण, त्याला खरोखरच दृष्ट लागली.
राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांच्या कॅबिनेटमधल्या सर्व २६ सदस्यांनी ३ एप्रिल २०२२ला राजीनामे दिले आणि श्रीलंकेत अभूतपूर्व अशी आर्थिक आणीबाणी आली. विविध धोरणांमुळे आणि कोरोनामुळे आधीच खंगलेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्ण रसातळाला गेली आणि देशभर आगडोंब उसळला. देशात इंधन मिळणं हे सोन्याइतकं मौल्यवान झालं.
या राजकीय आणि आर्थिक अवस्थेतून श्रीलंका मार्गक्रमण करत असताना, त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका मायदेशात खेळल्या. पण, आशिया कप आयोजित करणं श्रीलंकेच्या आवाक्याबाहेर जात होतं. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅशली डिसिल्वा यांनी प्रांजळपणे कबूल केलं की, दोन देशांमधल्या मालिका आयोजित करणे त्या परिस्थितीत एकवेळ शक्य होतं.
पण, आशिया कप म्हणजे पात्रता फेरीचा विचार करता, ९ संघांचं आयोजन आलं. प्रत्येक टीमला प्रवासातही बसची म्हणजेच पर्यायानं इंधनाची सोय, त्यांचं सामान वाहून न्यायला वेगळ्या गाड्या, आयोजकांचा प्रवास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसरात्र सामन्यासाठी लागणारे प्रकाशझोत ज्या जनरेटर वॅनवर असतात, त्यांचं प्रचंड इंधन इतकी तजवीज करणं श्रीलंकेला अशक्य होतं.
गॅलन सोडून मिलीलिटरमधे इंधनाची उलाढाल होत असलेल्या श्रीलंकेला हा आशिया कप आयोजित करणं शक्य नाही, हे नक्की झाल्यावर तो दुबईला हलवला. भारत किंवा पाकिस्तानात आयोजन शक्य नव्हतं. बांगलादेश हा एक पर्याय होता. सध्या दुबई ही संकटमोचन भूमी झालीय. आयपीएल असेल किंवा पाकिस्तान क्रिकेट लीग, देशात अडचण असली की दुबईचं मैदान मदतीला धावून येतं. श्रीलंकेला मायभूमीत आशिया कप खेळायची संधी अशी हातोहात गेली.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
या सर्व गदारोळात श्रीलंका टीम बांधली जात होती. मायदेशात त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिका अनिर्णित राखल्या, तर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हरवलं. पण, तरीही श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता.
आशिया कपमधे पहिला सामना हरल्यानंतर मात्र कॅप्टन दसून शनाकानं आपापली बलस्थानं कुठली आणि त्यांचा फायदा कसा उठवायचा याबद्दल टीमशी चर्चा केली. जयसूर्याच्या काळातल्या श्रीलंकेच्या फलंदाजीच्या दबदब्याचा अस्त झाल्यावर धडकी भरवणारे बॅट्समन श्रीलंकेत फारसे निर्माण झाले नाहीत. पण अनेक गुणवान ऑल-राउंडर तयार झाले.
आशिया कपच्या फायनलमधल्या श्रीलंकेच्या कामगिरीचं प्रेरणास्थान चेन्नई सुपर किंग्जचा २०२१च्या फायनलमधला इथला विजय हे होतं. दुबईला पहिली बॅटींग करणं म्हणजे सामना हरणं, हे समीकरण धोनीच्या चेन्नई टीमनं २०२१ला बदलून दाखवलं. दुबईच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना गेल्या दोन वर्षांत फक्त स्कॉटलंड आणि आयर्लंड हरलंय. या पार्श्वभूमीवर जेव्हा श्रीलंकेनं टॉस गमावला तेव्हा सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता.
पहिल्या पॉवरप्लेमधे तीन गडी गमावत नवव्या ओवरमधे जेव्हा श्रीलंकेची अवस्था ५ बाद ५८ झाली तेव्हा तो निकाल अधिकच ठळक झाला. फायनल अगदीच एकतर्फी होतेय आणि पाकिस्तानच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे, असं वाटत होतं. याचवेळी श्रीलंकेच्या मदतीला धावून आला तो राजपक्षे. आधी ऑल-राउंडर हसरंगा आणि नंतर करुणरत्नेच्या जोडीनं त्यानं श्रीलंकेला १७०चा टप्पा गाठून दिला.
श्रीलंकेचा कॅप्टन शनाका सांगतो, १६० आणि १७०मधे जरी १० धावांचा फरक असला तरी १७० हे आव्हानात्मक ठरतं आणि आम्हाला ते गाठायचं होतं. एका राजपक्षेनं देशाच्या राजकारणात धुमाकूळ घातला, तर इथं दुसर्या राजपक्षेनं दुबईच्या मैदानात धुमाकूळ घातला. शेवटच्या दोन बॉलवर १० धावा वसूल करून श्रीलंकेनं आपल्या टीममधे नवसंजीवनी आणली.
हेही वाचा: सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही
पाकिस्तानची ढिसाळ फिल्डींगही श्रीलंकेच्या मदतीला धावून आली. पाकिस्तानची सुरवात अडखळत झाल्यावर ज्या बाबर, फकर आणि रिझवान त्रिसूत्रीवर पाकिस्तान अवलंबून आहे, त्यापैकी रिझवाननं सामन्याची सूत्रे हातात घेतली. त्यात श्रीलंकेनं एक डीआरएस घेतला नाही आणि पाकिस्तानचं पारडं जड होतंय, असं वाटायला लागलं.
हंसरंगानं सोळाव्या ओवरमधे श्रीलंकेला धोकादायक ठरत असलेल्या रिझवानसकट तीन विकेट घेऊन पाकिस्तानच्या बॅटींगचं कंबरडं मोडलं. जोडीला प्रमोदचा भेदक मारा आणि उत्तम फिल्डींगच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं.
श्रीलंकेतल्या जनतेसाठी हा विजय त्यांच्या होरपळलेल्या जखमांवर फुंकर मारणारा आहे. क्रिकेटच्या विजयानं आर्थिक जखमा भरून येणार नाहीत. पण, कधी कधी अशा औषधांची गरज असते. श्रीलंकेचा विजय हा येणार्या ट्वेन्टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या आपल्या तयारीसाठी धोक्याची घंटा आहे. पण, या घडीला तरी आपल्या या शेजार्याचं कौतुक केलं पाहिजे.
लंकेत आज सोन्याच्या विटा नाहीत. सोन्याचा धूर निघत नाही. पण, गतवैभवाची अशी एखादी चमक दिसते तेव्हा ती नुसती चमक नसते, तर ती ठिणगी असते. गुणवत्तेनं भरलेल्या श्रीलंका टीमला पुन्हा धगधगीत करायला ही एखादी ‘ठिणगी’ही पुरेशी आहे. येणार्या वर्ल्डकपमधे श्रीलंका टीमच्या या आशादायक कामगिरीचे पडसाद उमटतील.
हेही वाचा:
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट